Site icon InMarathi

“तमिळ वाघ” LTTE बद्दल एक अज्ञात अचाट धक्कादायक गोष्ट; त्यांचं सुसज्ज हवाई दल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

‘श्रीलंका’ म्हणजे भारतीय द्वीपकल्पाच्या शेजारी असलेलं एक छोटंसं पण, सौंदर्याने नटलेलं बेट. कोणे एकेकाळी ‘सोन्याची लंका’ अशी ओळख असलेलं श्रीलंका अगदी काही वर्षांपूर्वी पर्यंत भयानक यादवी युद्धाला सामोरं जाऊन बेचिराख होतांना संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोड्याच महिन्यांनी २ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटिशांनी आपल्या ‘सिलोन क्राऊन कॉलनी’ ला स्वातंत्र्य दिले. १९४७ च्या श्रीलंकन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सेनानायके यांच्या ‘युनायटेड नॅशनल पार्टी’ला सर्वाधिक जागा मिळाल्या.

परंतु स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्यांनी ‘सिंहल महासभा’ आणि ‘तमिळ काँग्रेस’चे सहकार्य घेऊन संमिश्र सरकार बनवले. या दोन विरोधी पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवणं म्हणजे तारेवरची कसरत होती जी सेनानायकेंनी उत्तमप्रकारे पार पाडली. दुर्दैवाने थोड्याच दिवसात श्रीलंकेमध्ये जातीवादी राजकारणाने उडी घेतली.

 

 

सुमारे दीड शतकांपूर्वी मध्ये श्रीलंकेतल्या चहाच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी आलेल्या भारतीय तामिळांची लोकसंख्या सात-आठ लाखाच्या घरात पोहोचलेली होती. मात्र त्याच प्रदेशात वास्तव्यास असणाऱ्या कांदीयन जमातीला हे भारतीय तामिळ आता उपरे वाटू लागले होते.

त्यांनी या भारतीय तामिळांचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली. आपल्या पक्षातील बहुसंख्य कांदीयन नेत्यांचा पराभव टाळण्यासाठी पंतप्रधान सेनानायकेंनी १९४८ मध्ये संसदेत भारतीय मूळच्या तामिळांचे नागरिकत्व रद्द करण्यासाठीचा ठराव मांडला. हा भारतीय तमिळांना एक जबरदस्त धक्का होता.

 

९५ सदस्यसंख्या असलेल्या श्रीलंकन संसदेत त्यावेळेस १९ तमिळ खासदार होते.

इतके असूनही काही तमिळ खासदारांच्या साहाय्याने हा ठराव संमत झाला. यानंतर आलेल्या दुसऱ्या ठरवानंतर तर उरल्या सुरल्या वेगवेगळ्या भारतीय मूळच्या नागरिकांचा मतदानाचा हक्क देखील हिरावून घेण्यात आला.

या घटनेनंतर भारतीय तमिळांच्या मनात असंतोष खदखदत होता. त्यात भर पडली ती ५ जून १९५६ ला संसदेत मांडण्यात आलेल्या ‘फक्त सिंहली’ या विधेयकाने.

त्याच दिवशी या विधेयकाचा निषेध करण्यासाठी तमिळांच्या हक्कासाठी लढणाऱ्या फेडरल पार्टीच्या तीनशे सदस्यांनी चेल्वनायकम यांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या इमारतीला लागून असलेल्या समुद्रतीरावर शांततेने निदर्शने करण्याचा निर्णय घेतला.

 

 

अचानक काही बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वाखाली सिंहली लोकांचे जथ्थेच्या जथ्थे लोकशाही मार्गाने निदर्शने करणाऱ्या तमिळांवर तुटून पडले. सिंहलींनी तामिळांना अक्षरशः तिंबून काढले. उपस्थित पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेऊन हा तमाशा शांतपणे बघत होते.

बघता बघता हे दंगे कोलंबोभर पसरले, शहरातील तमिळ नागरिकांवर सिंहली गुंडांनी हल्ले चढवण्यास सुरुवात केली. या दंग्यांमध्ये सुमारे दीडशे तमिळ नागरिकांचा मृत्यू झाला ज्यात महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पोलिसांनी या दंग्यांमध्ये केवळ बघ्याची भूमिका घेतली, शेकडो तामिळांची हत्या होत असतांना पोलीस फक्त तमाशा बघण्यात धन्यता मानत होते. पोलीस तर पोलीस पण श्रीलंकन सत्ताधाऱ्यांनी देखील या दंग्यांचे समर्थन केले.

 

 

दंगे बंद झाल्या नंतर ‘आप्पालाई अम्रिथालिंगम आणि सी.सुथरालिंगम हे दोन खासदार दंग्यात झालेल्या जखमांवर मलमपट्टी करून जेव्हा संसदेत प्रवेश करत होते तेव्हा पंतप्रधान बंदरनायकेंनी ‘अरे वाह.. युद्धाच्या जखमा..!!’ या शब्दात त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा लज्जास्पद प्रकार केला होता.

यानंतर मात्र बहुसंख्य सिंहली आणि तमिळांमध्ये एक प्रकारच्या यादवी युद्धास सुरवात झाली.

१९७० साल उजाडता उजाडता या संघर्षाने पाशवी रूप धारण केले. शेकडो निर्दोष तमिळांच्या निर्मम हत्या करण्यात आल्या. या हत्यांमागे सिंहली नागरिकांसोबत श्रीलंकन सुरक्षा यंत्रणांचाही मोठा हात होता.

 

 

अश्यातच हजारो तमिळ युवकांनी शस्त्र उचलण्याचा निर्धार केला आणि ‘तामिळ एलम’ (स्वतंत्र तामिळ देश) च्या संघर्षात ते सहभागी झाले. तमिळ एलमच्या ध्येयासाठी धडपडत असलेला असाच एक तरुण होता ‘वेल्लूपिल्लई प्रभाकरन’.

प्रभाकरणचा जन्म जाफण्याचा मात्र लहान असतांनाच प्रभाकरणचे कुटुंब वेलवेत्तीतुराई ला म्हणजे त्यांच्या मूळगावी परतले. श्रीलंकेतल्या इतर तामिळ गावांप्रमाणे या गावावर सुद्धा भारताचा प्रभाव होता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल त्यांच्यात एकप्रकारची आत्मीयता होती.

याच वातावरणाचा प्रभाव प्रभाकरन वर देखील पडला. भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोसांना तो आपला आदर्श मानायचा. सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेनेची संकल्पना आणि सशस्त्र संघर्षातून स्वातंत्र्यप्राप्तीची कल्पनांच त्याला मंत्रमुग्ध करत असे.

 

सिंहलींनी तमिळांवर केलेल्या अत्याचाराबद्दल ऐकून त्याच्या किशोरमनावर मोठा आघात होई. त्यामुळे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तो तमिळ आंदोलनामध्ये सहभागी झाला.

१९७२ ला तामिळ स्टुडंट लीग या संघटनेतून काम सुरू केल्यानंतर प्रभाकरणने पुढे ‘तमिळ न्यू टायगर्स’ या गटाची स्थापना केली.१९७६ मध्ये प्रभाकरनची भेट झाली एस. सुब्रमण्यम याच्याशी झाली.

सुब्रमण्यमचा स्वतःचा एक गट होता. मात्र प्रभाकरनच्या व्यक्तिमत्वाची त्याच्यावर प्रचंड छाप पडली. पुढे याच साथीदाराच्या संगतीने प्रभारकनने ५ मे १९७६ रोजी ‘टीएनटी’च्या जागी ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ एलम’ या नव्या उग्रवादी गटाची स्थापना केली.

 

 

पुढील काही दशकांमध्ये प्रभाकरण आणि त्याच्या ‘एल.टी.टी.इ. ने श्रीलंकन संघर्षात एक महत्वाची भूमिका बजावली.प्रभाकरण एक मुत्सद्दी राजकारणी तर होताच पण सोबतच तो अत्यंत कठोर आणि निर्मम सेनापती सुद्धा होता.

प्रभाकरणनला हत्यार बाळगण्यात विशेष रस होता, तो एक उत्तम नेमबाज होता. नवनवीन शस्त्रास्त्र निर्मिती करणे आणि त्यांना हाताळणे प्रभाकरनला फार आवडत असे. एल.टी.टी.इ. Explosive Belt’s’ च्या माध्यमातून आत्मघातकी हल्ले करणारी जगातली पहिला संघटना आहे. ही संकल्पना देखील प्रभाकरणच्या डोक्यातूनच आलेली होती.

 

 

प्रभाकरन हा प्रचंड महत्वाकांक्षी होता. ‘तामिळ एलम’ हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट होते आणि त्यासाठी तो वाट्टेल ते करण्यास तयार असायचा.

जर स्थलसेना, वायुसेना आणि नौसेना असेल तरच आपण स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणू शकू या एका विचाराने प्रभाकरनने वायुसेनेची स्थापना केली होती. जगाच्या पाठीवर विविध देशांमध्ये असलेल्या दहशतवादी संघटनांमध्ये स्वतःचे हवाईदल आणि नौसेना असलेली एल.टी.टी.इ. ही एकमेव संघटना आहे.

वायूबळ प्राप्त करण्यासाठी प्रभाकरणने १९८४ सालापासूनच प्रयत्न सुरू केले होते. १९८५ मध्ये एल.टी.टी.इ. कमांडर किट्टू याने २०० सीसी मोटारसायकल इंजिनचा वापर करून विमान बनवण्याचा हास्यास्पद प्रकार केला.

तसेच १९९१ मध्ये शंकर या एल.टी.टी.इ. च्या वायुसेनेचा जनक मानल्या जाणाऱ्या टायगरने विमानाचा नमुना बनवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.अखेर १९९ मध्ये तीन टायगरांना पायलटच्या प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवण्यात आले. नंतर पुढील दोन वर्षांच्या काळात हलक्या विमानांची आयात करण्यात आली.

२७ नोव्हेंबर १९९८ रोजी एल.टी.टी.इ.ने अधिकृतरीत्या वायुसेनेच्या अस्तित्वाची घोषणा केली. त्याचे प्रदर्शन करण्यासाठी हुतात्मा झालेल्या टायगरांच्या स्मारकांवर विमानांच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली.

 

 

 

एल.टी.टी.इ. ने झेकोस्लोवाकीया बनावटीच्या झ्लिन झेड १४३ या छोटेखानी विमानांची निवड केली. एल.टी.टी.इ. जवळ १ हेलिकॉप्टर आणि चार झ्लिन विमाने होती.

या विमानांवर कुठल्याही प्रकारचा शस्त्रसाठा लादण्याची सोय नसतांना देखील टायगरांनी या विमानांवर शस्त्रे आणि स्फोटके लादली. शिवाय पार कोलंबो पर्यंत श्रीलंकन आर्मीच्या गटात एकदा नव्हे तर दोनदा खळबळ माजवली.

विशेष म्हणजे ह्या सर्व भराऱ्या अंधाराच्या वेळी रात्री उड्डाण न करू शकणाऱ्या विमानांमधून करण्यात आल्या होत्या. एल.टी.टी.इ. च्या वायुसेनेने केलेल्या सर्वात धाडसी ऑपरेशन्सपैकी एक ऑपरेशन होत ते ‘अनुराधापुरच्या हवाई तळावर केलेला हल्ला.

 

 

२२ ऑक्टोबर २००७ ला पहाटे पाच वाजताच्या सुमारास ब्लॅक टायगरांनी हवाई तळाच्या कुंपणाला भोक पाडून आतमध्ये प्रवेश केला आणि एका मागून एक विमाने उडवून देण्यास सुरूवात केली. त्यात काफिर आणि एम.आय.१७ हेलिकॉप्टर धरून तब्बल १० विमानं नष्ट झाले.

त्याच वेळेस एल.टी.टी.इ.ची दोन विमाने अवकाशात घिरट्या घालू लागली. त्यांनी विमानातून बॉम्ब फेकले आणि गोंधळात आणखीनच भर पडला. या हल्ल्यात एकूण ९ श्रीलंकन वायूसैनिक मारल्या गेले.

 

 

यानंतर त्याच वर्षी कटुनायके हवाई तळावर हल्ला करण्यात आला. २० फेब्रुवारी २००९ ला पुन्हा दोन विमानांनी कोलंबो मधील काही सरकारी इमारतींवर धाड घातली. त्यातील एका विमानाने तर ‘इनलँड रेव्हेन्यू बिल्डिंग’ वर धडक मारली. अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या हल्ल्याची ही नक्कलच होती जणू.

शेवटी एल.टी.टी.इ. जवळ फक्त एक विमान उरले जे श्रीलंकन सैन्याने खाली पाडले. प्रभाकरनचा हवाई दल स्थापन करण्याचा निर्णय किती योग्य होता हे विवादास्पद आहे. प्रचंड पैसा खर्च करून, तरुणांच्या प्राणांची बाजी लावून त्याने काय मिळवले हे सांगणे कठीण आहे.

 

 

केवळ स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वायुसेनेची उभारणी ही त्याची मोठी चूकचं होती. प्रभाकरनची ही वायुसेना फार प्रभाव पाडू शकलेली नसली तरी एक गोष्ट सर्वांना मान्य करावी लागेल. ती म्हणजे,

विमाने चोरमार्गाने आयात करून त्यांची जुळवणी करायची, विमान दुरुस्तीसाठी यंत्रणा उभारायची, धावपट्टी बांधायची, देशाच्या सक्षम वायुसेनेचा डोळा चुकवून विमानतळावरील यंत्रणेविना त्यांचे उड्डाण करायचे. हे नाटकी आणि एखाद्या कथेप्रमाणे वाटत असले तरी प्रभाकरणने ते सत्यात करून दाखवले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version