आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
दहावी, बारावी ह्या दोन महत्वाच्या पायऱ्या चढल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडतो तो म्हणजे पुढे काय..? करिअर कशात करायचे? कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे? खरं तर हे प्रश्न खूप संभ्रमात टाकणारे आहेत. ह्याची उत्तरेही शांतपणे मिळवली पाहिजेत.
काही मोजके विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाची आणि करिअरची दिशा आधीच ठरवून त्या पद्धतीने अभ्यास करतात. त्यांच्या आवडत्या क्षेत्रात जाऊन आपले करिअर यशस्वीरित्या पूर्ण करतात. त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळते.
पण काही असेही विद्यार्थी असतात ज्यांच्या घरी शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती बेताची असते. पुढे काय करावे ह्याचे मार्गदर्शन करणारे कोणी ‘गॉडफादर’ नसतात. अशा मुलांचे करिअर भरकटु शकते.
पुढे चांगली नोकरी न मिळाल्यास किंवा एखादा चांगला धंदा सुरू न करता आल्यास ही मुले आयुष्यातून उठू शकतात. असे काहीही होऊ नये म्हणून थोडासा स्वतःचा अभ्यास करावा. काही गोष्टी स्वतः बद्दल जाणून घ्याव्यात आणि त्याच अनुषंगाने आपले करिअर निवडावे.
खालील काही प्रश्न स्वतःला विचारल्यास आपल्या करिअरची दिशा कोणती ते आपण ठरवू शकतो.
१. माझी आवड कशात आहे?
आपण जे क्षेत्र निवडणार त्यात आपल्याला आवड असणे अत्यंत महत्वाचे आहे. माणूस आवड असलेल्या गोष्टी हातासरशी पूर्ण करू शकतो. ज्यात आवड नसते त्या गोष्टी करणे प्रत्येकाच्या जीवावर येते.
जर तुम्ही पाककलेत निपुण असाल तर हॉटेल मॅनेजमेंट हा उत्तम पर्याय आहे. पण तुम्ही त्याऐवजी वेगळेच क्षेत्र निवडले तर तुम्हाला त्यात रस वाटणार नाही.
२. माझी हातोटी कशाकशात आहे?
आवड कशात आहे हे कळल्यावर त्यात कोणकोणत्या विभागात आपली हातोटी आहे ते उमजून घ्या. हार्ड स्किल्स किंवा सॉफ्ट स्किल्स यापैकी कशात आपण पारंगत आहोत ते तपासा.
३. माझी बलस्थाने कोणती आहेत?
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशा आशयाची एक म्हण आहे. ह्याचा अर्थ बाळ मोठे होऊन काय बनेल हे लहानपणीच कळते. तसेच स्वतःचे कल ओळखा.
आपण लहान पणापासून कशात पारंगत आहोत? कोणत्या गोष्टी आपण सहज साध्य करतो? हे बघा. म्हणजे तुम्हाला तुमच्या बलस्थानाची माहिती होईल. त्याच प्रकारचे क्षेत्र निवडले गेल्यास तुम्ही जास्त जोमाने काम करू शकाल.
४. माझे व्यक्तिमत्व कसे आहे?
हे अत्यंत महत्वाचे आहे. आपण कोणत्या वर्गात मोडतो हे आपल्याला ठाऊक असणे गरजेचे आहे.
आपण एखाद्या मोठ्या गृप बरोबर एकटे काम करू शकतो का?
आपल्याला ऑर्डर घेऊन काम करता येईल की आपणच ऑर्डर देऊन दुसऱ्यांकडून काम करवून घेता येईल?
तुम्ही स्वतःच्या नवीन आयडिया वापरू शकता की दुसऱ्याने आखून दिलेल्या रस्त्यावरून चालणे तुम्हाला सोपे जाईल?
तुम्ही नेते आहात की अनुयायी?
ह्याची उत्तरे मिळवा. रस्ता आपोआपच सापडेल.
५. माझी तत्त्वं काय आहेत?
आपण कोणत्या तत्वांवर स्वतःच्या आयुष्याची आखणी केलेली आहे ते जाणून घेणे उपयुक्त ठरते.
मला लोककल्याणाचे काम करायचे आहे की घरच्यांना मदत करायला आवडेल..
स्वतःसाठी काही करायचे आहे की, फक्त रोजच्या गरजा भागवायच्यात? हे माहिती करून घ्या.
तुम्हाला फक्त थोडे फार पैसे कमावून ठेवायचे असतील तर ९ ते ५ ह्या वेळेत करायला मिळणारी नोकरी शोधणे उत्तम. महिन्याला पगार, ठराविक सुट्ट्या आणि रोजचे ठराविक काम. साधे सरळ चौकोनी आयुष्य जगण्याची कल्पना अशी पूर्ण होऊ शकते.
६. मला कशा प्रकारचे शिक्षण घेणे गरजेचे आहे?
आपल्याला डॉक्टर व्हायचे असल्यास किती वर्षे आणि पैसा गुंतवावा लागतो ह्याचे गणित माहिती असले पाहिजे.
–
- सामान्य नोकरी करत जीवन जगायचं नसेल तर तुम्ही या १० करियर ऑप्शन्सचा विचार केलाच पाहिजे!
- कॉमर्स/आर्टसच्या तरुणांसाठी खास असलेल्या अज्ञात करिअरच्या संधी
–
तुमच्याकडे वेळ कमी असल्यास किंवा जबाबदाऱ्या जास्त असल्यास लवकरात लवकर पूर्ण होणारे अभ्यासक्रम निवडणे योग्य. त्याला किती पैसा लागतो तेही जाणून घ्यायला हवे. काही ठिकाणी स्वस्तातही शिक्षण उपलब्ध असू शकते. पर्याय शोधून ठेवले तर अडचण येणार नाही.
७. मी ज्याचा अभ्यास करेन त्या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध आहेत का?
काही करिअर क्षेत्रे अशी आहेत जिथे नोकरीची पुरेपूर उपलब्धता असते. पण काही अवघड शिक्षणक्रम असतात जे पूर्ण केल्यावर सुद्धा नोकरी काही जणांनाच मिळते. तिथे टक्केवारीला महत्व असते. त्या क्षेत्रात संधी कमी असू शकतात.
त्यामुळे नोकरी मिळेल किंवा नाही हे तपासणे योग्य. नोकरी नसल्यास पैसे कमावण्याचे दुसरे कोणते पर्याय आहेत तेही तपासून ठेवणे गरजेचे आहे.
८. मला नक्की किती पैसा कमवायचा आहे?
पैसा हा खरे तर करिअर नक्की करण्याचा विषय असू नये. कारण तुमच्याकडे योग्य त्या स्किल्स असतील तर पैसा हा आपोआपच तुमच्याकडे येणार आहे. आपण कोणते करिअर निवडतो त्यावर आपल्याला कोणती नोकरी मिळते हे अवलंबून आहे.
वेगवेळ्या क्षेत्रात पगार देण्याच्या संकल्पना, निकष वेगवेगळे असतात. त्यामुळे तुम्ही किती मेहनत करू शकाल आणि किती शक्कल लढवून काम पूर्ण कराल त्यावर तुमचे मानधन अवलंबून असणार. त्यासाठी किती पैसे मिळाले म्हणजे तुम्हाला पुरेसे असणारेत ते ठरवा.
९. माझ्या राहणीमानाच्या संकल्पना काय आहेत?
मी जे करिअर ठरवलं आहे ते करायला मला कुठे राहावे लागेल? म्हणजे उदाहरणार्थ ‘जर मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनणार असेन तर मला झाडा झुडपात, जंगलात दिवस-रात्री कामास जावे लागेल.’ अशा प्रकारची तुमची तयारी आहे का?
माझे राहते घर सोडून मी परदेशात जायला तयार आहे का ते ठरवा. आपण जिथे जाऊ तिथल्या राहणीमानाशी आपल्याला जुळवून घेता येणार आहे ना ह्याची खात्री करा.
१०. मला हे करिअर का करायचे आहे?
मी हे करिअर स्वतःच्या आवडीनुसार घेत आहे की, कोणाच्या सांगण्यावरून हे तपासून पाहणे गरजेचे आहे. तुमच्या करिअरचा निर्णय सर्वस्वी तुमचा असला पाहिजे.
दुसऱ्यांकडून माहिती जरूर मिळवा पण हे का करतोय ह्याचे तुमच्याकडे पक्के उत्तर असले पाहिजे. नाहीतर सगळेच डॉक्टर इंजिनिअर होतात म्हणून मी पण झालोय असे घडायला नको. आपण ह्याच करिअरला का निवडलंय हे मनाशी पक्के करा.
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधून घ्या. हवे तर घरातील मोठ्यांची मदत घ्या. कोणी ओळखीचे, तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करत असेल तर त्यांचे मार्गदर्शन मिळतेय का बघा. जमल्यास स्वतःच थोडी माहिती काढा आणि योग्य तो निर्णय घ्या. पुढची वाट नक्कीच सुकर होईल.
–
- यशस्वी आयुष्य जगायचंय ? या गोष्टी आचरणात आणल्या तर ते जास्त अवघड नाही..
- ह्या ६ गोष्टी करत राहिलात तर करिअरमध्ये १००% यशस्वी व्हाल!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.