Site icon InMarathi

लहानपणी “नागराज” कॉमिक्स वाचलंय? भेटा नाग-मानवांना

snakes inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण प्रत्येकानेच लहानपणी कॉमिक्स वाचण्याचा आनंद घेतलाय. त्यातल्या ध्रुव, नागराज वगैरे सुपरहिरोंचे अचाट कारनामे बघून आपणही तसेच व्हावे अशी इच्छा व्यक्त केली असेल. पण ते कल्पना रंजन होते.

प्रत्यक्षात तश्या सुपरपावर्स आपल्याकडे येणे अशक्य आहे, असे मनाचे समाधान सुद्धा करून घेतले असेल… जर तुम्हाला ते अशक्य वाटत असेल तर थांबा.

आज आपण ओळख करून घेणार आहोत प्रत्यक्ष आयुष्यातील ‘नागराज’ सारख्या हिरोंची !

त्यासाठी आपल्याला भारताच्या दक्षिण भागाकडे जावे लागेल. चेन्नईच्या जवळ वदनेमल्ली नावाच्या गावात एक आदिवासी समाज राहतो जो विषारी नागांना पकडण्यात आणि त्यांच्या विषाची परीक्षा घेण्यात कुशल आहे.

त्यांचे नाव आहे इरूला! हे इरूला लोक त्यांच्या या कौशल्यामुळे पूर्वापार काळापासून प्रसिद्ध आहेत.

 

catchnews.com

 

त्यांचे विषारी सापांबद्दलचे ज्ञान आणि कौशल्य पिढ्या दर पिढ्या मार्फत हस्तांतरण होऊन सध्याच्या पिढीपर्यंत पोहोचले आहे. एवढंच नाही तर, असं म्हणता येईल की भारताच्या सर्पदंश होऊन मरणाऱ्या कित्येक लोकांचे प्राण या इरुलांनी प्रकाशझोतात न येता वाचवले आहेत.

आश्चर्य वाटलं ना? पण सत्य आहे. सर्पदंशावर दिले जाणारे अँटीव्हेनम औषध याच इरूला मार्फत आपल्यापर्यंत येत असते.

या जमातीमधला नागांची काळजी घेणारा राजेंद्र म्हणतो,

“खूप लोकांना सापांची विनाकारण भीती वाटत असते. पण आपण लक्षात घेतले पाहिजे की सापांना फक्त आपला स्वतःचा जीव वाचवण्यात रस असतो. ते आपल्या वाटेला जात नाहीत.”

“मात्र आपल्याकडून चुकीचे पाऊल पडले तर जीव वाचवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ते चावा घेऊ शकतात. जर सापांचा सामना झाला तर हालचाल न करता एका ठिकाणी स्तब्ध उभे राहिल्यास ते चुपचाप आपल्या वाटेने निघून जातात.”

१९७८ मध्ये वदनेमल्ली येथे नागांना पकडण्यासाठी, त्यांचा सांभाळ करण्यासाठी आणि त्यांचे विष औषधी उपयोगामध्ये काढण्यासाठी एक संस्था स्थापन झाली. ‘स्नेक कॅचर इंडस्ट्रीयल कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी’ असे तिचे नाव.

 

dailymail.co.uk

 

भारतात जवळपास पन्नास हजार लोक सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडतात. या सर्पदंशावर तात्काळ अँटीव्हेनमचा डोस देणे हाच एक उपाय आहे. देशात सहा कंपन्या या अँटीव्हेनमचे डोस तयार करतात. आणि या सगळ्या कंपन्यांमध्ये त्यासाठी विषाचा पुरवठा हा इरूलामार्फत होतो.

या गावात एक विष काढण्याची जागा आहे, जेथे एका फळ्यावर त्या ठिकाणी कोणत्या प्रजातीचे किती सर्प आहेत याची रोज नोंद ठेवली जाते.

सापांना ठेवण्यासाठी एक मडके वापरले जाते, ज्यात अर्ध्या भागापर्यंत वाळू भरलेली असते. एका मडक्यात दोन साप ठेवतात.

त्या मडक्यांचे तोंड एका जाळीदार सुती कपड्याने व्यवस्थित बांधले जाते जेणेकरून सापांना बाहेर पडता येऊ नये परंतु त्यांच्यापर्यंत हवेचा पुरवठा व्यवस्थित होत राहावा.

एकाच ठिकाणी मनुष्य, जनावरे आणि साप राहत असतील तर त्यांचा एकमेकांना धोका उत्पन्न होऊ शकतो. म्हणून हे काम अतिशय काळजीपूर्वक करावे लागते.

 

indianexpress.com

 

या को-ऑपरेटिव्ह संस्थेकडे एका वेळी ८०० सापांना ठेवण्याचा परवाना आहे. साप पकडण्याचे काम वर्षभर चालते. एका सापाला एकवीस दिवस या संस्थेत ठेवले जाते आणि त्या दिवसात त्याचे वेळोवेळी विष काढले जाते.

एकवीस दिवसानंतर त्या सापाला परत जंगलात मोकळ्या वातावरणात सोडून देतात.

पण सोडण्यापूर्वी त्यांच्या अंगावर एक खूण केली जाते जेणेकरून परत तोच साप पकडला जाऊ नये.

या साप पकडणाऱ्या इरूला जमातीतल्या मुलांना अगदी लहानपणापासून प्रशिक्षण दिले जाते. खूप लहान वयात सापांना हाताळल्यामुळे प्रत्येक सापाच्या प्रजातीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि स्वभावगुण या मुलांना समजतात.

ही मुले साप पकडण्यासाठी वयाच्या दहाव्या वर्षांपासून जंगलात भटकंती सुरू करतात. या इरूला आदिवासींना शक्यतो शांत वातावरणात काम करायला आवडते.

 

dailymail.co.uk

 

जंगलात कितीही मोठ्या समूहाने जरी गेले तरी ते शांततेचा नियम कटाक्षाने पाळतात. जंगलातील खुणा पाहून त्यांना साप कुठे असेल त्याचा अंदाज येतो. त्यांच्याकडे याविषयीचे जंगलातील इतके ज्ञान आहे की, ते जणू चालता बोलता ज्ञानकोष आहेत असे म्हणायला हरकत नाही.

परंतु, बाहेरील लोकांमध्ये जास्त न मिसळण्याचा स्वभाव, भाषेची अडचण यामुळे हे ज्ञान त्यांच्यातच मर्यादित राहते आणि इतर अभ्यासकांपर्यंत पोहोचत नाही.

हे इरूला लोक सापांना पकडण्याच्या कामात का व कधीपासून लागले याची माहिती इतिहास शोधूनही मिळत नाही. त्यांचा हा पूर्वपरंपरागत व्यवसाय आहे.

काही धार्मिक संकल्पना बघितल्या असता, हे कांनीअम्मा या कुमारिका देवीला मानतात. या देवीचे वाहन कोब्रा नाग आहे. पण यातला विरोधाभास असा की, नागाला जरी हे देवता मनात असले तरी विसाव्या शतकात मात्र पैशासाठी यांनी अनेक नागांच्या हत्या केल्या आहेत.

ब्रिटिशांच्या काळात सापांच्या कातडीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. पैश्यांच्या प्रलोभनामुळे इरूलांनी अनेक नाग आणि साप पकडून ब्रिटिशांच्या आणि व्यापाऱ्यांच्या हवाली केले.

एका सापाच्या कातडीची नाममात्र किंमत यांना देऊन तीच कातडी युरोप अमेरिकेच्या बाजारात हजारो डॉलर्सना विकली जात असे. १९७२ मध्ये मात्र कायद्याने सापांसोबत अनेक प्राणी मारण्यावर बंदी आली आणि हा उद्योग थंडावला.

अँटीव्हेनम साठी जेव्हा संस्था स्थापन झाली तेव्हा मात्र या आदिवासी लोकांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आले. पूर्वी त्यांना इतरांकडून भेदभावाची वागणुक मिळत असे आणि संशयित नजरेने पाहिले जात असे. मात्र आता ते एका चांगल्या कामात असल्याने त्यांना थोडीफार प्रतिष्ठा मिळू लागली.

 

indianexpress.com

 

आता सध्याची स्थिती मात्र चिंता करण्यासारखी आहे. औद्योगिकीकरणाचा फटका वदनेमल्लीला बसू लागलाय. चेन्नई शहर दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि ते या गावाला आणि जंगलाला लवकरच गिळंकृत करेल अशी भीती इथल्या इरूलांना वाटू लागली आहे.

इकडे येणाऱ्या रस्त्यांवर मोठमोठे शोरूम झाले आहेत आणि विष काढण्याच्या ठिकाणा जवळच गर्दीने गजबजलेले रिसॉर्ट तयार होत आहेत.

ज्या ठिकाणी सापांचा नैसर्गिक अधिवास आहे तेच ठिकाण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सापांची संख्या झपाट्याने कमी होतेय आणि इरुलांचा रोजगार हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

बहुधा सापांसोबत खेळणारी इरूलांची ही शेवटची पिढी असेल. कारण आता हे आदिवासी वस्त्र टाकून देऊन शहराची वाट पकडण्याच्या तयारीत आहेत.

पालकांना आपली मुले जंगलात सापांच्या मागे न भटकता शाळेत जाऊन शिक्षण घेऊन मोठी व्हावीत असे वाटत आहे, आणि त्यात काही गैर ही नाही. प्रश्न इतकाच आहे की, भारतात अँटीव्हेनमचा पुरवठा या पुढे कोण आणि कसा करणार?

कारण, अँटीव्हेनम हे सर्पदंशावर रामबाण उपाय आहे आणि त्याचा तुटवडा भासला तर कोण जबाबदार असेल असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version