आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
S-400 मिसाईल कराराचा मुद्दा सध्या बऱ्याच चर्चेत आहे, रशियन बनावटीची ही मिसाईल सिस्टीम जमिनीवरून हवेत मारा करणारी आणि लढाऊ विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना हवेतच बेचिराख करून टाकणारी अत्याधुनिक आणि प्रचंड संहारक अशी मिसाईल सिस्टीम आहे.
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती पुतीन यांनी या मिसाईल सिस्टीमच्या करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत.
S400 मिसाईल सिस्टीम काय आहे, तिचा इतिहास काय, तिची कार्यपद्धती काय, तिचे वैशिष्ट्ये काय इत्यादी बाबींचा आढावा आता आपण घेऊयात.
शीतयुद्धाच्या दरम्यान अमेरिका आणि सोव्हिएत संघात शस्त्रसज्ज होण्याची जणू शर्यतच लागली होती, जी आज सोव्हिएत संघ कोलमडल्यानंतर रशियाने पुढे सुरू ठेवलेली आहे.
त्या दरम्यान अमेरिकेने अनेक उन्नत क्षेपणास्त्रांची निर्मिती केली मात्र सोव्हिएत संघ अमेरिकेच्या तोडीचे क्षेपणास्त्र विकसित करू न शकल्याने त्यांनी क्षेपणास्त्रांना मारून पाडणारी ‘Surface To Air’ क्षेपणास्त्र तयार करण्यास सुरुवात केली.
१९६७ मध्ये रशिया जेव्हा सोव्हिएत संघाचा सदस्य होता तेव्हा S200 या मिसाईल सिस्टीमची निर्मिती करण्यात आली, S सिरीजची ती पहिली मिसाईल सिस्टीम होती.
१९६७ ची ती मिसाईल सिस्टीम किती उन्नत होती याचे अनुमान एकाच गोष्टी वरून लावता येईल ती म्हणजे ही मिसाईल सिस्टीम आजही उपयोगात आहे.
पुढे १९७८ मध्ये S300 ही S200 पेक्षा तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम अशी मिसाईल सिस्टीम अपग्रेड करण्यात आली, लांबच्या अंतरावर Surface To Air मारा करणारी S300 ही आजही नावलौकिक मिळवते आहे.
१९९१ मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर रशिया हा सर्वात मोठा देश ठरला, स्वाभाविकपणे अनेक शस्त्रास्त्र आणि उन्नत तंत्रज्ञान त्यांनाच मिळाले. रशियाने वेळोवेळी त्यात सुधारणा करून शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण केले. त्यानंतर २८ एप्रिल २००७ मध्ये S400 मिसाईल्स सिस्टीमची निर्मिती करून तैनाती करण्यात आली.
S400 च्या मारक क्षमतेचा विचार करावयाचा झाल्यास सिस्टीम मध्ये लागलेले रडार ६०० किलोमीटरपर्यंतच्या टार्गेटला शोधून त्याची माहिती पुरवते, त्यानंतर S400 मध्ये लागलेले सुपरसोनिक आणि हायपरसोनिक मिसाईल ३० किलोमीटरच्या उंचीवर तब्बल ४०० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर हल्ला करू शकतात.
लढाऊ विमान, क्रूझ व बॅलेस्टिक मिसाईल्स आणि जमिनीवरच्या लक्ष्यांना भेदण्याचे महत्वपूर्ण काम ही सिस्टीम पार पाडते.
या मिसाईलचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ४०० किलोमीटरच्या वर्तुळात ही मिसाईल एक सोबत ३६ लक्ष्यांवर अचूक निशाणा घेऊन त्यांना नष्ट करू शकते.
या सिस्टिमची आणखी एक खासियत अशी की अमेरिकेत निर्मित जगातील सर्वात घातक लढाऊ विमाम F-22 ला पाडण्याची क्षमता S400 मध्ये आहे.
भारताच्या दृष्टीने विचार करावयाचा झाल्यास चीन आणि पाकिस्तानच्या ‘न्यूक्लियर पावर्ड बॅलेस्टिक मिसाईल्स’ पासून भारतीय उपखंडाला वाचवण्याची क्षमता S400 मध्ये आहे, ही सिस्टीम भारतासाठी एक प्रकारचे ‘मिसाईल कवच’ ठरणार आहे.
अनेक संरक्षण तज्ञांच्या मते .400 भारतासाठी गेम चेंजर ठरणार आहे, शेजारी राष्ट्र चीन आणि पाकिस्तानच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या आण्विक मिसाईल्स किंवा लढाऊ विमानांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी S400 सक्षम आहे.
चीन आणि पाकिस्तानने एकाच वेळी हल्ला केल्यास रणनीतीक दृष्ट्या उत्तम ठिकाणांवर S400 ची तैनाती करून एक सोबत चीन व पाकिस्तानला कडवे आव्हान दिले जाऊ शकते. सद्यस्थितीत रशिया वगळता फक्त चिनी सैन्याकडे ही मिसाईल सिस्टीम उपलब्ध आहे, त्यामुळे भारताला S400 मिळण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.
भारताच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या कराराला अमेरिकेचा मात्र विरोध राहिलेला आहे,
‘हा करार झाल्यास भारतावर कडक निर्बंध घातले जाऊ शकतात’, असा धमकीवजा सल्ला देखील अलीकडेच अमेरिकेतर्फे देण्यात आलेला होता.
मात्र भारताने अमेरिकेच्या या धमक्यांना बळी न पडता रशिया सोबत आपला करार केला आहे. अमेरिकेच्या या विरोधामागे दोन प्रमुख कारणं आहेत, पहिलं म्हणजे अमेरिकेची थाड मिसाईल सिस्टीम.
थाड मिसाईल्स सिस्टीमचा विचार करायचा झाल्यास S400 च्या तुलनेत ‘थाड’ कमी प्रभावशाली ठरते मात्र या दोन्ही सिस्टीम संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या आहेत.
भारत अमेरिकेचे संबंध बघता भारताने रशियन S400 ऐवजी अमेरिकन ‘थाड’ विकत घेणे अमेरिकेला अपेक्षित होते, मात्र भारताने थाड पेक्षा वरचढ ठरणाऱ्या S400 ला पसंती देणे अमेरिकेच्या विरोधामागचं प्राथमिक कारण आहे.
दुसऱ्या कारणाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास चीन आणि रशिया या दोन अमेरिकन शत्रू राष्ट्रांविरुद्ध भारत हा अमेरिकेचा सर्वात मजबूत साथीदार आहे. अशात भारताने S400 च्या माध्यमातून रशियाच्या निकट जाणे अमेरिकेच्या जिव्हारी लागणार आहे.
मध्यंतरी याच कारणांवरून अमेरिकेने चिंता व्यक्त केलेली होती, शिवाय धमकीवजा सल्ला देण्याचा प्रयत्न देखील केला होता.
मात्र भारत सरकारने अश्या धमक्यांना बळी न पडता, ‘सर्वप्रथम राष्ट्रहित’ या तत्वाला अनुसरून S400 मिसाईल सिस्टीम खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय.
करार झाल्यानंतर मात्र अमेरिका बऱ्यापैकी शांत झालाय. हा करार झाल्यास अमेरिके मार्फत भारतावर निर्बंध घातल्या जाऊ शकतात अशी धमकी अमेरिकेने दिलेली आहे मात्र ते निर्बंध किती कठोर असतील, किती काळा साठी असतील, असतीलही की नाही इत्यादी गोष्टी ह्या भविष्याच्या गर्भात आहेत.
पण एक गोष्ट शंभर टक्के निश्चित आहे आणि ती म्हणजे या सिस्टीम भारतीय सैन्याला प्राप्त होण्याने आपल्या सैन्याची शक्तीं कैकपटीने वाढणार आहे जे आपल्या शेजारी शत्रू राष्ट्रांना धडकी भरवण्यास पुरेसे आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.