भारतात “फक्त मुस्लिम राजांचाच द्वेष” होतो का? वाचा आपल्या डोळ्यादेखत घडलेला निष्पक्ष इतिहास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त, राणी लक्ष्मीबाई, अनेक राजपूत राजे होऊन गेले ज्यांची अजूनही पूजा केली जाते. तर औरंगजेब, टिपू सुलतान व इतर मुघल शासकांवर टीका केली जाते, कारण त्यांनी हिंदू प्रजेचा छळ केला. भारतात अनेक लोक कट्टर धर्मांध आहेत.
आपल्या धर्माची व्यक्ती कशीही वागू दे, कितीही वाईट कृत्ये करू दे, ते लोक अश्या वाईट लोकांना नावे ठेवत नाहीत कारण ती व्यक्ती आपल्या धर्माची आहे.
परंतु सुदैवाने बहुसंख्य भारतीय लोक आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून आहेत, म्हणूनच ते चांगल्याला चांगले व वाईटाला वाईट म्हणतात , मग ती व्यक्ती कुठल्याही धर्माची का असेना! असे असूनही काही लोकांना असे वाटते की भारतात हिंदू राजांचे कौतुक व मुस्लिम राजांचा फक्त द्वेष केला जातो.
अनेक लोक असे चित्र उभे करतात की, भारतातील लोक धर्माच्या आधारावर हिंदू राजे व मुस्लिम शासक ह्यांच्यात पक्षपात करतात. हिंदू राजांची पूजा व मुस्लिम शासक मग तो चांगला असला तरी त्याच्या वाट्याला फक्त द्वेषच येतो. पण हे खरे नाही.
भारतातील लोक निष्पक्षपणे जे चांगले आहे, त्याचे कौतुकच करतात मग ती व्यक्ती हिंदू असो की मुस्लिम!
उदाहरणार्थ ज्या काही हिंदू शासकांनी वाईट कृत्ये केली त्या सर्वांचा बहुसंख्य लोक द्वेषच करतात.
ह्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे रावण…
रावण :
रावण हा विद्वान दशग्रंथी ब्राह्मण होता असे म्हणतात. तो विद्वान होता, शूर होता, भगवान शंकराचा कट्टर भक्त होता तरीही बहुसंख्य हिंदू लोक त्याचा द्वेष करतात. दर वर्षी प्रत्येक दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते.
श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. हे कशासाठी?
कारण रावण कितीही विद्वान असला तरीही तो एक अहंकारी, क्रूर राजा होता. त्याने परस्त्रीची लालसा केली.
सीतेचे अपहरण केले आणि तिला जबरदस्तीने अशोक वनात डांबून ठेवले. त्याच्या सख्ख्या भावाने तसेच पत्नीने अनेकवेळा समजावून देखील त्याचे डोळे उघडले नाहीत व तो वाईट मार्गावर शेवटपर्यंत चालत राहिला. अखेर त्याचा युद्धात अंत झाला.
आपल्या देशात रामायण सर्वांनाच माहीत आहे. पण कोणी रावण विद्वान ब्राह्मण किंवा हिंदू म्हणून त्याची पूजा करत नाहीत, तर त्याचा द्वेषच करतात आणि दर वर्षी त्याच्या दसऱ्याला प्रतिमेचे दहन करतात.
हिरण्यकश्यपू :
हिरण्यकश्यपू हा एक असुर असला तरी हिंदू राजा होता. तो अत्यंत क्रूर होता. सत्ता डोक्यात गेलेला एक अहंकारी राजा होता. आपल्याशिवाय प्रजेने इतर कोणावरही श्रद्धा ठेवू नये ह्याची तो दक्षता घेत असे. कुणी जर त्याच्याशिवाय अन्य कुणाची भक्ती केली, दुसऱ्या कुणावर श्रद्धा ठेवली तर त्या व्यक्तीला तो अत्यंत भयंकर शिक्षा करत असे.
तो इतका अहंकारी होता की त्याने स्वतःच्या मुलाला म्हणजेच प्रल्हादाला देखील सोडले नाही. प्रल्हादाने विष्णूची भक्ती करू नये म्हणून त्याने अनेक उपाय केले. प्रल्हादाला अनेक भयंकर शिक्षा केल्या.
भागवत पुराणात आपण ही गोष्ट वाचलीच आहे किंवा होळी साजरी करण्यासंदर्भात आपण ही गोष्ट अनेक वेळा ऐकतो की, हिरण्यकश्यपूची बहीण म्हणजे होलिका सुद्धा आपल्या भावाइतकीच क्रूर होती. तिला अग्नीपासून भय नव्हते. म्हणूनच हिरण्यकश्यपूने तिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसायला सांगितले व त्यांच्या सभोवती आग लावून दिली.
ह्यात होलिका जळून खाक झाली व प्रल्हादचे त्याच्या निस्सीम भक्तीमुळे अग्नीपासून संरक्षण झाले. हिरण्यकश्यपूचा पराजय व होलिकेचे दहन आपण दर वर्षी होळी ह्या सणाद्वारे साजरे करतो.
हिरण्यकश्यपू हिंदू होता तरीही त्याचा वध केला त्या नरसिंह अवताराची अनेक हिंदू पूजा करतात, हिरण्यकश्यपूचे कौतुक किंवा त्याची पूजा कोणीही करत नाही.
-ही तर पुराणातील उदाहरणे आहेत. आता इतिहासातील काही उदाहरणे बघूया.
राजा शिलादित्य :
राजा शिलादित्य किंवा सिल्हादी हा एक राजपूत राजा होता. ह्या राजाने सोळाव्या शतकात ईशान्य माळवा प्रदेशावर राज्य केले. हा राजा तोमर वंशाचा मानला जातो. ह्या राजाला पुरबिया राजपूत असेही म्हटले जाते.
त्याने मेदिनी रायला हाताशी घेऊन सुलतान मोहम्मद खिलजी दुसरा ह्याच्या साम्राज्यात माळवा प्रांतावर राज्य केले. सुलतान मोहम्मद खिलजी दुसरा ह्याने १५१० ते १५३१ दरम्यान राज्य केले.
ह्या राजाने राजपूत राजांना साथ न देता खिलजीला साथ दिली व राजपूत राजांशी गद्दारी केली. ह्याने नंतर बहादूर शाहला सुद्धा माळवा प्रांत काबीज करण्यात मदत केली. त्याच्यामुळे अनेक हिंदू राजांचे राज्य मुघलांच्या ताब्यात गेले. त्याने खानवाच्या युद्धात मेवाडचे राजपूत राजे राणा सांगा ह्यांच्याशी गद्दारी केली.
खानवाचे युद्ध १५२७ साली राजस्थानच्या खानवा ह्या गावात राणा सांगा व बाबर ह्यांच्यात झाले. ह्यात राणा सांगा ह्यांचा शिलादित्यामुळे पराभव झाला व बरेच राजपूत साम्राज्य मुघलांच्या ताब्यात गेले. ह्याच कारणाने बहुसंख्य लोक ह्या राजा शिलादित्यावर अजूनही टीका करतात.
राजा जयचंद राठोड :
राजा जयचंद राठोडमुळेच महंमद घोरी पृथ्वीराज चौहानचा पराभव करू शकला. ह्या राजाला उत्तर भारतात सगळे गद्दार म्हणतात. जयचंद राठोडची मुलगी राजकन्या संयुक्ता व राजपूत राजा पृथ्वीराज चौहान ह्यांचे एकमेकांवर प्रेम होते.
परंतु हे राजा जयचंदला मान्य नव्हते. संयुक्ताच्या स्वयंवरातून पृथ्वीराज चौहान ह्यांनी संयुक्ताला पळवून नेले व दोघांचा विवाह झाला.
ह्यामुळे जयचंद व पृथ्वीराज चौहान ह्या दोघांत शत्रुत्व निर्माण झाले. पृथ्वीराज चौहान ह्यांचा पाडाव करण्याची जयचंदची इच्छा होती. महंमद घोरी ह्याने आधी १८ वेळा भारतात पराभवाचा सामना केला होता.
महंमद घोरीला जयचंदने पृथ्वीराज चौहान ह्यांच्या किल्ल्यापर्यंत जाण्याचा गुप्त रस्ता सांगितला ज्यामुळे पृथ्वीराजांचा पाडाव करणे महंमद घोरीला शक्य झाले. म्हणूनच तो इतिहासात एक गद्दार म्हणून प्रसिद्ध झाला.
राजा मानसिंग पहिला :
राजा मानसिंग हा अकबर बादशहाचा एकदम खास मर्जीतला सरदार होता. अकबराने तर त्याला नवरत्नांमध्ये स्थान दिले होते. तो राजस्थानच्या आमेरचा म्हणजेच आजच्या जयपूरचा राजा होता. अकबराच्या खास मर्जीतील असल्याने त्याला अकबराने महाराणा प्रताप ह्यांच्याशी बोलणी करायला पाठवले.
महाराणा प्रताप ह्यांनी अकबराशी तह करून मुघल साम्राज्यात यावे असा निरोप महाराणा प्रताप ह्यांना अकबराने मानसिंगाकरवी पाठवला होता.
परंतु महाराणा प्रताप ह्यांच्या अंगात राणा सांगा ह्यांचे रक्त असल्याने त्यांनी हा तह करण्यास नकार दिला. राणा सांगा हे महाराणा प्रताप ह्यांचे आजोबा होते.
महाराणा प्रताप ह्यांनी तह करण्यास नकार दिल्याने अकबराने त्यांच्या राज्यावर हल्ला केला व १५७६ साली हल्दीघाटीचे युद्ध झाले.
ह्या युद्धात मानसिंग स्वतः राजपूत असून देखील महाराणा प्रताप ह्यांच्याविरुद्ध अकबराच्या बाजूने लढला. मानसिंग व महाराणा प्रताप हे एकमेकांचे भाऊ असून देखील मानसिंगने राजपूत व महाराणा प्रताप ह्यांची साथ न देता मुघलांची सेवा करण्यास पसंती दिली.
म्हणूनच मानसिंग ह्यास फार कोणी मान देत नाही, उलट त्याच्यावर टीकाच केली जाते.
इत्तयापुरम पॉलिगार :
तामिळ मध्ये गद्दारला समानार्थी शब्द म्हणजे ‘इत्तपा’ किंवा ‘इत्तपन’ आहे. हा शब्द रूढ झाला तो इत्तयापुरम पॉलिगार वरून! तामिळनाडू मधील सर्व हिंदू लोक इत्तयापुरम पॉलिगारचा द्वेष करतात कारण त्याने वीरापंडिया कट्टबोमन ह्या स्वातंत्र्यसेनानीशी गद्दारी केली होती.
वीरापंडिया कट्टबोमन हे अठराव्या शतकातले पलायकरार होते तसेच तामिळनाडू मधील पंचलनकुरीची गावचे मुख्य होते.
त्यांनी ब्रिटिशांची सत्ता मान्य करण्यास नकार दिला व त्यांच्याविरुद्ध बंड पुकारले. ब्रिटिशांनी त्यांना पुदुकोट्टाईच्या राजाच्या म्हणजेच विजय रघुनाथ तोडइमनच्या व इत्तपनच्या मदतीने पकडले व १६ ऑक्टोबर १७९९ रोजी त्यांना फाशी दिली.
म्हणून तामिळनाडू मधील लोक गद्दार ह्या शब्दाला समानार्थी इत्तपन हा शब्द वापरतात.
फणींद्र नाथ घोष :
ही व्यक्ती आधुनिक भारतातील सर्वात मोठी गद्दार समजली जाते. ह्याने भगतसिंग ह्यांच्याविरुद्ध कोर्टात साक्ष दिली होती. संसदेत बॉम्ब फेकण्यावरून भगतसिंग व बटुकेश्वर दत्त ह्यांच्यावर कोर्टात केस सुरू होती व फणींद्र नाथ घोषने साक्ष दिल्याने भगतसिंग, राजगुरू व सुखदेव ह्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
त्यानंतर योगेंद्र शुक्ला ह्यांचा पुतण्या बैकुंठ शुक्ला ह्यांनी फणींद्र नाथ घोषची हत्या करून भगतसिंग, राजगुरू व सुखदेव ह्यांच्या मृत्यूचा बदला घेतला.
ह्या लिस्ट मध्ये अजूनही अनेक नावे आहेत.
सांगायचा मुद्दा हा की, आपण बहुसंख्य भारतीय जे चूक आहे त्याला चूक म्हणण्यास घाबरत नाही भलेही मग तो हिंदू राजा का असेना! पण काही कट्टर मुस्लिम लोक मात्र अत्याचारी मुस्लिम राजांना ते फक्त मुस्लिम आहेत म्हणून चूक न म्हणता त्यांना पाठिंबा देतात.
उदाहरणार्थ टिपू सुलतान, बादशहा अकबर, बादशहा औरंगजेब ह्यांना अनेक कट्टर मुस्लिम लोक महान समजतात. ह्या शासकांनी मुसलमान सोडल्यास हिंदू व इतर धर्मीय जनतेवर अन्याय व अत्याचार केले आहेत.
अकबर बादशहाने जेव्हा चित्तोड वर आक्रमण केले तेव्हा हजारो स्त्रियांनी जौहर केला. हजारो लोकांची कत्तल करण्यात आली. जे जिवंत होते त्या सर्वांची संपत्ती मुघलांनी हस्तगत केली व त्यांना तुरुंगात टाकले किंवा गुलाम बनवण्यात आले. तसेच नागरकोटच्या चढाईच्या वेळेला भूनच्या किल्ल्यामध्ये देवीचे एक देऊळ होते. ते मुस्लिमांच्या हाती जाऊ नये म्हणून हजारो राजपूत मरेपर्यंत लढले.
जे ब्राह्मण देवळात सेवेसाठी होते ते सुद्धा लढले व त्यांना सुद्धा मुस्लिम सैनिकांनी मारून टाकले. ह्या देवळात असलेल्या २०० गाईंना सुद्धा मुस्लिम लोकांनी सोडले नाही. त्यांची कत्तल करून त्यांच्या रक्त व मांसाने देवळाचे छप्पर व भिंती रंगवून टाकल्या. इतका अमानुष प्रकार त्यांनी केला.
–
- “भारत एक “राष्ट्र” नाही” असं म्हणणाऱ्यांनी एकदा विचार करून पहावा
- भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ १० योद्धे!
–
तसेच गावंच्या गावं उध्वस्त करून तेथील पुरुषांना मारून टाकणे व तेथील स्त्रिया व लहान मुलांना गुलाम बनवणे व नंतर विकून टाकणे हे तर मुघलांच्या राज्यात वारंवार घडत असे. अकबराचा एक सेनापती अब्दुल्ला खान उझबेग तर गर्वाने सांगत असे की, मी पाच लाख स्त्रीपुरुषांना गुलाम बनवले आहे.
आता कयामत पर्यंत ह्या पाच लाखांचे कोट्यवधी गुलाम तयार होतील. तर टिपू सुलतानने केरळमधील मंदिरे उध्वस्त करण्याचा आदेशच दिला होता.
टिपू सुलतानने कुरुलचा नवाब रनमस्त खान ह्याला कोडावा हिंदू म्हणजेच कुर्गी लोकांवर सरप्राईज अटॅक करण्याचे आदेश दिले होते. ह्या हल्ल्यात शेकडो लोक ठार झाले तर हजारो लोक गाव सोडून जंगलात आश्रयाला गेले. सेरिंगापट्टम मध्ये तरुण मुलांची जबरदस्तीने सुंता करून त्यांना अहमदी सेनेत भरती करण्यात आले.
हजारो कोडावा हिंदूंची कत्तल करण्यात आली व राजाला सेरिंगापट्टम येथे बंदी म्हणून ठेवण्यात आले. ह्या सर्वांवर इस्लाम स्वीकारण्याची जबरदस्ती करण्यात आली नाहीतर त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले.
तरीही ज्यांनी धर्मांतर करण्यास नकार दिला त्यांना ठार मारण्यात आले. ह्या सगळ्यात ऐंशी हजार पुरुष स्त्रिया व लहान मुले ठार झाली असे आकडे सांगतात.
१७८८ मध्ये टिपू सुलतानने कालीकतचा सरदार शेर खानला लोकांचे धर्मांतर करण्याचे आदेश दिले. ह्यात २०० ब्राह्मणांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले व त्यांना जबरदस्तीने बीफ खाऊ घालण्यात आले. टिपू सुलतानच्या काळात त्याने मंदिरे उध्वस्त करून तेथे मशिदी बांधल्या. ह्यात हरीहरचे हरिहरेश्वर मंदिर, श्रीरंगपट्टणमचे वराहस्वामी मंदिर सुद्धा उध्वस्त झाले व तिथे मशिद बांधण्यात आली.
सेरिंगापट्टम येथे एक शिलालेख सापडला त्यावर असे कोरले आहे की,
“हे सर्वशक्तिमान अल्लाह, ह्या काफिरांचे सर्व शरीर नष्ट कर. त्यांचा वंश नष्ट होऊ दे. त्यांच्या पायातील शक्ती जाऊ दे, त्यांची दृष्टी जाऊ दे, त्यांच्या सम्पूर्ण शरीरात आजार पसरू दे, त्यांना मृत्यू येऊ दे, त्यांचे आयुष्य कमी होऊ दे! ”
आता असे सगळे असूनही जर मुस्लिम राजांवर टीका करायची नाही तर मग मात्र तो हिंदूंवर अन्याय आहे.
–
- भारत-हिंदू-आर्यावर्त : जाणून घ्या भारताच्या प्राचीन नावांचा उगम आणि अर्थ
- भारताचा “लपलेला” परंतु अत्यंत महत्वपूर्ण इतिहास दर्शवणारी ७ उदाहरणं!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.