Site icon InMarathi

स्वयंपाकघरात एकाच वेळी अनेक कामं करताना ऊर्जा आणि वेळ वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स वाचाच

dipika-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका : मृदुला देशमुख बेले 

===

मी एक वर्किंग वुमन आहे. १० ते ५ नोकरी करते. शिवाय मला सतत काहीतरी शिकत रहायला आवडतं. वाचायला आवडतं. लिहायला आवडतं. शिवाय नोकरी आणि घर दोन्ही सांभाळणाऱ्या बऱ्याच बायकांसारखं मला स्वत:कडे, स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करायला आवडत नाही.

त्यामुळे सकाळी रोज तासभर मला व्यायामही करायचाच असतो. आणि कार्ब्स, प्रोटीन, हिरव्या भाज्या, कच्च्या फायब्रस भाज्या यांनी संतुलीत असा ताजा गरम नाश्ता, स्वयंपाक ही बनवायचा असतो.

आता हे सगळं लक्षात घेता मला उत्कृष्ट स्वयपाक कमीत कमी वेळात बनवायचा असतो हे लक्षात येईलच.

त्याची बरीचशी पूर्व तयारीही आदल्या दिवशी बाईंनी केलेली असतेच. म्हणजे काय करायचे ते ठरलेलं असतं, लसूण सोललेला असतो, भाज्या निवडलेल्या असतात, पीठं मळलेली असतात, वाटण वाटलेली असतात, पण तरीही सकाळी तारांबळ उडलेलीच असते.

 

prashainkitchen.com

 

गेल्या २०-२१ वर्षाच्या या सकाळच्या गडबडीत मी काही छोटे छोटे अभ्यास केले. हे अभ्यास स्वयंपाकघरात स्वयंपाक करतानाच्या वेगवेगळ्या हालचालींचे अभ्यास आहेत. जास्तीत जास्त वेळ वाचवून कमीत कमी हालचालींमध्ये जास्तीत जास्त काम कसं करता येईल याचे “टाइम अँड मोशन स्टडीज”!

 

angels4peace.com

 

आपला स्वयंपाकघरातला वावर “स्मार्ट” असावा म्हणून केलेले अभ्यास. म्हणजे बघा, किचन ओट्यावरची गॅसची शेगडी, फ्रीज आणि सिंक हा स्वयंपाकघरातला “वर्क ट्रायंगल” समजला जातो. आपला स्वयंपाकघरातला जास्तीत जास्त वेळ या तीन गोष्टींमध्ये फेऱ्या मारण्यात जातो.

किचन जर फार मोठं नसेल तर ठीक… किंवा मोठं असेल आणि हे लक्षात ठेवून डिझाईन केलेलं असेल तरीही ठीक. पण माझ्या घरी तसं नाही. म्हणजे किचन मोठं आहे आणि हा त्रिकोण लक्षात न घेता डिझाईन केलेलं आहे.

मग मी प्रयत्न असा करते की, ओट्यापासून फ्रीज पर्यंत किंवा फ्रीज पासून सिंक पर्यंत चकरा मारण्यात माझा वेळ कमीत कमी कसा जाईल. गॅसची शेगडी आणि सिंक तसे एकमेकांपसून जवळ आहेत पण फ्रीज मात्र बराच लांब. भांडी काही शेगडीच्या खालच्या trolleys मध्ये असतात. तर काही बाजूच्या एल शेप ओट्याच्या trolley मध्ये.

 

indiamart.com

 

काही मसाले आणि पदार्थ गॅस शेगडी खालच्या trolley मध्ये तर काही डाव्या बाजूच्या भिंतीतल्या कपाटात. मग माझा प्रयत्न असा असतो की, माझी कुठलीही चक्कर व्यर्थ जाता कामा नये.

म्हणजे पहा… जर माझ्या ओट्यावर चिरलेल्या कांद्याचा डबा आहे, तो वापरुन झालाय आणि मला फ्रीज मध्ये ठेवायचाय. आणि थोड्या वेळाने मी कोशिंबीर करणार आहे (ती अजून झालेली नाही). जिच्यात मला चाट मसाला घालायचाय. जो फ्रीज मध्ये आहे.

मग समजा मी आत्ता कांदा वापरुन झालाय आणि डबा लगेच फ्रीज मध्ये टाकायचाय आणि ओटा आवरून ठेवायचाय म्हणून लगबगीने तो ठेवायला गेले. आणि नंतर कोशिंबीर करताना परत चाट मसाला आणायला गेले. तर मी ओटा ते फ्रीज अश्या दोन चकरा मारणार. शिवाय डबा ठेऊन येतांनाची माझी चक्कर आणि मसाला आणायला जातानाची चक्कर वाया जाणार.

 

kachiskitchen.com

 

मग मी डबा ठेवताना थोड्या वेळाने मसाला लागणार आहे, हे लक्षात ठेवून तो घेऊन येते किंवा मग डबा ओट्यावर थोडा वेळ राहू देते. आणि मसाला आणायला जातानाच फ्रीज मध्ये ठेवते. अश्या हिशोबाने दिवसभरात माझ्या कित्येक चकरा आणि मुख्य म्हणजे सकाळचा अमूल्य वेळ वाचतो.

किंवा फोडणी करायला मसल्याचा डबा खालच्या trolley मधून बाहेर काढला आणि उघडला की मी तो पुढच्या फोडण्या होईपर्यंत बाहेर उघडाच राहू देते. सतत आवरण्याचा अट्टहास करत नाही.

माझं डस्टबिन थोडं लांब आहे. मग मी जरा कचरा झाला की, सारखा तो टाकायला जात नाही.

 

greentumble.com

सगळं जमवून आता काहीही सोलायचं नाहीये किंवा सालं काढायची नाहीयेत हे एन्शूर करून मग ते टाकते.

समजा चार पैकी तीन पदार्थात मला कोथिंबीर घालायची असेल तर ती प्रत्येक पदार्थ करताना फ्रीज मधून काढायची, धुवायची, चिरायची आणि वापरायची असं न करता काही सेकंद थांबून ती कशा कशात घालायची आहे, साधारण किती लागेल हा विचार करून आधीच एकदम डब्यातून काढून धुवून चिरून ठेवते.

 

braingroom.com

 

किंवा पदार्थ शिजायला शेगड्यांवर ठेवताना जे शिजायला जास्तीत जास्त वेळ लागेल ते सगळ्यात आधी गॅसवर गेलं पाहिजे हे कटाक्षाने पाळते.

आता हे वाचणारे काही जण नक्की असा विचार करतील की, इतका विचार आणि चिरफाड का करायची या गोष्टीची. तर एक म्हणजे याने तुमचा प्रचंड वेळ वाचतो आणि इतर अनेक उद्योग सांभाळयला वेळ मिळतो, दुसरं म्हणजे मला आता हा विचार ठरवून करावा लागत नाही.

माझ्या मेंदूला ती सवय झाली आहे. ती आता केवळ एक रिफ्लेक्स अॅक्शन आहे आणि तिसरं म्हणजे दुसरं कुणी म्हणालं नाही तर मी माझी मीच स्वत:ला आपण कसं स्मार्टली काम आटपलं म्हणून शाब्बासकी देते आणि मग माझी सकाळ आनंदात जाते!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version