आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
गेल्या गणेशोत्सवात एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोर भाषण देत असताना गणेशाची प्रार्थना केली आणि “गणपती बाप्पा मोरया” म्हटले म्हणून एमआयएम आमदार वारीस पठाण यांनी समस्त मुस्लिमांची माफी मागितली आहे.
“मीही माणूस आहे, माणसाकडून चुका होत असतात. मी पुन्हा अशी चूक करणार नाही” हे त्यांच्या तोंडचे शब्द.
भारतासारख्या देशात एखाद्या आमदाराला परधार्मिक देवतेची प्रार्थना केली म्हणून आपल्या धर्माच्या लोकांसमोर माफी मागावी लागणे हे चित्र निराशाजनक आहे. त्यांच्या माफीनाम्याबद्दल आमदार साहेबांना लिहिलेले अनावृत्त पत्र..
===
आदरणीय वारीस पठाण साहेब,
माननीय तर आपण आहातच पण आपल्या सहिष्णू वर्तनाने आदर निर्माण केल्याशिवाय राहु दिले नाही. आपण इस्लामधर्मीय असूनदेखील हिंदुधर्मीय सणांना महत्व देता, त्यात उपस्थिती लावता हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. या वर्तनाचा राजकारणी दृष्ट्या जरी आपण विचार केला असेल तरी त्याचे स्वागतच आहे.
कारण नेता किंवा आमदार, खासदार हे सामान्य जनतेचे ‘लीडर’ असतात. ते त्यांचे प्रतिनिधित्व करतात.
आपले असे सहिष्णू वागणे नेहमीच स्वागतार्ह राहील.सर्वप्रथम आपल्या या विचारांचे कौतुक वाटते की आपण स्वतःला एक प्रतिनिधी जो सर्व धर्म जातींच्या लोकांचे नेतृत्व करणारा आहे असे पाहत आहात.
तिथे आपला धर्म बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्या उत्सवामध्ये एक स्थान निर्माण करू पाहत आहात जे आजच्या काळात अतिशय महत्वाचे आहे. राजकारणी दृष्ट्या आज याकडे पाहायलाच नको. प्रतिनिधी हा नेहमी एक जागरूक व्यक्ती असतो जो बाकी सर्व लोकांना सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवतो.
इथे त्याच स्वतःचा धर्म, जात, पंथ, पाटीलकी किंवा समुदाय यापेक्षा जनता, जनतेचे प्रश्न आणि त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या विकासास हातभार लावणे हे जास्ती महत्वाचे वाटते. योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी जनतेसमोर आपले विचार दाखवणे हे स्वाभाविक आहे.
त्या निमित्ताने आपण गणेशोत्सवात सामील झालात आणि गणेशभक्तांचा आंनद द्विगुणित केलात याबद्दल आपले विशेष आभार.
आजच्या दिवसांत, हो! असंच म्हणावं लागेल जिथे धर्माला स्वातंत्र्य नाही जिथे धर्म प्रचारार्थ कत्तली आजही होतात मग त्या विचारांच्या, उपासना स्वातंत्र्याच्या, वैयक्तिक हक्कांच्या किंवा सरळ सरळ व्यक्तींच्या असोत, तिथे आपण एक पाऊल पुढे टाकून सहीष्णुतेकडे येण्याचा प्रयत्न केलात याबद्दल अभिनंदन!
प्रत्येक मनुष्य हा अगदी सारखा असतो, प्रत्येकाचे एकाच पठडीतील शरीर आहे, रक्त, मांस आणि हाडे देखील सारखीच पण मेंदू प्रत्येकाचा वेगळा असतो, प्रत्येक मेंदूने केलेला विचारही वेगळाच असतो. इथेच ते धर्म-जात-पंथ-परंपरा-अभिमान वगैरे साठलेले असते, जतन झालेले आहे.
धर्मांधांचा रक्तरंजित इतिहास इथेच अजूनही जिवंत ठेवतात लोक. इथूनच सुरू होतात विचार आणि ‘अविचार’.
लहान तोंडी खूप मोठा घास घेण्यासाठी माफी असावी, पण एकाच आदमांची लेकरं ना सगळी?
तर मग आपण जन्मलो आधी नंतर आले धर्म, त्यांची प्रेषिते आणि ग्रंथ त्यानंतर आले त्यांचा आधार घेणारे त्यांच्या मागे फिरणारे कट्टरपंथीय. आपण आशा एक राष्ट्रात राहतो जिथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. गुण्यागोविंदाने(?) का असेना पण एकत्र राहतात. ‘विविधतेत एकता’ अंगिकरण्याचा प्रयत्न करतात.
दीडशे वर्ष इंग्रजांचे राज्य सहन केल्यावर आपण राजेशाही, हुकूमशाही, घराणेशाहीतुन पुढे सरकून लोकशाहीमध्ये आलो आहोत. पण आता धर्मांधांची जगभर मुजोरी वाढत चालली असल्याने आपण लोकशाहितुन ‘धर्म-शाही’ मध्ये घुसतो आहोत का?
एकात्मता, गंगाजमुना संस्कृती, सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता यांच्या व्याख्यांना तिलांजली देऊन, सर्वधर्मसमभाव हे फक्त एक थोतांड आहे असे असू शकते का? आपल्या राष्ट्रगीतातील दुसऱ्या कडव्यात म्हटले आहे,
“अहरह तव आव्हान प्रचारित सुनि तव उदार वाणी
हिंदू बौद्ध सीख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी।
पुरब पश्चिम आसे तव सिंहासन पासे
प्रेमहार होय गाँथा
जन-गण-ऐक्य-विधायक जय हे भारतभाग्यविधाता
जय हे जय हे….”
‘जण गण ऐक्यविधायक जय हे…’ या वाक्यातून टागोरांनी आपल्या ऐक्याचे, एकात्मतेचे गुणगान गेले आहे. याची गरजही आहे आणि आपल्यावर संस्कारही. जसे कोणाचे उष्टे खाल्ल्याने त्यांचे गुण वा अवगुण लागत नाहीत तसेच कोणाच्या धर्माचा आदर सन्मान केल्याने आपण काही तो धर्म आचरणात आणतोय किंवा त्या धर्माचे अनुयायी बनतो असे होत नाही हे बरोबरच आहे.
आपल्या संविधानाने सर्व भारतीयांना उपासनेच्या स्वातंत्र्यापासून ते वैयक्तिक पातळीवरील बरीच स्वातंत्र्ये दिली आहेत. जर खून करणे, कत्तल घडवून आणणे हे पाप असेल तर ते धर्मस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, उपासनास्वातंत्र्य यांची गळचेपी करू पाहणाऱ्यांवर देखील लागू झाले पाहिजे.
लोकांच्या वाईट परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना धर्मपरिवर्तनास भाग पडणे, प्रवृत्त करणे वगैरे प्रकार आजही पाहावयास मिळतात.
यात प्रामुख्याने एका गोष्टीचे आमिष दाखविले जाती ती म्हणजे “संरक्षण”.. आमच्या मूक एका धर्मात या तुम्हाला संरक्षण मिळेल.. ते सामाजिक किंवा आर्थिक असू शकते. अरे पण संरक्षण देण्याइतपत तालेवार आमचा देश आहेच की!
भारत देश हा सार्वभौमत्वावर आधारलेला आहे. धार्मिक एकता आणि सहिष्णुता हा आपल्या देशाचा आत्मा आहे, शान आहे. आपल्या राज्यघटनेचा मूळ आधार आहे.
आपणास आपसूकच याबद्दल संरक्षण दिले गेले आहे. कोणी कट्टरपंथीय लोक येऊन कोणास म्हणू शकत नाहीत की, आपण कशाबद्दल काही बोलल्याने किंवा अमुक गोष्टींसाठी तमुक प्रार्थना केल्याने कोणत्या धर्माचा किंवा कोणाच्या श्रद्धास्थानांचा उल्लेख केल्याने किंवा उत्सवात सहभागी झाल्याने ‘त्यांच्या’ धर्माचा अपमान होतो.
स्वतःला ‘काटेकोरवादीच्या’ गटात बसवणाऱ्यानी अश्या कोणत्या धर्मग्रंथांचे पारायणे केली असावीत जिथून त्यांनी फक्त एका न पटलेल्या प्रसंगावरून एखाद्याला धर्मनिरले ठरविण्याचे हक्क मिळविले आहेत?
श्रद्धा हा माणसाचा मूलभूत गुणधर्म आणि मानसिक गरज आहे, विचार हे श्रद्धेशी निगडित असतात. त्या श्रद्धेला विशिष्ट नियम, मर्यादा आणि पायंडे जोडले की त्याचा धर्म तयार होतो आणि याच विशिष्ट विचारांचा प्रवाह घेऊन त्यातील सही गलतचा विचार न करता त्यांची चाकोरी करणारा एक धर्मांध समूह बनतो.
ज्यांना ठराविक गोष्टी घडवायच्या नसतात आणि घडूही द्यायच्या नसतात. यांच्या असहिष्णुतेच्या आणि कर्मकांडात आपण बिनकामाचे भरडले जातो.
यांच्या धार्मिक जाणीव बंदिस्त असू शकतात. जेथे श्रद्धा नसून ‘अंधश्रद्धा’ वास करत असते आणि ती तिचे अंधत्व धर्मावर लादून त्यांस ‘धर्मांध’ करून सोडते. याचा फायदा याआधी खूप सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. आपण भारतीय याआधी विविध फाळण्यांना सामोरे गेलो आहोत. याच असहिष्णुतेच्या आणि कट्टरतावादी मानसिकतेत पुनश्च फाळणीची बीजे तर रोवली जाणार नाहीत ना?
फक्त अल्लाहच सर्व सुख किंवा दुःख याचे मूळ बाकी कोणी नाही हा एकेश्वरवादी प्रस्ताव खोटा नसेलही.. पण याचा अर्थ बाकी धर्माची श्रद्धास्थाने खोटी आहेत, त्यांना आधारच नाही, ते बिनबुडाचे आहेत असा होत नाही.
शेवटी कुठेही धर्मापेक्षा भावना महत्वाच्या, माणुसकी महत्वाची. प्रार्थना करणे व शुभेच्छा देणे यात फरक आहे हा मुद्दा जर असेल आणि त्यावरून ‘आपण’ इस्लामच्या(की त्या अभ्यासकांच्या?) दृष्टीने काफर ठरत असाल तर ते आपल्या सहिष्णुतेच्या संस्कारांचे, वैचारिक स्वातंत्र्याचे आणि डोळसपणाने धिंडवडे काढण्यासारखे आहे.
वेगळ्या धर्माच्या एका घोषणेने जर कोणता धर्म संकटात येत असेल तर त्याची पाळेमुळे व्यवस्थित आणि खोलवर रोवली गेली नसावीत, त्यांच्या मनात धर्मनाशचा बागुलबुवा ठाण मांडून बसला असावा.
आपणासारख्या प्रतिनिधींचा आदर्श भावी पिढी घेत असते, आपण माघार घेऊन समाजात व्यक्तिस्वातंन्त्र्याच्या भिंती किती कमकुवत आहेत हे सिद्ध होते आहे.
कृपया इतके लक्षात असू द्यावे की म्हणाल त्या दर्ग्यावर, मंदिराच्या पायरीवर किंवा चर्चमध्ये माथा ठेवणारी जनता ही फक्त श्रद्धेच्या नावाखाली भुलवली जाते. कमकुवत मन हे दिशा दिसेल-आधार दिसेल तिकडे भरकटते. त्याला सामाजिक भानापेक्षा तो आधार महत्वाचा वाटतो.
सामान्य माणूस किंवा समस्त मानवजात ही समूहाने राहणाऱ्या प्राण्यांमध्ये गणली जाते. त्यात आपण सर्व आपणास सुरक्षित वाटतील असे समूह निवडून त्यांत राहतो. त्यांनी आखलेल्या मर्यादा पाळतो, एकी प्रस्थापित करतो.
जर तेच लोक तुम्हाला तुमच्या त्या समूहातील ‘विखार’ ठरवत असतील तर त्यातून माघार घेणं साहजिक आहे पण आधी त्यांच्या दाखल्यांवर विचार केला पाहिजे. ते पडताळले पाहिजेत.
आपण एक समाजमान्य व्यक्तिमत्व आहेत. जे आज धर्माच्या (की धर्मांधांच्या?) नाजूक प्रश्नावर जळजळीत उत्तर देऊन एक नवीन पायंडा पडू शकता. आपल्या राष्ट्रीय स्पिरीटचा अपमान होण्यापासून परावृत्त करू शकता, संविधानातील मुद्द्यांना याने बळकटी येऊ शकेल. secular हा शब्द खऱ्या अर्थाने उच्चारला जाऊ शकेल.
एकमेकांच्या धर्मांबद्दल चांगला बोललो तर फार मोठी राष्ट्रीय एकात्मता होणार नाही हे मत असू शकतं पण त्याने असहिष्णुतेचा कडवट भाव मनातून जाऊन धार्मिक एकात्मतेला हातभार नक्कीच लागू शकेल.
मागच्या वर्षी भाऊ कदम यांना देखील अश्याच ‘धर्मपरायणांच्या’ जाणिवा आणि भावना दुखावल्याबद्दल फटकारण्यात आले होते.
त्यांच्या माफीनाम्यावर प्रौढी मिरवून हे ‘परायण’ खुश झाले असतील, जिंकले असतील पण अशा लोकांसाठी किंवा यांच्या मतांसाठी आपल्या सहिष्णू आणि मोकळ्या विचारांचा कधीपर्यंत बाली आपण देणार?
आपण अभ्यासक आहेत, जेष्ठ आहेत, आमचे प्रतिनिधी आहेत, आपणावर कुरघोडी करण्याचा कसलाच हेतू नसून इथे आपल्यासमोर फक्त छोटासा भावनाप्रदर्शन केले आहे. आपल्या विचारांचा, मतांचा किंवा आदर्शांचा चुकून अपमान झाला असल्यास मोठ्या मानाने क्षमा करावी. शेवटी माणसे धर्मासाठी नसून धर्म हे माणसांसाठी बनवले गेले आहेत हे खरे नाही का?
या सर्व बंदिस्त जाणिवांवर प्रकाश पडून धर्मांधांचे ‘डोळस’ व्हावेत हीच **** कडे प्रार्थना.
कळावे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.