आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
राफेल वर खूप काही बोललं आणि लिहिलं जातं आहे, राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राफेल विमानांचा करार हा जरी आरोप – प्रत्यारोपांचा मुद्दा झाला असला तरी या लढाऊ विमानांच्या तांत्रिक क्षमतेबद्दल मात्र कोणाला आक्षेप नाही. राफेल हे आजच्या काळातील अग्रगण्य श्रेणीतील लढाऊ विमान आहे.
अनेक कठोर चाचण्या आणि छाननी नंतर हे लढाऊ विमान आपल्या गरजा पूर्ण करू शकते असा विश्वास भारतीय हवाई दलाने व्यक्त केला आणि मग पुढे प्रत्यक्ष करार होण्याचा मार्ग सुकर झाला.
भारतीय सैन्य आज जगातील शक्तिशाली सैन्यापैकी एक मानलं जातं, ते असलेच पाहिजे कारण भारताला शत्रूचा धोका दोन बाजूने आहे.
चीन आणि पाकिस्तान हे भारताचे दोन शेजारी आणि शत्रू देखील आहेत. अशावेळेस दोन (तज्ज्ञ् म्हणतात अडीच) आघाड्यांवर लढाईसाठी भारत नेहमी तयार असला पाहिजे. या विचारातूनच तिन्ही दलांना अत्याधुनिक साधनांनी सज्ज करणे आवश्यक ठरते. आज तिन्ही दले अपुऱ्या युद्धसामग्रीने हैराण आहेत.
पुरेसा निधी नसणं आणि राजकीय पातळीवरची दिरंगाई ही त्याची कारणे सगळ्यांना ज्ञात आहेत.
भारतीय हवाई दलाचा विचार करता भारताला दोन्ही आघाड्यांवर सज्ज असण्यासाठी लढाऊ विमानांच्या ४२ तुकड्या असणे आवश्यक आहे. सध्या आहेत ३२! शिवाय येत्या काही वर्षात जुनी विमाने वापरता येणार नाहीत, त्यांची संख्याही मोठी आहे. तेव्हा भारतीय हवाई दल सक्षम करण्यापेक्षा आहे तेवढी ताकद टिकवणे हा प्राधान्यक्रम आहे.
या पार्श्वभूमीवर ३६ राफेल विमानं येत्या काही वर्षात भारतीय हवाई दलात असतील, तेव्हा ती का आवश्यक ठरतात हे राफेल लढाऊ विमानांच्या गुणवैशिष्टयांवरून लक्षात येईल.
हे लढाऊ विमान अनेक आघाड्यांवर वापरण्यासाठी सज्ज आहे. यातील पहिला महत्वाचा भाग म्हणजे मेटीऑर बियॉंड व्हिजुअल रेंज (BVR) क्षेपणास्त्र जे हवेतून हवेत हल्ला करते.
त्याचा पल्ला १५० किलोमीटर आहे याचा अर्थ असा की सीमेपलीकडे १५० किमी. पर्यंत सीमा न ओलांडता हल्ला करता येऊ शकतो. तुलनेच्या स्वरूपात सांगायचं तर चीन इतका लांब पल्ला अजूनपर्यंत गाठू शकलं नाही आणि पाकिस्तान आता भारतात ८० किमी पर्यंत हल्ला करू शकतं.
–
- “चीन” नावाचं भारतीय कनेक्शन! भारत-चीन प्राचीन संबंधांबद्दल ह्या गोष्टी माहितीच हव्यात
- चीनसारखी स्वस्त दरातील उत्पादने भारत का तयार करू शकत नाही? वाचा डोळे उघडणारं उत्तर..
–
ज्यावेळेस कारगिल युद्ध झाले तेव्हा भारताकडे ही क्षमता सीमेपलीकडे ५० किमी. पर्यंत होती तर पाकिस्तानकडे असे कुठलेच क्षेपणास्त्र नव्हते.
नंतर त्यांनी ८० किमी. पर्यंत हल्ला करू शकतील अशी क्षेपणास्त्रे आपल्या भात्यात समाविष्ट केली. यानंतर महत्वाचे दुसरे क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकते ते आहे SCALP.
हे हवेतून जमिनीवर मारा करणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून सीमा न ओलांडता ३०० किमी सीमेपलीकडे हल्ला करणे यामुळे शक्य होते. शिवाय हा मारा निश्चित केलेल्या लक्षाला अचूकपणे भेदू शकतो.
एकदा लक्ष्य निश्चित केलं की त्या लक्षाच्या २ मी पर्यंत हा भेद होऊ शकतो.
अचूकपणा आणि लांब मारा या दोन्ही बाबतीत भारत समोरच्या देशांपेक्षा आघाडीवर आहे असं सध्यातरी चित्र आहे. अजून एक महत्वाचे म्हणजे अणूबॉम्ब चा वापर करायचा झाल्यास हे लढाऊ विमान उपयुक्त आहे. अत्याधुनिक रडार हा देखील या विमानाचा महत्वाचा हिस्सा आहे.
शत्रू राष्ट्राने डागलेल्या क्षेपणास्त्रांना अडथळा निर्माण करण्याची क्षमता या लढाऊ विमानाला खास बनवते.
याव्यतिरिक्त खास भारतीय परिस्थितीला पूरक असे बदल देखील करण्यात आले आहेत. तेव्हा सर्वाना माहीत आहेत अशी ही गुणवैशिष्ट्ये आहेत. अजून गोपनीय असलेले बदल विचारात घेतले तर राफेल चे भारतीय हवाई दलात काय स्थान असेल हे वेगळे सांगायला नको.
एकीकडे चीन पाकिस्तानला लढाऊ विमाने, युद्धनौका आणि युद्धास लागणाऱ्या इतर सुविधा पुरवत आहे. चीनला दक्षिण आशियात पाकिस्तानचं स्थान मजबूत व्हावं असं वाटतं जेणेकरून ते भारताला जखडून ठेऊ शकतील.
पाकिस्तान आता अणुयुद्धाशिवाय आपण भारताशी दोन हात करू शकू असा विश्वास बाळगून आहे.
शिवाय चीन हा स्वतः बलशाली आहेच आणि त्यांचा संरक्षण खर्च हा भारताच्या कितीतरी अधिक आहे. त्यामुळेच दोन्ही देशांच्या युद्ध क्षमतेत असणाऱ्या दरीबद्दल दिल्ली चिंतेत आहे.
दोन्ही आघाड्यांवर युद्ध लढणे हे सोपे नाही याची भारताला जाण आहे. अशावेळेस ताकदीचे संतुलन करून देखील शांतता निर्माण करण्यास हातभार लावता येतो.
जर भारत दोन्ही आघाड्या लढू शकेल एवढा सक्षम झाला तर साहजिकच होणारे युद्ध हे समोरच्या राष्ट्राला तेवढेच हानिकारक असेल.
अशावेळी युद्ध सुरु करण्याआधी चीन किंवा पाकिस्तान भारताच्या क्षमतेचा विचार करतील. ती अधिक असेल तर युद्ध टाळता येऊ शकते. थोडक्यात या क्षेत्रात ताकदीचे संतुलन हा देखील एक महत्वाचा डावपेच ठरतो.
एकंदरीत जेव्हा दोन देश समोरासमोर ठाकतात (जसे की डोकलाम मुद्य्यांवर भारत आणि चीन समोरासमोर ठाकले होते), तेव्हा युद्ध न करता अन्य पर्याय काय असतील याचा विचार समोरच्या देशाला करावा लागतो.
मग आता प्रश्न उरतो की केवळ ३६ राफेल लढाऊ विमानांच्या जोरावर आपण दोन्ही आघाड्यांवर लढू शकतो का? याचे उत्तर तज्ज्ञ् हो किंवा नाही अशा स्वरूपात देत नाहीत.
मुळात आपली मागणी १२६ लढाऊ विमानांची होती आणि आता ३६ विमाने आपल्याला मिळतील. तेव्हा ही तूट मोठी आहे. परंतु सध्याची आपल्या हवाई दलाची कार्यक्षमता आणि ३६ राफेल विमानं समाविष्ट झाल्यावर असणारी कार्यक्षमता यांचा विचार केला तर तो नक्कीच सकारात्मक आहे.
उदाहरणार्थ एक राफेल विमान एका दिवसात ५ मिशन करण्यास सक्षम आहे. सध्याची विमानं ३ मिशन करू शकतात. अजून एक म्हणजे सध्याच्या विमानाचं इंजिन बदलावं लागल्यास ८ तासाचा वेळ घेतो आणि राफेल विमानाला लागणारा वेळ आहे १ तास!
सांगायचा मुद्दा म्हणजे राफेल विमानांची क्षमता केवळ संख्यात्मक मोजता येणार नाही तर गुणात्मक क्षमता देखील लक्षात घ्यावी लागेल.
राफेल विमानं असो वा नुकताच रशिया सोबत झालेला S-४०० क्षेपणास्त्रांचा सौदा यामुळे दोन देशांतील ताकदीचे संतुलन साधले जात असते आणि ही प्रक्रिया सतत चालेल जोवर दोन्ही देश आपले प्रश्न इतर पर्याय वापरून सोडवत नाही.
किंबहुना समोरच्या देशाने युद्धाशिवाय इतर पर्यायांचा विचार करावा म्हणूनच ही शस्त्रसज्जता आवश्यक ठरते.
–
- “भारत चीन युद्ध १९६२” : या महत्वाच्या युद्धात भारताचा दारूण पराभव का झाला?
- कम्युनिस्ट चीनने उचललंय इस्लामविरुध्द हत्यार, कारण भारतीयांसाठी धक्कादायक आहे!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.