Site icon InMarathi

भारतीय सेनेचं ते “सीक्रेट-मिशन” ज्यामुळे आणखी एक राज्य भारतात विलीन झालं

sikkim inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय सेना म्हटलं की, प्रत्येक भारतीयाच्या अंगात एक चैतन्य सळसळते.

कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या सेनेने अनेक मोठ्या मोठ्या ‘मिशन’ यशस्वी केल्या आहेत आणि भारताचे नाव मोठं केलं.

आपल्या सेनेने पहिली मोठी कामगिरी केली, ती स्वातंत्र्य मिळाल्यावर निजामाची सत्ता असलेले हैद्राबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी केलेली धडक कारवाई.

त्यावेळी गृहमंत्री होते वल्लभ भाई पटेल. निजामाने पाळलेल्या रझाकरांच्या दादागिरीला हैद्राबाद संस्थानातले लोक पुरते त्रासून गेलेले होते, हे वल्लभ भाई पटेलांनी जाणले आणि हैद्राबादवर भारतीय सेनेला कारवाई करण्याचे आदेश दिले.

भारतीय सेना एकाचवेळी पाच मार्गांनी हैद्राबाद संस्थानात घुसली.

रझाकरांनी जोरदार प्रतिकार केला पण, सेनेपुढे त्या पाळलेल्या रझाकरांच्या टिकाव लागला नाही. निजामाचा प्रधान आणि रझाकरांच्या तुकडीचा नायक ह्या दोघांना अटक करण्यात आले.

काही तासातच हैद्राबाद संस्थान सेनेने ताब्यात घेतले. हैद्राबाद भारतात विलीन झाल्याची घोषणा झाली. ही भारतीय सेनेने केलेली पहिली धडक कारवाई.

 

 

अशीच आणखी एक मोठी कारवाई, जी आपल्या सेनेने यशस्वी केली आणि एक इतिहासच घडला.

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी सिक्कीम हे छोटे राज्य होते आणि ते स्वतंत्र राष्ट्र होते.

तिथे एका राजाची सत्ता होती. म्हणजेच ते भारतामध्ये नव्हते. त्यावेळी जवाहरलाल नेहेरू पंतप्रधान झाले होते आणि त्यांच्यापुढे सिक्कीमसाठी दोनच पर्याय उपलब्ध होते.

एक म्हणजे सिक्कीमला भारतात विलीन करून घेणे आणि दुसरा म्हणजे ते तसेच स्वतंत्र राज्य ठेऊन भारताने त्याला सहकार्य करायचे.

नेहेरुंनी दुसरा पर्याय निवडला आणि सिक्कीम स्वतंत्र राज्य ठेऊन त्याला संरक्षण देण्याचे ठरवले. वास्तविक बाकी सगळे भारतीय नेते सिक्कीमला भारतात विलीन करावे म्हणून आग्रही होते, पण तसे झाले नाही.

 

 

सिक्कीमचा राजा होता त्याला त्यांच्या भाषेत चोग्याल म्हणत. त्याचं नाव होतं ताशी नामग्याल.

ह्या राजाने सिक्कीमचे चांगले नेतृत्व केले होते. पण आता वृद्धापकाळ आला होता म्हणून त्याच्या मदतीला एक “राज्य समिती” नेमण्यात आली. ही समिती जनतेने निवडून दिलेली होती.

त्यामुळे कारभार सुरळीत चालू होता. सगळे काही आलबेल होते.

पण १९६२ मध्ये भारत आणि चीन युद्ध सुरू झाले. चिनी सैन्याची आणि भारतीय सैन्याची सिक्कीमच्या नथुला खिंडीत चकमक उडाली. पण भारतीय सैन्याने चिनी सैन्यावर मात केली.

त्या युद्धानंतर लगेचच ही नथुला खिंड बंद करून टाकली गेली, ती पार ६ जुलै २००६ ह्या दिवशी परत उघडली गेली.

१९६३ मध्ये सिक्कीम चोग्याल ताशी नामग्यालचे कॅन्सरच्या आजाराने आणि वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यानंतर सिक्कीमच्या गादीसाठी नामग्याल परिवारात वाद सुरू झाले. एक वर्ष पुढे हे वाद चालूच राहिले.

नेहरुंनी हा परिवार वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण तो मिटेना. १९६४ मध्ये नेहेरूंचे निधन झाले.

नेहरुंच्या निधनानंतर नामग्याल परिवार वाद जास्तच चिघळला आणि सिक्कीममध्ये अस्थिर वातावरण तयार झालं.

 

 

या वादातून तोडगा निघून पालदेन थोन्दूप नामग्याल हा चोग्याल झाला. १९६७ मध्ये चीनने परत डोके वर काढले आणि सिक्कीम आमचं म्हणून काही सैन्य सिक्कीम वर पाठवलं.

त्यावेळी सिक्कीमच्या चोग्यालसाठी भारतीय सेना मदतीला गेली आणि चिनी सैन्याला परतवून लावले.

१९७० मध्ये नवीन चोग्याल पालदेन थोन्दूप नामग्यालच्या कारकिर्दीत सिक्कीममध्ये अंतर्गत अस्थिरता वाढली. राजतंत्राच्या विरुद्ध जाऊन काही लोकांनी उठाव केला.

चोग्यालच्या महालासमोर निदर्शने होऊ लागली. नेपाळी लोकांना राज्यात प्राधान्य मिळावे म्हणूनही निदर्शने झाली.

लोक तंत्राच्या मागणीने जोर धरला आणि निवडणूक घेऊन निवडून आलेल्या नेत्यांनी राजकारभार चालवावा ह्यासाठी मागणी होऊ लागली.

सतत कारभारात अडथळे निर्माण होऊ लागले आणि अराजकाची स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी दंगे झाले. ह्या घटनांकडे भारतीय राज्यकर्ते लक्ष ठेऊन होते.

अराजक माजण्याची स्थिती होती त्यामुळे भारताने ह्या कारभारात हस्तक्षेप करणे जरुरीचे होते, कारण चीन तिकडे टपुनच बसला होता.

 

 

अशा परिस्थितीचा फायदा चीन घेऊ शकत होता पण, ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच शांत करणे जरुरीचे होते. कारण राज्याचा प्रधान ‘ल्हेंदुप दोरजी’ आणि चोग्याल ह्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.

प्रधान हा राज्य समितीने निवडून दिलेला होता आणि राज्याचे नेतेही प्रधानाच्या बाजूचे झाले होते. त्यामुळे राज्यकारभार ठप्प झाला होता. कारभारात सतत अडथळेच निर्माण केले जात होते. चोग्यालला सगळीकडूनच विरोध होऊ लागला होता.

भारताने अचानक सेनेला सिक्कीमच्या राजमहालावर ताबा मिळवण्याचे आदेश दिले.

सेनेने ताबडतोब राज महाल ताब्यात घेतला. इतर ठिकाणी आणि गंगटोकला सगळ्या रस्त्यातून सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्यांनी ताबा मिळवला.

सगळ्या सीमा त्वरित बंद करण्यात आल्या आणि सगळीकडे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

 

 

हे घडले काही तासातच.

कोणाला काहीही समजण्याच्या आधीच ही धडक कारवाई झाली आणि सिक्कीम कोणालाही काहीही न कळू देता ताब्यात घेण्यात आले. कोणताही हल्लाबोल न होता.

ही भारतीय सेनेनं केलेली यशस्वी कारवाई.

ही कारवाई होत असताना सिक्कीममध्ये ‘करील रिडले’ नावाचा अमेरिकन गिर्यारोहक मुक्कामाला होता. त्याने त्या संपूर्ण कारवाईचे फोटो काढले आणि ही माहिती देणारे एक पत्र तयार केले होते.

पण काही भारतीय सतर्क अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडच्या सगळे फोटो आणि पत्र नष्ट करून टाकले. त्यामुळे ह्या कारवाईचा कोणालाही मागमूस लागला नाही आणि अतिशय गोपनीय कारवाई यशस्वी पार पडली.

लगेचच १४ एप्रिल १९७५ रोजी सिक्कीममध्ये जनमत घेण्यात आले. २६ एप्रिल १९७५ ला निश्चित झालं की, सिक्कीम भारतामध्ये विलीन करायचे.

१६ मे १९७५ ह्या दिवशी सिक्कीम हे भारतामध्ये विलीन करण्यात आले. हे आता भारताचे २२ वे राज्य म्हणून ओळखले जाईल अशी अधिकृत घोषणा भारताकडून करण्यात आली.

पुढे ‘पालदेन थोन्दूप नामग्याल’ हा सिक्कीमचा राजा त्याला झालेल्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी अमेरिकेला गेला आणि तिकडेच त्याचे निधन झाले.

असे होते भारतीय सेनेचे ते सीक्रेट मिशन ज्यामुळे घडला इतिहास.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version