“अयोध्येतील राम मंदिर पाडल्याबद्दल क्षमस्व”: बाबरच्या कथित वंशजाने मागितली माफी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
प्रिंस याकूब हबीबुद्दीन तुसी जे स्वतःला अखेरचा मुघल सम्राट बहादुरशाह जफर याचे वंशज मानतात त्यांनी आपली रामजन्मभूमी वादाबाबत भूमिका मांडली आहे. त्यात बाबरचा सेनापती मीर बांकी याने अयोध्येतील मंदिर पाडून त्याजागी मशीद बांधल्याच्या कृत्याचा निषेध करत पश्चताप व्यक्त केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमीचा खटला प्रलंबित असून याआधी प्रिंस याकूब हबीबुद्दीन तुसी याने स्वतःला याप्रकरणात पक्षकार करण्याची विनंती केली होती.
हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या येथील मंदिर पाडून त्याजागी बाबरचा सेनापती मीर बांकी याने इ.स. १५२८ मध्ये मशीद बांधली आणि त्याचे नामकरण बाबरी मशीद असे करण्यात आले.
त्यावेळेसच्या कागदपत्रात ‘मस्जिद ए जन्मस्थान’ असेही नाव आढळते. पुढे भारतावर मुघालांचेच राज्य असल्याने त्यांस हिंदूधर्मियांचा विरोध पुढे येऊ शकला नाही. मात्र मुघल सत्ता जसजशी अस्ताला जाऊ लागली तसा हा वाद पुन्हा उभा राहिला.
१८५० साली अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारलेल्या मशिदीवर हिंदूंनी हल्ला केला आणि हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले मंदिर पाडून ही मशीद उभी केल्याचा दावा केला. वेळोवेळी या वादाने उचल खाल्ली.
१९४९ मध्ये गोरक्षनाथ मठाच्या दिग्विजय नाथ यांच्या पुढाकाराने त्या बंद आलेल्या जागेत आत घुसून मूर्ती ठेवण्यात आल्या.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या मूर्ती तिथून काढण्याचा आदेश दिला मात्र स्थानिक अधिकारी के. के. के. नायर यांनी त्यास नकार देत यामुळे दंगल भडकू शकते हे कारण दिले.
पुढे हे अधिकारी बहराईच इथून भारतीय जनसंघाचे उमेदवार म्हणून लोकसभेत निवडून आले.
१९८६ नंतर हे आंदोलन पुन्हा एकदा जोर पकडू लागले. यावेळेस स्थानिक प्रशासनाने मूर्तीच्या पूजेसाठी आत जाण्यास परवानगी दिली. १९९० पासून लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेने आंदोलन वेग घेऊ लागले.
याची परिणीती पुढे ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात झाली. त्यानंतर भारतात अनेक ठिकाणी दंगली उसळल्या.
आजही हा वाद सर्वोच्च न्यायालयात चालू आहे. त्यानिमित्ताने अनेक बाजू समोर येत असतात. चर्चेच्या निमित्ताने अनेक पदर उलगडत असतात.
त्यातलाच हा एक पैलू म्हणजे प्रिंस याकूब हबीबुद्दीन तुसी या बाबरच्या वंशजाने मागितलेली माफी. या पत्रात काय म्हणणं मांडलं आहे ते पाहू.
अखिल भारतीय हिंदू महासभा आणि संत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांना १६ सप्टेंबर २०१८ रोजी लिहिलेल्या पत्रात प्रिंस याकूब हबीबुद्दीन तुसी म्हणतो…
===
विषय: “माझे पूर्वज बाबरच्या सेनापतीने १५२८ मध्ये अयोध्येत असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिर उध्वस्त केल्याबद्दल सर्व हिंदू आणि रामभक्तांची क्षमायाचनेसाठी पत्र.”
मी शाही मुघल कुटुंब बाबर आणि बहादुरशाह जफर यांच्या सहाव्या पिढीचा वंशज प्रिंस याकूब हबीबुद्दीन तुसी असून जो आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून माझे पूर्वज बाबर यांचे सेनापती मिरबांकी ने १५२८ मध्ये अयोध्येत बनलेल्या श्रीराम मंदिर उध्वस्त करण्याचे सैतानी, निंदनीय असे कुकृत्य केले त्यासाठी मी जगातील सर्व हिंदूंची मनापासून क्षमा मागतो.
श्रीराम जन्मभूमीच्या विवादात जे मुस्लिम पक्षकार आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडत आहेत त्यांनाही निवेदन करितो की, श्रीराम जन्मभूमीवर बाबरी मशिदीच्या नावाने राजकारण करणे बंद करा आणि आपले खोटे दावे परत घेऊन श्रीराम मंदिराच्या भव्य निर्माणासाठी मार्ग सुकर करा.
जेणेकरून हिंदु- मुस्लिम सदभावना कायम राहण्यास मदत होईल.
मी आपल्या सर्वांना माहिती करून देतो की, माझे पूर्वज बाबर यांनी आपल्या मृत्युपत्रात या घटनेला कलंक संबोधले होते.
असेही लिहिले की “हिंदुस्थानांतील सर्व संत महात्म्यांचे विचार जाणून घ्या, तसेच मंदिरांचे रक्षण करा व सर्वत्र एकसारखा न्याय करा.”
शेवटी पुन्हा एकदा बाबर आणि बहादुरशाह जफर यांचा वंशज असल्याच्या नात्याने पुन्हा एकदा सर्व हिंदूंची क्षमा मागतो त्यासोबत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी तन-मन-धनाणे मदत करण्याचे वचन देतो.
तसेच जेव्हा राम मंदिराचे भव्य निर्माण होईल त्यावेळी एक सोन्याची वीट माझ्याकडून देण्याचे वचन देतो जी पुढे हिंदू – मुस्लिम एकतेसाठी मैलाचा दगड ठरेल.
स्वाक्षरी
(प्रिंस याकूब हबीबुद्दीन तुसी)
===
वरील पत्रावरून बाबरचा सेनापती मिरबांकी याने केलेल्या कृत्याचा निषेध, हिंदूंची क्षमा, सर्वोच्च न्यायालयात लढणाऱ्या मुस्लिम पक्षकारांना दिलेला सल्ला आणि बाबरच्या मृत्युपत्राचा संदर्भ यांचा उल्लेख लक्षात येतो. शिवाय हिंदू – मुस्लिम एकतेसाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिसून येते.
परंतु प्रिंस याकूब हबीबुद्दीन तुसी यांना मुस्लिम जगतात किती मान्यता आहे हा एक प्रश्न आहे आणि सर्वोच्च न्यायालय या पत्राकडे किती लक्ष देईल याबाबत शंकाच आहे.
या प्रश्नचा तोडगा निघावा यासाठी त्यांनी याआधी हिंदू धार्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची देखील भेट घेतली होती.
–
- गो हत्या बंदी ते गाईच्या वासराचा निर्घृण खून – लोकशाहीची हरवलेली मूल्यं
- जेव्हा श्रीराम कोर्टात खटला दाखल करतात – मंदिरं, मूर्तींच्या संक्रमणाचा इतिहास
–
अंतिम निवाडा सर्वोच्च न्यायालयाचाच!
२०११ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर स्थागिती देत श्रीराम जन्मभूमीचा हा विवाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. आता त्यावर नियमित सुनावणी होऊन हा प्रलंबित खटला निकाली काढला जाण्याची शक्यता आहे.
या खटल्यात वरील पत्राचा काहीही परिणाम होणार नसून न्यायालयासमोर असणाऱ्या पुराव्यांच्या आधारावरच हा खटला निकाली निघेल.
फार फार तर; सुन्नी वक्फ बोर्डाच्या पक्षकारांना करण्यात आलेले आवाहन’ एवढेच या पत्राचे महत्व आहे.
या पत्रामागची प्रिंस याकूब हबीबुद्दीन तुसी यांची भावना चांगली असली तरी एकूण प्रकरण इतके सोपे नाही आणि चालू खटला व अंतिम निकाल यावर त्याचा कुठलाही परिणाम अपेक्षित नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अंतिम असेल आणि तो सर्वाना मान्य असेल इतकेच मात्र यानिमिताने अधोरेखित होते.
–
- ६ डिसेंबरचा धडा – महापरीनिर्वाण आणि बाबरी मस्जिदचा विध्वंस
- शिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग – १)
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.