आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
राजसाहेब, २००६ साली जेव्हा तुम्ही नव्या पक्षाची नांदी घालून महाराष्ट्रभर जो झंझावात पेटवलात, तेव्हा अक्षरशः क्रांती घडुन आल्यासारखं वाटलं. प्रत्येक शेंबड्या पोराप्रमाणे मी देखील ‘राज साहेबांचा विजय असो….जय मनसे’ अशा घोषणा देत गल्लीबोळात फिरत असे.
आजही आठवतंय…. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पट्टी मला पहिल्यांदा कुठूनशी मिळाली तेव्हा दिवसभर मी ती गळ्यात घालून मिरवत होतो.
एका प्रचारात घुसून हळूच चोरून मनसेचा एक झेंडा देखील मी मिळवला होता, तो घरावर लावण्यासाठी आईकडे केलेला हट्ट आठवून आजही हसू येतं.
जो पक्ष तुम्ही सोडलात त्या शिवसेना पक्षाचं घाटकोपर विभागात प्राबल्य असूनही सगळ्यांच्या तोंडावर तुमचंच नाव होतं….खरंतर हीच तुमच्या व्यक्तिमत्वाची जादू…! आणि घाटकोपरच काय तर अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही वेड लावलं होतं. सर्वोत्तम नेतृत्वगुण असूनही बाळासाहेबांनी सेनानेतृत्व तुमच्याच हातात दिलं नाही ही खंत प्रत्येकाच्याच मनात होती.
–
हे ही वाचा – देशाच्या राजकारणातला खरा चाणक्य कोण? : इतिहासात डोकावून केलेला धांडोळा
–
मात्र नवीन पक्षाला जन्म देऊन तुम्ही आपलं वेगळं युद्ध सुरू केलं आणि मराठी माणसाला दुसरे ‘साहेब’ मिळाले. पण वर्षामागुन वर्षे सरत गेली आणि वाईट वाटतं बोलताना मात्र तुमची ती जादू कुठेतरी उतरत गेली.
आजवर कोणत्याही पक्षाला पहिल्याच निवडणुकीत महाराष्ट्राने जो प्रतिसाद दिला नाही तो प्रतिसाद तुमच्या पक्षाला मिळाला.
पण कुठेतरी बेरीज वजाबाकी चुकली आणि आजवर सगळं गणितच चुकत गेलं. सांगताना खेद वाटतो पण ज्या राजसाहेबांसाठी रस्त्यावर उतरायला तयार असणारी तेव्हाची शेंबडी पोरं आज मोठी झाल्यावर मात्र त्याच राजसाहेबांच्या पक्षाला हसतात, टीका करतात हीच शोकांतिका आहे.
“राज साहेबांना खूप काही लगेच मिळालं पण त्यांना ते टिकवता आलं नाही, पक्ष वाढवता आला नाही”
हे दुखरे बोल तुमच्यासारख्या व्यक्तिमत्त्वासाठी वापरले जातात तेव्हा महाराष्ट्राच्या समृद्ध राजकारणाने भविष्यात ज्याला देवत्व लाभेल असा एक थोर नेता गमावला का हा प्रश्न मनात उठतो.
पण राजसाहेब एक गोष्ट मात्र खरी आहे आजही अख्खा महाराष्ट्र तुमच्या पर्सनॅलिटीचा जबरदस्त फॅन आहे.
तुमच्या सभांना होणारी गर्दी आजही इतर पक्षांच्या मनात धडकी भरवते. मात्र ही गर्दी फक्त तुमचं भाषण ऐकायला येते हे दुर्दैव! तुम्ही बऱ्याचदा म्हणताही,
“भाषणाला गर्दी करता मग मत का मिळत नाहीत?”
कारण साहेब, लोकांना वाटतं, “मनसेला मत दिलं म्हणजे फुकट जाणार, त्यापेक्षा का द्यायचं?”आणि हे यामुळे, कारण लोकांच्या आपल्या मराठीहृदयसम्राटाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण नाही झाल्या.
राजसाहेब तुमच्या कमीपणाचा पाढा वाचून तुमचा अनादर करायचा कोणताही हेतू नाही आणि तेवढी माझी कुवतही नाही. अजूनही कुठेतरी मनात तुमची जादू कायम आहे. आजही तुमचं भाषण ऐकावंस वाटतं. जय मनसेच्या घोषणा द्याव्याश्या वाटतात. एखादया परप्रांतीयाशी बाचाबाची झाली की तुमचा चेहरा पहिला डोळ्यासमोर येतो.
आज मनसेचा दरारा असता तर आपल्याच राज्यात आपल्याला अहंकारी परप्रांतीयांच्या तोंडाशी लागायची वेळ आली नसती असं राहून राहून वाटतं. आणि हे फक्त माझ्याच नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनी असावं हे खात्रीशीर सांगू शकतो. एका ओळखीच्या काकांशी चर्चा केली तेव्हा ते म्हणाले की,
“महाराष्ट्रात मराठी माणसाला टिकवून ठेवणारा एकच माणूस आहे तो म्हणजे राज ठाकरे.….फक्त ते ऍक्टिव्ह झाले ना की एक झटक्यात सत्ता मिळवतील. सत्तते आल्यावर काय करतील माहीत नाही पण मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणार नाहीत….”
राजसाहेब हीच आहे तुमची खरी ताकद…
आजही मराठी माणूस तुमच्यासाठी वेडा आहे आणि जो मराठी माणूस झोपी गेलाय त्याच्याही मनात तुम्हीच आहात. फक्त त्या प्रत्येकातील राजसाहेबांना जाग करायचं आहे आणि ते तुम्हीच करू शकता. असं म्हटलं जातं की तुमची खळळ खट्याकची भाषा लोकशाही विरोधी आहे….
पण गंमत म्हणजे अर्ध्याहून अधिक मराठी माणसांना तुमची हीच स्टाईल आवडते.
आम्हाला केवळ भाषणपूरती लोकांनी ज्यांचे गुणगान गावे ते राजसाहेब नको आहेत. ज्यांना लोकांनी बोलघेवडा म्हणावं ते राजसाहेब नको आहेत. ज्यांचं केवळ व्यंगचित्रकार म्हणून कौतुक केलं जावं ते राजसाहेबही नको आहेत. ती तनुश्री दत्ता सारखी अभिनेत्री थेट तुमच्यावर आरोप करते, असे विनाकारण कोणीही ज्यांना नावे ठेवावीत असे राजसाहेब आम्हाला नको आहेत.
आम्हाला ते पूर्वीचे राजसाहेब हवे आहेत ज्यांच्या एका गर्जनेने अख्खा महाराष्ट्र पेटून उठायचा. ज्यांनी पूर्वी एक फटक्यात १३ आमदार निवडून आणले होते ते राजसाहेब आम्हाला हवे आहेत.
मराठी माणसाचा खंदा पाठीराखा म्हणून तुम्ही हवे आहात. राजसाहेब मी कोणी मनसेचा कार्यकर्ता नाही की माझा तसा विचारही नाही. हो पण ज्या राजसाहेबांवर आम्ही जीव ओवाळत होतो ते राजसाहेब परत आले तर एक सच्चा राजसाहेब समर्थक व्हायला नक्कीच आवडेल.
–
हे ही वाचा – काशिनाथ घाणेकर, राज ठाकरे ते विनोद कांबळी : “त्या राखेतून पुन्हा-पुन्हा उठून उभा राहीन मी…!”
–
आणि मीच काय तर हा अख्खा महाराष्ट्र तुम्हाला स्वतःहुन खांद्यावर उचलेल….
पण त्यासाठी राजसाहेब तुम्हाला परत यावं लागेल…केवळ आणि केवळ मराठी माणसाला त्याचे स्थान मिळवून देण्यासाठी कार्यरत असणारा महाराष्ट्राचा पाठीराखा म्हणून राजसाहेब परत या…!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.