मोदीजी… तुमच्या प्रिय गंगा नदीसाठी जीव गमावणाऱ्या स्वामींच्या मृत्यूस जबाबदार कोण?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
काल म्हणजेच ११ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास प्रोफेसर जी. डी. अगरवाल ह्यांचे हृषीकेश येथे दु:खद निधन झाले. प्रोफेसर जी.डी. अगरवाल म्हणजेच स्वामी ज्ञानस्वरूप सानंद ह्यांनी गंगानदीच्या पुनरुज्जीवनासाठी आयुष्यभर प्रयत्न केले आणि ह्याच कारणासाठी आमरण उपोषण करताना काल त्यांनी देह ठेवला.
त्यांनी ह्या आमरण उपोषणाबद्दल पंतप्रधान नरेंद मोदी ह्यांना २४ फेब्रुवारी २०१८ रोजी एक पत्र लिहून कळवले होते. उपोषण सुरु करण्याच्या चार महिने आधीपासून कल्पना देऊनही गंगा नदीच्या पुनरुत्थानासाठी काही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत .
जेव्हा स्वामीजींच्या पहिल्या पत्राला पंतप्रधानांकडून काहीही उत्तर आले नाही, तेव्हा त्यांनी १३ जून २०१८ रोजी पुन्हा एक पत्र लिहिले.
ह्यात त्यांनी असे लिहिले की त्यांना पंतप्रधानांकडून काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांच्याकडे उपोषण सुरु करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. अखेर स्वामीजींनी २२ जून २०१८ रोजी आमरण उपोषणास प्रारंभ केला.
२३ जून २०१८ रोजी स्वामीजींनी परत एक पत्र लिहिले व त्याबरोबर आधीची म्हणजेच २४ फेब्रुवारी व १३ जून रोजी लिहिलेली दोन्ही पत्रे जोडली. ह्या पत्रात त्यांनी असे लिहिले की त्यांना पंतप्रधानांकडून काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी २२ जून २०१८ पासून हरिद्वारच्या मातृसदन येथे आमरण उपोषण सुरु केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या शासनाने ह्याबाबतीत काहीही ठोस पावले उचलली नाहीत तसेच ह्याला गंभीर प्रतिसाद सुद्धा दिला नाही.
स्वामीजींनी काही दिवसांपूर्वी उपोषणादरम्यान पाणी सुद्धा न पिण्याचा निर्णय घोषित केला होता आणि ९ ऑक्टोबर २०१८ पासून त्यांनी पाणी घेणे सुद्धा बंद केले होते.
१० ऑक्टोबर २०१८ रोजी पोलिसांनी त्यांना हृषीकेश येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे दाखल केले. तेथे त्यांना जबरदस्तीने आहार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या ११ ऑक्टोबर २०१८ म्हणजे काल दुपारी तीन ते चारच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गंगानदी किनारी आपली भारतीय संस्कृती रुजली. त्या संस्कृतीचा भाग असलेल्या असलेले आपण इतके कमनशिबी आणि करंटे आहोत की आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग असलेल्या गंगा नदीच्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न करणाऱ्या एका तपस्व्याला आपण सहज गांभीर्याने घेत नाही. त्यांचे उपोषण सरकार इतके लाइटली कसे काय घेऊ शकते?
ह्या नदीवर अर्थकारण अवलंबून असून सुद्धा आपले सरकार सुद्धा त्या नदीच्या पुनरुत्थानासाठी काहीही पावले उचलत नाही?
गंगानदी मातृस्थानी मानणाऱ्या प्रत्येक भारतीयाला लाज वाटली पाहिजे. इमोशनल कारणे, धार्मिक कारणे एक वेळ बाजूला ठेवूया, परंतु ह्या पर्यावरणाच्या दृष्टीने आणि अगदीच प्रॅक्टिकलदृष्टीने विचार करायचा झाल्यास अर्थकारणाच्या दृष्टीने सुद्धा गंगा नदी आपल्यासाठी तितकीच महत्वाची आहे. मग ह्या नदीच्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न व्हायला नकोत?
त्याकडे इतके अक्षम्य दुर्लक्ष करणे सरकारला आणि आपल्याला कसे काय परवडू शकते?
स्वामी ज्ञानस्वरूप सानंद ह्यांनी त्यांच्या पहिल्याच पत्रात असे नमूद केले आहे की ह्या उपोषणादरम्यान त्यांचे काहीही बरे वाईट झाल्यास त्यांची गंगा नदीकडे प्रार्थना असेल की ह्यासाठी पंतप्रधानांना जबाबदार धरण्यात यावे.
त्यांच्याआधी सात वर्षांपूर्वी संत निगमानंद ह्यांनीही ह्याच कारणासाठी ११४ दिवस उपोषण केले होते आणि त्यानंतर त्यांनीही देह ठेवला होता.
स्वामी ज्ञानस्वरूप सानंद ह्यांनी भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, कानपुर येथे शिक्षक म्हणून काम केले. ते मूळचे उत्तर प्रदेशातील कांधला मुजफ्फरनगरचे होते. त्यांनी हे उपोषण गंगानदीच्या रक्षणासाठी कडक कायदा व्हावा तसेच ह्या नदीवर जलविद्युत योजनांच्या विरोधात केले होते.
त्यांची गंगा नदीच्या पुनरुत्थानासंदर्भात आणखीही काही मागण्या होत्या. ह्या उपोषणादरम्यान ते फक्त लिंबू, मध, मीठ व पाण्याचे सेवन करीत होते. त्यांनी हे उपोषण सोडावे म्हणून केंद्रीय मंत्री उमा भारती स्वतः त्यांना भेटायला दोन वेळा मातृसदन येथे येऊन गेल्या.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांनीही स्वामीजींना संदेशवाहकासह एक पत्र पाठवून हे उपोषण सोडण्याची विनंती केली पण स्वामीजींनी उपोषण सोडण्यास नकार दिला.
मंगळवारी सकाळी सुद्धा हरिद्वारचे आमदार रमेश पोखरीयल निशंक नितीन गडकरी ह्यांचे पत्र घेऊन स्वामीजींना भेटायला गेले होते. शासन स्वामीजींच्या मागण्यांचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल असा मजकूर त्या पत्रात होता.
ह्या पत्रानंतर स्वामीजींनी सहमती सुद्धा दिली होती अन अचानक संध्याकाळी त्यांनी पाणी सुद्धा ग्रहण न करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला.
स्वामीजींनी देहदानाचा संकल्प सोडला असल्याने त्यांच्या इच्छेचा सन्मान म्हणून एम्स प्रशासनाने तयारी केली आहे. एम्सचे डीन डॉक्टर विजेंद्र सिंह ह्यांनी सांगितले की जेव्हा स्वामीजींची तब्येत चांगली होती तेव्हाच त्यांनी एम्सला देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती व तसे संकल्प पत्र सुद्धा पाठवले होते.
ह्या संकल्प पत्राचे एम्स प्रशासन पालन करेल अशी माहिती डॉक्टर विजेंद्र सिंह ह्यांनी दिली.
पर्यावरणासाठी कार्य करणारे राजेंद्र सिंह ह्यांचे म्हणणे आहे की पर्यावरणासाठी झटणाऱ्या राष्ट्रभक्त स्वामीजींच्या निधनाने त्यांना अतीव दु:ख झाले आहे. सरकार अनेक प्रकारच्या बाबाबुवांच्या भेटी घेत असते पण सरकारने ह्या तपस्व्याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.
स्वामीजींच्या निधनाचे वृत्त काळातच विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल ह्यांनी एम्सला भेट दिली. त्यांनी स्वामीजींना श्रद्धांजली देताना म्हटले की,
“स्वामीजींनी संपूर्ण आयुष्य गंगा नदीसाठी वाहून घेतले. गंगा नदीचे पावित्र्य व अविरलता टिकून राहावी ह्यासाठी त्यांचे प्रयत्न व त्यांची इच्छा अगदी योग्य होती, त्यावर विचार केला जाणे गरजेचे होते. सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले नाही, उलट उमा भारती व नितीन गडकरी ह्या केंद्रीय मंत्र्यांनी वेळोवेळी त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली.”
हेच मत मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत ह्यांनी व्यक्त केले आहे. त्यांनीही स्वामीजींना श्रद्धांजली व्यक्त केली. ते म्हणाले की,
“ह्या तपस्व्याच्या जाण्याने आम्हाला अतीव दु:ख झाले आहे. स्वामीजींचे म्हणणे होते की गंगा नदीसाठी वेगळा कायदा केला जावा व सर्व जलविद्युत प्रकल्प रद्द केले जावे. परंतु ह्या योजना तयार करायला व अमलात आणायला थोडा वेळ लागतो. आमचे सरकार स्वामीजींच्या सतत संपर्कात होते.
राज्य सरकारने ह्या उपोषणाबाबतीत संपूर्णपणे संवेदनशीलता दाखवली होती. त्यांचा जीव वाचावा म्हणून सरकारने प्रयत्न केले होते. डॉक्टरांनी सुद्धा हर तऱ्हेचे प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनीही स्वामीजींच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.
नरेंद्र मोडी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की “जी. डी. अग्रवाल यांच्या जाण्याने त्यांना अतीव दुखः झाले आहे. त्यांची पर्यावरण, शिक्षण, गंगा शुद्धीकरण या बद्दलची आस्था कायम लक्षात राहील.”
हेच नरेंद्र मोडी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि भाजप विरोधी पक्षात असताना अग्रवाल यांनी आमरण उपोषण पुकारले होते. त्यावेळी काँग्रेस सरकार सत्तेत असताना अग्रवाल यांच्याबद्दल मोदींनी केलेली फेसबुक पोस्ट पहा..
सत्तेत आल्यानंतर मोदींची जी. डी. अग्रवाल यांच्याबद्दलची ही काळजी अचानक कुठे गेली?
“नमामि गंगे” सारखे इव्हेंट भाजपच्या निवडणूक प्रचारात अग्रस्थानी असतात. मते मिळवण्यासाठी त्याचा व्यवस्थित वापर केला जातो.
मग गंगेच्या शुद्धीकरणासाठी एखादे स्वामी उपोषण करून मृत्यूला जवळ करेपर्यंत वेळ येते, तेव्हा त्यांची गंगेबद्दलची आस्था कुठे जाते?
पोकळ आस्था दाखवून इव्हेंट साजरे करणे, निधनावर दुखः, शोक वगैरे करणे या पलीकडे जाऊन मोदी आणि त्यांचे सरकार गंगेच्या पुनरुज्जीवनासाठी काय करणार आहेत? या तपस्वीचा मृत्यू तरी त्यांना भानावर आणेल का?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.