Site icon InMarathi

सकारात्मक तर्क आणि समज हे देखील त्रासदायक असू शकतात. कसे? जाणून घेऊया…!

judging people inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

तर्क- कुतर्क करणं आणि त्यावरून माणसाला पारखणं किंवा त्याच्याबद्दल मत बनवून घेणं हा मानवी स्वभाव आहे. भारतात तर हे सर्रास चालतं  ‘स्टरिओटाइपिंग’ असा इंग्रजी शब्द यासाठी प्रचलित आहे. पिढ्या दर पिढ्या आपल्याकडे ‘समज’ करून घेण्याचा प्रघात आहे.

दक्षिण भारतात राहणारे रंगाने काळेच असतात, उत्तरप्रदेश बिहारचे लोक कमी शिक्षित असल्याने चोऱ्या माऱ्याच करतात. मराठी माणसे खेकड्या सारखी असल्याने एकमेकांना खाली ओढतात. मारवाडी चिक्कू असतात आणि पैसे दाबून ठेवतात. बंगाली कळकट असतात तर पंजाबी आणि जाट मारामाऱ्या करतात….असे बरेच समज आहेत.

पुण्याच्या माणसांच्या बाबतीत तर जोरदार किस्से आपण ऐकतो. त्यांच्या वागण्याचे असो किंवा त्यांच्या पाट्यांचे, पण पुण्याचा ह्या संदर्भात पहिला नंबर नक्कीच लागतो. बरेच समज गैरसमज वेगवेगळ्या समाजाच्या बाबतीत आपल्याकडे मानतात.

समाजाचं ठीक आहे पण माणसाच्या दिसण्यावरूनही ठोकताळे बांधले जातात. घाऱ्या डोळ्यांची माणसे लबाड असतात, लठ्ठ माणसे आळशीच असतात, गोरी माणसे शिष्ठ असतात तर बुटकी माणसे अहंकारी. कोणाशी बोलण्याच्या आधीच किंवा एखाद्याला जाणून घेण्याच्या आधीच आपण प्रत्येकाला कळत न कळत ‘जज’ करत असतो.

 

 

असे गैरसमज आपण मानले तर आपण आपलं मन तर कलुषित करतच असतो, पण आपण काय विचार करतोय समोरच्याबद्दल, हे त्या व्यक्तीला कळलं तर अजूनच गोची होऊ शकते. एक तर भांडण नाहीतर अबोला. कधी कधी नातीही तुटू शकतात. नकारात्मक तर्क , गैरसमज कधीही घातकच.

ह्याच्याबरोबर विरुद्ध असतात ते ‘गोड समज’. म्हणजेच एखाद्या बद्दल असलेले सकारात्मक समज.

किती वेळा आपले समाजाच्या बाबतीत सुद्धा खूप समज असतात. ते सकारात्मक सुद्धा असतात. जसे काश्मिरी कायम गोरे आणि सुंदर असतात. केरळी माणसांचे केस काळेभोर आणि लांब असतात. बंगलोर, मुंबईला राहणारे खूप श्रीमंत असतात. मद्रासी माणसे खूप हुशार असतात.

“एक ना अनेक” समज आपण मानतो. अर्थात ते समज काही निरीक्षणांतीच बनवलेले असतात. वैयक्तिक पातळीवरही आपण भरपूर ठोकताळे बांधतो. सकारात्मक असले तरी ठोकताळेच ते..!

 

inc.com

 

जसं, वर्गात एक विद्यार्थी दर वेळी पहिलाच येत असेल तर सगळ्यांची खात्रीच असते की परीक्षा कोणतीही असो हा पहिलाच येणार. घरातील वातावरण अमुक अमुक असेच असणार, कोणाचे वडील खूप मोकळ्या स्वभावाचे असणार आणि खूप काही.

पण जसा नकारात्मक समजांचा मनावर वाईट परिणाम होतो तसा ह्या सकारात्मक तर्कांचा सुद्धा कोणाकोणाला त्रास होत असतो. ह्याचा आपण कधी विचार करतो का?

साहजिकच आपल्याला असं वाटेल की, सकारात्मक ठोकताळे म्हणजे एक प्रकारचं कौतुकच असतं. मग कोणाला ह्याचा त्रास का व्हावा..? पण खरंच ह्याचा सुद्धा काही जणांना त्रास होतोच. कसा ते पाहू.

जेव्हा आपण कोणाच्या बाबतीत सकारात्मक तर्क बांधतो उदाहरणार्थ, एखादा हुशार विद्यार्थी घ्या. तो दर वेळी पहिला येतो. हळूहळू हे लोकांना सवयीचं होतं आणि त्यांच्या अपेक्षा उंचावत राहतात. त्यांना वाटतं हा सतत अभ्यास करताना दिसावा. म्हणजे तो पहिला नंबर कधी सोडणार नाही.

 

the times of israel

 

कधीकधी त्या विद्यार्थ्याला सुद्धा आपल्या इतर मित्रांसारखं मजा करावीशी वाटतच असेल ना..? त्याला ही कधी अभ्यास न करता सिनेमा पहावा, शॉपिंग ला जावं किंवा एखादा खेळ खेळावा असे वाटतच असेल ना..? पण नाही.. हे समजून कोणी घेत नाही.

त्याच्या बाबतीत बांधलेले तर्क खरे न झाल्यास लोकांना आश्चर्य वाटतं किंवा जवळचे, घरातले लोक त्या विद्यार्थ्याला घालूनपाडून बोलण्यासही कमी करत नाहीत. अगदी इज्जतीचा प्रश्न उभा करणारे सुद्धा कमी नाहीत.

पण,आपल्याबद्दल लोक इतक्या अपेक्षा ठेवतात ह्याचा त्या मुलाला त्रासही होत असतो. त्याला सतत मनात भीती वाटत राहते की, “जर मला नेहमी सारखे गुण नाही मिळाले तर काय होईल? मला आई वडील ओरडतील, लोकं नावं ठेवतील आणि नंतर मला चांगली नोकरी सुद्धा मिळणार नाही. माझे आयुष्य बरबाद होईल.” एखादा हळव्या मनाचा विद्यार्थी स्वतःचं बरं वाईट ही करून घेईल.

 

 

आपल्याला सतत वाटतं की, आपण एखाद्याला किती जास्ती जाणून आहोत, पण जे आपल्याला वाटतं ते समोरच्याला वाटत नाही. त्या व्यक्तीचे स्वतः बद्दलचे ज्ञान आणि ठोकताळे वेगळे असतात.

त्यांना इतरांच्या सकारात्मक समजांचे ओझही वाटू शकते. त्यातून तयार होते भीतीची टांगती तलवार. सकारात्मक तर्क एकप्रकारे त्या व्यक्तीला प्रेशराईझ कारायचेही काम करतात आणि त्यातून अपयशाची भीती वाटत राहते.

 

verywell family

 

एखाद्याबद्दल जेव्हा आपण गोड समज करून घेतो तेव्हा आपण कधी कधी त्या व्यक्तीला गृहितही धरतो. जर आपल्याला माहीत असेल की एखादी व्यक्ती स्वभावाने, मनाने खूप सशक्त, स्ट्रॉंग आहे तर आपण त्यांना गृहीत धरल्याने त्यांच्याशी खूप स्वार्थीपणाने वागू शकतो.

पण, ती व्यक्ती मनाने इतका घट्ट का झाली असेल? त्यामागे तो कोणकोणत्या घटना क्रमातून, परिस्थितीतून तावून सुलाखून निघाला असेल ह्याचा विचार आपण करत नाही. काही वावगे बोललो तर तो काय करेल? ‘त्याला नाहीच वाईट वाटत कशाचं’ असे समजून आपण विचित्र वागत राहतो.

 

isha foundation

 

त्या व्यक्तीला कदाचित आपलं वागणं आवडतही नसेल. कधी जास्तीच असह्य झाल्यास ती व्यक्ती आपल्याला टाळायलाही सुरुवात करू शकेल.

म्हणून तर्क-कुतर्क करणे हा जरी मानवी स्वभाव असला तरी वेळ काळाचं भान हवं. काही ठोकताळे बांधून कोणाला काही बोलण्याच्या आधी सदसदविवेकबुद्धी जागृत असावी. कौतुक नक्कीच करावं, पण कोणाला गृहीत धरून त्या व्यक्तीला आपण दुखावत तर नाही ना? ह्याची काळजी घ्यावी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version