आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
राष्ट्रीय स्वयंसेवक या ९३ वर्षांच्या संघटनेवर नेहमीच ‘मनुवादी, ‘फॅसिस्ट’, ‘लोकशाहीविरोधी’, ‘ब्राह्मणवादी’, ‘प्रतिगामी’, ‘सनातनी’, ‘गुप्त कारवाया करणारी’, ‘बंदिस्त’, ‘जातीयवादी’, ‘संविधानविरोधी’ हे आणि असे आणखी बरेच काही आरोप देशातील ‘पुरोगामी’, ‘लोकशाहीवादी’, ‘जातीअंताच्या लढाया लढणाऱ्या’, ‘फॅसिस्टवादास विरोध करणाऱ्या’, ‘संविधानवादी’, ‘विवेकी’ म्हणवणाऱ्या संघटना दीर्घकाळापासून करत आहेत.
त्यांचा एक आरोप असतो, तो म्हणजे “संघ आमच्या प्रश्नांना उत्तरं देतच नाही.” सबब संघ ही बंदिस्त संघटना आहे आणि देशास या संघटनेपासून फार्फार धोका आहे.
तर अशा सर्व प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आणि रा. स्व. संघाची भूमिका मांडण्यासाठी राजधानी दिल्लीत विज्ञान भवनात या महिन्याच्या सतरा, अठरा आणि एकोणीस तारखांना तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे या कार्यक्रमास विरोधकांना सन्मानाने निमंत्रण देण्यात आले होते. सोबतच फेसबुक, ट्वीटर आणि युट्यूब या माध्यमातून त्याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते.
त्यामुळे “आम्हाला ब्वा माहितीच नाही” असा राग आळवायला संधीच पुरोगाम्यांना नव्हती.
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी प्रथम दोन दिवस रा. स्व. संघ म्हणजे काय, यावर आपले विचार मांडले. तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होता.
अखेरच्या दिवशी डॉ. भागवतांनी संघाविषयी विचारण्यात येणारे प्रश्न, प्रवाद आणि आरोप यांना सविस्तर उत्तरे दिली.
त्यात गोळवलकर गुरूजींचे विचारधन, त्यातील वादग्रस्त संदर्भ, संघ आणि भारतीय राज्यघटना, संघ आणि जातव्यवस्था, संघ आणि मुसलमान, संघ आणि भाजप अशा सर्व प्रश्नांना सरसंघचालकांनी थेट उत्तरं दिली. त्यामुळे आता तेच संघाचे अधिकृत मत आहे, यावर शिक्कामोर्तब झालंय.
प्रस्तुत लेखात ‘बंच ऑफ थॉट्स’ एवढाच संदर्भ घेण्यात आला आहे.
मात्र, तरीदेखील देशातील पुरोगामी म्हणवणारे लेखक, प्राध्यापक, वकील, पत्रकार, स्वयंघोषित विचारवंत या सर्वांचे काही समाधान यातून झालेले नाही.
म्हणजे एकीकडे म्हणायचे की,
“संघाचे बंदिस्त आणि गुप्तपणे काम चालते, संघ आमच्या प्रश्नांना उत्तरे देत नाही.”
आणि दुसरीकडे संघाने बोलावले, सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, तरिही ती मान्य करायची नाही. अशी विचित्र कार्यपद्धती पुरोगाम्यांची आहे. त्यामुळे त्यास ‘पुरोगामी कावा’ म्हटले तरी वावगे ठरू नये.
अर्थात यात पुरोगाम्यांचा दोष नाही. कारण पुरोगामी सध्या सपशेल उघडे पडायला लागले आहेत, त्यांचे वैचारिक ढोंग आता जनतेसमोर यायला लागले आहे आणि म्हणूनच
“आम्ही सांगू तेच सत्य आणि आम्ही सांगू तेच तुम्हाला ऐकावं लागेल”
अशी भाषा रमण्याच्या आशेमुळे ते करायला लागले आहेत. रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्रीगुरूजी यांनी लिहिलेल्या ‘विचारधन’ अथवा ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकाचा दाखल देत पुरोगाम्यांनी आपले दुकान दीर्घकाळापासून चालवले आहे. या
पुस्तकात जातव्यवस्था, मुस्लिम आदी विषयांवर काही आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आणि संघाचे तेच विचार असल्याचा आरोप पुरोगाम्यांकडून नेहमी केला जातो.
===
सदर लेखावर मते, प्रतिवाद आपल्या फेसबुक पेज – facebook.com/InMarathi.page – वर मेसेज करावीत. अभ्यासपूर्ण व मुद्देसूद प्रतिवादाना प्रसिद्धी देण्यात येईल.
===
अर्थात त्यांना तसा आरोप करायचा पूर्ण अधिकार आहे, त्यात वावगे काहीही नाही. मात्र, रा. स्व. संघ केवळ ‘बंच ऑफ थॉट्स’वरच चालवला जातो, हा द्वेषातून केलेला आरोप झाला. त्याविषयी डॉ. भागवत यांनी अगदी स्वच्छ शब्दात सांगितले. डॉ. भागवत म्हणतात की,
“काही बाबी या तात्कालिक संदर्भाने बोलल्या जातात, त्या शाश्वत अथवा कायमस्वरूपी मानण्याचे काहीही कारण नाही. गुरूजींजे जे शाश्वत विचार आहेत, त्याचे संकलन श्रीगुरूजी- व्हिजन अँड मिशन या नावाने संकलित करण्यात आले आहेत. त्यात तत्कालिन संदर्भाने आलेल्या सर्व गोष्टी काढून, शाश्वत राहणारे विचार केवळ त्यात आहेत. ते जरूर वाचा.
–
त्याचप्रमाणे संघ काही बंदिस्त संघटना नाही. डॉ. हेडगेवारांनी काही सांगितले आणि आम्ही आजही त्याच वाक्यांना प्रमाण मानतो, असे अजिबात नाही. काळ बदलतो, तशी संघटनेची स्थितीदेखील बदलत असते. त्याचप्रमाणे आमचे विचारही बदलतात आणि त्याची परवानगी आम्हाला डॉ. हेडगेवारांकडूनच मिळाली आहे.”
असा स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात गोळवलकर गुरूजींचे कोणते विचार संघ आजही मानतो आणि कोणते विचार मानत नाही, हे सरसंघचालक पदावरील जबाबदार व्यक्तीने स्पष्ट केले आहे.
मात्र, तरीही संघविरोधक ढोंगी पुरोगामी ‘बंच ऑफ थॉट्स’चं तुणतुणं अद्यापही वाजवताय आणि पुढेही वाजवत राहणार, यात कोणतीही शंका नाही.
पुरोगाम्यांची मजल एवढी वाढली आहे की, देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावर जाण्याचा निर्णय घेतल्यावर पुरोगाम्यांनी एकच गजहब माजवल होता. एरवी आम्ही जातीअंताची लढाई लढतो हो…
असं सांगत गावगन्ना हिंडणाऱ्या बऱ्याच पुरोगाम्यांनी तर मुखर्जींची जातही अगदी तत्परतेने काढली.
संघाच्या व्यासपीठावर गेल्यामुळे मुखर्जी हे जणुकाही अस्पृश्य झाले, असा आव पुरोगामी मंडळींनी आणला होता.
देशाच्या माजी राष्ट्रपतीबद्दल पुरोगामी असा विचार करतात, सामान्य संघ स्वयंसेवक, संघ पदाधिकारी अथवा संघाविषयी सहानुभूती बाळगणाऱ्या सर्वसामान्य माणसाला तर पुरोगामी टोळकं भंडावून सोडल्याशिवाय राहत नाही.
एकीकडे संघावर वैचारिक असहिष्णुतेचे आरोप लावायचे आणि दुसरीकडे संघाने संवादासाठी निमंत्रण दिल्यावर ते नाकारायचे, असा दुतोंडीपणा पुरोगाम्यांना उत्तम जमतो. अशा दुतोंडीपणातच पुरोगाम्यांची हयात गेली आहे, त्यामुळे त्यांच्यात बदल होणे निव्वळ अशक्य आहे.
: युगंधर
===
सदर लेखावर मते, प्रतिवाद आपल्या फेसबुक पेज – facebook.com/InMarathi.page – वर मेसेज करावीत. अभ्यासपूर्ण व मुद्देसूद प्रतिवादाना प्रसिद्धी देण्यात येईल.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.