Site icon InMarathi

“मा राज साहेब…” : भारत बंदच्या निमित्ताने, एक अनावृत्त पत्र

raj-bharat-bandh-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

इंधनाचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. “बहुत हुई महंगाई की मार” असं म्हणून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या कार्यकाळात झालेली इंधन दरवाढ पाहता निवडणुकीच्या आधीचे वायदे फक्त मते मिळवण्यासाठी असतात हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

या दरवाढीच्या विरोधात काल विरोधी पक्षांनी भारत बंद ची हाक दिली होती. देशाच्या अनेक भागात या बंदचे संमिश्र पडसाद उमटले. 

महाराष्ट्रात या बंद मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सक्रीय सहभाग घेतला.

बंदच्या संदर्भात एक दिवस आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिध्द केले. त्यात त्यांनी या बंद दरम्यान सामान्य माणसाला त्रास  दिला जाणार नाही आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी होणार नाही असे आश्वासन दिले होते.

 

dnaindia.com

लोकशाही मार्गाने इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करता येईल असं राज ठाकरे म्हणाले.

परंतु बंद दरम्यान आलेल्या बातम्या पाहता आंदोलन करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

पक्ष प्रमुखांनी सार्वजनिक मालमत्तेची हानी होणार नाही असे आश्वासन दिले असताना कार्यकर्त्यांनी ते पाळले नाही याची नैतिक जबाबदारी पक्ष प्रमुखाकडे जाते.

त्यामुळे या बंद दरम्यान झालेली हिंसक कृत्ये पाहता, तरुण लेखक स्वानंद गांगल यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ते इनमराठीच्या वाचकांसाठी खाली देत आहोत..

===

प्रति.
मा. राज ठाकरेजी
(अध्यक्ष- महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

महोदय,

परवा तुमच्या फेसबूक पेजवर तुमच्या पक्षाचे तुमची सही असलेले एक पत्रक (काहिंसाठी आदेश) पाहिले.

पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारतबंदला पाठींबा देणारे ते पत्रक होते. देशातला एक विरोधी पक्ष म्हणून अशा बंदांना पाठींबा देणे ही आपली राजकीय खेळी (अपरिहार्यता?) असू शकते.

तो एक राजकीय पक्ष म्हणून सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. पण परवा प्रसिद्ध केलेल्या त्या पत्रकातील एक वाक्य खूप आवडले आणि त्यासाठी तुमचे जाहिर अभिनंदन करावे असे देखील वाटले.

 

ते वाक्य असे होते

“सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेतली’च’ पाहिजे”

काल हे खरंच झाले असते तर ह्याच व्यासपिठावरून तुमचे जाहीर अभिनंदन करणार होतो आणि आभारही मानणार होतो.
पण उक्तीप्रमाणे कृती झालीच नाही हो.

कालच्या बंदच्या एकूणच बातम्या पाहिल्या तर काहि ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यांनी खरंच प्रभावी, अभिनव आंदोलने केली मग Selfie With Modi असु दे किंवा Dropper ने पेट्रोल भरणे असु दे. ही आंदोलने खरंच अभिनव होती आणि सर्वात महत्वाचे लोकशाही मार्गांनी केलेली होती.

पण अनेक ठिकाणी तुमचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसले. ज्यात त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही केले आणि सर्वसामान्य जनतेला त्रासही दिला.

 

dnaindia.com

ह्याच बंदच्या पार्श्वभूमीवर काल तुमची एक पत्रकार परिषदही झाली. त्यात तुम्ही ह्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या द्याल अशी अपेक्षा होती.
तुम्ही म्हणालात की अनेक ठिकाणी चांगली आंदोलने झाली जे मी पण मान्य केलंय. तुमच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केलेत. ते पण करणे योग्यच होते.

पण आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल काहिच बोलला नाहीत. सरकारला केसेस टाकल्या म्हणून प्रश्न तेवढा आवर्जून विचारलात.

 

 

पण साहेब, कालच्या एकूणच प्रकारानंतर महाराष्ट्राला प्रश्न पडले आहेत.

जर पक्षाच्या अधिकृत निवेदनात जाहिर करूनही तुमचे कार्यकर्ते हिंसा करत असतील, तर ह्याचा अर्थ असा होतो की तुमचे कार्यकर्ते तुमच्याच शब्दाचा/निवेदनाचा/आदेशाचा मान राखत नाहीत. तसं असेल तर ते महाराष्ट्राच्या जनतेच्या शब्दाला काय आणि किती किंमत देणार?

निवेदनातील ‘ते’ वाक्य म्हणजे केवळ ‘दाखवायचे दात’ ह्या प्रकारातील होते का?

मनसेच्या (वैयक्तिक तुमच्या नाही) पक्ष म्हणून ह्या वर्तणूकीला जनतेने दुटप्पी का म्हणू नये?

साहेब जनतेला हे प्रश्न पडतात. पण जनता हे व्यक्त व्हायला घाबरते. कारण हे वाचून तुमचा एखादा कार्यकर्ता कधी त्यांना ‘खळ्ळ-खट्याक्’ करेल काही सांगता येत नाही. मग जनता मतपेटीतून बोलते.

साहेब, महाराष्ट्राच्या जनतेला आजही तुमच्या बद्दल एक Soft Corner आहे पण तो कधीच मतांमध्ये परिवर्तीत होताना दिसत नाही.

 

youtube.com

ह्याचे खरे कारण EVM नसून पक्ष म्हणून घेतलेल्या दुटप्पी भूमिका, कार्यकर्त्यांचे वर्तन ह्या गोष्टी आहेत. ह्याचा सगळ्याचा खरंच एकदा गांभीर्याने विचार करा.

तुमच्या आणि पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी आणि भवितव्यासाठी शुभेच्छा!!

– स्वानंद गांगल
(महाराष्ट्राचा एक सामान्य नागरीक, तुमच्या Strokesचा आणि Non Political भाषणांचा चाहता)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version