Site icon InMarathi

सांस्कृतिक शहरातील ‘झपाटलेली’ ठिकाणं, पुण्यातील ६ गूढ गोष्टी

shaniwarwada-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पुणे शहर! पूर्वी पुण्याला पेन्शनरांचे शहर म्हणायचे पण आता ओळख बदलली आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. देश विदेशातून अनेक विद्यार्थी पुण्यात येऊन राहतात. आता तर पुणे आयटी सिटी म्हणून सुद्धा नावारूपाला आले आहे.

 

 

अनेक जण नोकरीच्या निमित्ताने पुण्यातच स्थायिक होतात. पुण्याच्या काही वैशिष्ट्यांमुळे पुणे ‘जगात भारी’ आहे असे पुणेकरांचे मत आहे.. इथे एक समुद्र सोडला तर नाही असे काहीच नाही!

पुण्यातल्या अनेक पर्यटनस्थळांविषयी बऱ्याच ठिकाणी नेहमी चर्चा होतेच. परंतु या लेखात आम्ही सांगणार आहोत पुण्यातल्या भुतांनी झपाटलेल्या जागांविषयी… दचकू नका. होय, हे खरे आहे!

पुण्यात अश्या अनेक जागा आहेत जिथे भुतांचा वावर आहे असे मानले जाते. ते किती खरे आणि किती खोटे आहे माहीत नाही. परंतु अनेक लोकांना या जागांवर अमानवीय अनुभव आल्याचे सांगितले जाते.

चला तर मग ओळख करून घेऊया आपल्या पुण्यातील परिचित पण, झपाटलेल्या म्हणुन समजल्या जाणाऱ्या जागांची…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

१. शनिवार वाडा

पुण्यातल्या भुताटकीच्या जागेत सर्वात पहिल्या नंबरवर शनिवारवाडा येतो. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी या वाड्याची मुहूर्तमेढ शनिवारी रोवली म्हणून याला शनिवार वाडा म्हणतात. (१० जानेवारी १७१३)

या वाड्याने राजकारणातून झालेल्या अनेक हत्या पाहिल्या आहेत. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेली ही वास्तू आपल्या पोटात इतिहासातील अनेक रहस्य बाळगून आहे. इथे अनेकांना अमानवीय आवाज, कुजबुज, किंचाळ्या ऐकू आल्या आहेत.

 

कित्येक जणांनी वाड्यात एका तरुणाचा आत्मा फिरतो असा अनुभव आल्याचे सांगितले आहे. आसपासच्या स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार पौर्णिमेच्या रात्री ‘काका मला वाचवा’ अश्या किंकाळ्या ऐकू येतात. नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की, नारायणराव पेशवे यांचा खून पौर्णिमेच्या रात्रीच झाला होता.

त्यानंतरही विषबाधेतून अनेक जणांचा मृत्यू या वाड्यात झाला आहे. आतल्या लोकांसह पूर्ण वाडा जाळला गेला तेव्हापासून इथे फक्त अवशेष शिल्लक आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने संध्याकाळी साडे सहा नंतर वाड्यात प्रवेश करण्यास मनाई केली आहे हे विशेष.

२. होळकर पूल

होळकर पूल ही पुण्यातली झपाटलेली आणखी एक जागा. या पुलाचे बांधकाम माधवराव पेशवे यांनी अठराव्या शतकात केले होते. यशवंतराव होळकर यांच्या स्मरणार्थ पुलाला होळकर पूल असे नाव दिले गेले. या पुलाचे ऐतिहासिक महत्त्व असले तरी सध्या हा पूल अमानवीय घटनांसाठी जास्त ओळखला जातो.

 

या पुलावरून रात्रीच्या अंधारात गाडी चालवणे कुठल्याही धाडसापेक्षा कमी नाही. या पुलाने अनेक दुर्दैवी मृत्यू पाहिले असून इथे काहीतरी असामान्य आहे यावर अनेक लोक विश्वास ठेवतात. कित्येकांनी पुलाच्या कठड्यावर भूत पाहिल्याचे छातीठोकपणे सांगितले आहे.

शक्यतो रात्री या पुलावरुन प्रवास करणे टाळले जाते. पुलाच्या थोडे पुढेच स्मशानभूमी असून त्यात सतराव्या शतकातील जुनी बांधकामे आहेत. एखाद्याच्या अंगावर काटा आणण्यासाठी हे भयावह वातावरणच पुरेसे असणार!

३. व्हिक्टरी थिएटर

हे पुण्यातील एक जुने सिनेमा थिएटर आहे. तुम्ही कधी इथे सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला इथे नक्कीच एक वेगळे वातावरण जाणवले असणार. सध्याच्या मल्टिप्लेक्स काळात हे एकपडदा थिएटर आपल्या जुन्या वास्तुशैली मध्ये अगदी उठून दिसते.

 

 

हे अजूनही चालू स्थितीत असले तरी काहीजण इथे सिनेमा पाहायला जाण्याऐवजी इथल्या भयावह वातावरणाचा अनुभव घ्यायला जातात. जवळपासच्या लोकांच्या अनुभवानुसार, दिवसभर इथे कितीही वर्दळ असली तरी रात्री मात्र शांतता पसरते.

दिवसाच्या शोला काही अनुभव येत नाहीत पण रात्रीच्या शोला मात्र हमखास वेगळे अनुभव येतात. खुर्च्या आपोआप हलणे, प्रेक्षकांच्या कानात भीतीदायक कुजबुज होणे, भयानक किंचाळी ऐकू येणे इत्यादी प्रकार इथे घडतात असे सांगितले जाते.

विशेष म्हणजे हे प्रकार फक्त भूतांचे सिनेमे चालू असतानाच नव्हे तर रोमँटिक किंवा कॉमेडी सिनेमा चालू असतानाही घडतात. मग पुढच्या वेळी सिनेमा बघायला इथेच जाणार ना?

४. चंदन नगर

समजा तुम्ही रात्री रस्त्याने एकटे जात आहात… आणि त्याचवेळी एक आठ वर्षांची लहान गोंडस मुलगी हातात बाहुली घेऊन भयानक आवाजात किंचाळत तुमच्याकडे येत असेल तर कसे वाटेल? जर असे झाले तर तुम्ही पुण्यातील चंदन नगर मध्ये आहात हे समजून जा!

 

 

इथल्या लोकांच्या सांगण्यानुसार या छोट्या मुलीचा काही वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झालेला आहे. ही बांधकाम मजुराची मुलगी आपल्या बाहुलीसोबत खेळत असताना अचानक उंचावरून खाली पडून मृत्युमुखी पडली.तेव्हापासून तिचे भूत या परिसरात भटकत आहे असे म्हणतात.

रात्री बाराच्या ठोक्याला या मुलीचा रस्त्यावर वावर सुरू होतो. ही मुलगी कुणाला काही त्रास देत नाही. परंतु पांढऱ्या फ्रॉकवर रक्ताचे डाग घेऊन तुमच्याकडे किंचाळत येते आणि अचानक गायब होते. एवढे तुम्हाला अटॅक आणण्यासाठी पुरेसे आहे!

५. चॉईस हॉस्टेल, कर्वे रोड

पुण्यातील हे एक अत्यंत गजबजलेले हॉस्टेल. इथे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची रोज धमाल मस्ती सुरू असते. पण ही धमाल एका दिवशी मात्र थंडावते… शनिवारी रात्री!

शनिवारी रात्री इथले वातावरण अगदी चिडीचूप्प असते. कारण त्या रात्री इथे राज्य करते एका लाल साडीवाल्या बाईचे भूत. ही लाल साडी नेसलेली स्त्री रात्रभर कॉरिडॉर मधून इकडे तिकडे फिरत असते असे सांगतात.

कधी कधी ती बेडच्या बाजूला उभी असल्याचे क्षणभर दिसते तर कधी बाथरूममध्ये सुद्धा असल्याचा भास होतो. विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार हे भूत कुणाला त्रास देत नाही मात्र तिचा चेहरा उदास असतो आणि ती काहीतरी शोधत असते.

 

रात्रीच्या शांततेत तिच्या पैंजणाचा आवाज आला की भले भले धाडसी लोक डोक्यावर पांघरूण घेऊन गुपचूप पडून राहतात. एक अशीही वदंता आहे की, होस्टेलच्या मूळ मालकांची ही प्रथम पत्नी असून तिचा खून झाल्यामुळे ती बदला घेण्यासाठी नवऱ्याचा शोध घेत फिरते.

६. एम. जी. रोडचा झपाटलेला बंगला

अतिशय गजबजलेल्या एम जी रोड या भागात अनेक मोठमोठी दुकाने, शोरूम्स, हॉटेल्स आहेत. पण या वर्दळीच्या भागात एका भूताचे सुद्धा वास्तव्य आहे! याच भागात आहे एक ओसाड निर्जन बंगला जो किती काळापासून तसाच आहे हे सांगता येत नाही.

 

 

असं म्हणतात की, या बंगल्यात एका तरुण स्त्रीला जाळून मारले होते. त्या स्त्रीच्या भुताने संतापून या बंगल्यावर कब्जा केला. रात्रीच्या वेळी या बंगल्यातून भयानक किंकाळ्या येतात हे अनेकांनी ऐकले आहे म्हणतात.

काही धाडसी लोकांनी या बंगल्याच्या आवारात प्रवेश केला पण त्यांना अचानक वातावरणात झालेले बदल अनुभवास आले. बर्फ पडत असल्यासारखी थंडी जाणवली. काहीजणांच्या म्हणण्यानुसार इथले जुने फर्निचर, दारे, खिडक्या एका लयीत संथ आवाज करत वाजत राहतात जणू त्यांना कुणीतरी मुद्दाम वाजवत आहे.

या जागांशीवाय पुण्यामध्ये आणखी काही जागा अश्या आहेत जिथे भुतांचा वावर असल्याचे मानले जाते. सिंहगड किल्ला, खडकी कब्रस्तान, कॅम्प एरिया, हलीमा बेगम उर्दू शाळा इत्यादी.

या लेखाचा उद्देश अंधश्रद्धा पसरवणे अथवा भीती घालणे नसून फक्त माहिती देणे हा आहे. या वरील गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे हे जाणकारच सांगू शकतील. जर आपणासही आणखी काही अश्या झपाटलेल्या जागा माहीत असतील अथवा काही अनुभव आलेले असतील तर कमेंट्स मध्ये जरूर शेअर करावे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version