Site icon InMarathi

चीनी सम्राटाला धूळ चारणाऱ्या राजाची अभिमानास्पद शौर्यगाथा

kanishk-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

भारताच्या इतिहासात अनेक सुवर्णपानं आहेत आणि तो वारसा आपण अभिमानाने जपत असतो. परंतु काळाच्या ओघात काही नावे विस्मृतीत लोटली जातात किंवा इतिहासाच्या पुस्तकात बंदिस्त होऊन जातात. त्यापैकीच एक नाव राजा कनिष्क!

बाहेरून आले आणि इथल्या लोकांत मिसळून भारतीय होऊन गेले असे वर्णन केले जाते त्यापैकी एक म्हणजे कुषाण! त्या कुषाण साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली शासक म्हणजे राजा कनिष्क.

कोण होते कुषाण?

आजच्या पश्चिम चीनचा प्रदेश हा युएची टोळ्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पशुपालक असणारी ही जमात पुढे स्थलांतर करत गेली आणि शासक म्हणून स्थिरावली ती बॅक्ट्रिया या प्रदेशात. ज्या प्रदेशाला आज आपण मध्य आशिया म्हणून ओळखतो.

पुढे हिंदुकुश पर्वतरांगा, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, दक्षिणी उझबेकिस्तान इथून ते थेट भारतात गंगेचे सुपीक खोरे असलेल्या भागापर्यंत मथुरा,पाटलीपुत्र इथपर्यंत विस्तार झाला.

इतका मोठा प्रदेश अधिपत्याखाली असूनही ते साम्राज्य पद्धतीने कारभार करत नव्हते.

काही भागावर त्यांची थेट सत्ता होती तर अन्य प्रदेशात क्षत्रपांच्या हाती होती. काही राजांनी कुषाणांचे स्वामित्व मान्य केले तर त्या राजातर्फे सत्ता चालवली जात असे.

 

geek.com

राजा कनिष्कची कारकीर्द

इसवी सन १२७ ते १५० हा राजा कनिष्कने राज्य केलेला काळ आहे. इतिहासकारांमध्ये याबद्दल दुमत होतेच परंतु आता नवीन येणाऱ्या तथ्यांमधून याच काळाबद्दल दुजोरा मिळतो. शिवाय राजा कनिष्क एकच होऊन गेला की अनेक हा पण वाद आहे त्यामुळे राजा कनिष्क व राजा कनिष्क प्रथम या नावाने पण उल्लेख येतो.

इतक्या मोठ्या प्रमाणावर विस्तार असलेल्या या साम्राज्याची राजधानी गांधार प्रदेशातील पुरुषपूर (आताचे पेशावर) होती. त्यासोबत कापिसा (आताचे बाग्राम, अफगाणिस्तान) आणि मथुरा अशा दोन राजधान्या होत्या.

सम्राट कनिष्कचे चिनी शासकाशी युद्ध

हान राजवंशाचा इतिहास (मूळ चिनी नाव – Hou Hanshu)या पुस्तकात बान चाओ (Ban Chao ) हा सैनिकी अधिकारी खोतान जवळ लढल्याचे उल्लेख आहेत. येथे  ७०,००० कुषाण सैनिक लढल्याचे चिनी कागदपत्रात नमूद केलेले आहे काशगर, यार्कंद, ख़ोतान हा आजच्या चीनमधील प्रदेश कुषाणांच्या अधिपत्याखाली आला.

 

youtube.com

जिथे सम्राट कनिष्क एकदा पराभूत झाला,नंतर पुन्हा जिंकला. पुढे तो प्रदेश कुषाणांच्या हातून परत निसटला. तेथे कनिष्क काळातील अनेक नाणी सापडली आहेत. यावरून या दोन प्रदेशातील आंतरसंबंध लक्षात येतो.

दक्षिण आशिया आणि रोम यांच्यातील जमीन (रेशीम मार्ग) आणि समुद्र व्यापार मार्गांवर नियंत्रण करणे कनिष्कच्या मुख्य ध्येयांपैकी एक होते.

कनिष्ककालीन नाणी

सुरुवातीच्या काळात ग्रीक भाषा आणि लिपी असलेली नाणी ते पुढे इराणी बॅक्ट्रियन भाषेतील नाणी आणि अगदी थोड्या प्रमाणात बुद्ध आणि शिव यांची प्रतिमा असलेली नाणी त्याकाळी प्रचलित होती. ही नाणी त्यांच्या विविध धार्मिक परंपरांचा समन्वय साधणारी दिसतात. ही नाणी सोने व तांब्याची आहेत.

यातील काही नाणी ब्रिटिश संग्रहालयात बघायला मिळतात तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानी हल्ल्यात तेथील संग्रहालय नष्ट झाल्याने जतन केलेली नाणी नामशेष झाली आहेत.

 

coinindia.com

सम्राट कनिष्क आणि बुद्धधर्म

केवळ बुद्ध धर्माचा उपासक इतकीच सम्राट कनिष्कची ओळख नाही तर या धर्माप्रती अभ्यासकांना प्रोत्साहित करण्यात ते अग्रेसर होते. चौथी बौद्ध धर्म परिषद कुंडलवन, काश्मीर येथे भरवण्यात त्यांचा पुढाकार होता. वसुमित्र हे या परिषदेचे प्रमुख तर अश्वघोष हे उपप्रमुख म्हणून उपस्थित होते.

या परिषदेनंतर बौद्ध धर्म हीनयान आणि महायान मधील दोन भागात विभागला गेला.

पेशावर येथे असलेला कनिष्क स्तूप हा बुद्ध परंपरेच्या वास्तुशैलीत बनवलेला स्तूप हे पण एक मोठे योगदान आहे. सम्राट कनिष्क हे बुद्ध तत्वज्ञ अश्वघोष यांच्या निकट होते.

पुढे अश्वघोष सम्राट कनिष्क यांचे धार्मिक सल्लागार झाले. सम्राट कनिष्क आणि सम्राट अशोक यांची बुद्ध धर्माच्या योगदानाबाबत तुलना केली जाते.

बुद्ध परंपरेत सम्राट कनिष्क

 

india.com

बुद्ध साहित्यात असे म्हटले जाते की कनिष्क खूपच क्रोधित आणि कठोर राजा होते, परंतु बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर ते बदलले. पुढे त्यांना मोठा मानसन्मान मिळाला. ‘महाराजाधिराज’ या बिरुदाने ते नावाजले गेले. हे बिरुद मात्र पर्शियन, चिनी, रोमन परंपरेतून आले होते.

बुद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार

सम्राट कनिष्कच्या चिनी शासकावरील विजयानंतर बुद्ध संन्यस्यांनी व्यापाऱ्यांसोबत धर्मप्रचारासाठी  रेशीम मार्गाद्वारे चीनमधील प्रवेश केला. याचीच परिणीती म्हणून पुढे बुद्ध संन्यासी लोककसेमा यांनी महायान बुद्ध ग्रंथाचा चिनी भाषेत अनुवाद केला.

पुढे चिनी यात्रेकरू बुद्ध ग्रंथांच्या शोधात भारतात येऊ लागले. त्यासाठी मुख्यतः कुषाण प्रांतातून ते प्रवास करत असत.

वर्तमानात सम्राट कनिष्क

सम्राट कनिष्कच्या मृत्यूबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. सम्राट कनिष्कचा एक शिलालेखाचा अवशेष विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सापडला होता आणि आता तो पेशावरमधील संग्रहालयात आहे.आज काशमीरमध्ये कनिष्कनगर नाही आहे परंतु बारामुल्ला जवळ अनेक स्तूप आढळतात.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अतिरेक्यांनी संग्रहालय नष्ट केले आहे.

 

cemml.com

ठोस माहितीची कमतरता असूनही, सम्राट कनिष्कच्या शासनाचे परिणाम भारत, चीन आणि मध्य आशियातील सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात दिसून येतात.

त्यांच्या समर्थनामुळे महायान बौद्ध धर्माचा प्रसार शक्य झाला ज्यामुळे धर्मासाठी एक मजबूत पाया उपलब्ध झाला. हा परिणाम कुठेतरी हिंदू धारणांवर देखील झालेला दिसून येतो.

कदाचित आपल्यासमोर सम्राट कनिष्कच्या आयुष्यातील संपूर्ण चित्र कधीच उघड होणार नाही, परंतु त्यांनी आपल्या जीवनात आढळणाऱ्या असंख्य कलात्मक आणि वास्तुशिल्पाच्या कलाकृती तसेच अनेक संस्कृतींची व विचारांवर आधारित परंपरा आणि मूल्यांची ओळख पटवून दिली आहे.

आजही रेशीम मार्गाचे महत्व अबाधित आहे आणि त्यापैकी काही प्रदेशावर राज्य केलेल्या या सम्राटाला विसरणं अशक्य आहे.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version