Site icon InMarathi

लढाऊ विमाने, पाण्यात खोलवर दडलेल्या पाणबुड्यांचा अचूक वेध कसा घेतात?

fighter jets inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मानवाला युद्धे काही नवीन नाहीत आणि आजही युद्ध तोंडावर असल्याची जाणीव सतत होत असते. आधुनिक युद्धशास्त्र इतकं प्रगत झालं आहे की, मानवाचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे हे डोळ्यासमोर दिसतं.

प्रत्येक नवीन अस्त्र अधिक भेदक क्षमतेसह शत्रूला नामोहरम करण्यासाठी सज्ज असतं.

मग कालांतराने त्यावर मात करणारं नवीन अस्त्र गवसतं आणि ही स्पर्धा कधी संपतच नाही.

पाणबुडीचा शोध हा आधुनिक युद्धशास्त्रात असाच एक महत्वाचा टप्पा होता. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात पाणबुड्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.

जर्मनांना दोन्ही महायुद्धात अंतिम यश मिळाले नाही, परंतु त्यांच्या पाणबुड्यांची मारकक्षमता समोरील राष्ट्रांना मोठं नुकसान पोहचवून गेली.

 

india.com

 

त्यामुळेच नौदलात पाणबुड्यांचा ताफा असणं हे गरजेचंच झालं. आता नवीन तंत्रज्ञानाने समृद्ध असलेल्या या पाणबुड्या अधिक सक्षम झाल्या आहेत.

त्यांचा दबदबा आजही आहे, पण त्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांना उध्वस्त करणं आता शक्य आहे. त्यामुळे कुठलेही अस्त्र अंतिम नाही हे पुन्हा सिद्ध झालं आहे.

पाणबुड्यांची मारकक्षमता लक्षात आल्यावर त्यांना आवर घालणं गरजेचं होतं. अशावेळी पाण्याखाली त्यांचा ठावठिकाणा शोधणे हे तसे कठीण काम होते.

मग पाणबुड्यांच्या सहाय्यानेच शत्रूराष्ट्राच्या पाणबुड्या नष्ट करणे इथून पाण्याखालच्या युद्धाला सुरुवात झाली. त्यात हानीदेखील मोठी होत होती.

पाणबुडीच्या निर्मितीसाठी वेळ आणि पैसा यांची मोठी गुंतवणूक होत असते. याशिवाय मनुष्यहानी होते ती वेगळीच. त्यामुळे जहाज आणि त्यानंतर विमानाच्या सहाय्याने पाणबुड्यांचा शोध घेणे ही काळाची गरज होती.

 

businessinsider.in

 

दुसऱ्या महायुद्धात विमानाच्या सहाय्याने हे शक्य होते. १९४२ पासून हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आजच्या काळाच्या तुलनेत त्याची अचूकता निश्चितच कमी असेल. पण आज मात्र हे तंत्रज्ञान अधिक अचूक आहे.

मग विमान आकाशात इतक्या उंचावर असतं तर ते पाण्याखाली असणाऱ्या पाणबुडीचा इतका अचूक वेध कसा घेतं?

याचं उत्तर आहे SONAR तंत्रज्ञानाच्या साहाय्याने. SONAR म्हणजे Sound Navigation And Ranging.

 

 

पाणबुडी संचार करत असलेल्या क्षेत्राच्या आसपास ध्वनितरंग सोडले जातात. मग ज्या ठिकाणी पाणबुडी असेल तिथून त्या ध्वनीतरंगांचे परावर्तन होते आणि मग पाणबुडी कोठे आहे त्याचे स्थान निश्चित करता येते.

हे तंत्रज्ञान जहाजात पण वापरले जाते. परंतु विमानाच्या तुलनेत जहाजाच्या हालचालीला मर्यादा असतात. जसे की, जहाज एकदम शत्रूराष्ट्राची सागरी हद्द पार करू शकत नाही.

म्हणून वेग, हल्ला करून निसटण्याची क्षमता, दूरवरच्या जागेत पोहोचण्याची क्षमता, कमी प्रमाणात असणारी जोखीम यांसारख्या वैशिष्टयांमुळे विमानाचा वापर करणे सोयीस्कर ठरते.

आता ही कारवाई प्रत्यक्ष कशी पार पडते ते पाहू.

या कारवाईसाठी नौदलाची गस्तीची विमाने वापरली जातात. जसे की, भारतात बोईंग कंपनीचे P८ या प्रकारचे विमान वापरले जाते.

पाणबुड्यांच्या शोधासाठी जे SONAR तंत्र वापरले जाते त्यासाठी SONOBUOY (उच्चार – सोनाबुऑय) हे उपकरण वापरण्यात येते. हे एक पोर्टेबल उपकरण आहे. एका आवरणात ते बंदिस्त असते.

जे समुद्रात विमानाच्या साहायाने क्षेपणास्त्रासारखे सोडले जाते. त्यासाठी पॅराशूटचा वापर करतात.

 

scienceabc.com

 

समुद्राच्या पृष्ठभागावर गेल्यानंतर पॅराशूट वेगळे होते. मात्र त्यासाठी आधी कुठले क्षेत्र लक्ष्य करायचे आहे ते ठरवणे आवश्यक आहे.

मग सुरुवातीला ते पाण्यावर तरंगते आणि मग पाण्याखाली जाऊ लागते. त्याचे आवरण पाण्यावरच असते.

हे उपकरण पाण्याखाली किमान २७ मीटर ते पुढे ४५७ मीटर पर्यंत खोल जाऊ शकते. शेवटी प्रत्यक्ष SONAR तंत्राचा वापर सुरु होतो.

आवश्यक खोलीपर्यंत पोहोचल्यानंतर पाच अँटिनाच्या साहाय्याने हे उपकरण पाणबुडीचा शोध घेऊ लागते. जे विमानाशी रेडिओ फ्रेक्वेंसीने जोडलेले असते.

जसा एका टोकाला अँटिना असतो तसेच वरच्या टोकाला देखील एक अँटिना असतो ज्याच्या साहाय्याने विमानापर्यंत पाण्याखालचे सिग्नल पोहचवले जातात.

वैमानिक आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्यांच्या संगणकावर ते सिग्नल्स दिसू लागतात. जर त्या क्षेत्रात पाणबुडी असेल तर अजून इतर sonobouy च्या सहाय्याने त्याची पडताळणी केली जाते.

याशिवाय डेटाबेस मधून आलेली माहिती आणि उपलब्ध माहिती यांची पडताळणी करून हे ‘लक्ष्य’ आहे हे अंतिमतः ठरवले जाते.

त्यानंतर इतर क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने पाणबुडी नष्ट करता येते.

 

theaviationist.com

 

युद्ध, सराव आणि विशेष कारवाई अशा विविध प्रकारात हे तंत्रज्ञान वापरले जाते. अर्थात प्रत्येक कारवाईनुसार त्याच्या वापरण्याच्या पद्धतीत फरक असतो.

एका P८ विमानात १२० SONOBUOYS लादण्याची क्षमता असते. एकाचवेळी मोठे क्षेत्र यामुळे व्यापाने शक्य होऊन जलदरीतीने कारवाई करणे शक्य होते.

आता पाणबुड्यादेखील आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. त्या anechoic टाईल्सने आच्छादलेल्या असतात. त्यामुळे ध्वनी शोषला जातो.

परिणामी SONAR तंत्र वापरण्याला मर्यादा येतात.

पाणबुड्यांच्या अधिक जवळ गेले तरच त्यांचा ठावठिकाणा कळतो. एकावेळी ६ ते १० तासांपर्यंत ही कारवाई चालू शकते. मात्र याचा एक फायदा असा होतो की, पाणबुडी अधिक काळापर्यंत समुद्राच्या पृष्ठभागावर येऊ न शकल्याने तिची कार्यक्षमता कमी होते.

समुद्राच्या पृष्ठभागावर जर पाणबुडी असेल तर ती अधिक वेगवान, जास्त मारकक्षमता असलेली असते.

त्यामुळे साहजिकच पाण्याच्या आत असल्याने तिच्यावर काही मर्यादा येतात व शत्रूराष्ट्राची कारवाई मंदावते.

 

scienceabc.com

 

लढाऊ विमाने खोल समुद्रातील पाणबुडी शोधून काढण्यासाठी केवळ हीच एक पद्धत वापरतात असे नव्हे. अजून MAD म्हणजेच मॅग्नेटिक अनोलोमी डिटेक्टर चा वापर केला जातो.

चुंबकीय शक्तीने पाणबुडी शोधण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो, मात्र यासाठी विमान फार खाली आणावे लागते जे जोखमीचे आहे.

या व्यतिरिक्त रडार व्यवस्था आहेच. यामुळे फक्त पृष्ठभागावर असणाऱ्या पाणबुड्यांचा शोध लागतो. ही एक मर्यादाच आहे.

अजून एक पद्धत म्हणजे पाणबुडीचे सिग्नल पकडणे, पण यालाही मर्यादा आहेच. थोडक्यात या इतर पद्धती गरजेनुसार वापरल्या जातात मात्र त्यांच्या मर्यादा त्यांचे अवलंबित्व कमी करतात.

SONOBUOY हे उपकरण मात्र अनेक मर्यादांवर मात करून खोल समुद्रातील पाणबुडी शोधून काढण्यासाठी लढाऊ विमानांच्या मदतीने आपले कार्य चोख पार पाडते. 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version