आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गुप्ता बंधू उत्तर प्रदेशातील सहारनपूर मधून व्यवसायाच्या शोधात दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तीन दशकांपूर्वी सहारनपूरचे अजय गुप्ता व्यवसायासाठी दिल्लीला गेले व तिथून ते दक्षिण आफ्रिकेत गेले.
त्यांचे वडील शिव कुमार ह्यांचे वाणसामानाचे दुकान होते. सहारणपूर मध्ये त्यांचे वाडवडिलांचे घर देखील होते. तरुणपणापासूनच अजय गुप्ता अतिशय महत्वाकांक्षी होते.
सुरूवातीला त्यांनी दिल्लीला एक हॉटेलमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांनी त्यांचे भाऊ राजेश गुप्ता व अतुल गुप्ता ह्यांच्या सह दक्षिण आफ्रिकेत सहारा कंप्युटर्सची सुरुवात केली.
ते कंप्युटर्सचे असेंबलिंग, मार्केटिंग, डिस्ट्रीब्यूशन व ब्रांडिंग करत असत. ह्या व्यवसायात फायदा होऊ लागल्यानंतर त्यांनी खनन आणि इंजिनियरिंग कंपन्या सुद्धा सुरू केल्या.
त्यानंतर त्यांनी लक्झरी गेम लाउंज, एक न्यूज चॅनेल व एका वर्तमानपत्रात भागीदारी सुरू केली.
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती जेकब जुमा ह्यांची पत्नी व मुलगा तसेच अनेक नातेवाईक गुप्ता ह्यांच्या कंपनीच्या मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. तसेच जुमा ह्यांच्या सरकारातील अनेक मंत्र्यांचे नातेवाईक सुद्धा ह्या कंपन्यांमध्ये आहेत.
त्यांच्यावर भ्रष्ट व्यवहार करण्याचे तसेच आपले वजन वापरून अनेक कंत्राटे आपल्या नावावर करून घेण्याचे आरोप सुद्धा आहेत.
मार्च महिन्यात अचानक परिस्थिती गुप्ता कुटुंबाच्या विरुद्ध झाली. चार वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या उप वित्त मंत्री असलेल्या मसोबीसी जोनास ह्यांनी दावा केला की गुप्तांनी त्यांना आधीच्या वित्त मंत्र्यांना पायउतार करून जोनास ह्यांना पदावर आणण्याचा शब्द दिला होता.
त्यासाठी भलीमोठी लाच देण्याची सुद्धा गुप्तांची तयारी होती. हे बाहेर आल्यानंतर जुमा सरकार संकटात सापडले.
देशात गुप्ता बंधूंना विरोध होऊ लागला. अजय गुप्तांवर ह्या आधी सुद्धा असे आरोप झालेले आहेत. त्यांनी २०१० साली सुद्धा एका आमदाराला मंत्री बनवण्याचा शब्द दिला होता.
व्यावसायिक हितासाठी आपल्याला हवी ती माणसे सत्तेवर आणण्याचा आरोप गुप्तांवर अनेकदा लागला आहे.
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती जुमा ह्यांच्याशी गुप्ता बंधूंचे घनिष्ठ संबंध आहेत असा त्यांच्यावर आरोप आहे. हे कुटुंब जुमा सरकारला आपल्या तालावर नाचवून हवा तो फायदा करवून घेते. आत्ता जो नवा वाद आहे तो एका डेयरी प्रोजेक्ट वरून उद्भवला आहे.
हा प्रोजेक्ट गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आला होता, पण गुप्ता कुटुंबाने त्यात भ्रष्टाचार करून मोठ्या प्रमाणावर पैसे लाटले आहेत.
गुप्ता कुटुंबाने दक्षिण आफ्रिकेत व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांचे जेकब जुमांशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले.
हे संबंध घनिष्ठ होते परंतु तेव्हा जुमा राष्ट्रपती झाले नव्हते. जुमा ह्यांची पत्नी बोगी नगमा गुप्तांच्या माइनिंग कंपनीत डायरेक्टर होती, मुलगा दुदुजेन गुप्तांच्या ओकबे इनवेस्टमेंट मध्ये डायरेक्टर होता व मुलगी दुदुजेल सहारा कंप्युटर्स मध्ये डायरेक्टर होती.
दुदुजेन जुमा गुप्तांच्या कंपनीत कामाला असल्याने गुप्ता व जुमा ह्यांची ओळख झाली.
गुप्ता ब्रदर्स बरोबर भ्रष्टाचार केल्याने तसेच इतर अनेक कारणांमुळे जुमा ह्यांच्यावर आधीही आरोप झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध आंदोलने सुरू आहेत. त्यांच्यावर आर्थिक भ्रष्ट्राचाराचे अनेक आरोप आहेत.
त्यातील मुख्य आरोप म्हणजे त्यांनी गुप्ता ब्रदर्सना अनैतिक मदत केली आहे, तसेच त्यांनी स्वतःचे आलिशान घर सरकारी खजिन्यात लाखो डॉलर्सचा भ्रष्टाचार करून बांधले आहे.
मागेच त्यांच्यावर संसदेत महाभियोग चालवला गेला होता, पण तेव्हा ते बचावले होते. परंतु आता मात्र त्यांना राजीनामा देऊन पायउतार व्हावे लागले आहे. गुप्तांशी संबंध जुमांना महागात पडले आहेत.
परंतु तिन्ही गुप्ता बंधूंनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत.
त्यानंतर जुमा ह्यांनी राजीनामा दिला. त्याआधी गुप्ता ब्रदर्सच्या कंपन्यांवर पोलीस व भ्रष्टाचार विरोधी एजन्सीने छापे घातले आहे. तसेच ह्याच भ्रष्टाचारामुळे त्यांचे अनेक बँक अकाउंट बंद करण्यात आले आहेत.
ह्यामुळे गुप्ता कुटुंब आपल्या ८००० कर्मचाऱ्यांना वेतन सुद्धा देऊ शकले नाहीत.
दक्षिण आफ्रिकेतील एबीएसए, एफ़एनबी, स्टॅंडर्ड व नेड बँकने मार्च २०१६ मधेच गुप्ता कुटुंबाला सांगितले होते की त्या आता गुप्तांच्या ओकबे व इतर सहाय्यक कंपन्यांना बँकिंग सुविधा देऊ शकत नाहीत.
गुप्ता कुटुंब हे अब्जाधीष आहे. २०१६ च्या जोहान्सबर्ग स्टॉक एक्सचेंजच्या आकड्यांनुसार अतुल गुप्ता दक्षिण आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सातव्या क्रमांकावर होते. त्यांची संपत्ती ७७० मिलियन डॉलर्स इतकी होती.
पण ह्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपानंतर ऑगस्टमध्ये ओकबे आणि दुसऱ्या कंपन्या विकायला काढल्या.
दोनच दिवसात गुप्ता कंपनीच्या दोन कंपन्या एएनएन न्यूज आणि वर्तमानपत्र द न्यू एज आधीच्या सरकारचे प्रवक्ते मजनवेले मान्यी ह्यांनी ३४ मिलियन डॉलर्सना विकत घेतल्या.
तसेच त्यांची मायनिंग कंपनी टीगीटा चार्ल्स किंग नावाच्या व्यापाऱ्याने २२८ मिलियन डॉलर्सना विकत घेतली.
मार्केटचे तज्ज्ञ पीट अटर्ड मोंटलतों म्हणतात की, आफ्रिकन नॅशनल काँग्रेस मधील जुमांचे समर्थक आता यापुढे गुप्तांची साथ देणार नाहीत.
जुमांचे समर्थक आणि गुप्ता कुटुंब ह्यांच्यात अंतर निर्माण झाले आहे, असे चित्र सध्यातरी दिसते आहे. परंतु पडद्याआड नेमके खरे काय आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. दक्षिण आफ्रिकेतील कॉर्पोरेट जगात गुप्ता कुटुंबामुळे गोंधळ माजला.
ज्यांचे ज्यांचे गुप्तांशी व्यावसायिक संबंध आहेत त्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.तसेच ज्या कंपन्यांमधील लोकांचे गुप्तांशी संबंध आहेत त्यांनी राजीनामे दिले आहेत किंवा त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
गुप्तांच्या भ्रष्टाचाराचा व जुमांच्या राजीनाम्याचा परिणाम युरोप पर्यंत जाणवतो आहे.
ब्रिटिश प्रशासनातील बेल पटेलिंगर, आंतरराष्ट्रीय लेखा फर्म केपीएमजी, वित्तीय सल्ला देणारी फर्म मॅकेंझी ह्या सर्वांवर दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीचा परिणाम झाला आहे. तसेच जर्मनीची सॉफ्टवेअर कंपनी एसएपीने दक्षिण आफ्रिकेतील आपल्या चार प्रबंधकांना निलंबित केले आहे.
खाजगी क्षेत्रात लोक ह्यावर लगेच कार्यवाही करत आहेत. परंतु दक्षिण आफ्रिकेतील लोकांच्या मनात मात्र आता ह्यापुढे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली. म्हणूनच संसदेत चार समित्या स्थापन करून त्यांना ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
गुप्ता कुटुंब आता दक्षिण आफ्रिकेतून बाहेर पडणार का ह्याचे उत्तर आता काळच देईल. त्यांची संपूर्ण संपत्ती विकली जाऊन तो पैसा देशाबाहेर नेण्यात त्यांना वेळ तर लागणारच आहे. गुप्तांच्या व्यापारामुळे दक्षिण आफ्रिका व इतर देशातील कंपन्या सुद्धा प्रभावित झाल्या आहेत.
संपूर्ण देश हलवून टाकणाऱ्या ह्या सर्व प्रकारात खरंच कोण दोषी आहे, हे समोर येण्यासाठी मात्र दक्षिण आफ्रिकेतील जनतेला बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.