दलितांवरील अत्याचाराची ही ६ प्रकरणे भारतातील लज्जास्पद वास्तव समोर आणतात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
आपला भारत देश वेगाने प्रगती करतो आहे हे सगळ्या देशवासीयांच्या एकूण जीवनशैलीतून चांगल्या प्रकारे जाणवते. गेल्या पंधरा-वीस वर्षांत ह्या प्रगतीला मोठी गती मिळाली आहे. ह्या प्रगतीने अनेक बदल झालेलेही दिसतात.
शिक्षण, तंत्रज्ञान, शेती, बांधकाम क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, बँका, दूरध्वनी, दूरदर्शन, व्यापार, दळण वळण, अंतराळ, भूगर्भातील तसेच सागरातील अमूल्य ज्ञान, पर्यावरण, मोठे छोटे उद्योग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अभूतपूर्व प्रगती मानवाने केली आहे.
अनेक प्रकारची संशोधने चालू आहेत, त्यातून मानवजातीचा मोठा उत्कर्ष गेल्या काही वर्षात आपल्याला दिसायला लागला आहे. हा बदल प्रत्येकाने आपल्यातही करून घेतला आहे. जीवनमान उंचावण्याचा आपला प्रवास जोरात सुरू आहे.
एकूणच सामाजिक, आर्थिक, विकास झपाट्याने वाढला आहे.
आपल्या देशात अनेक प्रकारचे लोक एकत्र राहतात. एकमेकात व्यवसाय वाढवतायत. स्वतःची आर्थिक प्रगती करून घेत आहेत. आपलाच देश असा आहे की अनेक जाती धर्माचे लोक इथे राहतात. पण उद्योगात , नोकरीमध्ये त्याचे बंधन आता राहिले नाही. जसजशी आर्थिक प्रगती होते आहे तसतशी ही बंधने कमी होत गेली आहेत.
तरी अजूनही आपल्या देशात काही काही भागात जाती भेद, धर्म भेद, चिकटून बसला आहे. एवढी प्रगती होत असताना काही ठिकाणी लोकांनी आपली मानसिक प्रगती करून घेतली नाही. त्या त्या ठिकाणी अजूनही जाती धर्माचे वाद होताना दिसतात.
मनामनात अजून द्वेष भरलेला आहे. काही व्यवसायातून भांडणे उद्भवतात तर काही धर्म बंधनातून. पूर्वी वर्णद्वेष होता तो काही ठिकाणी अजूनही डोकावतो आहे. यातूनच अनेकांचा बळी घेतला जातो तर अनेक घरे उध्वस्त केली जात आहेत.
वर्णभेदाचे भयानक वास्तव समोर आणणाऱ्या काही घटना आज आम्ही सांगणार आहोत.
१) दुलीना कांड
१५ ऑक्टोबर २००२ रोजीची हरियाणातील ही घटना..काही ठिकाणी दलित जनावरांची कातडी कमावण्याचे व्यवसाय करतात. पण ह्या व्यवसायातून ५ दलित तरुणांना जीव गमवावा लागला.
दसऱ्याच्या संध्याकाळी काही लोकांना मेलेली गाय दिसली, त्या लोकांनी सरळ जाऊन कातडी कमावण्याचा व्यवसाय करणाऱ्या ५ तरुणांना ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली.
पोलिसांनी जाब जबाब घेऊन त्यांना सोडून दिले पण, काही माथे भडकलेल्या लोकांनी एकाला मारहाण केली आणि जाळले. त्या जाळा मुळे बाजूची झोपडी पेटली. त्याच जाळात बाकीच्या चौघांनाही फेकले. हे “दुलीना कांड” म्हणून ओळखले जाते.
२) गोहना कांड
२७ ऑगस्ट २००५ रोजी वाल्मीक समाजाच्या ७ तरुणांना जाट लोकांनी मारहाण केली. पण त्यातले काही पळून गेले. म्हणून जाटांनी चार जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले आणि ४८ तासाची मुदत दिली. जर ४८ तासात बाकीचे पळून गेलेले पकडले नाही तर वाल्मिक लोकांची पूर्ण वस्ती जाळून टाकू अशी धमकी दिली.
३० तारखेपर्यंत २००० वाल्मिक घरे सोडून निघून गेले. ३१तारखेला १५०० जाटांनी वाल्मिक वस्तीवर हल्ला केला. ५०/६० झोपड्या पोलिसांच्या समोर जाळून टाकल्या. पोलिसांनी १२ राउंड हवेत गोळीबार करून जमावाला पळवून लावले. नंतर काही लोकांना पकडले. पण पंचकुला सी बी आय कोर्टाने पुराव्या अभावी त्यांना सोडून दिले.
३) सालवन कांड
कर्नाल जवळच्या सालवन गावातली ही घटना. २६ फेब्रुवारी २००७ रोजी, दोन वाल्मिक तरुण जनावरांना चरण्यासाठी माळ रानावर घेऊन गेले. चरता चरता गुरे एका शेतात घुसली आणि शेतातलं पीक खाऊ लागली. शेताचा मालक महिपाल राजपूत धावत आला. त्याची आणि गुरे घेऊन आलेल्या दीपक आणि लिलू ह्यांच्याशी वादावादी झाली. थोडी झटापट पण झाली. नंतर ती दोन मुले वस्तीवर गेली आणि आणखी काही तरुण मुलांना घेऊन महिपाल राजपुतकडे आली.
त्यांनी महिपालला खूप मारलं, इतकं मारलं की त्यात त्याचा मृत्यु झाला. राजपूत लोकांनी त्याचे अंत्यसंस्कार केले आणि एक मिटिंग घेतली व बराच मोठा गट वाल्मिक वस्तीवर चालून गेला ,बऱ्याच वाल्मिक लोकांना मारलं, जाळपोळ केली, २५/३०जण जखमी झाले. एका वाल्मिक तरुणाचा मृत्यू झाला.
–
- भारतातून “जात” जात का नाहीये? वाचा ८ तर्कनिष्ठ कारणं
- धर्म : भारतीय, जात : मराठी – एका पालकाचा उत्कृष्ट आदर्श!
–
४) हरियाणातल्या मिरचपूरला २०११साली एका झोपडीत एक अपंग मुलगी आणि तिच्या वडिलांना जिवंत जाळण्यात आले. द्वेषाने पेटलेल्या जमावाने हे लाजिरवाणे कृत्य केलं. २४ ऑगस्ट २०१८ रोजी कोर्टाने यासंदर्भात ३३ जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली.
५) साल २०१२, गीर, सोमनाथ जिल्हा , अकोलाडी गाव
एक अनुसूचित जातीची सुंदर मुलगी, तिच्या एकतर्फी प्रेमात पडलेला एक वाल्मिक तरुण मुलगा, ह्यांच्या दोघांच्या प्रेमाचा संशय येऊन मुलीच्या घरच्यांनी त्या तरुणांच्या घरावर हल्ला केला. तो तरुण घरात होता, त्याचे वडील बाहेर बसले होते त्यांनाही मारहाण झाली. वडील ओरडून सांगत होते की बाबा माझा मुलगा त्यात नाही. तो चांगला आहे. तुम्ही मारू नाका.
पण घरातून रागात आलेल्या त्या लोकांनी त्यांचे काही ऐकले नाही. घराच्या छपरावर जाऊन बरोबर आणलेल्या कॅन मधले रॉकेल घराचे छप्पर उचकटून त्या तरुणाच्या अंगावर ओतले आणि त्याला घरातच जाळून टाकले.
६) अहमदाबाद जिल्ह्यातल्या एक गावातली घटना. त्या गावात एक दलित सरपंच निवडून आल्यावर गावात दोन भाग पडले, भरवाल जातीच्या लोकांनी सरपंचाला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. रोज रोज कामात अडथळा आणणे , आरडा ओरडा करणे, दबाव निर्माण करणे, काम करू न देणे, असा त्रास सुरू झाला. रोज रोज हेच होत गेले.त्रासच त्रास. अनेक वेळा भांडणे होऊ लागली, एकदा मारणारी पण झाली. प्रकरण मिटेना.
त्या रागात भरवाल लोकांचा एक गट सरपंचाला जाब विचारायला त्यांच्या शेतात घुसला, तिथे बाचा बाची झाली. रागात भरवालांनी सरपंचाला शेतातच ठार केले.सरपंचाची बहीण त्याच्या न्यायासाठी कोर्टात हेलपाटे घालत होती. एक दिवस कोर्टातून परत येताना तिची पण हत्या केली गेली. सगळं संपलं.
एकीकडे आपला देश मोठी प्रगती करतोय त्यात सगळे मिळून मेहनत करतायत. त्या प्रगतीत सगळे जाती धर्माचे लोक आहेत , पण दुसरीकडे आपल्याच देशातले आपलेच लोक आपल्याच देश बांधवाचें जीव घेतायत.
ही लज्जास्पद गोष्ट आहे ह्याची जाण त्यांना नाही. कोणाचा जीव घेणे हा आपला अधिकार नाही. दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणे हाच आपल्या आत्म्याचा मुख्य गुणधर्म आहे. शांतता हेच मूळ स्वरूप आहे, हे जाणून घेतले पाहिजे.
–
- भारतातील अशी काही मंदिरे जिथे ब्राह्मण नाही तर दलित पुजारी आहेत!
- अॅट्रोसिटी कायद्यावरील निर्णय : दलितांच्या आत्मसन्मानावर पुन्हा एकदा पद्धतशीर आक्रमण!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.