Site icon InMarathi

‘तिने’ पासष्टीत पदार्पण केलंय यावर तुमचा विश्वास बसणार नाही!

Rekha-smooch-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

काही चेहरे असे असतात जे सौंदर्याचा मापदंड ठरावेत. मधुबाला नव्हती का तशी? निट आठवा.. नाजूक ओठ, काळेभोर डोळे, लांबसडक केस.. आरसपानी चेहरा आणि दिलखुलास हसू. त्यांनतर हल्ली आपली दीक्षितांची माधुरी. काय ते सौंदर्य .. लाखो दिलो कि धडकन वैगरे का काय ते ती हीच.. घायाळ करायचं फक्त.

पण या दोघीत एक अजून होऊन गेली. मधु अकाली गेली आणि माधुरी नेन्यांकडे गेली पण त्यांच्यामधली रेखा आजही तिथेच आहे.

भानुरेखा गणेसन. निदान हे नाव तरी ओळखण काही अंशी कठीण आहे. जेमिनी गनेसन या तमिळ अभिनेत्याची ही मुलगी.

नाखुशीने का होईना पण वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तोंडावर रंग लावून, नाव बदलून चंदेरी पडद्यावर आली ती मात्र परत गेलीच नाही. १४ ते ६४ या जवळपास ५० वर्षात किती लोकांना तिनं वेड लावलं, किती लोकांच्या रात्री बेजार केल्या हे तिला ठाऊक असणं शक्यच नाही.

 

SpotboyE.com

अस्सल दक्षिणात्य सौंदर्याला उठून दिसेल इतका उत्कृष्ट चेहरा, उर्दूत फार सुंदर शब्द आहे ‘तबस्सुम’ अर्थात गुलाबाच्या ताटव्यासारखे ओठ, हरीणीसारखे घायाळ करणारे डोळे आणि तितक्याच ताकदीचा अभिनय. काय नाही आहे तिच्यात.. सगळच आहे पण सौंदर्य शापित असतं हेच खर. कोणी काहीही का म्हणेना पण हे नाकारता येत नाही.

मधु अल्पायुषी ठरली. ३६ व्या वर्षी गेली. मार्लिन मोन्रोचंही तेच झालं. दोघींचं आयुष्य सारखंच, दुख: सारखंच आणि प्रेमाची कमतरता पण तीच.

दीक्षितांची मधु ती परीस आहे माहित सुद्धा नसणाऱ्या नेन्यांशी लग्न करून, कित्येक हृदयांचा चुराडा करून आंग्लदेशात निघून गेली. रेखा इथेच राहिली पण तशीच इतरांसारखी.. कमनशिबी.

कोणीतरी उर्दू शायर म्हणतो,

ये इश्क नहीं आसान बस इतना समजा लीजिये, आग दर्या है और डूब के जाना है..

हे खर वाटावं असं आयुष्य या सौंदर्यवतींच्या वाट्याला आलं. ज्यावर प्रेम केलं त्याच्याशी लग्न नाही करू शकत आणि ज्याच्याशी लग्न केलं तो आपल्यावर प्रेम नही करत. किती त्रास देणारी भावना असते ना ही…

 

scoopwhoop.com

९० मध्ये रेखानं मुकेश अग्रवाल नावाच्या बीजनेसमन सोबत लग्न केलं खरं पण ती अमिताभ ला विसरू नाही शकली हे ओपेन सिक्रेट आहे. तिच्या घर नावाच्या सिनेमात एक सुंदर गाण आहे गुलजार नं लिहिलेल,

फिर वही रात है ख्वाब की, रात भर ख्वाब में देखा करेंगे तुम्हे..

तीचं – अमिताभचं असच काहीस होतं. आहे सुद्धा. तिनं केलेलं लग्न तरी कुठे टिकलं? वर्षाच्या आतच मुकेशनं आत्महत्या केली. रेखा पुन्हा एकाकी.

एकाकीपणा हा एकाच मित्र असतो शेवटपर्यंत..

६ भावा बहिणीच्या गोतावळ्यातली भानू एकाकीच होती. बापानं कधी तिला आपली मुलगी मानलं नाही. आई सुद्धा काही फार काळ जवळ राहू शकली नाही. भाऊ बहिणी किती ही म्हटले सावत्र. शेवटी नाखुशीनं का होईना पण पडद्याला तिनं जवळ केलं.

‘रंगूला रतन्म’ मधली बालकलाकार ते आताच्या यमला .. मधली ती गाणारी बाई हा प्रवास केला.. जवळपास १८० सिनेमे केले.

सिनेमात रमली त्याही पेक्षा तिनं स्वत:ला रमवून घेतलं हे खरं. तिच्या जवळ जाण्याचा किती लोकांनी प्रयत्न केला. तीच आणि विनोद मेहराच काहीतरी चालू आहे अशी चर्चा बराच काळ रंगत होती. पण तिनं स्पष्ट केलं विनोद फक्त मित्र त्याहून काही नाही. पण अमिताभ बाबत ती कधीच काही बोलली नाही.

 

jagran.com

आजही इतक्या वर्षानंतरही अमिताभ काय रेखा काय एकमेकांसमोर फारसे येत नाहीत.  प्रत्येकाची एक दुखरी नस असतेच की.. आयुष्यभर ती आपल्यासोबतच राहते. हे तसाच काहीसं आहे. एक काळ होता तेव्हा अमित आणि रेखाच्या प्रेम प्रकरणांनी रकानेच्या रकाने भरले जात.दिवसागणिक निदान एक तरी बातमी असेच.

त्या काळात यश भाऊंनी ‘सिलसिला ‘ काढला आणि पुढच्या पिढीवर किती उपकार केले ते कसं सांगावं.

कोणताही अंगप्रदर्शन न करता सलवार कमीज अशा अंगभर कपड्यात रेखा जी काही बेफाट दिसलीय! काय सांगावं.. त्याची सर आताच्या टू पीस मध्ये नाही. प्रेम करावं तर सिलसिलाच्या पहिल्या भागात अमित-रेखा करतात तसच.. हाच मापदंड. पण नशीब काही तिथं, खोट्या आयुष्यातही बदललं नाही तिचं.

त्या सिनेमातला ड्रामा रेखा आणि अमित –जयाच्या खऱ्या आयुष्यातही व्हावा हीच काय ती नियती. मुकद्दर का सिकंदर तसा सबकुछ अमिताभ सिनेमा. पण त्यातही गाण्यात जी काही रेखा अदाकारी करते त्याला तोड नाही.

प्रकाश मेहरा पण काय लिहितात,

इश्क़ वालों से न पूछो
की उनकी रात का आलम
तन्हाँ कैसे गुज़रता है
जुदा हो हमसफ़र जिसका
वो उसको याद करता है
न हो जिसका कोई वो
मिलने की फ़रियाद करता है ..

पूर्ण गाणं रेखावरून नजर हटता हटत नाही.

 

twitter.com

९० नंतरची रेखा मात्र हळूहळू पुसट होत गेली ती गेलीच. तिनं काम बरंच केलं पण ती अदा, तो चार्म नाहीच. सौंदर्याला दुख:ची किनार लागतेच बाबू मोशाय.. कदाचित त्याशिवाय सौंदर्य खुलतच नाही. मधु, मार्लिन अजुन किती जणी नाही सुटल्या त्यातून तर रेखा कशी सुटेल? असो.

आज रेखा वयाची ६४ वर्ष पूर्ण करत आहे. कमाल आहेच कारण तिच्याकडे बघून कोणाला ती पन्नाशीच्या वर वाटेल ही शंकाच आहे. काहीही असो पण काळ आपलं काम इमाने इतबारे करतच असतो.

रेखा, तू पुढे किती काळ आहेस, असशील त्या वरच्यालाच ठाऊक पण कित्येकांच्या मनात, हृदयात मात्र बराच मोठा काळ राहशील हे नक्की.

happy birthday Rekha!!
Stay Young like Always!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version