आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
रेल्वेमधील खाण्याचं नाव काढलं की बऱ्याच जणांच्या मनात धडकी भरते, त्याला कारणही तसंच आहे म्हणा ! रेल्वेचं अन्न म्हणजे कमी दर्ज्याचं अशी अनेकांची समजूत, बरं त्यात कधी कोणता प्राणी सापडेल ते सांगता येत नाही असंही अनेकांच्या तोंडून आपण ऐकलं असेल. ते खरं ही आहे म्हणा कारण उगाचंच भारतीय रेल्वेची बदनामी करायची म्हणून रेल्वेच्या जेवणाबद्दल कोणी अफवा पसरवलेल्या नाहीत, तर लोकांनी असे क्षण स्वत: अनुभवले आहेत. जनमानसात निर्माण झालेली रेल्वेची हीच कलंकित प्रतिमा पुसण्यासाठी भारतीय रेल्वेने नवीन पाऊल उचलले आहे. या अंतर्गत भारतीय रेल्वे रेल्वेने दरोरोज प्रवास करणाऱ्या ३० दशलक्ष लोकांना खुश करण्यासाठी अतिशय कमी किंमतीत पौष्टिक अन्न प्रदान करत आहे.
या उपक्रमांतर्गत इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कोर्पोरेशन अर्थात IRCTC ने भारतातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर जन आहार कॅफेटेरिया उघडलेले आहेत. या कॅफेटेरियामध्ये मिळणारे बहुतेक अन्नपदार्थ २० रुपयांच्या आतील आहेत हे विशेष ! त्यामुळे या उपक्रमाचा सर्वसामान्य प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे.
२४ तास उघडे असणारे हे कॅफेटेरिया पूर्णपणे वातानुकुलीत आहेत. येथे तुम्हाला स्वत:च्या हाताने तुमची ऑर्डर घ्यावी लागते. आईसक्रिम किंवा थंड-गरम पेय मिळवण्यासाठी AVM मशीन देखील लावण्यात आलेली आहे. अजून एक खास गोष्ट म्हणजे अनेक प्रवाश्यांना मिनरल वॉटर हवे असल्यास पाण्याची बाटली जास्त किमंत देऊन खरेदी करावी लागते, म्हणूनच या कॅफेटेरियामध्ये पिण्यासाठी RO ने शुद्ध केलेले पाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जन आहार कॅफेटेरियाममधील स्वयंपाक घरे काचेची असल्याकारणाने तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोर जेवण तयार होताना पाहू शकता आणि जेवण झाल्यावर तुम्हाला इलेक्ट्रोनिक बिल दिले जाते.
ही संकल्पना २००९ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी अंमलात आणली होती. परंतु कमी निधी आणि वाढता तोटा लक्षात घेऊन अल्पावधीतच ही योजना बंद करण्यात आली होती. २०१४ च्या शेवटी नवनिर्वाचित भाजपा सरकारने या योजनेचा सामान्य जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन योजना नव्याने सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशभरात विविध स्थानकांवर जन आहार कॅफेटेरिया बिनदिक्कतपणे सुरु आहेत.
रेल्वे मंत्रालयाचं हे पाउल पाहून भारतीय रेल्वे आता हळूहळू कात टाकतेय आणि नव्या युगाकडे वळतेय असंच म्हणावं लागेल !
—
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.