आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्या समाजात अजूनही लव्ह मॅरेज करणे अनेकांना रुचत नाही, पटत नाही. त्यात जर तो आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह असेल तर समाजाला दोन भिन्न जातीय किंवा भिन्न धर्मीय लोक विवाह करत आहेत ही कल्पनाच सहन होत नाही.
खरे तर लग्न करण्यासाठी दोन व्यक्ती एकमेकांना मनापासून आवडणे गरजेचे आहे.
दोन व्यक्तींचे जर एकमेकांवर मनापासून प्रेम असेल, त्या व्यक्ती एकमेकांची काळजी घेत असतील, एकमेकांबरोबर आनंदात राहू शकत असतील तर त्यांनी एकमेकांशी लग्न करायला काहीच हरकत नसायला हवी.
पण समाजाला ह्या सर्व गोष्टींपैकी काहीही महत्वाचे न वाटता फक्त जात व धर्म महत्वाचे वाटतात. खरेतर लग्न टिकण्यासाठी फक्त एकमेकांविषयी प्रेम,काळजी व विश्वास असायला हवा पण आपल्याकडे धर्म, जात ह्यांचेच अवडंबर माजवले जाते.
बहुसंख्य मुसलमान लोक अजूनही कट्टरपणे त्यांच्या धर्माचे पालन करतात. जर एखाद्या भिन्नधर्मीय मुलीला एखाद्या मुस्लिम मुलाशी लग्न करायचे असल्यास तिला आधी धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारावा लागतो तरच ते लग्न होऊ शकते असा ईस्लामी नियम आहे.
आपल्या धर्मातील एक मुलगी दुसऱ्या धर्मात जाते व त्या धर्मात तिला अनेक जाचक रुढींप्रमाणे वागावे लागते, तिचे स्वातंत्र्य नष्ट होते. अनेकदा तिचा छळ होतो, फसवणूक सुद्धा होते. म्हणूनच अनेक हिंदुत्ववादी लोक ह्या विवाहाला तसेच ह्या धर्मांतराला विरोध करतात.
जर ह्या विवाहासाठी धर्मांतर सक्तीचे नसते तर कदाचित ह्या विवाहांना तितका विरोध सुद्धा झाला नसता. विरोध हा विवाहाला नसून धर्मांतराला आहे.
अनेक मुस्लिम लोक हा धर्मंतराचा नियम कट्टरपणे पाळतात पण गौरी खान, करीना कपूर ह्यांनी मात्र ह्या नियमाला छेद देऊन आपला धर्म बदलला नाही.
मात्र बहुसंख्य केसेसमध्ये मुलींना धर्मांतर करावेच लागते. ह्याचेच एक उदाहरण म्हणून पुढे एका पत्राचे भाषांतर देत आहोत जे एका भावाने आपल्या बहिणीच्या समस्येवर मार्गदर्शन मिळावे म्हणून एका काउंसिलरला लिहिले आहे.
ह्या भावाचे म्हणणे आहे की,
“माझ्या बहिणीने तिच्या मुस्लिम प्रियकराशी जरूर लग्न करावं पण धर्मांतर करू नये.”
ह्या व्यक्तीच्या बहिणीला आपला धर्म तर सोडायचा नाहीये पण तिच्या मुस्लिम प्रियकरालाही गमवायचे नाहीये.
हा भाऊ लिहितो की,
“माझ्या बहिणीचे एका मुस्लिम तरुणावर प्रेम आहे व आम्ही हिंदू आहोत. तो मुलगा माझ्या बहिणीसाठी योग्य मॅच आहे. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. परंतु माझ्या आई वडिलांची मात्र हे लग्न व्हावे अशी फार इच्छा नाहीये. मी मात्र माझ्या बहिणीच्या बाजूने उभा आहे परंतु तिचे धर्मांतर मात्र मला अजिबात मान्य नाहीये.
माझ्या बहिणीने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारावा अशी त्या मुलाची इच्छा आहे. असे केले तरच तो तिच्याशी लग्न करू शकेल असे त्याचे म्हणणे आहे.
ह्यामुळे माझी बहीण मात्र संभ्रमात पडली आहे. केवळ लग्न व्हावे म्हणून धर्मांतर करण्याची तिची इच्छा नाहीये. तसेच तिला हा मुलगा मनापासून आवडत असल्याने त्याला गमावण्याचीही तिची इच्छा नाही.
मला माझ्या बहिणीची खूप काळजी वाटते आहे. कुणीतरी ह्यावर उपाय सुचवा कारण मला माझ्या बहिणीला ह्या परिस्थितीत बघून त्रास होतो आहे. तिचे त्याच्यावर मनापासून प्रेम आहे तसेच त्याचेही तिच्यावर खूप प्रेम आहे. कृपा करून मला ह्यातुन काय मार्ग काढता येईल हे सुचवा.”
ह्या प्रश्नाचे उत्तर देताना रिलेशनशिप काउन्सेलर स्निग्धा मिश्रा म्हणतात की,
“मी तुम्हाला एकच सल्ला देऊ इच्छिते की तुमच्या बहिणीला व तिच्या प्रियकराला सपोर्ट करा. त्यांना तुमचे प्रेम आणि सहानुभूती द्या. धर्मांतर करायचे की नाही हा निर्णय फक्त लग्न करणाऱ्या दोन व्यक्तींचा असतो. बाहेरचे कुणीही त्याबाबतीत काही बोलू अथवा करू शकत नाही.
धर्मांतर करायचे की नाही हा निर्णय खरे तर फक्त आणि फक्त तुमच्या बहिणीचा असायला हवा. इतर कुणीही तिच्याबाबतीत हे ठरवू शकत नाही. तिचा नवरा सुद्धा नाही. तिने कुठला धर्म पाळावा हे फक्त तीच ठरवू शकते.
तिला धर्मांतर काय असते व ते केल्याने काय होईल ह्याची संपूर्ण कल्पना आधीच तिच्या होणाऱ्या नवऱ्याने द्यायला हवी.
हे सर्व जाणून घेतल्यानंतर तिला जर धर्मांतर करायचे नसेल तर तिच्यावर ही धर्मांतराची सक्ती कुणीही करू शकत नाही. फक्त लग्नासाठी धर्मांतर करावेच लागेल ही सक्ती तिच्यावर कुणीही करणे चुकीचे आहे.
कुठल्याही नात्याचा पाया हा एकमेकांचा आदर केल्याने, एकमेकांना आहे तसे स्वीकारल्याने भक्कम होतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीचा धर्म स्वीकारण्याचा आणि आपल्या आवडत्या देवावर श्रद्धा ठेवण्याचा संपूर्ण हक्क आहे. हा हक्क प्रत्येकाला आपल्या संविधानाने दिला आहे.
म्हणूनच खरे तर धर्मांतराचा लग्नाशी काही संबंध असू नये. लग्नानंतर सुद्धा जर नवरा बायको वेगवेगळ्या धर्माचे असतील तर दोघांनाही आपापला धर्म फॉलो करण्याचा संपूर्ण हक्क आहे.
कुणीही कुणावरच आपल्या धर्माची सक्ती करू शकत नाही. म्हणूनच त्या दोघांनाही संपूर्ण पाठिंबा द्या. तुमच्या बहिणीला पाठिंबा द्या व तिला हे सांगा की तिच्यावर कुणीही धर्म बदलण्याची सक्ती करू शकत नाही.”
घरचे सांगतात म्हणून लग्न करून टाकणे आता बदलायला हवे. काळाप्रमाणे समाज इव्हॉल्व होतो आहे तसे आपले विचार सुद्धा बदलायला हवे. लग्न हे दोन व्यक्ती एकमेकांना आवडतात आणि त्यांना आयुष्यभर एकमेकांबरोबर सुखाने राहता यावे म्हणून करायची गोष्ट आहे.
दोन व्यक्ती जर एकमेकांवर मनापासून प्रेम करत असतील आणि आयुष्यभर एकमेकांबरोबर आनंदात राहू शकत असतील तर त्या लग्नाच्या आड कुठलाही धर्म, कुठलीही जात यायला नको.
जर ती व्यक्ती तुम्हाला मनापासून आवडते तर मग तिला तुम्ही आहे तसे तिचा स्वभाव, गुण-दोष व तिच्या धर्मासह व तिच्या श्रद्धेसह स्वीकारायला हवे. तुमचे जर तिच्यावर खरे प्रेम आहे तर मग तिच्यावर केवळ लग्नासाठी धर्मांतराची सक्ती कशासाठी?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.