तुमच्या बालपणाच्या आठवणी खोट्या आहेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्या आजूबाजूला लहान बाळं खेळताना बागडताना पाहिली किंवा आपल्याच घरात जर लहान मूल असेल तर आपण त्यांच्याबरोबर पुन्हा आपलं बालपण जगून घेतो. त्यांचे सुंदर निरागस भाव आणि बोबडे बोल ऐकून आपण सुद्धा आपल्या बालपणाच्या सुंदर आठवणींत रमून जातो आणि “बालपण देगा देवा” अशी इच्छा करू लागतो.
बालपणी कसे सगळे आपले लाड करायचे, आपले हट्ट पूर्ण करायचे, आजोबा फिरायला न्यायचे, आजी सुंदर गोष्टी सांगायची, काका/मामा खाऊ आणायचे.. मावशी/आत्या लाड, कौतुक करायची, आई मायेने जेवू घालायची, बाबा खांद्यावर बसवून नव्या नव्या गोष्टी शिकवायचे अश्या आठवणी प्रत्येकाच्याच मनात साठवून ठेवलेल्या असतात.
तीन वर्षांपर्यंतच्या ह्या आठवणी अगदी स्पष्ट आठवत नसल्या तरी त्या धूसर धूसर आठवत असतात. ह्याच आठवणी आपल्याला परत बालपणाची सैर करवून आणतात.
पण आता काही शास्त्रज्ञांनी मात्र आपल्या ह्या आनंदाला सुरुंग लावला आहे. त्यांच्या मते आपल्या तीन वर्षांचे होईपर्यंतच्या सगळ्या आठवणी ह्या खोट्या किंवा काल्पनिक असतात.
ह्या आठवणी मोठ्यांनी सांगितलेले आपल्या बालपणीचे प्रसंग, थोडीशी धूसर आठवण व आपले बालपणीचे फोटो ह्यावरून तयार झालेल्या असतात. कदाचित त्या काल्पनिक सुद्धा असू शकतात.
एका सर्व्हेवरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, कुठलीही व्यक्ती साडे तीन वय वर्षाच्या आधीच्या आठवणी लक्षात ठेवू शकत नाही. माणसाला बालपणीचे जे काही आठवते ते तो चार वर्षाचा झाल्यानंतर जे घडले होते तेच त्याच्या मेंदूमध्ये साठवले जाते. त्या आधीचे काहीही आठवणे अशक्य आहे असे तज्ञ सांगतात.
ह्याच विषयावर जो अभ्यास करण्यात आला तो सायकॉलॉजिकल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
ह्या अभ्यासात असा निष्कर्ष निघाला की ४० टक्के लोक जे दोन वर्षांचे असताना किंवा त्या आधी घडलेल्या काही गोष्टी आठवतात असा दावा करतात, त्यांच्या त्या अगदी बालपणीच्या आठवणी ह्या काल्पनिक आहेत.
आपण बाबागाडीत कसे बसून जायचो किंवा पांगुळगाडा घेऊन कसे घरभर फिरायचो असे ज्या लोकांना आठवते, ती तुमच्या स्मरणशक्तीची कमाल नसून थोडीशी धूसर आठवण व तुमच्या मनाची कल्पना असा एकत्रित झालेला परिणाम असतो.
प्रोफेसर मार्टिन कॉंनवे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर ह्याचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत.
ते म्हणतात की,
“ह्या प्रकारच्या आठवणी ह्या कुणी मोठ्यांनी सांगितलेल्या आठवणींच्या बेसिसवर आपल्या मनात तयार होतात. तुम्हाला जर कुणी सांगितले असेल की तुम्ही लहान असताना तुमच्याकडे लाल रंगाची बाबागाडी होती, तर तुमच्या मनात आपण त्या लाल बाबागाडीत बसून आईबरोबर कसे फिरायला जात असू ही काल्पनिक आठवण तयार होते.
तुम्ही नकळत कल्पना करू लागता की ती बाबागाडी कशी असेल, मग आपण बालपणी कसे दिसत असू, काय करत असू? ह्या सगळ्याच्या धर्तीवर ती बाबागाडीची काल्पनिक आठवण तयार होते.”
आपण बाबागाडीतून बसून जात होतो ही खरी घटना तर प्रत्यक्षात आपल्याला आठवत नसते परंतु त्या बाबागाडीचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते.
कदाचित बालपणीच्या एखाद्या फोटोमध्ये आपण ती बाबागाडी पाहिली असते. त्या बाबागाडीचे आपल्या डोक्यात चित्र तयार होते, त्यात थोडे मोठे झाल्यानंतरच्या काही धूसर आठवणी एकत्र होतात आणि मेंदूत एक काल्पनिक आठवण तयार होते.
तज्ज्ञांच्या मते आपण सहा वर्षांचे झाल्यानंतरच आपल्या मेंदूत मोठ्या माणसांसारख्या आठवणी साठू लागतात. माणसाला जास्तीत जास्त तीन वय वर्षांपर्यंतचे आठवू शकते परंतु त्या आधीचे काही आठवणे अशक्य असते. बालपणीच्या आठवणींवर अभ्यास करण्यासाठी रिसर्च करणाऱ्यांनी ६,६४१ लोकांना त्यांच्या अगदी बालपणीच्या काही गोष्टी आठवायला सांगितले.
त्या घटनेचे फोटो अस्तित्वात नाहीत ना किंवा त्याबद्दल त्यांना घरातल्या मोठ्यांनी काही सांगितले नाही ना, हे कन्फर्म केले.
कॉनवेंच्या मते ह्या काल्पनिक आठवणी बऱ्याचदा आपले बालपणीचे फोटो बघून किंवा घरातल्या मोठ्यांकडून आपल्या बालपणीची कुठली गोष्ट सांगितल्यास तयार होतात.
ह्या रिसर्चमध्ये भाग घेतलेल्यांपैकी २,४८७ लोकांनी असा दावा केला की त्यांना ते अडीच वर्षांचे असतानाच्या किंवा त्याही आधीच्या काही घटना आठवतात. ८९३ लोकांनी दावा केला की त्यांना त्यांच्या पहिल्या वाढदिवसाच्याही आधीच्या काही घटना आठवतात.
परंतु तज्ज्ञांच्या मते हे इतक्या बालपणीचे काहीही आठवणे अशक्य आहे. कारण ह्या वयात बाळाच्या मेंदूची त्याप्रमाणे वाढच झालेली नसते.
मूल तीन वर्षांचे झाल्यानंतरच त्याच्या मेंदूची घटना साठवून ठेवण्याच्या दृष्टीने वाढ होणे सुरु होते व मूल सहा वर्षांचे झाल्यानंतरच त्याचा मेंदू मोठ्या माणसांप्रमाणे गोष्टी साठवून ठेवू शकतो. त्यामुळेच ह्या लोकांना बालपणीचे जे काही आठवते ते काल्पनिक आहे.
ह्या रिसर्च मध्ये ज्यांनी अगदी बालपणीच्या गोष्टी आठवत असल्याचा दावा केला ते मध्यमवयीन किंवा त्यापेक्षाही जास्त वयाचे होते.
मध्यमवयीन लोकांमध्ये दहापैकी चार लोकांना फॉल्स मेमरी असते असं निष्कर्ष ह्या रिसर्चमध्ये काढण्यात आला आहे.
आपला मेंदू अश्या काल्पनिक आठवणी का तयार करत असावा ह्या प्रश्नाचे उत्तर देताना डॉक्टर शाझिया अख्तर म्हणतात की,
“माझ्या मते आपण लहानपणीची एखादी गोष्ट आठवतो तेव्हा ती एपिसोडीक मेमरी असते. ते आपल्याला धूसर आठवत असलेल्या काही गोष्टी व आपल्याला आपल्या बालपणाबद्दल माहित असलेल्या काही गोष्टी ह्यांचे एकत्रित मेंटल रिप्रेझेंटेशन असते.”
तीन वय वर्षाआधीच्या गोष्टी लक्षात न राहणे ह्या गोष्टीला चाईल्डहूड ऍम्नेशिया म्हणतात. जन्माला आल्यापासून ते सहा वर्षांपर्यंत मेंदूची वाढ झपाट्याने होते. ह्या काळात मेंदूची वाढ झालेली नसल्याने मेंदू गोष्टी साठवून ठेवू शकत नसावा असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
अर्थात ह्यालाही काही अपवाद आहेत. काही लोक बऱ्याच गोष्टी अगदी तंतोतंत लक्षात ठेवू शकतात.
म्हणजे एखादे गाणे किती वेळा व केव्हा ऐकले आहे हे त्यांना अगदी तंतोतंत आठवते. ही हायली सुपीरियर ऑटोबायोग्राफिकल मेमरी (HSAM) नामक एक न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. ही गोष्ट अगदी दुर्मिळ आहे. पण फॉल्स मेमरी मात्र कॉमन आहे. पन्नास टक्के लोकांना बालपणाबद्दल फॉल्स मेमरी असते.
–
- या गावात मागील ४०० वर्षांपासून एकही बाळाने जन्म घेतला नाही, कारण एक हास्यास्पद अंधश्रद्धा!
- रडणाऱ्या बाळाचं, कित्येक अपघातांस जबाबदार धरलं गेलेलं “शापित” चित्र
–
आपली स्मरणशक्ती इतकी लवचिक असते की रिसर्चर फक्त तीन इंटरव्यूमध्ये आपल्या मेंदूत एखादी खोटी किंवा काल्पनिक आठवण पेरू शकतात. किंवा एखाद्या व्यक्तीला तिने एखादा गंभीर गुन्हा केला आहे हे पटवून देऊ शकतात.
ब्रीगेम यंग युनिव्हर्सिटीतील सायकॉलॉजी डीपार्टमेंट व न्यूरोसायन्स सेंटरचे असोसियेट प्रोफेसर ब्रॉक किर्वान म्हणतात की,
“आपल्या आठवणी ह्या अतिशय लवचिक असतात. त्या नवी नवी माहिती मिळते त्याप्रमाणे बदलू शकतात. आपल्या आठवणी कालपरत्वे बदलतात. तुमच्या बालपणाबद्दल तुमच्याकडे चांगल्या आठवणी असतील तर त्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो.”
“तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होतो आणि पुढील आयुष्यात येणाऱ्या संकटांना तुम्ही चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकता.माझ्या मते अगदी बालपण्याच्या आठवणी म्हणजे आपल्या मेंदूच्या अपडेटिंग प्रोसेसचे एक बायप्रोडक्ट आहे.”
आपल्या बालपणाच्या आठवणी जरी काल्पनिक असल्या तरीही त्यांचा आपल्या पुढील आयुष्यात निर्णय घेताना उपयोग होतो.
म्हणूनच बालपणीचे काही आठवत असल्यास आणि ती एखादी सुखद आठवण असल्यास ती खरी की खोटी ह्या भानगडीत पडूच नये. त्याने आपल्या मनात सकारात्मक उर्जा निर्माण होते व हीच सकारात्मक उर्जा जगण्याचे बळ देते.
–
- आईच्या गर्भात असताना बाळ काय काय अनुभवते ? जाणून घ्या..
- बाळ चिमुकल्या हातांनी डोळे का चोळतं ? अशा वेळी काय काळजी घ्याल ? जाणून घ्या…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.