वाघाचा जबडा हातांनी फाडणारा, शत्रूच्या छातीत ‘धडकी’ भरवणारा, प्रचंड साहसी योद्धा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
बलदंड शरीर यष्टी, करडी नजर, भारदस्त आवाज, शरीरातली चपळता, प्रचंड साहसी वृत्ती, जबरदस्त आत्मविश्वास, सळसळते रक्त, ही सगळी योद्धयाची लक्षणे……
योद्धा म्हटले की तो असाच असला पाहिजे, जो कोणत्याही शत्रूशी सहजपणे दोन हात करू शकतो ! ! !
युद्ध करण्यात पारंगत. कशाचीही तमा न बाळगता, समोर आलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असलेलाच उत्तम योद्धा म्हणून ओळखला जातो.
असे अनेक योद्धे या भारतमातेच्या उदरात जन्माला आले. लढाईत हार कधी त्यांना माहीतच नव्हती. युद्ध म्हटलं की त्यांना “चेव” चढतो आणि मग समोर कितीही बलाढ्य शत्रू असला तरी आगेकूच करून त्याला धूळ चारायची हेच त्यांचे ध्येय असतं.
भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली, काही राजे योद्धयांच्या कमतरतेमुळे कमजोर पडले. पण काही राजे ह्या महापराक्रमी योद्धयांमुळे सतत लढाया जिंकत राहिले.
बाजीराव पेशवा स्वतः लढाईत पुढे राहून सगळ्याच्या सगळ्या लढाया जिंकत गेले. हे आपल्याला माहितीच आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांकडे तर अशा महापराक्रमी योद्धयांची फौज होती. म्हणून तर अतिशय कमी सैन्य असतानाही महाराज बलाढ्य फौजांना सळो की पळो करु शकले. बाजी प्रभू पावनखिंडीत हजारोंच्या सैन्यासमोर भिंती सारखे आडवे आले.
हे ही वाचा –
- मुघलांच्या कचाट्यातून हे राज्य एकहाती वाचवणारा एक दुर्लक्षित योद्धा!
- नेपोलियन सारखा शूर योद्धा इतका हळवा, रोमँटिक असेल यावर विश्वास बसेल का?
संताजी – धनाजी ह्या जोडीने तर मोगलांना अनेक ठिकाणी अनेकवेळा पाणी पाजले. संताजी – धनाजी नाव ऐकताच अवाढव्य मोगल सैन्याचा थरकाप उडायचा. शत्रूला कापून काढायचं वेडंच होते की ते… दिसला शत्रू की काप!!
प्रत्त्येक राज्यात वेगवेगळ्या राजांच्या सत्ता होत्या आणि असे अनेक योद्धे ह्या भारतभूमीच्या रक्षणासाठी लढले. काहींना नावलौकिक मिळाला पण काही आपल्याला आजही ज्ञात नाहीत. कारण लांब कुठेतरी लढत होते; पण लढत होते भारत भूमीच्याच रक्षणासाठी.
त्यातलाच एक महान योद्धा, ज्याचं नाव फार प्रसिद्ध झालं नाही. पण अफाट ताकदीच्या जोरावर त्याने शत्रूची अनेकवेळा पळता भुई थोडी करून टाकली.
नावाचा दराराच एवढा की शत्रूला घाम फुटायचा. शत्रू महा बलाढ्य, पण ह्या योध्याशी लढायला त्यांच्या अंगातली ताकदच निघून जायची. कोण होता हा भारत मातेचा जिगरबाज सुपुत्र? माहिती आहे तुम्हाला? कसा होता त्याचा दरारा? जाणूनच घ्या.
“हरिसिंह नलवा” त्याचं नाव…… जे नाव ऐकताच हजारोंच्या संखेने चालून येणाऱ्या शत्रूला ‘धडकीच’ भरायची.
“हरीसिंह नलवा” ह्याचा जन्म पंजाब मधल्या गुजरावाला ह्या गावात झाला. १७९१ साली वडील सरदार गुरदियालसिंह उप्पल आणि माता धरम कौर ह्यांच्यापोटी हा वीर जन्माला आला.
एकुलता एक सुपुत्र, म्हणून सगळ्यांचेच प्रेम ह्या पुत्राला लाभले. सगळ्यांचेच भरभरून प्रेम लाभलेला हा सुपुत्र आपल्या जन्मानंतर सातच वर्षात वडिलांच्या प्रेमाला पारखा झाला. १७९८ मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.
माता धरम कौर हिने ह्या तेजस्वी पुत्राचा पुढे अतिशय उत्तम रीतीने सांभाळ केला. वयाच्या दहाव्या वर्षी त्याला अमृतपान करून सच्चा शीख बनवला.
ह्या तरुणाला अस्त्र-शस्त्र, घोडेस्वारीचे शिक्षण मातेने देऊ केले आणि त्यात पारंगत केले. त्यासाठी लागणारी शारीरिक क्षमताही हरी सिंगने स्वतः मिळवली.
१८०५ मध्ये वसंतोत्सव समारोहात महाराजा रणजितसिंह यांनी “प्रतिभा की खोज” ह्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या समारोहात योगायोगाने हरीसिंह आपल्या जमिनीच्या वादातल्या न्यायासाठी महाराजा रणजीत सिंह यांच्या दरबारात पोहोचला.
ही बोलणी चालू असतांना हरी सिंहाने आपले वडील आणि आपले आजोबा हे महाराजा रंणजितसिंहांच्या पूर्वजांच्या म्हणजेच महासिंह आणि चेतरसिंह यांच्याकडे चाकरी करत होते अशी माहिती समोर बसलेल्या दरबारातल्या प्रमुखाला दिली.
त्यामुळे हरिसिंहाला त्या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी मिळाली.
हरीसिंहाने त्या स्पर्धेत भालाफेक, तिरंदाजी, घोडेस्वारी,ह्यात आपल्या प्रतिभेचे सर्वोच्च प्रदर्शन केले, त्या स्पर्धेमुळे हरिसिंहाच्या प्रतिभेची सगळीकडून वाहवा झाली. इतक्या छोट्या वयात अशा सर्वोच्च प्रतिभेच्या प्रदर्शनामुळे महाराजा रणजितसिंह ही प्रभावित झाले.
त्यांनी हरिसिंहाला आपल्या पदरी खास सहाय्यक म्हणून नोकरी दिली.
ही नोकरी करत असताना महाराजा रणजित सिंह यांच्याशी सतत संपर्क होत राहिला. हरीसिंह महाराजांच्या मर्जीतील झाला.
महाराजा रणजितसिंहाना शिकार करण्याचा शौक होता. कधी कधी हरीसिंह सुद्धा महाराजांबरोबर जायचा. इतर अनेक सरदार सुद्धा बरोबर असायचे. एकदा असेच महाराज शिकारीला गेले होते. सगळा लवाजमाही सोबत होता. हरिसिंह सुद्धा बरोबर होताच.
जंगलामध्ये शिकार शोध चालू होती, आणि अचानक समोर एक मोठा वाघ सगळ्या लोकांवर चालून आला. तो अचानक उडी मारून समोर आला म्हणून सगळे घाबरून गेले.
काय करावे हे सुचण्याच्या आत वाघ अंगावर चालून आला. सगळ्यांचा थरकाप उडाला. आता वाघ आss वासून कोणाला तरी पंजात पकडणार एवढ्यात मोठ्या चपळाईने हरीसिंह पुढे झाला; आणि त्याने वाघाचा आsss वासलेला जबडा पकडूनच ठेवला.
वाघावर स्वार होऊन त्याचा जबडा प्रचंड ताकद लावून फाडून टाकला……
हे ही वाचा –
- स्वत:चे शीर हातात घेऊन, मातृभुमीसाठी अहोरात्र लढणारा महान शीख योद्धा!
- वयाच्या ८०व्या वर्षी इंग्रजांना धूळ चारणारा असाही अफाट योद्धा!
ScoopWhoop.com
म्हणूनच मोठे संकट टळले. अन्यथा एखादा तरी शिपाई वाघाने केलेल्या हल्ल्यात मारला गेला असता. स्वतः महाराजा रणजितसिहांनी हा प्रसंग डोळ्यांनी पाहिला. हरीसिंहाला शाबासकी मिळाली.
ह्या प्रसंगाचे वर्णन करताना महाराजांनी नल राजाच्या शिकारीची हरिसिंहाच्या त्या प्रसंगाशी तुलना केली.
‘नल राजासारखाच तू सुद्धा पराक्रमी आहेस’ असं म्हणून पाठ थोपटली. त्या प्रसंगापासून लोक हरिसिंहाला “बाघमार नलवा” असे संबोधू लागले. म्हणून तो हरीसिंह नलवा म्हणून ओळखला जाऊ लागला.
वर्षभर महाराजांच्या दरबारात राहून हरिसिंहाला आपले खरे कौशल्य दाखवता येत नव्हते. त्याने महाराजांना युद्धावर पाठवण्याची विनंती केली.
महाराजांनी त्याला ८०० सैनिकांच्या एका तुकडीचा प्रमुख बनवलं. त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. त्यावेळी त्यांचं वय होतं, अवघं १४ वर्ष! लहान वयातच एका मोठ्या तुकडीचा नायक बनला हरीसिंह….
अफाट ताकद, युद्धनीती पारंगत असलेल्या हरीसिंहाने ही जबाबदारी उचलली आणि त्यात सतत मोठे यश मिळवत गेला.
१८०७ मध्ये सियालकोट, १८१३मध्ये अटक, १८१८मध्ये मुलतान, १८१९मध्ये काश्मीर, १८२२मध्ये दुमतौर, १८३४मध्ये पेशावर, १८३६/३७ मध्ये जमरौद, आशा २० पेक्षा जास्त लढाया हरीसिंह लढला. सगळीकडे जोरदार विजय मिळवला आणि महाराजा रणजितसिंहांचे राज्य वाढवत गेला.
ह्या २० पेक्षा जास्त लढाया हरिसिंहाने केल्यामुळे त्याचा दरारा वाढतच गेला. ह्या लढाया परकीय आक्रमणातुन झाल्या. खैबर खिंडीतून शत्रू आपल्या देशात घुसायचे आणि तो भाग महाराजा रणजितसिंहांच्या ताब्यात होता.
म्हणून खैबर खिंड आणि खैबर पर्वत रंगामध्ये सतत जागरूक राहावे लागत होते.
म्हणून महाराजा रणजितसिंहांनी खैबर खिंडीजवळ एखादा किल्ला बांधावा असा आदेश हरीसिंहाला दिला. हरी सिंहाने तिथे अनेक किल्ले तयार केले आणि शत्रूवर आणखी जरब निर्माण केली.
हरीसिंह ८००च्या छोट्या तुकडीसह पेशावर आणि जमरोदवर लक्ष ठेऊन होता. त्याच्या नावाच्या दहशतीने अफगाण सैन्य पुढे यायला धजत नव्हते.
ब्रिटिश आपल्या फौजांना ताजे तवाने ठेवण्यासाठी हरींसिंहाच्या शौर्याच्या गोष्टी सांगून सतत मनोबल वाढवायचे.
इतकी त्याच्या नावाची ताकद होती. तो प्रत्यक्ष समोर लढायला येताना दिसला तर ह्या अफगाणांच्या छातीत धडकी भरायची. कारण आता आपले मरण आले असेच वाटायचे.
हरीसिंग दोन तलवारी हातात घेऊन लढायचा. बेभान झालेल्या हरीसिंहच्या तलवारीच्या एक फटकाऱ्यात अनेक शत्रू सैनिक गारद व्हायचे. पुढे यायच्या ऐवजी शत्रुसैन्य मागे जायचे. हरीसिंह सहज विजयी व्हायचा.
भारत भूमीचे आकर्षण सगळ्याच परकीय राजांना होते. त्यामुळे सतत त्या ओढीने शत्रू चाल करून यायचे. विशेष आकर्षण मोगलांना होते म्हणून ते सतत हल्ले करायचे.
१८३७मध्ये महाराजा रणजितसिंहांच्या मुलाचा विवाह होणार होता. सगळ्या सरदारांना हजार राहायचे होते .पण जमरोद आणि पेशावर हे जास्त संवेदनशील होते. त्यामुळे हरीसिंहाचे विवाह समारंभाला हजर राहणे अफगाण शत्रूला फायद्याचे होते.
म्हणून हरीसिंहाने त्या समारंभाला जाण्याचे रहित केले पण तो पेशवरला थांबला.
शत्रू सैन्याला वाटले हरीसिंह तिकडे गेला. ते जमरोदवर चालून आले. त्यांच्याकडे अफाट सैन्य होते ह्याची कल्पना हरिसिंहाला होती. म्हणून त्याने आणखी कुमक मागवली होती. पण ती यायला उशीर होणार होता. जमरोदच्या युद्धाला सुरुवात झाली.
हरिसिंहाच्या प्रकृतीत थोडा बिघाड झाला होता पण त्याची पर्वा न करता तो तातडीने जमरोदला पोचला.
हरीसिंह आल्याची वार्ता कळताच शत्रू धास्तावला. पण दबावाखाली शत्रू सैन्य पुढे सरकायला लागले. हरीसिंह ८००च्या तुकडीने शत्रूवर चालून आला.
घनघोर युद्धाला सुरुवात झाली हरिसिंहांच्या सैन्याने मुसंडी मारली आणि कापाकापिला सुरवात झाली. ह्या कापाकापित एका शत्रू सैन्यातल्या शिपायाच्या तलवारीचा फटका पाठीमागून हरिसिंहाच्या मानेवर बसला.
हरीसिंहाला जबर मार लागला पण ज्याने फटका मारला त्याला हरिसिंहाच्या सरदाराने ताबडतोब कापून काढला.
ह्या गर्दीत हरिसिंहाला बाजूला नेण्यात आले.
“पण मी घायाळ झालो आहे हे कोणालाही कळू देऊ नका.”
हरीसिंहाने साथीदारांना बजावून सांगितले. हरीसिंह जबर जखमी झाला होता. तेवढ्यात हरिसिंहाने मागावलेली सैनिकांची कुमक येऊन धडकली आणि हरिसिंहाने प्राण सोडले.
आलेली कुमक ताज्या दमाची होती त्यामुळे शत्रूचा टिकाव लागला नाही आणि हरिसिंहाच्या तुकडीने हरीसिंह धारातीर्थी पडल्यावरसुद्धा ते युद्ध त्याच ताकतीने जिंकले.अफगाण सैन्य नेस्तनाबूत झाले. वाट फुटेल तिकडे पळून गेले. आणि हरीसिंहाच्या सैन्याचा विजय झाला.
अशा ह्या भारत भूमीच्या महान योध्याला शतश: प्रणाम…!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.