या एकमेव मराठमोळ्या “अल्ट्रा मॅन”ने जवळपास सगळ्या जगातील आयर्नमॅन स्पर्धा जिंकल्यात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतात क्रिकेट हा एकमेव सगळ्यात जास्त प्रसिद्ध असा खेळ आहे. सध्या सिनेमाच्या माध्यमातून पडद्यावर उतरल्याने बॉक्सिंग, हॉकी, फूटबॉल, सायकलिंग आणि कुस्ती सारख्या खेळांना जरा वलय येऊ लागलंय.
कबड्डी सारख्या खेळांचे राज्यस्तरीय सामने देखील रंगू लागलेत. ह्या खेळातील खेळाडूंना आता जरा लोक ओळखू लागलेत.
त्यांचा फॅन फॉलोविंग देखील सुरू झालाय. खऱ्या अर्थाने क्रिकेटची मक्तेदारी मोडून बाकीच्या खेळांना सुद्धा आता सुगीचे दिवस येऊ लागलेत.
ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि इतर आंतरराष्ट्रीय खेळात पूर्वी भारताला एखादं दुसरं पदक मिळायचं. तेही रौप्य किंवा ब्रॉन्झ आणि कधीतरीच सुवर्ण पदक. हल्ली मात्र चित्र पालटलय. सुवर्ण पदकांची रीघ लागलीये. विविध राज्यातून वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवणारे जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावू पाहत आहेत.
एक अतिशय कठीण क्रीडा प्रकार परदेशात प्रसिद्ध आहे. त्याला म्हणतात आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस. ह्यात ३ प्रकारे रेस पूर्ण करायची असते. ही रेस अथक असते. म्हणजे मध्ये विश्रातीसाठी ब्रेक मिळत नाही. थोडक्यात काय तर एका दिवसात पूर्ण करावयाची रेस..!!
ह्याचे स्वरूप वाचूनच आपल्याला घाम फुटेल..
३.८६ किमीचे अंतर पोहून पूर्ण करायचे. त्यांनतर लागलीच १८०. २५ किमीचे अंतर सायकलिंगने पार करायचे आणि पाठोपाठ ४२.२० किमी मॅरेथॉन रन..!!
सगळ्या खेळात सर्वसाधारणपणे एकाच प्रकार खेळला जातो. पण ह्या ट्रायथलॉन मध्ये मात्र ३ प्रकारच्या क्रीडा प्रकारांवर भर दिला आहे. त्यामुळे ह्याला जगातील सगळ्यात अवघड रेस म्हणूनच मानले जाते.
ह्या खेळाचे खेळाडू घडवायला खूप मेहनत आणि पैसे लागतो. जो बाहेरील देशातील खेळाडूंना पुरवलाही जातो. पण भारतासारख्या देशातूनही ह्या खेळात पारंगत असे खेळाडू जातात.
मिलिंद सोमण जो फिटनेस फ्रिक म्हणून भारतभर प्रसिद्ध आहे तो देखील आयर्नमॅन आहे आणि तेही वयाची पंचेचाळिशी उलटून ..!!
पण ह्या मिलिंद सोमणला सुद्धा शह देणारा मराठमोळा खेळाडू ज्याने साही च्या साही खंडातील आयर्नमॅन स्पर्धा जिंकल्या आहेत. मिलिंद सोमण पेक्षा ३ तास कमी घेऊन त्याने विक्रम नोंदवला आहे. त्याने नाव ‘कौस्तुभ राडकर’.
जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पोहण्याच्या स्पर्धांमधून पुढे येत कौस्तुभने ट्रायथलॉन सारख्या रेस मध्येही बाजी मारली आहे.
वयाच्या नवव्या वर्षापासून स्विमिंग मध्ये पारंगत झालेल्या कौस्तुभने पुणे, महाराष्ट्र आणि युनिव्हर्सिटी स्पर्धातील पदके जिंकली. त्याने आशिया पॅसिफिक लेवलवर स्विमिंग क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे.
‘Poster boy of IRONMAN in India’ असे दिमाखदार बिरुद मिळवलेल्या कौस्तुभने २००८ साली ऍरिझोना येथे आपली पहिली आयर्नमॅन रेस जिंकली. ती सुद्धा विक्रमी वेळात म्हणजेच फक्त ११ तास ४१ मिनिटे आणि ३६ सेकंदात.
ही आता पर्यंतच्या भारतीय ट्रायथलॉन खेळाडूंमध्ये कौस्तुभ कडून सगळ्यात कमी वेळात पूर्ण झालेली रेस होती. हा ही एक विक्रमच..!
–
- हालअपेष्टा सहन करत भारतासाठी पहिलं व्यक्तिगत ऑलम्पिक पदक मिळवणारा महाराष्ट्राचा रांगडा गडी!
- एकेकाळी आपल्या खेळाने मैदान गाजवणाऱ्या जयसूर्याला आता आधार घेऊन चालावं लागत आहे
–
यानंतर कौस्तुभने प्रत्येक खंडातून आयर्नमॅन स्पर्धेचा किताब जिंकण्याचा चंग बांधला. त्याचे हे स्वप्न २०१५ मध्ये सत्यात उतरले. त्यावर्षी त्याने आफ्रिका खंडातून पोर्ट एलिझाबेथ येथे आपली ६व्या खंडातील ट्रायथलॉन रेस पूर्ण केली.
अशा त्याने तब्बल २२ हून अधिक रेस पूर्ण केल्या आहेत.
ह्याही उप्पर अल्ट्रामॅन ट्रायथलॉन ही रेसदेखील कौस्तुभने जिंकली आहे. यामध्ये हे तिन्ही क्रीडाप्रकार साधारण दुप्पट किलोमीटरचे असतात आणि ३ दिवस ही रेस चालते. म्हणजे १० किमी स्विमिंग, ४२१ किमी सायकलिंग आणि ८४ किमी अल्ट्रा मॅरेथॉन..!!
फ्लोरिडा मध्ये पार पडलेली ही अल्ट्रामॅन ट्रायथलॉन कौस्तुभ राडकरने फक्त ३१ तास २९ मिनिटात पूर्ण करून, सगळ्यात कमी वेळात पूर्ण करणारा पहिला भारतीय असल्याचा विक्रम आपल्या नावे करून घेतला आहे.
प्रत्येक आयर्नमॅन स्पर्धेपूर्वी कौस्तुभ ६ महिने आधी पासूनच खूप मेहनत घ्यायला सुरुवात करतो. स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग सोबत एरोबिक्स करून स्टॅमिना वाढवण्यावर सुद्धा जोर देतो.
१६ ते २० तास अथक व्यायाम करून स्वतःला ट्रायथलॉनसाठी फिट करण्याकडे त्यांचा कल असतो.
स्पर्धांमध्ये बऱ्याचदा शरीराला दुखापत होऊन सुद्धा परत ‘फिट अँड फाईन’ होऊन कौस्तुभ ने आपले स्वतःचे ट्रेनिंग सुरूच ठेवले. आणि एकावर एक ट्रायथलॉन वर आपल्या नावाची मोहोर उमटवली.
भारतात क्रिकेट इतका प्रसिद्ध नसलेला हा क्रीडा प्रकार जिवंत रहावा, भविष्यात पुढे येणाऱ्या आयर्नमॅन ना व्यवस्थित मार्गदर्शन मिळावे म्हणून कौस्तुभने स्वतःची फिटनेस ट्रेनिंग संस्था सुरू केली आहे.
रॅडस्ट्रॉंग ही त्यांची संस्था असून मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा कौस्तुभ राडकरांकडून ट्रेनिंग घेताना दिसतात. इतकेच काय तर ५० व्या वर्षी आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅन असलेला मिलिंद सोमण सुद्धा कौस्तुभ कडून टिप्स घेताना दिसतो. तसे ट्विट ही त्याने केले होते.
रॅड स्ट्रॉंग कोचिंग ही भारतातील एकमेव आयर्नमॅन कोचिंग संस्था आहे आणि कौस्तुभ राडकर हे भारतातील एकमेव सर्टीफाईड ट्रायथलॉन कोच..! लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने फिटनेस ट्रेनिंग आणि कोचिंग देण्यामध्ये कौस्तुभचा हातखंडा आहे.
स्ट्रेंथ ट्रेनिंग, न्यूट्रिशन, हायड्रेशन ह्या विषयांवर लेक्चर्स देण्यासाठीही कौस्तुभने प्लॅन आखलेला आहे. शाळा कॉलेजात फिटनेस संदर्भात मोटीवेशनल भाषण देण्यातही कौस्तुभ अजिबात मागे नाहीत. ह्या क्षेत्रात नव्याने पाऊल टाकणाऱ्यांना कौस्तुभच्या कोचिंगने नक्कीच फायदा होऊ शकतो.
आपली खेळाची आवड जोपासताना शिक्षणाकडे मात्र कौस्तुभने कधीही दुर्लक्ष केले नाही. १२ उत्तीर्ण होऊन अमेरिकेतील इंडियन विद्यापीठातून शारीरिक शिक्षण ह्या विषयात पदवी घेतली. विस्कझिन युनिव्हर्सिटीतून पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले
नंतर बाल्टिमोर मधून क्रीडा वैद्यकीय क्षेत्रातील MBA देखील पूर्ण केले. आता स्विमिंग पटू कौस्तुभ डॉक्टर कौस्तुभ राडकर झाले. हेदेखील आजच्या लहान मुलांनी शिक्षण सोडून क्रीडा प्रकारात पाऊल ठेवण्याआधी लक्षात घेणे गरजेचे आहे.
पूर्ण शिक्षण घेऊन आपल्या आवडत्या खेळात करिअर करणे हे कौस्तुभ राडकरांकडून शिकण्यासारखे आहे. आपल्या क्षेत्रात नंबर वन होण्याकरता अथक मेहनत घेणे ह्याला पर्याय नसतो हे देखील आपल्याला कौस्तुभच्या यशामुळे दिसून येते.
जगात अतिशय अवघड अशा क्रीडा प्रकारात भारताचे नाव उंचावणाऱ्या ह्या खेळाडूला पुढील वाटचालीसाठी आणि असंख्य विक्रमांसाठी इन मराठी तर्फे खूप शुभेच्छा..!!
–
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.