पहिल्याच टेस्टमध्ये सेंच्युरी मारणारा पृथ्वी शॉ, प्रत्येकासाठी प्रेरणादायी, नक्की वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आज सर्व क्रिकेट रसिकांच्या तोंडी एकच नाव आहे… पृथ्वी शॉ! वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करणाऱ्या पृथ्वीने राजकोट मध्ये पदार्पणातच शतक ठोकलंय! पहिल्या कसोटीत शतक ठोकणाऱ्या या खेळाडू विषयी अनेक जणांना उत्सुकता आहे.
शाळेतल्या क्रिकेट मॅचेस पासून ते आयपीएल पर्यंत पृथ्वी शॉने जबरदस्त कामगिरी करून भारतीयांच्या आशा उंचावल्या आहेत.
अठरा वर्षाच्या या युवकाने रणजी आणि दलीप ट्रॉफी मध्येही अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. जाणून घेऊया पृथ्वी बाबत आणखी काही गोष्टी..
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आपल्याकडे आहे. पृथ्वीच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत खरी खरते. पृथ्वीचा जन्म विरार येथे झाला. त्याचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे.
पृथ्वी लहानपणापासूनच अत्यंत मेहनती आहे. दुर्दैवाने त्याला आईची साथ लाभली नाही. तो चार वर्षांचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले आणि त्याचा सांभाळ त्याच्या वडिलांनी केला.
पृथ्वीचे करिअर घडवण्यासाठी त्याच्या वडिलांनी अनेक त्याग केले आहेत. पृथ्वी म्हणतो की,
“मी दिवसभर क्रिकेट प्रॅक्टिस करतो आणि माझे वडील सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्या सोबतच असतात.”
क्रिकेटर व्हायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रॅक्टिस दरम्यान अनेकदा त्याच्या वडिलांनीच बॉलरची भूमिका निभावली आहे. मध्यंतरी पृथ्वीच्या वडिलांचा व्यवसाय आर्थिक कारणामुळे डबघाईला आला होता. परंतु त्याला स्कॉलरशिप मिळाली आणि त्यांच्या घराची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारली.
२०१० मध्ये AAP एंटरटेनमेंटने त्याच्या सोबत करार केला आणि त्याला व त्याच्या वडिलांना मुंबई मध्ये स्थलांतरित केले. तिथे त्याचे शिक्षण आणि क्रिकेट प्रॅक्टिस साठी बरीच मदत केली. पृथ्वीला इंडियन ऑइल या कंपनीतर्फेही स्पॉन्सरशीप मिळाली आहे.
अठरा वर्षाचा पृथ्वी शॉ भारताचा दुसरा सर्वात तरुण ओपनर खेळाडू आहे ज्याने भारतातर्फे ओपनिंग केली आहे.
त्याच्या पूर्वी विजय मेहराने वयाच्या सतराव्या वर्षी १९९५ मध्ये मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियम वर न्यूझीलंड विरुद्ध ओपनिंग केली होती. विजय मेहरा नंतर कित्येक वर्षांनी कमी वयाच्या खेळाडूला ओपनिंग करण्याचा मान पृथ्वीला मिळाला.
टेस्ट मॅच खेळणारा ‘शॉ’ आडनावाचा हा जगातला दुसराच खेळाडू. पहिला खेळाडू होता इंग्लंडचा आल्फ्रेड शॉ नावाचा गोलंदाज, ज्याने १८७७ मध्ये कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते.
या वर्षीच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट वर्ल्डकप मध्ये पृथ्वी भारतीय संघाचा कॅप्टन होता. त्याने एकूण सहा मॅच मध्ये २६१ रन वर्ल्डकप मध्ये काढले.
जानेवारी २०१८ मध्ये त्याची दिल्ली डेअरडेव्हील या संघाकडून निवड झाली. लिलावात त्याच्यासाठी एक कोटी वीस लाखाची बोली लावली गेली होती. २३ एप्रिल २०१८ रोजी इंडियन प्रीमिअर लीग च्या इतिहासातील तो सर्वात लहान खेळाडू ठरला.
या दिवशी त्याची पहिली मॅच किंगस इलेव्हन पंजाब सोबत झाली आणि पहिल्याच मॅच मध्ये त्याने दहा बॉल मध्ये बावीस धावा काढून आपली निवड सार्थ ठरवली!
२७ एप्रिल २०१८ ला त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पहिले अर्धशतक ठोकले आणि सर्वात लहान वयात आयपीएल मध्ये अर्धशतक ठोकणारा खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली.
त्याची ६२ धावांची जबरदस्त खेळी संघाच्या विजयाची शिल्पकार ठरली.
४ ऑक्टोबर २०१८ या दिवशी त्याने शतक ठोकले आणि सचिन तेंडुलकर नंतर सर्वात लहान वयात कसोटी शतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू बनला.
पृथ्वी शॉ बाबत बोलताना सचिन तेंडुलकर म्हणतो की,
“दहा वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने माझे लक्ष पृथ्वीकडे वेधले होते. त्याने असे सांगितले की, पृथ्वीच्या खेळाचे विश्लेषण करून त्यात आणखी सुधारणा करता येईल का हे बघ. मी पृथ्वीचा खेळ बघून प्रभावित झालो.”
“त्याच्या सोबत काही काळ घालवला आणि त्याला बऱ्याच टिप्स दिल्या. त्याच वेळी माझ्या मित्राला सांगितले होते की, हा मुलगा भविष्यात भारताकडून नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल.”
पृथ्वी शॉला अनेकजण सचिन तेंडुलकरचा वारसदार मानत आहेत. त्याने असा एक पराक्रम केला होता ज्यामुळे महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले होते.
नोव्हेंबर २०१३ मध्ये पृथ्वी शॉने हॅरिस शिल्ड मध्ये एक राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. आंतरशालेय सामन्यात रिझवी स्प्रिंगफिल्ड तर्फे खेळताना सेंट फ्रान्सिस विरोधात त्याने तब्बल ५४६ धावा कुटल्यात. या धावा त्याने ३३० चेंडूत काढल्या.
या खेळीत ८५ बाऊंडरीज आणि पाच सिक्स त्याने मारले. अधिकृत आंतरशालेय क्रिकेट मॅच मध्ये पाचशे धावा काढणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. (नंतर हा रेकॉर्ड प्रणव धनावडे याने ४ जानेवारी २०१६ मध्ये मोडला.)
विशेष बाब म्हणजे सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून अधिकृत संन्यास ज्या दिवशी स्वीकारला त्याच्या चौथ्या दिवशीच हा विक्रम घडला आणि पृथ्वी नावाचा हिरा सर्वांच्या नजरेस आला.
त्यानंतर आजपर्यंत पृथ्वी शॉने आपल्या चमकदार खेळीने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडण्यात कसूर दाखवली नाही.
हा अठरा वर्षाचा खेळाडू शालेय क्रिकेटपासून ते अंडर नाईन्टीन आणि तिथून आयपीएल मध्ये आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सातत्याने आपला करिअरचा ग्राफ उंचावतच नेत आहे. भविष्यात अधिक चांगली कामगिरी पृथ्वीच्या हातून घडावी यासाठी त्याला आपण शुभेच्छा देऊया..
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.