डोक्याला बॉल लागला, टाके पडले, तरीही त्याने मैदानात येऊन षटकार ठोकला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
क्रिकेटच्या सामन्यांची सध्या रेलचेल सुरू आहे. टेस्ट क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट, टी-ट्वेन्टी क्रिकेट इतकं कमी होत की काय म्हणून वेगवेगळ्या लीग्स. पण चाळीशी पार केलेल्या एखाद्या क्रिकेटप्रेमी ला विचारा, तुमचं आवडतं क्रिकेट कोणतं?
क्षणाचाही विचार न करता ‘कसोटी’ क्रिकेट असं उत्तर येईल, सोबत क्रिकेटच्या आजच्या स्वरूपावर एक दोन टिप्पण्या आणि थोडा नाराजीचा सूर पण ऐकायला येऊ शकतो.
(त्या नंतर होणारी चर्चा, तिचा काळ, वेळ, आवेग ही पूर्ण तुमची जबाबदारी राहील बर का! आम्ही म्हणजे इनमराठी त्याला जबाबदार राहणार नाही..!) त्यांच्या म्हणण्यात तथ्य ही असेल, त्याला आधार देणारे किस्सेही ते सांगतील, हा किस्सा देखील असाच मजेदार आहे, ऐका.
मोहिंदर अमरनाथ हे नाव ऐकल्यावर बहुतेकांना आठवतो तो ८३ च्या विश्वचषकातील त्याचा उपांत्य सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार, ज्याने भारतीय संघाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला आणि अंतिम सामन्यातील चिवट अशा २६ धावा आणि ७ षटकात १२ धावा देऊन घेतलेल्या ३ विकेट्स आणि सामनावीराचा पुरस्कार.
भारतीय संघाच्या ८३ च्या विश्वचषकातील संघाच्या चिकतीला जर एका शब्दात सांगायचं असेल तर तो म्हणजे, मोहिंदर अमरनाथ.
ज्याच्या गोलंदाचीच वर्णन त्याचा कप्तान कपिल,
“आळसावलेली, निवांतअशी शैली, जणू काही पहाटे फिरायला गेलाय” अशा शब्दात करतो.
स्वतःच्या फलंदाजीचा तंत्राबद्दल विचारलं असता, “हे सगळं वाडीलांकडून आलंय” अस सांगणारा मोहिंदर. जेंव्हा मैदानात उतरत असे तेंव्हा जगातल्या प्रत्येक गोलंदाजला हवी असे ती त्याची विकेट. मग हेल्मेट नसलेल्या त्या काळात विकेट मिळवायचं हुकमी शस्त्र म्हणजे, बाऊन्सर.
८३ च्या संघाचं अस एक वर्णन ऐकायला मिळतं ते म्हणजे सगळे ‘अनलकी’.
या सगळ्यांत दुर्दैवी म्हणजे अनलकीइस्ट म्हणजे अमरनाथ. ८३ च्या विश्वचषकाआधी भारतीय संघ कॅरेबियन दौऱ्यावर गेला. पाच सामन्यांच्या मालिकेत मोहिंदर अमरनाथ ला संघात घेण्यात आलं. हा त्याचा चौथा संघप्रवेश होता.
अखूड टप्प्याच्या चेंडूवर बिचकणारा मोहिंदर आपल्या वडिलांच्या म्हणजे लाला अमरनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खेळात काही बदल करून आला होता. त्यातील पहिला बदल होता, स्टंप समोर उभं राहायची पद्धत जिला म्हणतात Two eyed stance. थोडक्यात चंद्रपॉल थांबायचा ना, काहीसा तसा.
या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक करून सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
तिसरा सामना पावसाने रद्द झाला. चौथ्या सामन्यात मैल्कम मार्शल, माइकल होल्डिंग आणि एंडी रॉबर्ट्स यांच्या समोर अमरनाथ सोडता एकही फलंदाज ३० धावांची रेष ओलांडू शकला नाही.
अमरनाथ ने ९१ धावा केल्या. वेस्ट इंडिज संघाने २७७ धावांची आघाडी घेतली होती. भारत सामना हारणार हे स्पष्ट दिसत होत. अशा वेळी भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली.
गावसकर १९ धावा करून बाद झाला. गायकवाड सोबत अमरनाथ चांगला जम बसवतोय अस दिसत असतानाच माइकल होल्डिंग ने आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. आधीच आखूड चेंडू खेळण्यात अडचण येणाऱ्या अमरनाथ च्या तो हनुवटीवर आपटला. अमरनाथ कोसळला.
त्याच्या शर्टवर रक्ताचे ओघळ सांडले. तिथून त्याला थेट दवाखान्यात नेण्यात आले. त्याच्या सोबत होता लक्ष्मण शिवरामकृष्णन. अमरनाथ च्या चेहऱ्यावर सहा टाके पडले. रक्ताचे पडलेले डाग साफ करून अर्ध्यातासात अमरनाथ ड्रेसिंग रूममध्ये येऊन बसला.
एंडी रॉबर्ट्स ने बलविंदर संधू ला पायचीत पकडले. भारताची पाचवी विकेट पडली. अमरनाथ ड्रेसिंग रुम मध्ये उभा राहिला, त्याने बॅट घेतली, तू खेळू शकशील का? यावर त्याने फक्त मान डोलवली आणि तो चालायला लागला.
शिवरामकृष्णन त्याच्या मागे त्याचा छाती आणि पोटाला झाकणारा पॅड घेऊन धावत होता. १८ धावांवर थांबलेली आपली खेळी त्याने पुढे सुरू केली.
–
- प्रत्येकवेळी कुणामुळेतरी झाकोळला गेलेला क्रिकेटमधील खरा जंटलमन!
- भारतीय क्रिकेटची अंधारातली बाजू उजळवून टाकणाऱ्या मोहम्मद कैफला लक्षात ठेवायला हवं!
–
यानंतर अस सांगितलं जातं की माइकल च्या त्याने खेळलेल्या पहिल्याच चेंडूवर पूल चा फटका मारत थेट षटकार ठोकला. सांगितलं जातं एवढया साठीच की त्या सामन्यात दुसऱ्या डावात एकही षटकाराचा उल्लेख नाही!
परंतु सहा टाके पडल्या नंतर पुन्हा फलंदाजीला येऊन तशाच आखुड आपटलेल्या चेंडूंवर ८० धावा करणं यातच अमरनाथच्या मानसिक ताकदीचा अंदाज येतो.
यानंतर झालेल्या पाचव्या सामन्यात पुन्हा पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक ठोकून त्याने आपल्या फलंदाजीतल्या तंत्राचा अस्सलपणा पुन्हा सिद्ध केला.
या दौऱ्यात त्याने ५९४ धावा केल्या. त्याची सरासरी होती ६६.४४ आणि त्यात दोन शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश होता. हा दौरा आणि या खेळी म्हणजे योगायोग नसून ८३ च्या विश्वचषकाची ‘नांदी’ होती हे थोड्याच दिवसात जगाला कळणार होत.
–
- क्रिकेटमधील हे रेकॉर्डस् तोडणं केवळ अशक्य मानलं जातं!
- क्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न! याचं उत्तर ओळखा बरं!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.