' स्मशानातील खरे भूत “अंनिस”च…! – InMarathi

स्मशानातील खरे भूत “अंनिस”च…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : त्रिकाल अडसड

===

परभणी जिल्ह्यातील जिंतूरमध्ये काही टवाळखोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी रात्री हिंदू स्मशानभूमीत जाऊन वाढदिवस साजरा केला व चिकन पार्टी केली. खरंतर ही घटना म्हणजे हिंदू धर्माच्या आस्थेची प्रचंड विटंबना आहे.

मी जिंतूर तालुका भाजपचे आभार मानेन की, त्यांनी तातडीने त्या जागेचे शुद्धीकरण करून घेतले व पोलिसात तक्रार दाखल केली. अशा भामट्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी.

मुळात अनिसचे प्रमुख डॉ. शाम मानव यांना मी बालपणापासून विविध ठिकाणी भोंदूगिरीचा पर्दाफाश करणारी प्रात्यक्षिके दाखवताना पाहिलेले आहे. मी त्यांचे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर अत्यंत परखड व दिशादर्शक व्याख्यानही ऐकलेले आहे. शिवाय ते विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील आहेत.

त्यामुळे माझ्या मनात शाम मानवांबद्दल नितांत आदर आहे, ज्याला आता निश्चितच तडा गेला.

दुर्दैवाने आज डॉ. दाभोलकर हयात नाहीत, तेव्हा अशा संस्थांचे अघोषित पालकत्व हे डॉ. मानवांकडेच येते. त्यामुळे डॉ.मानवांनी अशा मूर्ख कार्यकर्त्यांचे नीट मार्गदर्शन करायला हवे.

अनिसतर्फे स्मशानाविषयीचे निष्कारण भय व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अनेक चांगले उपक्रम आजवर राबविल्या गेले. परंतु या विकृत चिकनपार्टीने मात्र अनिसची प्रतिष्ठा मानवी विष्ठा खाणाऱ्या डुकराच्या विष्ठेत मिळवली.

मुळात ज्यांना स्मशानभूमी ही भूत-पिशाच्यांचा अड्डा वाटतो किंवा ज्यांना त्याबद्दलचे भय घालवावेसे वाटते, ते दोघेही हिंदू धर्माबद्दल अज्ञानी आहेत.

त्यामुळे एखाद्याला निष्कारण शत्रू बनवून अंगावर ओढून घेण्याऐवजी प्रथम तो शत्रू आहे किंवा नाही, निदान याची तरी खात्री या बावळट अनिस कार्यकर्त्यांनी करायला हवी.

 

anis-inmarathi
mazapaper.com

मुळात हिंदू स्मशानभूमी हे अशुभ स्थान नसून अत्यंत पवित्र स्थान आहे. जीव गेल्यानंतर मानवाच्या भौतिक शरीराची विटंबना होऊ नये, मृत शरीरातील जिवाणूंमुळे दुर्गंधी व रोगराई पसरू नये, यासाठी लाकडे, चंदन, तूप, कापूर, राळ-उद, गायीच्या शेणाच्या गोवऱ्या, दर्भ अशा गोष्टी वापरून, मंत्रोच्चार करून, मृतव्यक्तीच्या आत्म्यास शांती व सदगती मिळो अशी प्रार्थना करून प्रेत जाळून नष्ट करण्यात येते.

ततपश्चात त्याच्या अस्थींचे जलाशयात विसर्जन केले जाते. म्हणजेच मृतदेहाचे सर्व अवशेष अग्नी, जल, वायू, आकाश तथा धरा या पंचमहाभूतांमध्ये विलीन केले जाते. जीव गेल्याच्या पश्चातही प्रेताचे सन्मानपूर्वक निर्मूलन केले जावे हा प्रेमभाव त्यामागे असतो.

हिंदू स्मशान भूमीचा परिसर कायम स्वच्छ व शांत राखला जातो, तेथे व्यक्तिगत स्वच्छताही राखली जाते.

परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावली जातात, ज्यामुळे दहनातून उत्सर्जित होणारा कार्बन पर्यावरणाचे संतुलन बिघडवणार नाही.

इतक्या छोट्याछोट्या गोष्टींचे सूक्ष्म व वैज्ञानिक नियोजन हिंदू धर्मात प्राचीन कालखंडापासून केलेले आहे. त्यामुळे ज्या धर्माला अनिसवाले प्रतिगामी मानतात तो हिंदू धर्म मुळात अत्यंत विज्ञाननिष्ठ, पुरोगामी व चिरकाल टिकणारा आहे.

मुळात शरीराने प्राणाचा त्याग केल्यावर आत्म्याचा पुढील ११ महिन्यांच्या प्रवासाची इत्यंभूत माहिती गरुड पुराणात दिलेली आहे आणि गरुड पुरणाला आजवर कुणीही आव्हान देऊ शकलेलं नाही, कारण मनुष्याने प्राण सोडल्यावर जिवात्म्याचे काय होते याचा शोध आजवर कुठलाही शास्त्रज्ञ अथवा अन्य धर्म लावू शकलेला नाही.

“ऊर्जा अक्षय आहे, ती कधीच मरत नसते, ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रुपात परिवर्तित होत असते.”

हा भौतिकशास्त्राचा मूलभूत नियम हिंदू संस्कृतीने हजारो वर्षांपूर्वीच जाणलेला आहे. त्यामुळेच आत्मा अमर आहे, असे सांगितले गेलेले आहे.

 

what-happens-after-death-inmarathi
powerofpositivity.com

मानवाचे शरीर हे डिग्रेडेबल किंवा डिकम्पोजीबल आहे व त्यातील आत्मारुपी ऊर्जा ही अविनाशी आहे. म्हणूनच अंत्यविधी पूर्ण झाल्यावर देह पंचतत्वात विलीन झाला, म्हणजे पर्यावरणात विलीन झाला व आत्मा ब्रम्हांडात विलीन झाली म्हणजेच युनिव्हर्समध्ये मर्ज झाली असे म्हटले जाते.

खरंतर मनुष्य मृत पावणे हा अंत नसून पुन्हा एक नवी सुरुवात असते, परंतु भौतिक सुख-दुःख तसेच मोह-मायेने ग्रासलेल्या मनुष्यास आप्त-स्वकीयांच्या निधनाने प्रचंड दुःख होते, त्यांची मानसिक अवस्था डगडमगते, त्यांचे मन अशांत व चिंतातुर होते.

म्हणूनच स्मशानात होणाऱ्या अंत्यविधींमुळे त्याच्या मनाला क्षणभर का होईना पण मंदिरात गेल्याप्रमाणेच मनशांती मिळते.

म्हणून हिंदू स्मशानभूमी ही मंदिराएवढीच पवित्र वास्तू आहे, त्यामुळे तिथे भूत, पिशाच, वाईट आत्मा किंवा कुठल्याही नकारात्मक शक्तीचा वास असणे शक्यच नाही.

म्हणून स्मशानभूमीबद्दल हिंदूंनी भय बाळगण्याचे काहीच कारण नाही आणि असे भय योग्य पद्धतीने दूर करण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडे धर्माबद्दल द्वेषभावनेऐवजी चिकित्सक वृत्ती व

“आम्हालाच सारं काही कळत किंवा आम्ही सांगतो तेच सत्य”

या अहंकाराचा अभाव असल्यास ते योग्य पध्दतीने अंधश्रद्धा निर्मूलन करू शकतात.

मुळात नरबळी, गुप्तधन, अंगात येणे, अंगारे-धुपारे, भोंदूगिरी यांचा पर्दाफाश करण्यात अनिसने आजवर फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे या संस्थेकडे हिंदू धर्माच्या खऱ्या उत्थानाची, हिंदू धर्माच्या विज्ञाननिष्ठतेबद्दलची जनजागृती करण्याचे महान कार्य करण्यासाठी भरपूर वाव आहे.

पण या संघटनेला सर्वप्रथम अहंकार, द्वेषभावना, सुढभावना व परकीय फंडिंगच्या चक्रव्यूहातून बाहेर पडावे लागेल.

आम्ही कुठलाही धर्म मानत नाही असा दावा करणारी अनिस जेव्हा हिंदू धर्मात व्यक्तिगत स्वार्थासाठी निर्माण होणाऱ्या अनिष्ट गोष्टींचा पर्दाफाश करत असताना अन्य धर्माला काहीसे दुर्लक्षित करते, झुकते माप देते किंवा मौन बाळगते, तेव्हा तिच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

जेव्हा विशिष्ट राजकीय अथवा धार्मिक शक्ती अनिसला आर्थिक, सामाजिक, न्यायालयीन पाठबळ पुरवते. तेव्हा लोकांच्या मनात संशय निर्माण होतो.

जेव्हा अनिसच्या वक्तव्यांमधून जातीय अथवा राजकीय सुढबुद्धीचा दर्प येतो, तेव्हा अनिसच्या उद्दिष्टाबद्दल समाजात संभ्रम निर्माण होतो व मूठभर पाखंडी बाबा, बुवांना सामाजिक पाठबळ मिळते.

 

smashan-bhumi-inmarathi
dainiknewslive.com

त्यामुळे अनिस इतक्या वर्षांपासून आजही एक चाडपडणारी, वैचारिक गोंधळात अडकलेली व हव्या त्या प्रमाणात लोकस्वीकृती न लाभलेली संघटना आहे. त्यामुळे डॉ. मानवांकडे या संस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यास पुरेपूर वाव आहे.

डॉ. मानवांचे अनेक तर्कही चुकीचे आहे. ते स्वतःला निधर्मी मानतात. मुळात उपासना पद्धती कुठलीही असली तरी मनुष्याने आपल्या धर्माचा कधीही त्याग करू नये. धर्मांधता जगासाठी घातक आहेच, पण निधर्मी समाज ही संकल्पना त्याहून भयंकर आहे. माणसाला धर्माशिवाय गती मिळणे शक्य नाही.

नियम-कायदे माणसाचे फक्त सामाजिक अथवा फार फार तर कौटुंबिक जीवन नियंत्रित करू शकते, व्यक्तिगत नाही. त्यामुळे माणसाला जीवन जगण्यासाठी जन्मापासूनच काही मूलभूत संस्कारांची गरज पडते, जे धर्माविना मिळणे शक्य नाही.

जगातील बहुतांश धर्मात अन्य धर्माविषयी आदर बाळगण्याची शिकवण दिली जाते.

हिंदू धर्माचा तर मूळ गाभाच “वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेवर आधारित आहे. त्यासाठी धर्माचा त्याग करून निधर्मी होण्याची गरजच नाही. मुळात “सेक्युलर” या शब्दाची व्याख्या सर्वधर्मसमभाव किंवा समरसता होतच नाही, सेक्युलर या शब्दाचा अर्थ निधर्मी असा होतो.

त्यामुळे हिंदूंनी रोजे पाळल्याने, मुस्लिमांनी गणेशोत्सव अथवा शिवजयंती साजरी केल्याने, बौद्धांनी नाताळ व ख्रिस्ती लोकांनी पर्युषण पर्व साजरे केल्याने सेक्युलॅरीजम वाढत नाही, तर सर्वधर्मसमभाव, बंधुत्वाची व सामाजिक ऐक्याची भावना दृढ होते.

हिप्नोटीजम अर्थात संमोहनविद्या ही शापही आहे व वरदानही. या विद्येमुळे दुर्धर मानसिक विकारांपासून माणसाला दुरुस्त करता येत व ब्रेनवॉश करून आतंकवादीही निर्माण करता येतात, यात दुमतच नाही. परंतु डॉ. मानव हे ध्यानसाधना म्हणजेच मेडिटेशनला सुद्धा सेल्फ-हिप्नोटीजम म्हणजेच स्व-संमोहन मानतात.

त्यांचे मानने आहे की, यामुळे मनुष्य मानसिक रुग्ण बनतो व अशा अवस्थेत त्याला काही भास होऊ लागतात, ज्याला तो दिव्यज्ञान वगैरे मानायला लागतो. म्हणजे त्यांच्या लेखी भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद हे सारे सेल्फ-हिप्नोटाईज झालेल्या ऍबनॉर्मल विभूती होत्या.

 

Swami_Vivekananda02-marathipizza
youtube

त्यांचा हा दावा १०१% खरा आहे. कारण या साऱ्या विभूती असामान्यच होत्या म्हणूनच त्यांच्या हातून असामान्य, अद्वितीय असे कार्य घडले.

गॅलिलिओ, न्यूटन किंवा आर्किमिडीज, आयस्टाईन, डॉ.एपीजे अब्दुल कलाम सारख्या थोर शास्त्रज्ञ मंडळींचे राहणीमान, वर्तन हे असमान्यच होते.

त्यावेळी अनिस असती तर तिने यांनाही वेड्यात काढले असते. कारण ही माणसे असामान्यच होती, त्यांना वेडच लागलं होतं, त्यामुळेच ते अद्वितीय कार्य करू शकले.

माणसाला एखाद्या गोष्टीचे वेड लागल्याशिवाय त्याच्या हातून असामान्य कार्य घडूच शकत नाही.

शाम मानवांनी जे व्रत हाती घेतले, ते सुद्धा एक वेडच आहे. मग ते स्वतःसुद्धा सेल्फ-हिप्नोटाईज वेडे आहेत, असे म्हणायला काय हरकत आहे…?

राहिला प्रश्न ध्यानसाधना अथवा मेडीटेशनचा, तर ज्याप्रमाणे पिक्सल्स, ध्वनी, डेटा यांचे अदृश्य स्पेक्ट्रम अथवा चुंबकीय लहरींमध्ये रूपांतर करून टेलिकॉम, इंटरनेट व ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी केले जाऊ शकते, त्याचप्रमाणे युनिव्हर्सल एनर्जीतुन निर्माण झालेले मानवशरीर आणि एक अफाट शक्ती असलेला त्याचा सुप्तावस्थेतील मेंदू सचेत होऊन अदृश्य लहरींच्या माध्यमातून युनिव्हर्सशी कनेक्ट होऊन युनिव्हर्सल नॉलेज म्हणजेच ब्रम्हज्ञान प्राप्त करू शकत नाही?

तोंडात जळता कापूर विझवून झिडकारण्याएवढं ध्यानसाधना हे थोतांड किंवा तथ्यहीन शास्त्र आहे?

तसे असते तर पृथ्वी चपटी आहे किंवा एका धर्माच्या ईश्वराने चंद्राचे दोन तुकडे केले असा दावा करण्याच्या हजारो वर्षांपूर्वी किंवा नासाची स्थापना होण्याच्या हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेले भारतीय पंचांगशास्त्र ग्रहणे, ग्रहांची बदलती स्थिती, सूर्याचे उत्तरायण-दक्षिणायन यांचा अचूक वेध आजही कसे घेऊ शकते.

 

meditation-inmarathi
pxhere.com

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे जगाला कळायला १६ वे शतक उजाडले. परंतु ज्योतिष्यशास्त्राने ग्रहांच्या बदलत्या परिस्थितीचे, पृथ्वीच्या सूर्यपरिक्रमेचे आकलन तर हजारो वर्षांपूर्वीच केले.

स्मशानात जाऊन बिर्याणी खाणे तर सोडाच, परंतु जेव्हा जगाला अग्नी निर्माण करून हाड-मांस कसे शिजवायचे हे सुद्धा माहिती नव्हते, तेव्हा हिंदू धर्माने आयुर्वेद व चरकसंहितेच्या माध्यमातून शल्यचिकित्सा करून मोडलेली हाडे व फाटलेले मांस जोडण्याचे शास्त्र शिकविले.

त्यामुळे डॉक्टर मानव साहेब, मूठभर पाखंडी, भोंदू लोकांमुळे जगातील सर्वश्रेष्ठ, सर्वात सनातन व सर्वात विज्ञाननिष्ठ असा हिंदू धर्म वाईट कसा असू शकतो…?

हिंदू स्मशानभूमीत भूत-खेत कधीच नव्हती, ती पहिल्यांदाच स्मशानात आली असतील तर ते तुमच्या सैतानी कार्यकर्त्यांमुळे. मी त्या चिकन पार्टीचे फुटेज बघितले.

एकतर स्मशान हे मंदिराप्रमाणे पवित्र स्थळ असल्याने तिथे मध्यरात्री जाऊन मांसाहार करणे, हेच मुळात सैतानी कृत्य होते.

त्यात अधिक भर म्हणून दाण्यादाण्याला मोताज झाल्याप्रमाणे किंवा उष्ट्या पत्रावळींवर तुटून पडणाऱ्या पशूंप्रमाणे कोंबडीच्या तंगडीचे वचवचा लचके तोडणे व त्याचे विकृतपणे शूटिंग करणे, तोंडात लेगपीस घेऊन फोटो काढणे हा सारा प्रकार हा कुठल्याही प्रकारे मानवीय नव्हता.

म्हणजे उद्या कुणी शौचालयात भूत असल्याची बोंब उठवली तर अनिस कार्यकर्ते शौचालयात जाऊन सीटवर बसून शौच्य करत वचावचा चिकन खात फोटो काढायला मागेपुढे पाहणार नाहीत.

सकाळी गायीला टाकलेल्या नैवेद्यात सोज्वळपणाचा आव आणत, नम्रपणे शेपूट हलवत तोंड घालणारी मोकाट कुत्री ज्याप्रमाणे रात्री सैतान बनून डुकरांच्या पिल्लांचे लचके तोडतात. त्याचप्रमाणे समाजसुधारणेचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा आव आणून पवित्र हिंदू स्मशान भूमीत मध्यरात्री जाऊन हापापलेल्याप्रमाणे चिकन खाणाऱ्या सैतानांपेक्षा भयंकर सैतान स्मशानात दुसरं कोण असू शकतं…?

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?