' दिवसातून दोन वेळा पाहिजे ते खा; “दीक्षित-डाएट” बद्दल आयुर्वेद काय म्हणतंय? वाचा – InMarathi

दिवसातून दोन वेळा पाहिजे ते खा; “दीक्षित-डाएट” बद्दल आयुर्वेद काय म्हणतंय? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : डॉ. परीक्षीत शेवडे

===

‘दोन वेळाच जेवा’चा ट्रेंड मध्यंतरी सुरु होता हे पाहून खरं तर खूप बरं वाटलं. हा ट्रेंड रूढ करणाऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना धन्यवाद द्यावे तितके कमीच. मुळात ही संकल्पना त्यांची नसून कै. डॉ. जिचकार यांची असल्याची ते अतिशय प्रांजळपणे मान्य करतात हा त्यांचा मोठेपणा आहे.

मात्र; ही संकल्पना मुळात आहे आयुर्वेदाची. हो; आयुर्वेदीय ग्रंथांत दोन वेळाच जेवण्याचा पुरस्कार आढळतो.

मात्र एखादी गोष्ट आपल्याकडची असल्यास तिला फारसे महत्व न देणे हे; किंबहुना तिला मोडीत काढणे हे आमच्या रक्तात भिनलेले असल्याने गेली कित्येक वर्षे कित्येक वैद्य कंठशोष करून हेच सांगत असताना त्यांची हेटाळणीच करण्यात आली.

सध्या डॉ. दीक्षित यांच्यामुळे किमान या विषयाच्या अनुषंगाने चर्चा तरी सुरु झाली याबाबत त्यांचे अभिनंदन!

 

eating-two-times-inmarathi

 

या साऱ्या विषयावर लिहा अशी विचारणा बऱ्याच जणांनी आजवर केली होती; मात्र त्या आधी विषय नीट समजून घ्यावा असा विचार होता.

डॉ. दीक्षित यांची काही व्याख्याने पाहिली; परवा माझा कट्टा या कार्यक्रमात डॉ. दीक्षित यांची मुलाखत पाहिली आणि या साऱ्या विषयावर सविस्तरपणे लिहिणे गरजेचे वाटले.

काही महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे;

१. ५५ मिनिटांत जेवणे याचा अर्थ ५५ मिनिटे जेवणे नव्हे हे आतापर्यंत बहुतेक जणांच्या लक्षात आलं असेलच. त्यामुळे त्यावर चर्चा करत नाही. मात्र एकदा जेवून झाल्यावर मग एखादा आवडीचा पदार्थ दिसला तर तो त्या ५५ मिनिटांतच खायला हरकत नाही असंही मत मांडले गेलं. आयुर्वेदानुसार मात्र तसे करणे योग्य नाही.

एकदा जेवलेलं पचायच्या आतंच पुन्हा काही खाणे याला अध्यशन असं म्हणतात. असं केल्याने पचनशक्तीला अपाय होतो असं आयुर्वेद सांगतो.

यासाठीच ‘हातावर पाणी पडलं की पुन्हा खायचं नाही’ ही पद्धत रूढ झाली. त्यामुळे दिलेल्या ५५ मिनिटांत एकदा बसून जेवलात की त्यावर पुन्हा काही न खाणे हेच आयुर्वेदाला अपेक्षित आहे.

 

lunchbreak inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – प्राचीन आयुर्वेदात सांगितलेलं “या” मसाल्याच्या पदार्थाचं वैद्यकीय महत्व प्रत्येकाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे

२. दिलेल्या ५५ मिनिटांत तुम्हाला आवडेल ते खा; हा संदेशही योग्य नाही. प्रत्येक आहारीय पदार्थाचे गुणधर्म वेगळे असतात. आरोग्याला वाईट असलेले पदार्थ जरी नेमून दिलेल्या ५५ मिनिटांत घेतले तरी त्याचे दुष्परिणाम होणारच आहेत हे लक्षात घ्या.

शिवाय; पचायला जड आणि हलके असंही वर्गीकरण आयुर्वेदाने केलंय. जड पदार्थ आपल्या क्षमतेच्या निम्मेच खावे तर हलके पदार्थ जेमतेम क्षमतेपर्यंतच खावे असंही आयुर्वेद सांगतो.

३. ‘अग्नि’ ही अत्यंत महत्वपूर्ण संकल्पना आयुर्वेदाने आपल्याला दिली आहे. आहाराची मात्रा ही अग्निनुसार असावी असं आयुर्वेद सांगतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा अग्नि हा साधारणपणे तीक्ष्ण असतो. म्हणजेच त्या अन्न लवकर पचवू शकतात.

यासाठीच त्यांना केवळ दोनवेळा आहार घेऊन चालत नाही.

आचार्य सुश्रुतांनी त्यांना ‘दन्दशूक’ म्हणजे ‘सतत खादाडी करणारे’ असा शब्द योजला आहे.

सध्याच्या काळात पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी किमान तीन वेळा खाणे संयुक्तिक आहे. अन्यथा आयुर्वेदीय सिद्धांतांचा विचार करता; त्यांचा तीक्ष्ण असलेला अग्नि हा त्यांच्या शरीरातील धातूंना पचवायला सुरुवात करेल!

 

thali-inmarathi

 

४. आयुर्वेदानुसार; केवळ हेमंत ऋतूत नाश्ता करावा असं सांगितलं आहे. या ऋतूतल्या थंडीमुळे आपली भूक आणि पचनशक्ती एकंदरच वाढलेली असते हे आपण अनुभवतो. हाच नियम जिथे सतत थंड वातावरण असेल अशा प्रदेशांतही लावणे गरजेचे असते.

यासाठीच बऱ्याच पाश्चात्य देशांत ब्रेकफास्टचं अनन्यसाधारण महत्व आढळतं. आपल्याकडेही उत्तरांचलादी प्रदेशांत या नियमाचा विचार करावा लागेल.

 

breakfast inmarathi

 

५. मेदस्वी वा स्थूल किंवा कफ प्रकृतीच्या व्यक्ती, काही ठराविक विकार यांमध्ये दोन वेळाच जेवण्याचा आग्रह (तेही आहाराचे गुणधर्म लक्षात घेऊन आणि अध्यशन न करता) करणं योग्य ठरेल. मात्र केवळ इन्शुलिनचं ‘माप’ इतक्याच एका घटकाकडे लक्ष देत हा डोलारा उभारणं हे शरीरातील एकंदर धातूव्युहनाला घातक ठरू शकतं.

धातूंचा क्षय झाला की वात वाढीला लागतो. आणि प्रमेही व्यक्तींत वातप्रकोप झाल्याने प्रमेहाचे रुपांतर मधुमेहात (इथे मधुमेह म्हणजे डायबेटीस नव्हे) होऊन तो असाध्य होतो; असं आयुर्वेद सांगतो हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे.

 

diabetes-inmarathi

 

हत्ती कसा असतो? तर शेपूट धरलेल्या व्यक्तीसाठी दोरखंडासारखा, पाय पकडलेल्यासाठी खांबासारखा; असा प्रकार होणे हे विषयाच्या समग्र ज्ञानापासून दूर नेणारे असते.

जसा हत्ती समजावून घेण्यासाठी तो उघड्या डोळ्यांनी पूर्ण पहायला हवा; तसेच केवळ इन्शुलिनच्या मागे न लागता प्रकृती, बल, देश, काल, दोष-दुष्य अशा नैक मुद्द्यांचा सखोल विचार त्यामागे हवा.

 

insulin-inmarathi

 

आहारासारखा विषय हा सब घोडे बारा टके या न्यायाने न नेता ‘पुरुषं पुरुषं वीक्ष्य’ असा टेलरमेड असला पाहिजे. तो रेडीमेड असून उपयोगाचा नाही.

प्रत्येक नियमाला अपवाद असतात हे जगन्मान्य तत्व ध्यानी ठेवलं की; माझा मुद्दा सहज लक्षात येईल. या विषयाच्या निमित्ताने आयुर्वेदाचा एक नियम पाळायला सुरुवात होईल अशी आशा आहे.

 

Ayurveda medicines InMarathi

हे ही वाचा – डाएटिंगचे विचित्र पाश्चात्य परिमाण : वाचा पचनशक्तीनुसार आयुर्वेदाचा मौलिक सल्ला

पण आयुर्वेदच पाळायचा आहे तर तो सगळ्या पैलुंतून नीट समजावून घेऊन आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने पाळणे अधिक संयुक्तिक ठरेल; नाही का? एकदा जरूर विचार करून पहा!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?