Site icon InMarathi

परीकथा वाटावी अशी हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अवीट प्रेम कहाणी

Sunil-dutt-and-nargis 4 Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम

===

पाहिलं प्रेम आयुष्यात नेहमीच लक्षात राहण्यासारखं असतं. मात्र असं फारचं कमी वेळा होतं की, ते प्रेम आयुष्याच्या चढउतारांवर जोडीदार म्हणून सोबत असतं. असे भाग्यवंत तसे कमीच आणि त्यातलंच एक नाव म्हणजे सुनिल दत्तजी.

एखाद्या गोष्टीच्या पुस्तकातील परीकथा वाटावी अशीच काही त्यांची लव्ह स्टोरी आहे.

 

रेडिओ जॉकी म्हणून काम करणारा एक तरुण आपल्या आवडीच्या नायिकेची मुलाखत घेता येईल म्हणून खूप खुश असतो. शेवटी तो दिवस उजाडतो आणि त्या तरुणाची आवडती नायिका समोर बसलेली असते. पण त्याला एक शब्द सुद्धा बोलता येत नाही. शेवटी मुलाखत रद्द होते.

पहिल्या भेटीत बोलताच आलं नाही तर प्रेम व्यक्त होणं तर दूरच राहिलं. मात्र काही वर्षात त्या तरुणाला त्याच अभिनेत्रीसोबत चक्क चित्रपटात काम करण्याची संधी मिळते, कसली ही अद्भुत इच्छाशक्ती.

तो तरुण म्हणजेच सुनिलजी आणि ती नायिका म्हणजे नर्गिसजी.

 

नर्गिस त्यावेळी करियरच्या शिखरावर होत्या. राज कपूर आणि नर्गिसची सिनेमातील जोडी त्यावेळी सुपरहिट होती.

याउलट सुनीलजींचा अभिनयाशी दूर दूरपर्यंत संबंध नव्हता. ते रेडिओ जॉकी होते. त्यामुळे आपल्या सारख्या रेडिओ जॉकीला त्या बघणारं सुद्धा नाही हे सुनीलजींना ठाऊक होतं.

यानंतर त्यांची दुसरी भेट झाली टी बिमल रॉय त्यांच्या ‘दो बिघा जमीन’ या सिनेमाच्या सेटवर. नर्गीसजी बिमल यांना भेटायला आल्या होत्या. योगायोगाने सुनीलजीसुद्धा कामाच्या शोधात तिथेच आले होते.

 

 

त्यावेळी सुनीलजींना बघताच नर्गीसजींना त्यांची मुलाखत घेतानाची फजिती आठवली आणि त्यांनी हसुन सुनीलजींना ओळख दाखवली.

वेळ पुढे पुढे गेला आणि १९५५ मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म नावाच्या चित्रपटातून सुनीलजींनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्याकाळात राज कपूर आणि नर्गिसजीच्या अफेरच्या अनेक चर्चा होत्या.

सुनिलजींनी या काळात शांत राहायचं ठरवलं. त्यांनी प्रेमाबद्दल कधीच कोणाला सांगितलेलं नव्हतं. काही वर्षातच अफेयरच्या चर्चा खऱ्या ठरल्या.

 

sangitamelekarblog.com

नर्गिसजी राज कपूरसोबत लग्न करायला सुद्धा तयार होत्या. अगोदरच राज कपूर यांचं लग्न झालेलं होतं. तरीसुद्धा सर्व मान्य करायला त्या तयार होत्या. पण म्हणतात ना, नियतीला काही गोष्टी मान्य नसतातच, तसंच झालं.

नर्गिस आणि राज कपूर यांचा ब्रेकअप झाला आणि हे दुःख नर्गिसजी सहन करू शकल्या नाहीत. त्या नैराश्यात पार बुडून गेल्या.

काही वर्षात मेहबूब खान यांच्या मदर इंडिया या चित्रपटात सुनिल आणि नर्गिसजींना सोबत काम करण्याची संधी मिळाली. सुनिल दत्त साठी तर हे एखादं स्वप्नं पूर्ण होण्यासारखीच गोष्ट होती.

खरंतर या रोलसाठी आधी दिलीपकुमार यांना विचारणा झाली होती. पण नर्गीसजींच्या मुलाची भूमिका असल्याने त्यांने नकार दिला. नर्गीस माझी हिरॉइन आहे मी तिच्या मुलाची भूमिका कशी काय करू असे त्यांचे म्हणणे आले. त्यांच्या नकारामुळे या भूमिकेसाठी सुनीलजींना विचारणा झाली.

सुनीलजींना नेहमीच नर्गीसजींसोबत काम करण्याची ईच्छा होती. त्यामुळे त्यांनी भूमिकेचा विचार न करता लगेचच या चित्रपटास होकार दिला. पण गंमत अशी की चित्रपटाच्या शूटींदरम्यानही सुनीलजींना नर्गीसजींसमोर काय बोलावे सुचत नसे. ते डायलॉग्स विसरून जात.

नर्गीसजी त्यावेळी अत्यंत यशस्वी नायिका होत्या. सहकलाकाराला अभिनय जमत नाही म्हणुन दुसऱ्या कुणाला सिनेमात घेण्याची मागणी त्या सहज करू शकत होत्या. पण त्यांनी तसे न करता सुनीलजींना शक्य ती मदत केली. सुनीलजींच्या अभिनयात सहजता यावी म्हणुन प्रयत्न केले. त्यामुळे सुनीलजी अजूनच त्यांच्या प्रेमात पडले.

 

 

याच चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अशी घटना घडली की सुनीलजींनी एवढे वर्ष बाळगलेले मौन त्यांनी सोडले. या घटनेनंतर सुनीलजी आणि नर्गीसजी जवळ आले ते आयुष्यभरासाठीच.

गुजरातमधील बिलीमोर येथे शुटींग सुरु असताना एक सीन आगीमध्ये करायचा होता. या सीनमध्ये नर्गीसजी अभिनय करणार होत्या. त्यांचा अभिनय सुरु असताना तात्पुरत्या स्वरूपात लावलेली जी आग होती ती नियंत्रणाबाहेर गेली. आणि या आगीत नर्गीसजी अशा अडकल्या की त्यांना बाहेर काढणे जवळपास अशक्य झाले होते.

परंतु एखाद्या चित्रपटातील  नायकाप्रमाणेच सुनिलजींनी त्यांना आगीतून वाचवण्यासाठी धाव घेतली. अंगावर फक्त एक चादर घेऊन जीवाची पर्वा न करता ते आगीत शिरले. नर्गीसजींना वाचवण्यात ते यशस्वीही झाले. पण या दरम्यान सुनिलजींना बरंच भाजलं होतं.

 

ते पुन्हा पुन्हा बेशुद्ध होऊ लागले. काही दिवस ताप पण होता. त्यांना तात्काळ रुग्णालयात ठेवावे लागले. 

या काळात नर्गिसजींनी त्यांची खूप सेवा केली. याच काळात दोघांना पहिल्यादांच सोबत वेळ घालवता आला. या काळात ते एकमेकांच्या जास्त जवळ आले. नर्गिसजी स्वतःला थांबवू शकल्या नाही आणि त्याही सुनिलजींच्या प्रेमात पडल्या.

दोघांनी मदर इंडिया रिलिज होइपर्यंत कोणालाच काही सांगितलं नाही. रोज संध्याकाळी शूट संपल्यानंतर दोघे भेटू लागले, टेलिग्रामवर बोलू लागले. काही दिवसातच त्यांच्या प्रेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. सर्वांसाठीच हा मोठा धक्का होता.

 

 

त्याकाळी बॉलिवूडमध्ये असे आंतरधर्मिय प्रेम जुळणे आणि त्याचे लग्नात रूपांतर होणे आताप्रमाणे सवयीचे नव्हते. त्यामुळे काही वाईट प्रतिक्रिया सुद्धा आल्या. पण या दोघांनी कशाचीच तमा बाळगली नाही. त्यांनी १९५८ ला फक्त जवळच्या लोकांच्या साक्षीने लग्न केलं.

लवकरच संजय, प्रिया आणि नम्रता त्यांच्या आयुष्यात आले आणि दत्त कुटूंबीय पूर्ण झालं. मात्र नियतीला काही वेगळं मंजूर होतं.

काही दिवसातच नर्गिसजीना कॅन्सर झालंय असं कळलं आणि पूर्ण कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला. सुनीलजींनी शक्य तेवढे प्रयत्न केले. अमेरिकेत नेलं, उत्कृष्ट डॉक्टर्सना दाखवलं मात्र त्याचा काहीच फायदा होऊ शकला नाही.

या सर्व गोष्टीमध्येच संजय दत्तचा पहिला सिनेमा रॉकी येणार होता. चित्रपटाच्या  प्रिमियरला येण्याची नर्गिसजींची खूप इच्छा होती त्यांनी सांगितलं होत की, काहीपण करा स्ट्रेचर वर मला न्या पण मला खरंच  प्रिमियर बघायचा आहे. मात्र ते शक्य होऊ शकलं नाही कारण ३ मे १९८१ ला त्यांचे निधन झाले आणि रॉकी ७ मे १९८१ ला रिलीज झाला.

प्रिमियरच्या वेळेस सुनिल दत्त यांनी संजय जवळची एक सीट रिकामी ठेवली होती जिथे नर्गिसजी बसणार होत्या.

सुनिलजी आणि नर्गिसजींची प्रेमकथा एखाद्या चित्रपटांप्रमाणेच होती, शेवट पर्यंत सुनिलजींनी त्यांची साथ दिली. पहिलं प्रेम अनेकांना होतं मात्र शेवटपर्यंत ते जपायचं सौभाग्य फार कमी लोकांना मिळतं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version