Site icon InMarathi

कझाखस्तानमधील गुन्हेगारांना “लैंगिक” गुन्ह्याबद्दल शिक्षा देण्याची अघोरी पद्धत वाचूनही झोप उडेल…

ambedkar-inmarathi

haberler.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लैंगिक अत्याचारांना सामोरे जाणे हे कुठल्याही व्यक्तीसाठी अतिशय भयानक अनुभव असतो. स्त्री असो की पुरुष, लहान मुलं असोत की वृद्ध, विकृत लोक कुणावरही अत्याचार करू शकतात. हल्ली तर काही विकृत लोक प्राण्यांना सुद्धा आपल्या विकृत वासनेचे भक्ष्य बनवतात.

लैंगिक अत्याचाराने पीडितांना शारीरिक त्रासाला तर सामोरे जावेच लागते परंतु त्या भयावह अनुभवाच्या त्रासदायक आठवणी आयुष्यभर त्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडवतात.

म्हणूनच हा अत्याचार करणाऱ्याला जितकी कडक शिक्षा करावी तितकी कमीच आहे. अनेक देशांत ह्या गुन्ह्यासाठी कडक शिक्षा आहेत.

फ्रांसमध्ये ह्या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराला कमीत कमी १५ वर्षे तुरुंगात टाकले जाते. जर गुन्हा खूप जास्त गंभीर असेल तर गुन्हेगाराला ३० वर्षांची किंवा अधिक तुरुंगवासाची शिक्षा होते. आपल्या शेजारच्या देशात म्हणजेच चीनमध्ये ह्या गुन्ह्यासाठी थेट मृत्युदंड दिला जातो किंवा काही केसेसमध्ये गुन्हेगाराला कॅस्ट्रेशन करून नंपुसक सुद्धा करण्यात येते.

 

dnaindia.com

सौदी अरेबियामध्ये ह्या केसेसचा लवकरात लवकर निकाल लावून सार्वजनिकरित्या गुन्हेगाराला औषधांच्या अंमलाखाली त्याचे शीर धडावेगळे करून मृत्युदंड दिला जातो.

उत्तर कोरिया ह्या देशात अश्या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराला गोळ्या घालून मारून टाकले जाते. अफगाणिस्थानमध्ये ह्या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराला फाशी देतात किंवा डोक्यात गोळी घालून मृत्युदंड दिला जातो.

इराण व इजिप्तमध्येही ह्या कृत्यासाठी गुन्हेगाराला फाशी देतात. इराण मध्ये तर कधी कधी गुन्हेगारावर दगडफेक करून त्याला मारून टाकतात. इस्राईलमध्ये गुन्हेगाराला १६ वर्ष किंवा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा देतात. तर अमेरिकेत ह्या गुन्ह्यासाठी आजन्म तुरुंगवासाची शिक्षा केली जाते. परंतु कझाकस्थानमध्ये गुन्हेगाराला अघोरी शिक्षा दिली जाते.

कझाकस्थानने नुकतीच त्यांच्या कायद्यात नव्या शिक्षेची तरतूद केली आहे. लैंगिक गुन्हेगारास केमिकल कॅस्ट्रेशन करण्याची ही शिक्षा आहे.

 

 

कझाकस्थानमध्ये येत्या काही काळात एका पीडोफाईलला म्हणजेच लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला केमिकल कॅस्ट्रेशनची शिक्षा भोगावी लागणार आहे.

कझाकस्थानमध्ये पीडोफाईल गुन्हेगारांसाठी ही शिक्षा नव्याने ठरवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते तुर्कस्तान भागातील एका गुन्हेगाराला देशाच्या आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली एक इंजेक्शन देण्यात येणार आहे.

ह्या पद्धतीत इंजेक्शनद्वारे गुन्हेगार व्यक्तीच्या शरीरात केमिकल्स सोडून त्याचे वृषण निकामी करण्यात येणार आहेत. ह्याने त्या व्यक्तीची लैंगिक इच्छा नष्ट होईल तसेच तो कुठल्याही प्रकारची लैंगिक क्रिया करू शकणार नाही.

कझाकस्थानचे राष्ट्राध्यक्ष नुरसुलतान नाझरबायेव ह्यांनी ह्या शिक्षेसाठी सत्तावीस हजार डॉलर्स उपलब्ध करून दिले आहेत. ह्या पैश्यातून २००० अशी इंजेक्शने कझाकस्थानध्ये उपलब्ध होतील व त्या इंजेक्शन्सचा प्रयोग लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तींवर केला जाईल.

 

india.com

ह्या शिक्षेदरम्यान गुन्हेगाराच्या शरीरात सायप्रोटेरॉन नावाचे स्टिरॉइडल अँटी अँड्रोजेन ड्रग इंजेक्शनद्वारे सोडण्यात येईल. हे ड्रग कॅन्सरच्या उपचारासाठी सुद्धा वापरले जाते. ह्या शिक्षेदरम्यान सर्जिकल कॅस्ट्रेशनसारखा कुठलाही अवयव काढून टाकण्यात येणार नाही.

तर केमिकलद्वारे वृषणावर परिणाम होऊन व्यक्तीची लैंगिक इच्छा नष्ट होईल जेणे करून पुढे जाऊन त्याने असे कुठलेही कृत्य परत करू नये.

कझाकस्थानचे आरोग्यमंत्री ल्याझ्झात अक्तायेवा ह्यांनी असे स्पष्ट केले की सध्या एका व्यक्तीवर ह्या इंजेक्शनचा वापर करून त्याचे केमिकल कॅस्ट्रेशन करण्याचे आदेश कोर्टाकडून प्राप्त झाले आहेत.

अशीच २००० पेक्षाही जास्त इंजेक्शने उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्यात आला आहे. कझाकस्थानमध्ये लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारासाठी २० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

परंतु असे असून देखील अनेक लोक हा गंभीर गुन्हा करण्यास धजावत आहेत. म्हणूनच गुन्हेगारांना जरब बसावी म्हणून ही शिक्षा येथे लागू करण्यात आली आहे.

 

२०१० ते २०१४ दरम्यान दर वर्षी किमान १००० लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद झाली आहे. म्हणूनच हा आकडा वाढू नये म्हणूनच ही कडक शिक्षा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२०१५ मध्ये ह्या देशात नॅशनल क्राईम एजन्सीने एक सर्व्हे केला होता. ह्या सर्व्हेत असे निदर्शनास आले की ३५ लोकांपैकी एक माणूस पीडोफाईल असू शकतो.

 

dnaindia.com

द टेलिग्राफच्या मते लहान मुलांविषयी लैंगिक भावना असणाऱ्यांपैकी दोन तृतीयांश लोक थेट कृत्ये करत नाहीत परंतु इंटरनेटवर चाईल्ड अब्युजचे भयंकर व्हिडीओज किंवा फोटो बघतात.

नॅशनल क्राईम एजन्सीने २०१५ साली असाही अंदाज व्यक्त केला आहे की ब्रिटनमधील ७,५०,००० पुरुष लहान मुलांबरोबर लैंगिक क्रिया करू इच्छितात तसेच २,५०,००० लोकांनी असे मान्य केले की त्यांना १२ वर्षाखालील लहान मुलांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते. हा भयावह आकडा समोर आल्यावर NSPCC ने धोक्याचा इशारा दिला आहे.

की युकेमधील लाखो मुले कमी अधिक प्रमाणात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली आहेत परंतु बहुतांश गुन्ह्यांची नोंदच झालेली नाही.

 

 

कझाकस्थानमध्ये हा गुन्हा घडू नये म्हणून ह्या अघोरी शिक्षेची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. ह्या वादग्रस्त शिक्षेवर वादंग माजले आहे. हे कॅस्ट्रेशन्स देशाच्या आरोग्य विभागाकडून मंजूर झाले आहेत आणि ते रिजनल सायकोन्यूरॉलॉजिकल क्लिनिक्समध्ये करण्यात येणार आहेत.

ह्या शिक्षेवर वादंग माजले असताना ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनने मात्र ह्या शिक्षेला विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की ह्या शिक्षेचा हवा तसा परिणाम होणार नाही. नॅशनल कमिशन फॉर वुमेनच्या अध्यक्षा अझिराना ह्यांचे असे म्हणणे आहे की,

“ज्या देशांत ही शिक्षा केली जाते, त्या देशांत सुद्धा बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमध्ये घट झालेली दिसून येत नाही. तसेच ही अतिशय महागडी प्रोसिजर आहे. गुन्हेगारांवर इतका पैसा खर्च करण्याऐवजी पीडितांच्या भल्यासाठी ह्या पैश्याचा उपयोग व्हायला हवा.”

 

rightlog.in

बहुतांश केमिकल कॅस्ट्रेशन हे कायमस्वरूपी नसतात. तसेच औषधांनी ह्या कॅस्ट्रेशनचा शरीरावर झालेला प्रभाव उलटवता येणे सुद्धा शक्य आहे.तसेच ज्या गुन्हेगारांना ही शिक्षा होईल त्यांना २० वर्षांपेक्षा कमी काळासाठी तुरुंगवास होईल.

कझाकस्थानशिवाय पोलंड, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियामध्ये सुद्धा ही शिक्षा दिली जाते.

इंडोनेशियामध्ये २०१६ मध्ये ह्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यानंतर देशात सगळीकडे वातावरण पेटले होते. त्यानंतर इंडोनेशियात लैंगिक अत्याचारासाठी ही शिक्षा करण्यात येते.

 

 

सर्वप्रथम ही १९४४ साली एका व्यक्तीला ही केमिकल कॅस्ट्रेशनची शिक्षा करण्यात आली होती. ह्या शिक्षेसाठी डायइथिलस्टिल्बेस्ट्रॉल हे औषध त्या व्यक्तीची टेस्टोस्टेरॉन लेव्हल कमी करण्यासाठी वापरण्यात आले होते.

त्यानंतर मार्च २०१० साली अर्जेंटिनाने केमिकल कॅस्ट्रेशनला मंजुरी दिली. तसेच संपूर्ण युरोप, इस्राएल, न्यूझीलंड, रशिया, अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्येही केमिकल कॅस्ट्रेशन केले जाते.

भारतात निर्भयाच्या केसनंतर केमिकल कॅस्ट्रेशनसंदर्भात विचारविनिमय सुरु आहे. ह्या केमिकल कॅस्ट्रेशनचा एक हकनाक बळी म्हणून ब्रिटिश कंप्यूटर सायंटिस्ट अॅलन ट्युरिंगचे नाव घेता येईल. अॅलन हा समलैंगिक असल्याने त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक संबंधांचा आरोप करण्यात आला होता.

 

telegraph.co.uk

१९६७ पर्यंत ब्रिटनने समलैंगिक संबंधांना मान्यता दिली नव्हती व अॅलन ट्युरिंगवर १९५२ सालीचा आरोप झाले होते. ह्याची शिक्षा म्हणून त्याचे केमिकल कॅस्ट्रेशन करण्यात आले होते.

ही प्रोसिजर चांगली की वाईट ह्यावर अजूनही मतभेद आहेत. तरीही अनेक देश ह्या प्रोसिजरकडे वळत आहेत.

लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ह्यावर गुन्हेगाराला कडक शिक्षा होणे हाच एक मार्ग आहे. आता केमिकल कॅस्ट्रेशनच्या शिक्षेमुळे गुन्हेगारांना जरब बसते की नाही ह्यावर रिसर्च होणे गरजेचे आहे तसेच कायद्यात आणखी कडक शिक्षांची तरतूद होणे आवश्यक आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version