Site icon InMarathi

एक बाप जेव्हा जनावरावर “मालकी” गाजवणाऱ्या कसायासारखा वागतो

pranay-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

अमृता (२१) आणि प्रणय कुमार (२३) शाळेत असल्यापासुन मित्र होते. कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी आयुष्यभरासाठी एकमेकांना साथ देण्याचे ठरवले. त्यांनी घरी लग्नाचा प्रस्ताव मांडला.

अमृताच्या वडिलांना हा निर्णय मुळीच पसंत नव्हता. कारण एकच की दोघांची जात वेगवेगळी होती. पण अमृताने या विरोधाला जुमानले नाही. प्रेमापुढे जात गौण मानत तिने प्रणयकुमार सोबत लग्न केलेच.

 

greatandhra.com

याचवर्षी ३० जानेवारीला त्यांचा विवाह झाला. दोघेही आनंदात होते आणि त्यात भर म्हणुन त्यांना एक गोड बातमी कळली. ती म्हणजे त्यांच्या कुटुंबात नवीन पाहुणा  येणार असल्याची. अमृता गरोदर होती.

या महिन्यात तिला गरोदर राहून पाच महिने झाले. बाळ सुखरूप आहे ना हे तपायला ते दोघे आणि प्रणयची आई दवाखान्यात गेले. तपासणी झाली, सगळे व्यवस्थित आहे हे कळल्याने सगळे अत्यंत समाधानाने घरी परतत होते.

ते तिघे गाडीत बसणार तेवढ्यात एका अनोळखी व्यक्तीने मागुन येऊन प्रणयकुमारचा गळा चिरला आणि ती व्यक्ती नाहीशी झाली. अमृता आणि तिच्या सासुने तात्काळ दवाखान्यात मदतीसाठी धाव घेतली. उपचार सुरु करण्यापूर्वीच प्रणयचा मृत्यु झाला. काही सेकंदातच सर्व होत्याचे नव्हते झाले.

 

teluguwishesh.com

आपले प्रेम असणाऱ्या व्यक्तीसोबत धाडसाने विवाह केलेली अमृता क्षणात विधवा झाली. का? तर तिने निवडलेला मुलगा तिच्यापेक्षा खालच्या जातीतला होता म्हणुन.

मुलीचे सुख, तिचे भविष्य, तिचे प्रेम, तिचा संसार हे सर्व गौण ठरत जातीभेद वरचढ ठरला. दलिताशी विवाह केल्याने समाजातील प्रतिष्ठा कमी झाली आणि ती पुन्हा मिळवण्याच्या अट्टहासापायी सरळ-सरळ जावयाचा खून घडवून आणला गेला.

हो. आपल्या एकुलत्या एक मुलीच्या नवऱ्याची हत्या तिच्या वडिलांनीच मारेकऱ्याकडून घडवून आणली. किती प्रतिष्ठा मिळाली असेल बरं या हत्येने? पैसे देऊन मुलीला विधवा करताना असे कोणते समाधान मिळाले असेल?

 

deccanherald.com

आपल्या समाजाने जाती धर्माचा एवढा बाऊ करून ठेवलाय की माणसे स्वतःची कुटुंबे उध्वस्त करायला मागे पुढे बघेनात. आणि देशात रोजच्याच झालेल्या खून मारामाऱ्यांचा परिणाम काय? तर प्रत्येक घटनेनंतर अधिकच तीव्रतेने पेटणारे धार्मिक आणि जातीय दंगे.

वरील घटनेत तरी वडिलांनाच जातीबाहेर लग्न मान्य नव्हते. काही दिवसांपूर्वी ऐकलेली घटना अशी की, वडिल जाती धर्मापेक्षा मुलीच्या प्रेमाला अधिक महत्त्वाचे मानत होते. वडील व एकंदर कुटुंब अतिशय प्रतिष्ठित. पण इतर नातेवाईक याच्या अगदीच विरोधात होते. लग्न वगैरेची तर अजिबातच तयारी नव्हती.

वडिलांना मुलगी तर प्रिय होतीच पण इतर जवळची नातीही तोडायची नव्हती. अशा द्विधा मनस्थितीत काय करणार? वडिलांनी मुलीला सर्व मदत देत त्या मुलाबरोबर गुपचूप विवाह करण्याचे सुचवले. आणि मुलगी लग्न करून आल्यानंतर काहीच माहिती नसल्याचा आव आणला.

म्हणजे या समाजात प्रेमात पडणे वगैरेच अनैसर्गिक असल्यासारखे निषिद्ध समजले जाते. त्यात ते एकाच जाती-धर्मातील असेल तर ठीक. नाहीतर जे प्रेमात पडलेत त्यांनाच आधी आपण वेगळ्या जातीचे आहोत याचे दुःख असते.

बरीच जोडपी पुढे काही संकट नको, आई वडिलांची प्रतिष्ठा, मुलांचे भविष्य वगैरेचा विचार करत प्रेमाचा त्याग करतात. याला भित्रेपणा समजा, एकमेकांची काळजी समजा वा कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठीचा त्याग समजा. पण जे काही आहे ते जात धर्म अडसर ठरल्याने मनाविरुद्धच केलेले आहे.

या पलीकडे जाऊन इकडून तिकडून खूप धाडस करून ही बाब कुणी कुटुंबासमोर मांडलीच तरी परिणाम काय होतील याची शाश्वती नसते.

“आपल्या जातीतले सगळे मेले होते का?” म्हणत आधी नकार, मग समजूत, नंतर मारहाण, तरीही ऐकले नाहीच तर तुम्ही “आमच्यासाठी मेलात असे समजू” आणि कधीकधी प्रत्यक्षात हत्या.

अगदी क्वचित कुठेतरी सहजा सहजी मान्यता मिळते. काहींना बऱ्याच विनवण्या करून मिळते. पण त्यापुढचा प्रश्न असतो आता समाजाला काय सांगायचे? कुणी सांगायचे? कसे सांगायचे? मग बरेचदा यातुन पळवाटा काढल्या जातात तर काही लोक धाडसाने समाजाचा विचार न करता काय करायचे ते करून मोकळे होतात.

पण एवढ्या गोष्टींतून तावून सुलाखून बाहेर पडत सोबत जरी राहता आले तरी ते सुसह्य असेलच याची शाश्वती नाही. कुणाच्यातरी अस्मितेचा, प्रतिष्ठेचा बळी घ्यायला ही आयती शिकार असते. जर असे झाले नाही तर पुढे त्यांच्या अपत्यांना अजून कशा कशाचा सामना करावा लागेल याची कल्पना नसते.

 

rediff.com

थोडक्यात या समाजात तुम्हाला कसे आणि कुणासोबत जगायचेय हे तुम्ही स्वतः ठरवणे गुन्हा आहे. आणि समाजाच्या चौकटीत मन मारून, मुटकून, प्रसंगी विचारहीन होऊन तुम्ही या चौकटीत बसण्यात यशस्वी झालात तर तुम्ही सज्जन, आदर्श, समजूतदार समजले जाता.

आरक्षणाचा विषय निघाल्यावर “कशाला हवे आरक्षण? आपल्यातली दरी  नष्ट झालीये” असे म्हणत दाखवलेले उच्च विचार आंतरजातीय/धर्मीय विवाहांच्या वेळी धपकन खाली पडतात.

महासत्ता बनण्याची स्वप्ने बघणाऱ्या, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या, आमचा विकास, आमची प्रगती, आमच्या सुधारणा, आमचा हा नेता, आमचा तो महाराज, आमचा इतिहास, आमची क्रांती म्हणत ओरडा करणाऱ्या समाजाच्या तोंडाला काळे फासणारी ही घटना आहे.

जातीयते सारख्या बेसिक गोष्टींकडे दुर्लक्ष करत, त्या नष्ट करण्याच्या दिशेने पाऊले न उचलता आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याचा विचार करतोय. पण हा धोंडा पायाला तसाच बांधलेला ठेवून, ओढत अपेक्षित दिशेने, अपेक्षित कालावधीत पोहचणे केवळ अशक्य आहे.

“व्यक्तीस्वातंत्र्य” हे मुलभूत मूल्य केवळ मान्य नव्हे तर समाजात अवलंबिले जात नाही तोवर सगळ्या मानवी प्रगतीच्या गप्पा म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे. व्यक्ती स्वायत्त असून तिच्यावर कुणाची मालकी नसते हा या मूल्याचा गाभा आहे. मग तिने काय करावं, काय करू नये. लग्न कुणाशी करावं वगैरे गोष्टी ठरवण्याचा हक्क फक्त त्या व्यक्तीलाच असतो.

पण जातीबाहेरच्या मुलाशी स्वेच्छेने लग्न केलं म्हणून जावयाचा खून करण्याचा रानटीपणा अजून शिल्लक आहे. तो ज्जोवर आहे तोवर प्रगतीच्या गोष्टी करणे हा तर मूर्तिमंत दांभिकपणा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version