आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
प्राचीन काळात, जगभरात विविध संस्कृती अस्तित्वात होत्या. व्यापाराच्या निमित्ताने फिरणाऱ्या व्यापाऱ्यांकडून बऱ्याच गोष्टींची देवाणघेवाण व्हायची. प्राचीन वस्तू, पुस्तके, हस्तलिखित, भांडी, दागदागिने, कपडे, भाषा, धर्म ह्याची एकमेकांना ओळख व्हायची.
अशाच प्रकारे भारतातील संस्कृतीची झलक आपल्याला विदेशात आजही दिसून येते. उगवत्या सूर्याच्या देशाने म्हणजेच जपानने सुद्धा भारतातील काही गोष्टींची अशीच जपणूक केलेली आहे.
जपानी संस्कृतीशी भारताच्या संस्कृतीची सांगड आपण आज अनुभवू शकतो.
भारतात पुजली जाणारी विद्येची देवता म्हणजे देवी सरस्वती. तिची मंदिरे जपानमध्ये आढळतात. ‘किचिजॉई’ शहराचे नाव लक्ष्मी मातेच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
भारतातून बाहेर पडलेले प्राचीन खबरी, व्यापारी, प्रवासी यांनी भारताचा सांस्कृतिक खजिना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवला आहे. विशेषतः आशिया खंडात ह्याचा प्रभाव जास्त जाणवतो. त्यामुळे जपानमध्ये भारताशी निगडित वस्तू, चिन्ह दिसल्यास काही वावगे नाही.
असे सगळे असताना एक मजेशीर गोष्ट मात्र आपल्याला आश्चर्यचकित करून जाते. ती म्हणजे ६ व्या शतकात भारतात प्रचलित असलेली एक भाषा आता भारतातून पूर्णपणे नष्ट झाली आहे. मात्र ती जपानमध्ये पोसली गेली आहे.
‘सिद्धम’ हे त्या भाषेचे नाव आहे. ह्या भाषेच्या लिपीचा वापर जपानचा एक समुदाय अजूनही करतो. ह्या लिपीमध्ये बरेच बुद्धिस्ट श्लोक, कवनं, सूत्र, मंत्र लिहिले जातात. भारतातून नष्ट झाली असली तरी सिध्दम लिपी आज जपानमध्ये अभ्यासता येऊ शकते.
भारतातली ही भाषा भारतातून नष्ट होऊन जपान मध्ये कशी काय पोहोचली असेल..?
भारतात तर प्राचीन काळात कोणतीही शिकवण गुरूंकडून शिष्याला दिली जाई.. त्यावेळी लिहिण्याची कला अवगत झाली नव्हती. गुरू तोंडीच सगळे श्लोक, कवन, वेद आणि इतर शैक्षणिक बाबी शिष्यांना शिकवत असत.
शिष्य सगळे पाठ करत असत आणि पुढे स्वतः गुरू बनल्यानंतर त्यांच्या शिष्यांना शिकवत असत. असे असताना एखादी भाषा इतक्या दूरच्या देशात पोहोचणे म्हणजे आश्चर्यच आहे..!
पर्शिया वरून आलेले व्यापारी लिहायची कला शिकले होते. त्यांच्याकडून ती भारतातही आली. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यावर प्राकृत आणि ब्राह्मी लिपीमध्ये लिहिण्यास सुरुवात केली.
त्याने लिहिलेले संदेश त्याचे अनुयायी अनुसरत असत. अनुयायी देखील लिहिण्याची कला शिकले आणि साधारण पहिल्या शतकाच्या आसपास ही कला संपूर्ण भारताला मिळाली.
त्यामुळे सिद्धम भाषेची लिपी देखील लिहिली जाऊ लागली. सिद्धम लिपी ही ब्राह्मी लिपीचे लेकरू आहे असे म्हणावयास हरकत नाही. चायना आणि जपान ह्या दोन्ही देशात बौद्ध समुदायाचे लोक ह्या लिपीचा वापर आजही करतायत
.
त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या ‘सिल्क रूट’ च्या मार्गाने जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मार्फत ही सिद्धम लिपी लेखी स्वरूपात चायना आणि जपानपर्यंत पोहोचली.
चायनामध्ये सिद्धम लिपी वापरायला अवघड वाटत असल्याने ह्या लिपीच्या जाणकारांनी ती चायनीज लिपीसोबत तेथील बौद्ध लोकांना शिकवली. ह्या लिपीची लिखावट आणि उच्चार अवघड असल्याने हे बदल करण्यात आले.
–
–
ह्याच सुमारास जपानचे कुकुई आणि साईचो नावाचे बौद्ध भिक्खू चायना प्रवासाला आले होते.
हा कुकुई तर संस्कृत आणि सिद्धम भाषेचा अभ्यास करण्यासच चायनाला आलेला होता. तर साईचोला जपानच्या राजाने नवनवीन भाषा शिकण्यासाठी तिथे पाठवले होते.
ह्या दोघांनीच सिद्धम भाषा जपानला नेली. नंतर त्यांनी तिथे आपल्या स्वतःच्या नावे गुरुकुल स्थापून विद्यार्थ्यांना सिद्धम भाषेचे धडे देण्यास सुरुवात केली. ह्या घटनेनंतर चायनामधून मात्र ही भाषा लोप पावली.
संस्कृत बिजाक्षरे असलेली सिद्धम लिपी साईचो ह्या भिक्खूने शिकवलेल्या पद्धतीने आजही जपानमध्ये खूप लोकांना अवगत आहे. ज्यांना ही वाचता येत नाही ते सुद्धा ह्या भाषेतल्या श्लोकांना पवित्र समजून पूजतात.
कुकुईने ह्यातून काना लिपी निर्माण केल्याने जपानमध्ये जपानी लिपी काही संस्कृत शब्दांनी बनवलेली अढळते.
जपान्यांनी भाताचा ‘शारी’ असा उच्चार घेतला. त्याचा पुढे अपभ्रंश म्हणजे ‘सुशी’ असा झाला. आता सुशी हा शब्द सगळ्यांनाच माहीत आहे. बोकुहित्सु नावाच्या खास ब्रशच्या वापराने ही लिपी लिहिली जाते.
संस्कृत मिश्रित सिद्धमचा वापर बौद्ध समुदायाच्या धार्मिक लिखाणात केला गेला आहे. जपानमध्ये बौद्ध सूत्र, मंत्र सगळे सिद्धममध्ये आढळतात. तसेच कोरियापर्यंत देखील ही भाषा पोहोचली आहे.
भारतात मात्र देवनागरी लिपी लोकांना सोपी वाटू लागल्याने सिद्धम अडगळीत गेली. नंतर कालांतराने भारतातून लोप पावली.
सिद्ध किंवा सिद्धम म्हणजे बरोबर किंवा अचूक. असा सुंदर अर्थ असल्याने चक्क देवांची भाषा म्हणूनच जपान मध्ये ह्या सिद्धम लिपीला मान आहे. ह्याला बोंजी लिपी असेही म्हटले जाते.
देवाची भाषा किंवा शुभ अक्षरे असणारी भाषा असे मानले गेल्याने जपानच्या घरांमध्ये, दुकानात, ऑफिस मध्ये देखील ह्या भाषेत लिहिलेली सूत्रे भिंतीवर पोस्टरच्या स्वरूपात आढळतात. जापनीज मंदिराच्या भिंतींवर नी घुमटांवर देखील सिद्धम अक्षरे दिसतात.
यासुकोनी इनोकि हे जापनीज अँबॅसिडर म्हणाले होते की,
‘८०% जपानी देवता ह्या भारतातून बौद्ध आणि हिंदू धर्मातून प्रेरित आहेत. पण हे जास्त लोकांना माहीत नाही. कारण त्या चायनामार्फत जपानपर्यंत पोहोचल्या आहेत.’
हिंदू देवता जपान मध्ये पूजल्या जातात ह्या विषयावर एक फिल्म सुद्धा उपलब्ध आहे.
अशाप्रकारे भारतीय संस्कृतीशी नाळ जपलेल्या जपान देशात आपलीच एक भाषा, तिची लिपी अजूनही वापरली जाते हे ऐकून आणि पाहून नक्कीच अभिमान वाटतो..!
–
- एखाद्या प्राण्याची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे कसे ठरवले जाते? जाणून घ्या
- नामशेष झालेलं जगातील ८ वं आश्चर्य शोधल्याचा शास्त्रज्ञांचा दावा!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.