' सुरतहून महाराजांनी आणलेल्या या खजिन्याचा अर्धा भाग आजही अज्ञात आहे. – InMarathi

सुरतहून महाराजांनी आणलेल्या या खजिन्याचा अर्धा भाग आजही अज्ञात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड युद्धकौशल्याची साक्ष इतिहासात अनेक ठिकाणी अभ्यासायला मिळते. त्यांची राजकारणाची पद्धत, गनिमी कावा तंत्र हा जगभरातल्या इतिहास अभ्यासकांच्या कुतूहलाचा विषय आहे.

छत्रपतींनी अनेक लढाया जिंकल्या, प्रसंगी तह सुद्धा केले. पण हे करत असताना त्यांनी प्रजेची काळजी मात्र आवर्जून घेतली.

त्यांचे समकालीन शासनकर्ते एखाद्या ठिकाणी हल्ला करत असतील तर तिथल्या नागरिकांची सरेआम कत्तल करत असत.

मात्र आपले छत्रपती शिवाजी महाराज निष्पाप प्रजेच्या केसालाही धक्का लावत नसत. हेच त्यांचे मोठेपण होते.

महाराजांनी सुरत लुटले हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण त्यांनी दुसऱ्यांदा सुरत लुटले हे फार कमी जण जाणतात.  ३ ऑक्टोबरला महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत शहर लुटून मुघल साम्राज्याला जबरदस्त धक्का दिला होता.

 

chatrapati-inmarathi

 

तर जाणून घेऊया ही अद्भुत कहाणी…

सुरत शहर! मुघलांचे महत्वाचे व्यापारी शहर! या शहरात सोने-नाणे, हिरे-माणके खच्चून भरलेले होते. पहिल्या लुटीच्या वेळी या सुरत शहराला मराठा सैन्याने साफ केले होते आणि स्वराज्याचा खजिना भरला होता.

स्वराज्याच्या उभारणीसाठी त्या लुटीची मोलाची मदत झाली. पण अर्थातच यामुळे औरंगजेब खवळला होता. त्याने मिर्जा जयसिंहाला मराठ्यांवर हल्ला करण्यासाठी पाठवले. जयसिंहाने आपल्या प्रचंड सेनेच्या जोरावर असा पेच टाकला होता की, महाराजांना त्याच्याशी तह करणे भाग पडले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

हाच तो सुप्रसिद्ध पुरंदरचा तह! या तहात महाराजांना आपले २३ किल्ले आणि चार लक्ष रुपयांवर पाणी सोडावे लागले. नंतर आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला जावे लागले आणि तिथे अपमान झाल्यावर नजरकैदेत राहावे लागले.

मग त्यांनी तिथून कशी सुटका करून घेतली याचा इतिहास महाराष्ट्रातल्या प्रत्येकालाच माहीत आहे.

परत रायगडी आल्यावर महाराज काही दिवस शांत होते.

स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्याची तळमळ त्यांना लागली होती.

काही दिवस त्यांनी सैन्याची तयारी करण्यासाठी वेळ दिला.

महाराज शांत असले तरी गप्प मात्र बसले नव्हते. मुघलांना धडा शिकवण्याची ते वाटच बघत होते. रयतेवर झालेल्या अत्याचाराचा बदला त्यांना घ्यायचा होता आणि राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी सुद्धा परत बसवायची होती.

काय होते महाराजांच्या मनात?

तर जिथून ही सुरुवात झाली त्या सुरत शहराला परत एकदा जबरदस्त धक्का देण्याचा त्यांचा मनसुबा होता. या हल्ल्यामुळे औरंगजेबाच्या दहशतीला त्याच ताकदीचे उत्तर देण्याचा त्यांचा मानस होता…

 

aurangzeb-shivaji-inmarathi

 

या त्यांच्या योजनेची खबर सुरत शहरी लागली होती. पण महाराज परत एकदा सुरत गाठतील असे सुरतेच्या सुभेदाराला वाटत नव्हते. तिथला इंग्रज प्रेसिडेंट जिरॉल्ड अँजियर मात्र दूरदर्शी होता. त्याने हा लुटीचा धोका ओळखला आणि आपली वखार नदीपलिकडील स्वाली बंदरावर हलवली.

सुरतचा सुभेदार विचार करत होता की, वाईट आर्थिक स्थितीत असलेले मराठे असा काही हल्ला करू शकत नाहीत. समजा आलेच तर आपल्याकडे तीनशे लोकांची फौज तयार आहे. या भरवशावर तो निर्धास्त होऊन बसला होता.

पण त्याला मराठा सैन्याच्या ताकदीचा अंदाज अजिबात आला नाही. कारण या वेळी मागच्यापेक्षा अधिक शक्तिशाली सैन्य घेऊन महाराज निघाले होते. त्यांच्याकडे पंधरा हजाराच्या जवळपास पायदळ आणि घोडदळ होते.

२ ऑक्टोबर या तारखेला सुरत मध्ये बातमी धडकली की, महाराज आपले सैन्य घेऊन शहराच्या सीमेवर आले आहेत.

हे ऐकताच संपूर्ण सुरत शहरात एकच पळापळ सुरू झाली. मुघलांचे सर्व अधिकारी तोफा सज्ज करण्यासाठी धावपळ करू लागले.

महाराजांनी मात्र शेवटची संधी म्हणून एक खलिता मुघलांकडे रवाना केला. त्यात त्यांनी लिहिले होते की,

“मी तिसऱ्या आणि शेवटच्या वेळी मागणी करतोय की, मुघलांनी आपल्या साऱ्याचा चौथा हिस्सा मला द्यावा. कारण, तुमच्या राज्यकर्त्यांच्या वागण्याने मला मोठे सैन्य बाळगण्यासाठी बाध्य केले आहे आणि या सैन्याला पोसण्यासाठी पैसा लागतो.”

पण या मागणीचे काहीही उत्तर मुघलांकडून मिळाले नाही. त्यामुळे महाराजांना हल्ला करण्यावाचून उपाय राहिला नाही. तारीख ३ ऑक्टोबर १६७० रोजी मराठ्यांचे सैन्य सुरतच्या तटबंदीला धडकले.

पहिल्या लुटीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून औरंगजेबाने ही तटबंदी बांधून घेतली होती. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पंधरा हजार संख्येच्या सैन्यापुढे तीनशे लोक कसे टिकणार? अखेर सैन्याने शहरात प्रवेश केलाच!

 

marathe-war-inmarathi

 

३ तारखेपासून ५ तारखेपर्यंत ३ दिवस मराठा फौज सुरत शहराची लूट करत होती. पैसा, सोने नाणे, जड-जवाहिर सगळे ताब्यात घेतले गेले… मात्र असे म्हणतात की, तांब्याच्या वस्तू आणि मूल्यवान कपड्यांना हात लावला नाही.

इथे महाराजांच्यात आणि मुघलांच्यात मोठा फरक असा दिसून येतो की,

ही लूट करत असताना मराठा सैन्याने सामान्य प्रजेला अजिबात त्रास दिला नाही.

फक्त मोठे मोठे व्यापारी धनिक श्रीमंत लक्ष्य केले गेले.

त्यातही धार्मिक प्रवृत्तीच्या चांगल्या लोकांना या लुटीतून वगळले गेले.

म्हणजे हल्ला करण्यापूर्वी त्या शहराचा आणि तिथल्या लोकांचा महाराजांनी किती अभ्यास केला होता हे यावरून दिसून येते.

पहिल्या लुटीत ८० लक्ष मिळाले होते तर या लुटीत तब्बल ६६ लक्ष रुपयांचा खजिना मराठ्यांच्या हाती लागला. त्यात सोने, रूपे, हिरे, माणके, मोती, पाचू, पोवळे, मोहरा, पुतळ्या, अशर्रफया, होन, नाणे अशी मूल्यवान सामुग्री सामील होती.

अनेक जणांना वाटते की ही लूट करणे चुकीचे होते. पण या मागे जसे आर्थिक कारण होते तसेच महाराजांना जगाला एक संदेश सुद्धा द्यायचा होता.

‘कुणी माझ्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघेल तर, त्याला तसेच प्रत्युत्तर मराठा सैन्याकडून दिले जाईल.’

खरोखर, मुघलांसारखा स्वार्थी भाव मनात न ठेवता फक्त राष्ट्रभक्ती आणि स्वराज्य संरक्षणासाठी हल्ला करणारे छत्रपती म्हणूनच महान ठरतात.

 

shivaji-maharaj-inmarathi

 

या लुटीबाबत आणखी एक आख्यायिका अशी सांगितली जाते की, सुरत वरून परत येताना महाराजांवर मुघल सैन्याने चिडून हल्ले केले.

त्यांच्यापासून जपून सुरक्षितपणे हा खजिना स्वराज्यात यावा यासाठी या खजिन्याचे दोन भाग पाडले गेले. अर्धा खजिना सैन्यासोबत आणला गेला आणि अर्धा खजिना नाशिक भागात अज्ञात ठिकाणी दडवला गेला.

असं म्हणतात की अजूनही तो खजिना त्या भागात असून काहीजण त्याचा शोध घेत फिरत असतात. यात खरे किती खोटे किती माहीत नाही.

परंतु हा दुसऱ्यांदा सुरत लुटण्याचा इतिहास म्हणजे आपल्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?