“ब्रिटिशांनी गांधीजींना बहिष्कृत करावं अशी विनंती शंकराचार्यांनी केली होती!”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
इतिहासकार रामचंद्र गुहा हे मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच बापूजींच्या जीवनावर गेली पंधरा वर्ष अभ्यास करीत आहेत. त्यांनी गांधीजींवर नुकतेच एक पुस्तक लिहून पूर्ण केले आहे. Gandhi : The years that changed the world (1914- 1948) असे ह्या पुस्तकाचे नाव आहे.
ह्या आधी त्यांनी महात्मा गांधी ह्यांच्या जीवनावर “इंडिया आफ्टर गांधी” व “गांधी बिफोर इंडिया” हि पुस्तके लिहिली आहेत. आता ह्याच मालिकेतले तिसरे पुस्तक त्यांनी लिहून पूर्ण केले आहे.
ह्या पुस्तकाच्या निमित्ताने सोपान जोशी ह्यांनी रामचंद्र गुहा ह्यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत इंडिया टुडे मध्ये प्रसिद्ध झाली आहे. ह्याच मुलाखतीचा हा संपादित अंश आहे.
मूळ मुलाखत वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या.
-The Shankaracharyas tell the British that Gandhi must be excommunicated, says Ramachandra Guha
प्रश्न – गांधीजींच्या कार्याचा भारताबाहेरच्या जगावर काय परिणाम झाला होता, त्याविषयी आपण माहिती देऊ शकता का?
उत्तर :
गांधीजी व त्यांचे कार्य भारताबाहेर सुद्धा प्रसिद्ध झाले होते. आपल्याला कल्पना करता येणार नाही अश्या जागी सुद्धा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झालेले लोक आहेत.
मी ह्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे मी एकदा न्यूयॉर्क येथील एका हॉटेलमध्ये होतो. माझ्याकडे माझ्याच आधी लिहिलेल्या “गांधी बिफोर इंडिया” ह्या पुस्तकाची एक प्रत होती. त्या पुस्तकावर गांधीजींचा एक वेगळाच फोटो आहे. साधारणपणे गांधीजींचे फोटो हे पंचा नेसलेले किंवा चरखा चालवताना किंवा भाषण देताना असे असतात.
परंतु ह्या पुस्तकावर गांधीजींचा वकिलाच्या वेषातला म्हणजेच सूटमधला फोटो आहे. एका वेटरने हा फोटो बघितला आणि मला विचारले की,
“हे तरुणपणीचे मिस्टर गांधी तर नव्हेत?” मी त्याला “होय!” असे उत्तर दिले.
त्या वेटरने मला सांगितले कि त्यांच्या देशातले लोक गांधीजींचे चाहते आहेत. मी त्याला त्याच्या देशाचे नाव विचारले तेव्हा त्याने “डॉमिनिकन रिपब्लिक” असे उत्तर दिले. गांधीजी खरंच संपूर्ण जगात प्रसिद्ध होते.
माझ्या एका मित्राने मला नुकताच ब्राझीलमधील रियो ह्या शहरात असणारा गांधीजींच्या पुतळ्याचा एक फोटो पाठवला होता.
पाश्चात्य देशांत तसेच लॅटिन अमेरिकन देशांतील लोकांना गांधीजींविषयी फार काही सखोल माहिती नाही. परंतु ते गांधीजींना “कूल” समजतात.
प्रश्न – भारतातील लोक गांधीजींकडे कसे बघतात?
उत्तर –
इकडे, आपल्या देशात मात्र ह्यावर वाद, मतमतांतरे अगदी तिटकारा सुद्धा दिसून येतो. आपल्या देशात गांधीजींचा द्वेष करणारे अनेक लोक आहेत. त्यांच्यावर अगदी उघडपणे टीका केली जाते.
मार्क्सिस्ट त्यांचा द्वेष करतात, हिंदुत्ववादी लोक त्यांच्या विचारांचा विरोध करतात, आंबेडकरवादी त्यांना विरोध करतात, स्त्रीवादी लोक त्यांच्यावर टीका करतात. पाश्चिमात्य लोकांचा मात्र त्यांच्याबद्दलचा दृष्टीकोन अगदी गोडगुलाबी आहे.
प्रश्न – प्यारेलाल पेपर्समध्ये काय दिले आहे?
उत्तर –
त्यात सर्व प्रकारची माहिती आहे. उदाहरणार्थ यात डायट्रिच बोनहोफर नामक एक मनोरंजक व्यक्तिमत्व आहे. हा जर्मनीमधील एक विद्रोही ख्रिश्चन प्रीस्ट होता. हा अडोल्फ हिटलरला विरोध करत असे.
ही व्यक्ती जर्मनीमध्ये प्रसिद्ध आहे कारण, त्याने १९४० च्या सुमारास हिटलरच्या वधाचा जो प्रयत्न झाला त्यात सहभाग घेतला होता. त्याला तुरुंगात टाकण्यात आले. त्याने तुरुंगातून काही पत्रे लिहिली आणि ती पत्रे सगळीकडे प्रसिद्ध झाली.
प्यारेलाल पेपर्समध्ये मला असे आढळले की, १९३०च्या सुमारास या व्यक्तीचा गांधीजींशी संपर्क होता. त्याला भारतात येऊन गांधीजींकडून सत्याग्रह कसा करतात हे शिकून घ्यायची इच्छा होती. त्याने भारतात येण्याचा प्रयत्न केला पण तो येऊ शकला नाही.
जर तो भारतात आला असता व त्याने गांधीजींकडून सत्याग्रह शिकून घेतला असता तर त्याने हिटलरविरुद्ध नाझी साम्राज्य तयार होण्याआधीच सत्याग्रह केला असता.
प्रश्न – प्यारेलाल पेपर्समध्ये भारतातील ऐतिहासिक व्यक्तिमत्वांविषयी काही दिले आहे का?
उत्तर –
माझ्या पुस्तकांचा एक उद्देश हा आहे की, गांधीजींच्या जीवनात तसेच स्वातंत्र्यलढ्यात महादेव देसाईंचे जे महत्वाचे योगदान आहे त्याबद्दल सर्वांना माहिती होणे!
महादेव देसाई ह्यांचे महात्मा गांधींच्या जीवनात जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल ह्यांच्यापेक्षाही जास्त महत्वाचे स्थान होते. महादेव देसाई गांधीजींबरोबर चर्चा करायचे, ते त्यांचे सल्लागार होते.
ते गांधीजींना बाहेरील जगाविषयी महत्वपूर्ण माहिती द्यायचे कारण त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण व राजकीय तत्त्वज्ञानाचे ज्ञान होते. ते नेहरूंप्रमाणे नव्हते. ते गांधीजींबरोबर गुजरातीत संभाषण करायचे. ते पटेलांसारखेही नव्हते. त्यांचा कॉस्मोपॉलिटन दृष्टीकोन व्यापक होता.
–
- गांधी हत्येत सावरकरांचा सहभाग : हे पहा कोर्ट काय म्हणतंय
- …तर काँग्रेसने गांधींना तुरुंगात टाकलं असतं…अन गोडसे “गांधीवादी” झाले असते!
–
प्रश्न – गांधीजी त्यांच्या आधुनिक टीकाकारांसाठी व रूढीवादी विरोधकांना हाताळण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरायचे का?
उत्तर – गांधीजींनी आंबेडकरांसारख्या लोकांबरोबर काम करणे पसंत केले. त्यांनी हिंदू रूढीवादी लोकांशी जास्त संपर्क न ठेवणे पसंत केले. कारण त्यांना हे लोक कट्टर, धर्मांध व अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असलेले वाटत असत.
आताच्या म्हणजेच २०१८च्या दृष्टीकोनातून बघितल्यास आंबेडकरांचे चाहते तुम्हाला सांगतील की, गांधीजी भारतातून जातीयवाद हद्दपार करण्यासाठी फार हळू हळू प्रयत्न करीत होते.
१९२८ च्या काळातल्या दृष्टीकोनातून बघितल्यास असे दिसते की, गांधीजींना उजव्या कट्टर हिंदू लोकांचा विरोध होता. या लोकांच्या मते गांधीजी फार घाई करत होते. त्याच्या मते अस्पृश्यता त्यांच्या परंपरेचा एक भाग होती व एक “बनिया” ज्याला संस्कृतचे ज्ञान नाही, तो आमच्या श्रध्देवर कसा काय घाला घालू शकतो?
तुम्हाला गांधीजींची द्विधा मनस्थिती तेव्हाच कळू शकेल जेव्हा तुम्ही त्यांच्या जागी येऊन विचार कराल. त्यांच्या एका बाजूला आंबेडकरांसारखे आधुनिक विचारांचे लोक होते तर दुसऱ्या बाजूला शंकराचार्यांसारखे लोक होते.
हिंदू रूढीवादी कट्टर लोकांचा गांधीजींना तीव्र विरोध होता. शंकराचार्यांनी ब्रिटिशांना गांधींवर बहिष्कार टाकण्याची विनंती केली होती. गांधीजी जेव्हा जेव्हा अस्पृश्यतेच्या विरोधासाठी जात तेव्हा तेव्हा हिंदू महासभेचे लोक त्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करीत असत.
त्यांना ह्या लोकांशी अत्यंत हुशारीने संवाद साधून आपला मार्ग मोकळा करावा लागत असे. आपल्याच धर्माच्या लोकांचा विरोध होईल असे काम करण्यासाठी माणसात जिगर असावी लागते. जशी जशी त्यांची हिंदू समाजाच्या मनावरची पकड मजबूत होत गेली, तशी तशी त्यांनी हिंदू धर्मात असलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर टीका केली व त्याचा विरोध केला.
म्हणूनच गांधीजींना त्यांचा जातीयवादाविरुद्ध असलेला लढा फार हळू होता असे म्हणणे चुकीचे आहे. कारण त्यांना जातीयवादाला विरोध करण्यासाठी हिंदू रूढी व परंपरा ह्यांच्या विरोधात जावे लागले.
आंबेडकरांनी प्रेरणा दिल्यानंतर त्यांनी जातीयवादाला कट्टर विरोध केला.
गांधीजींनी स्वतःच स्वतःचा मार्ग तयार केला. त्यांचा हा मार्ग पुरोगामी व प्रतिक्रियावादी ह्या दोन्ही प्रकारच्या लोकांना पटत नाही.
प्रश्न – गांधीजींवर अभ्यास करण्याचा थकवा किंवा कंटाळा येतो का?
उत्तर – अजिबात नाही. ते व त्यांचे विचार दोन्हीही चित्तवेधक आहेत. त्यांनी भारतीय जीवनाच्या सर्व बाबींचा अभ्यास केला आहे. ते जात, लिंग, तंत्रज्ञान, राज्य, राजकारण, संस्कृती, आंतरिक सुधारणा ह्या सर्व बाबींवर चर्चा करायचे.
ते सेक्सबद्दल सुद्धा बोलायचे. त्यांनी आयुष्यभर सतत प्रवास केला. त्यांचा मित्रांशी व विरोधकांशी सतत संपर्क असायचा. म्हणूनच मला त्यांच्याविषयी अभ्यास करायचा कधीच कंटाळा येऊ शकत नाही.
मी त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील वर्षांवर पुस्तक लिहिले आहे. तसेच ते भारतात आले त्यानंतरच्या त्यांच्या जीवनावर सुद्धा हे पुस्तक लिहिले आहे. सध्या मात्र मी गांधीजीवर कुठलेही पुस्तक लिहित नाहीये.
परंतु येणाऱ्या काळात, कदाचित येत्या पाच वर्षांत त्यांच्या जीवनावर एक छोटे वाद्विवादात्मक पुस्तक लिहिण्याची माझी इच्छा आहे. आधुनिक भारतातल्या इतिहासकारांसाठी अभ्यासायला गांधीजींइतके दुसरे आकर्षक व्यक्तिमत्व नाही.
–
- गांधी प्रेम ते गांधी द्वेष – ते – गांधी प्रेम : दुटप्पी प्रचारकांचं पाप!
- नोटेवर गांधीजींचाच फोटो का बरं? – अनेकांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाचं परखड उत्तर
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.