Site icon InMarathi

हिंदू राजांनी गझनीच्या सैन्याची धूळधाण उडवली मात्र तरिही हे हिंदू शौर्य का लपवलं जातं?

ghaznavi 4 InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

महमूद गझनीचा क्रूर इतिहास सर्वाना ज्ञात आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याने १७ वेळेस सोमनाथ मंदिरावर आक्रमण करून लूट करून नेली, मंदिर उध्वस्त केले. हे सर्व करण्यात त्याच्या सेनापतींपैकी एक म्हणजे सैय्यद सालार मसूद हा अग्रणी होता.

कमालीचा धर्मांध असलेला हा सेनापती आपण इस्लामचे प्रसारक असल्याचे मानत होता. एका हिंदू राजाने त्याचा शिरच्छेद करून पराक्रम गाजवला. ही शौर्यकथा आपण विसरलो आहोत?

सैय्यद सालार मसूद हा महमूद गझनीचा भाचा आणि सेनापतींपैकी एक होता. भारतात येऊन इथल्या संपन्न मंदिरांचा नाश करणे आणि शहरांची लूट करणे हाच त्याचा उद्देश होता.

ते भारतात राज्य करीत नसत तर लूट घेऊन परतत आणि या संपत्तीच्या जोरावर मध्य आशियायी प्रदेशात आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करीत.

 

 

ते स्वतःला मूर्तिभंजक मानत. त्यामुळे या लुटीत त्यांना धर्मासाठी उभारलेल्या सैन्याची साथ मिळे. गाझी सैनिक म्हणून ते ओळखले जात. या सैन्याला वेतन नाही तर लुटीतला हिस्सा मिळत असे.

१०३० मध्ये महमूद गझनीचा अंत झाला. पुढे त्याचे वारस तख्तावर बसले. १०३१ मध्ये सैय्यद सालार मसूद या सेनापतीने पुन्हा एकदा भारताकडे आपल्या एक लाख सैन्यासह कूच केली.

परंतु यावेळी त्याचा उद्देश लूट करण्याचा नव्हता तर भारतात येऊन राज्य करण्याचा होता.

 

 

सुरुवातीलाच हिंदू राजा आनंदपाल याने त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला पण यश काही मिळालं नाही. पुढे मसूद आपले विजयी अभियान चालू ठेवत माळवा, गुजरात   येथे आला. दुर्दैवाने तिथेही स्थानिक राजे जिंकू शकले नाही. आता त्याने उत्तर भारताकडे प्रयाण केले.

सुरुवातीला त्याला फार असा प्रतिकार झाला नाही आणि मग एक एक मजल गाठत त्याचा डेरा बहराईच इथे पडला.

गेली दोन वर्षे सतत युद्ध आणि त्यामुळे होणारी होरपळ सुरु होती. ती आता थांबेल याची चिन्हे काही दिसत नव्हती. इथे त्याची गाठ राजा सुहलदेव यांच्याशी पडली आणि इथेच झाली ती बहराईचची लढाई!

प्राचीन भारतीय इतिहासात अनेक छोटी छोटी राज्य होती. त्यापैकीच एक राज्य म्हणजे श्रावस्ती आणि त्या राज्याचा राजा सुहलदेव! त्यापूर्वीचा इतिहास जाणून घेतला तर गौतम बुद्धांच्या काळात जी सहा मोठी शहरं होती त्यापैकी एक म्हणजे श्रावस्ती!

 

travelladda.com

इथे गौतम बुद्धांनी मोठा काळ व्यतीत केला आहे. आज भारत-नेपाळ सीमेवरचा उत्तरप्रदेशमधील बहराईच जिल्हा आणि श्रावस्ती जिल्हा हा परिसर म्हणजे श्रावस्ती राज्य होय.

शरयू नदीच्या काठी वसलेल्या या राज्यावर तसेच आजूबाजूच्या राज्यांवर आक्रमणाचं संकट निर्माण झालं होतं. आता युद्ध होणार हे निश्चित.

तेव्हा सैय्यद सालार मसूद याने शरयू नदीच्या काठी असलेल्या सूर्यमंदिरावर मशीद बांधण्याचा आपला मनसुबा जाहीर केला. जो त्याने अनेक ठिकाणी याआधी तडीस नेला होता. बघता बघता युद्धास सुरुवात झाली.

आजूबाजूची राज्ये युद्धात ओढली गेली. त्यावेळेस तेथील राजपूत राजांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.आता २१ राजांच्या संयुक्त सेनेशी हे युद्ध लढले जाणार होते. सुरुवातीला सैय्यद सालार मसूद याचे वडील सैय्यद सालार साहू यांच्याकडे या युद्धाचे नेतृत्व होते.

 

 

त्यांनी विरोधी सैन्याला नामोहरम केले पण युद्ध थांबत मात्र नव्हते. हिंदू राजांचे सैन्य विरोधी सैन्याला झुंजवत होते. अशावेळी खुद्द सैय्यद सालार मसूद याने युद्धाचे नेतृत्व करण्याचे ठरविले आणि युद्धात उडी घेतली.

या बाजूला २१ राजे संयुक्तपणे लढा देण्यास तयार पुन्हा एकदा तयार झाले होते. यावेळी सैन्याचे नेतृत्व राजा सुहलदेव करत होता. सेनापती  सैय्यद सालार मसूदयाचे सैन्य बलाढ्य होते. इसवी सन १०३४ जूनच्या महिन्यात दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

हिंदू युद्धशास्त्राच्या नियमानुसार शत्रूला ही जमीन सोडून जाण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांस मसूदने नकार दिला आणि युद्धाला तोंड फुटले. २१ राजांचे संयुक्त सैन्य असल्याने ते निश्चितच एक बलशाली सैन्य होते.

 

 

या युद्धात सेनापती सैय्यद सालार मसूद यांच्या सैन्याची पुरती दानादान उडाली. त्याचे सैन्य मोठ्या प्रमाणात मारले गेले. अखेर खुद्द सेनापती या युद्धात मारला गेला. एका विषारी बाणाने त्याच्या कंठाचा वेध घेतला आणि तो जागीच गतप्राण झाला.

काय झाला या युद्धाचा परिणाम?

पुढे १५० वर्षे म्हणजे ११९२ मध्ये मुहंमद घोरीने पृथ्वीराज चौहान यांना तराईच्या लढाईत पराभूत केले. तोपर्यंत हे अफगाण सैन्य भारतीय भूमीपासून दूर होते. याचे कारण मध्य आशियातील अस्थिरता सांगितले जाते. परंतु तेवढे एकमेव कारण सांगून हिंदू राजा सुहलदेव आणि त्यांच्या सैन्याने गाजवलेल्या शौर्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

 

india.com

आज शरयू नदीच्या काठी  सैय्यद सालार मसूदच्या नावाने दर्गा आहे. आता तो गाझी म्हणजे धर्मयुद्धात हौतात्म्य पत्करलेला योद्धा म्हणून ओळखला जातो. तिथे श्रद्धाळू प्रार्थना करण्यासाठी जात असतात.

त्याचे वडील यांचीही कबर ‘बुढे बाबा कि मजार’ म्हणून ओळखली जाते. तिथे पाच दिवसांचा उरूस साजरा केला जातो. राजा सुहलदेव हे सध्या कोणत्या जातीचे आहेत त्याविषयी वाद आहेत परंतु ते पासी या त्या प्रदेशातील जातीचे असल्याचे सांगितले जाते. ही जात दलित म्हणून ओळखली जाते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०१७ मध्ये झालेल्या हिंदू विजय उत्सवात सूर्य मंदिर पुन्हा उभारण्याचे आणि राजा सुहलदेव यांचे स्मारक बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

याशिवाय प्रसिद्ध कादंबरीकार अमिश त्रिपाठी यांची कादंबरी राजा सुहलदेव यांच्या जीवनावर आधारलेली आहे. ही कादंबरी १८ जून रोजी प्रकाशित होणार होती परंतु काही अज्ञात कारणाने तिचे प्रकाशन पुढे ढकलण्यात आले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version