Site icon InMarathi

या राणीने पोर्तुगीज सैन्याला धूळ चारली होती, कोण होती ही वीरांगना?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

इतिहासाच्या पानात अनेक घटना दडलेल्या असतात. काही सतत प्रकाशात असतात तर काही झाकोळल्या जातात. त्यामागे निश्चित एक कारण असते असं नाही मात्र जेव्हा ही लुप्त झालेली पाने प्रकाशात येतात तेव्हा आपले डोळे दिपल्याशिवाय राहत नाही.

अशीच एका राणीची कथा आहे जी आज अनेकांना ज्ञात नाही. परंतु त्या राणीचं कर्तृत्वच असं होतं की इतिहासाच्या बाडांमध्ये ती बंदिस्त राहणार नाही. तुलूनाडूची राणी अब्बक्का राणी किंवा अब्बक्का महादेवी यांनी पोर्तुगीजांना हरवण्याचा पराक्रम पुन्हा पुन्हा केला आहे.

 

post card news

 

कोण होत्या अब्बक्का राणी किंवा अब्बक्का महादेवी?

बाराव्या शतकात चोवटा राजघराणे जे मूळचे गुजरातमधील होते पुढे स्थलांतरीत होऊन आजच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात स्थायिक झाले. आजचा दक्षिण कन्नड जिल्हा आणि केरळचा काही भाग इथे चोवटा राजघराण्याचे राज्य होते.

हे राजघराणे जैन धर्माचे होते. बाराव्या शतकापासून ते पुढे अठराव्या शतकापर्यंत हे राजघराणे टिकून होते. तुलूनाडू म्हणजे तुलू वंशाच्या लोकांचा प्रदेश. इथे मातृसत्ताक पद्धत अस्तित्वात आहे. चोवटा राजघराण्यातही ही पद्धत अस्तित्वात होती.

त्यानुसार तिरुमला राया यांनी अब्बक्का यांच्यातील गुण हेरून त्यांना राज्यपदी बसविण्याचा निर्णय घेतला. त्या घोडेसवारी, तलवारबाजी, धनुर्विद्या आणि सैनिकी डावपेच यांत तरबेज होत्या. तिरुमला राया हे अब्बक्का राणींचे मामा होत.

feminism in india

पुढे या गादीचे विभाजन झाले आणि तुलूनाडू  राज्याची राणी म्हणून अब्बक्का महादेवी स्वतंत्रपणे कारभार पाहू लागल्या. उल्लाल ही त्यांच्या राज्याची राजधानी होती. त्यांचा विवाह लक्ष्मप्पा अरसा यांच्याशी झाला. जे शेजारच्या मंगलोर राज्याचे राजा होते.

त्यामुळे हे एक बलाढ्य राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या मात्र उल्लाल येथेच राहत. परंतु हा विवाह जास्त टिकू शकला नाही आणि पुढे आपल्या तीन अपत्यांसह त्या उल्लाल येथेच राहिल्या.

त्यांच्या राज्याचे स्थान अत्यंत मोक्याच्या ठिकाणी होते. एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजुला पश्चिम घाट असे त्या राज्याचे भौगोलिक स्थान होते. अरब आणि इतर देशांशी मसाले, कापड, शस्त्र आणि युद्धाचे घोडे यांचा व्यापार करणारी जी काही महत्वाची बंदरे त्याकाळी होती त्यापैकी एक बंदर या राज्यात होते.

याशिवाय हिंदू श्रद्धाळूंचे पवित्र स्थान असणारे सोमेश्वर मंदिर हे येथेच आहे. धर्माने जैन असणाऱ्या राणी अब्बक्का सर्व धर्मियांना सोबत घेऊन समर्थपणे राज्यकारभार हाकत होत्या.

 

ntd.com

 

भारतात पोर्तुगीजांचे बस्तान

सातव्या शतकापासून पुढे भरभराटीला आलेला भारतातील व्यापार अनेक मोठ्या बंदरांतून चालत असे. जगात भारताच्या व्यापाराची पत वाढली होती. येथील मालाने अनेक परदेशी व्यापाऱ्याना भुरळ घातली होती.

अनेक यूरोपीय देश जलमार्गाने भारतात येण्यासाठी प्रयत्नरत होते. अशातच पोर्तुगीजांनी जलमार्ग शोधण्यात यश मिळवले. वास्को द गामा मोठा जलप्रवास करून १४९८ साली कलिकत बंदरावर उतरला.

त्यानंतर अवघ्या पाच वर्षात पोर्तुगीजांनी कोचीन येथे पहिला किल्ला बांधला. वास्को द गामा आल्यानंतर अवघ्या वीस वर्षात आपल्या नौकानयनाच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी सारा जलमार्ग आपल्या ताब्यात घेतला.

त्यांनी केवळ भारतातीलीच नव्हे तर श्रीलंका, मस्कत, मोझाम्बिक, इंडोनेशिया आणि मकाऊ(चीन) इथपर्यंत मजल मारली. येथील जलमार्गावर संपूर्ण सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी अधिराज्य गाजवलं. पुढे ब्रिटिश, डच, फ्रेंच आले पण ते सतराव्या शतकाच्या सुरुवातीला!

आतापर्यंत भारतीय, अरब, आफ्रिकन जहाजांसाठी हा मुक्त मार्ग होता तो आता पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. भारतीय व्यापाऱ्यानां पोर्तुगीजांकडून परवाना घ्यावा लागत असे. जे विरोध करत त्यांना पोर्तुगीज मोडून काढीत.

इकडे गोव्यात आपले बस्तान पक्के बसले आहे हे लक्षात आल्यावर पोर्तुगीजांनी आपले लक्ष दक्षिणेकडे वळवले होते.

पहिले युद्ध

१५२५ मध्ये मंगलोर किल्ला पोर्तुगीजांनी जिंकला तेव्हाच राणी अब्बक्का सावध झाल्या आणि त्यांनी आपल्या राज्याच्या बाजूच्या राजांशी बोलणी करून युती केली. धर्म, जात यापलीकडे जात अनेकांनी त्यात साथ दिली. त्यामुळे शांतता निर्माण झाली.

दुसरे युद्ध

१५५५ मध्ये पोर्तुगीजांनी राणी अब्बक्का यांच्यापुढे अनाकलनीय आणि संताप आणणाऱ्या मागण्या केल्या. राणी अब्बक्का यांनी त्या तितक्याच ठामपणे नाकारल्या. पोर्तुगीज गव्हर्नरने ऍडमिरल डॉम अलवारो दा सिल्वेरिया याच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले. पण राणी अब्बक्का यांनी समर्थपणे हा हल्ला परतवून लावला.

 

starofmysore.com

 

तिसरे युद्ध

यावेळी म्हणजे १५५७ मध्ये पोर्तुगीजांनी मंगलोर क्रूरपणे उध्वस्त केले. मंदिरे लुटली आणि शहराला आग लावली. हे सर्व अब्बक्का यांच्या बाजूच्या राज्यात घडत होते.

चौथे युद्ध

१५६७ मध्ये पोर्तुगीज थेट उल्लाल वर चालून आले. त्यांनी नासधूस केली. परंतु अखेरीस राणी अब्बक्का यांनी हा वार देखील परतवून लावला.

पाचवे युद्ध

१५६८ मध्ये पोर्तुगीज पुन्हा उल्लाल शहरावर चाल करून आले. यावेळी त्यांनी थेट राजदरबारात धाव घेतली. मात्र तिथून राणी अब्बक्का निसटल्या होत्या. त्यांनी मशिदीत आश्रय घेतला.

त्याच रात्री त्यांनी आपले दोनशे सैनिक जमवले आणि पोर्तुगीजांवर हल्ला केला. जनरल पेक्झोतो मारला गेला त्या तिथेच थांबल्या नाहीत. पुढे त्यांनी ऍडमिरल मसक्रेन्हस यालाही ठार केले आणि पोर्तुगीजांना मंगलोर किल्ला सोडून पळावे लागले.

सहावे युद्ध

१५६९ मध्ये पोर्तुगीजांनी मंगलोर किल्ला परत मिळवला आणि पुन्हा उल्लालवर चाल करून आले. याचसुमारास विवाह न टिकल्यामुळे मत्सरापोटी राणी अब्बक्का यांच्या पतीने विश्वासघात करत पोर्तुगीजांना साथ दिली.

१५७० पर्यंत ही धुसपूस सुरूच होती. आता राणीने अहमदनगरचा सुलतान आणि कालिकतचा झामोरिअन यांच्याशी युती केली. त्यामुळे चांगला प्रतिकार होऊ शकला. मात्र राणी अब्बक्का यांच्या पतीच्या आणि काही सरदार यांच्या विश्वासघाताने त्या अखेरीस युद्ध हरल्या आणि बंदी झाल्या.

 

esamskriti

 

मात्र तिथेही त्यांनी आपला लढा कायम ठेवला आणि तिथेच त्या मृत्यू पावल्या. त्यांच्या दोन शूर कन्याही त्यांच्यासोबत युद्धात होत्या. पोर्तुगीज बलाढ्य होते मात्र त्यांच्यासमोर ४०-४५ वर्षे त्यांनी  कायम लढा दिला यावरूनच त्यांच्या पराक्रमाची कल्पना येते.

भारत सरकारने २००३ मध्ये पोस्टाचे तिकीट काढून त्यांची आठवण जपली आहे. त्याशिवाय २०१५ मध्ये विशाखापट्टणम येथे नौदलाच्या गस्ती जहाजांना त्यांचे नाव देऊन सन्मान केला आहे.

याशिवाय लोकगीत आणि यक्षगान यामार्फत लोकांमध्ये आपल्या शूर राणीची आठवण कायम आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून “वीरा राणी अब्बक्का उत्सव” साजरा करून त्यांच्या आठवणी जपल्या जातात.

 

mangaloretoday.com

 

याशिवाय “वीरा राणी अब्बक्का प्रशस्ती” या पुरस्काराने कर्तृत्ववान महिलेला सन्मानित करण्यात येते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version