Site icon InMarathi

बालपण पुन्हा जगायचंय? तुमच्या प्रिय बालपणी घेऊन जाणाऱ्या “टाईममशीन” मालिका…

doordarshan-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

ज्या काळात कोणी मसालेवाली ३०० कोटींची डिल वगैरे करण्याचा फालतूपणा करत नव्हती, बिग बॉस सारखे घरातले भांडण चव्हाट्यावर येत नव्हते, स्वतःच्या घरात काळं कुत्रही न विचारणारे लोक्स टीव्हीवर येऊन ज्ञान पाजत नव्हते, भडकपणा नव्हता, चित्रविचित्र मेकअप नव्हते, फॅमिली शो मध्ये सगळी फॅमिली सोबत बसून कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकायची (आजकाल वेगवेगळं बसावं लागतं).. तो काळ..

ज्या काळात सिरिअल्सच्या बजेटपेक्षा त्याच्या स्टोरीला महत्व होतं, ज्या काळात कॅमेरापेक्षा अभिनेत्यांच्या ऍक्टिंगला प्राधान्य असायचं, प्रत्येक सीरिअलचं गीत-संगीत त्या सीरिअल इतकंच महत्वाचं असायचं.

सिरीयल लागली की, अख्ख घरं टीव्ही समोर बसलेलं दिसायचं. आई स्वयंपाक घरातून बाहेर येऊन भाजी निवडत निवडत, बाबा वर्तमानपत्र बाजूला ठेऊन, एकीकडे आजी-आजोबा, दादा-ताई आणि सोबत आपण अभ्यासाचं पुस्तक समोर ठेऊन लपत छपत टीव्ही बघायचो.

आजकालच्या अर्थहीन सिरिअल्स बघून आपण कधीकधी वैतागुन जातो, अगतिक होतो आणि आपल्याला आठवतात जुने दिवस, त्या जुन्या काळच्या दर्जेदार सीरिअल्स… त्यातल्या व्यक्तिरेखा… त्याचे शीर्षक संगीत.. जे अजूनही आपल्या मनामध्ये रेंगाळत असतात.

या सिरियल्स आजही आठवल्या तरी एखाद्या टाईम मशीनप्रमाणे त्या आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जातात.

अश्याच काही निवडक सीरिअल्सच्या आठवणी घेऊन आलोय तुमच्याकरता…ज्या तुम्हाला तुमच्या जुन्या दिवसांत नेतील..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१) चंद्रकांता

तिलीस्मी दुनिया, अचाट जादू, शराब, शबाब, गुप्तहेर, विलक्षण लढाया ह्यासारख्या रंजक घटनांनी भारलेली सीरिअल म्हणजे चंद्रकांता.

१९९४ मध्ये दूरदर्शनवर दाखवल्या गेलेल्या आणि देवकी नंदन खत्री यांच्या कादंबरीवर आधारित ह्या सीरिअलची निर्मिती आणि दिग्दर्शन नीरजा गुलेरी ह्यांनी केली.

राजकुमारी चंद्रकांता, विक्रम सिंग, अखिलेंद्र मिश्रांचा क्रूर सिंग म्हणजेच यक्कु, इरफान खानचा बद्रीनाथ आणि सोमनाथ ह्या सगळ्या व्यक्तिरेखांच्या जादूची मोहिनी अख्ख्या भारतावर पसरली होती. ह्या सीरिअलला भारताचं गेम ऑफ थ्रोन्स म्हणायला काहीही हरकत नाही.

 

गेम ऑफ थ्रोन्स सारखंच राजकारण, प्रेम, जादू ह्या सिरीयल मध्येही दाखवलं गेलंय. फरक इतकाच की, ही सीरिअल आपण संपूर्ण परिवार सोबत बसून बघू शकायचो.

कलाकारांच्या दर्जेदार अभिनयामुळे ह्या कथेची रंजकता अधिकच वाढली होती. आजही कोणाचे विचित्र केस झाले की, आपण त्याला यक्कु म्हणतो यातच सीरिअलचं यश आहे.

२) शक्तिमान

सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, आयर्नमॅन हे सगळे जेव्हा भारतामध्ये पूर्णपणे प्रवेश करायचे होते तेव्हा, भारताचा एक हक्काचा सुपरहिरो भारताकडे होता, तो म्हणजे शक्तिमान.

होल अँड सोल मुकेश कुमार असलेली हि सिरीयल तेव्हा किशोर, तरुण, त्यांचे आईवडील ह्या सर्वांची आवडती होती.

विनोद राठोडच्या “अद्भुत अदम्य साहस की परिभाषा है” भरड्या आवाजात टायटल सॉंग सुरु झालं की, अख्ख्या भारतातली मैदानं ओस पडायची.

आधी शनिवारी आणि नंतर मग रविवारी सुरु झालेल्या ह्या सिरीअलची वाट करोडो शाळकरी मुलं चातकासारखी बघायची.

अंधेरा कायम रहे म्हणणारा व्हिलन आमच्यासाठी सर्वात नृशंस व्हिलन होता. पॉवर म्हणत आपले प्लॅन्स आखणारा डॉक्टर जॅकोलला बघूनच चीड यायची.

“गंगाधरही शक्तिमान है” हे माहिती असूनही तो गंगाधर जेव्हा जेव्हा त्याचा तो गबाळा वेष टाकून रफटफ शक्तिमानच्या वेशात यायचा, दुष्ट ताकदींपासून मुंबई शहराला वाचवायचा, तेव्हा एक वेगळीच ऊर्जा आपल्या पण शरीरात सरसरायची.

 

ह्या सिरीयलचं वेड एवढं पसरलं गेलं की शक्तिमान आपल्याला वाचवायला येईल म्हणून मुलांनी घरावरून उड्या मारल्या आणि स्वतःच्या तंगड्या तोडून घेतल्या.

बालमनावर वाईट संस्कार होत असल्याची टीका ह्या सिरीयलवर केली गेली.

शेवटी मुकेश खन्नांनी सिरीयलच्या शेवटी “छोटी मगर मोटी बाते” हे सदर चालवून मुलांना संस्कार द्यायला सुरवात केली. हे सदर देखील प्रचंड लोकप्रिय झालं. त्यातलं “सॉरी शक्तिमान” वर आजही मिम्स बनतात.

३) अलिफ- लैला

काळी  जादू, मोठाले राक्षस, उडणारे गालिचे, दिवा घासल्यावर त्यातून निघणारे जीन, बोलणारे प्राणी, छोट्याला मोठं आणि मोठ्याला छोटं करणारे आणि समोरच्याला गायब करू शकणारे  रसायनं, मोहित करणाऱ्या अप्सरा, चकित करणारे जादूगार, भीतीदायक राक्षस ह्या सगळ्यांचं थक्क करणार जग म्हणजे अलिफ लैला.

 

 

अरेबियन नाईट्स ह्या लोकप्रिय कथासंग्रहावरून ही सीरिअल बनवण्यात आली. शहजादा शहरयारला एकेक कथा सांगत जातो आणि कथा पुढे सरकत जाते. प्रत्येक कथेमध्ये घडणाऱ्या अकल्पित घटनांनी आपण चकित होत जातो.

त्या काळी तंत्रज्ञान तेवढं मजबूत नव्हतं. जगामध्ये स्पेशल इफेक्टस वगैरे तंत्राची व्याख्या बदलून गेली होती. हॉलीवूड मध्ये अचाट करणाऱ्या फिल्म्स बनत होत्या.

भारतामधेही असलं काहीतरी करावं म्हणून सागर बंधूनी हि सिरीयल बनवली आणि संपूर्ण भारताला मोहात पाडलं.

आजवर केवळ ऐकलेल्या कथा डोळ्यांसमोर दिसू लागल्यामुळे आबालवृद्ध हि सिरीयल मंतरल्या सारखे बघायचे.

सिंदबादची सफर, अल्लादिनचा चिराग, अलीबाबा और चालीस चोर सारख्या लोकप्रिय कथा प्रत्यक्षात बघायला मिळाल्या त्या केवळ अलिफ लैला मुळेच.

 

४) दामिनी

“सत्यता शोधण्या घेऊनी लेखणी…!!” गाणं लागताच घरातल्या सगळ्या स्त्रियांच्या दुपारच्या झोपा पूर्ण होऊन वाफाळलेला चहाचा कप हातामध्ये घेऊन त्या टीव्हीसमोर बसत.

दामिनी… एक करारी स्त्री.. अन्याया विरुद्ध जगाशी लढायला निघालेली.

महाराष्ट्रातली प्रत्येक स्त्री दामिनी मध्ये स्वतःला कुठेतरी शोधायची. प्रतीक्षा लोणकर हा चेहरा तेव्हाच पूर्ण महाराष्ट्रात गाजला. दुपारची वामकुक्षी आणि त्यानंतर दामिनी हे महाराष्ट्राचं समीकरणच बनलं होतं.

 

५) चित्रहार

गाणी बघायची, ऐकायची आवड आहे? कुठे बघता? यूट्यूब, गाण्यांचे वेगवेगळे ऍप्स चुटकीसरशी उपलब्ध आहेत. पण जेव्हा ह्या सगळ्या साईट्स, ऍप्स नव्हते तेव्हा सगळयांच्या हक्काचा आणि आवडीचा कार्यक्रम म्हणजे चित्रहार.

दर शुक्रवारी रात्री हा कार्यक्रम लागल्यावर घराघरात, रस्त्यावर, गल्यांमधे, दुकानांमध्ये सगळ्या ठिकाणी एकच गाणे ऐकू यायचे. बिनाका गीतमाला मुळे सगळा देश सुरेल झालाच होता पण गाणं बघायला मिळायचं एकमेव माध्यम म्हणजे चित्रहार होतं.

 

 

६) देख भाई देख

मोठं घर असून उपयोग नाही. घरात माणसं हवीत. सध्या मायक्रो फॅमिलीचं युग आहे. नवरा-बायको आणि अपत्य एवढेच घरात राहतात.

त्यातल्या त्यात कोण एकाची शिफ्ट US टायमिंग्स नुसार असेल तर, नवरा ऑफिस वरून यायच्याआधी बायको ऑफिस ला निघून गेलेली असते.

परिवार, परिवाराने वाटून घेतलेले सुखदुःख.. त्यांच्या गमतीजमती सध्याच्या पिढीला ठाऊकच नसणार. पण ह्याच मोठ्या परिवाराच्या गमतीजमतींवर सीरिअल येऊन गेली. “देख भाई देख..!!”

ही एका एकत्र कुटुंबाची गोष्ट. दिवाण कुटुंब. त्यात भरपूर मेंबर्स. आजोबा-आजी,मोठे काका-काकू, लहान काका-काकू, सगळ्यात लहान काका, सख्खे भावंडं, चुलत भावंडं असल्या सगळ्या गोतावळ्याची मजा अनुभवून देणारी ही सिरीयल अख्ख्या फॅमिलीने सोबत बसून बघितल्याशिवाय बघितल्याचे फिलिंगच येत नसे.

 

 

हलके फुलके जोक्स, सगळ्यांचे ठरावीक चटपटीत संवाद ह्यामुळे वेगळाच खुसखुशीत आनंद ही सीरिअल देत असे. दिवाण कुटुंबाची ही गोष्ट भारतातल्या सगळ्या कुटुंबाची गोष्ट होऊन गेली होती. शेखर सुमनची खरी ओळख ह्याच मालिकेद्वारे सगळ्यांना झाली.

६) ऑफिस ऑफिस

नव्वदीचं दशक संपलं आणि २००० मध्ये सब टीव्हीवर ऑफिस ऑफिस ही सीरिअल सुरु झाली. आता कधीही सब टीव्ही लावल्यावर आपल्याला तारक मेहता का उलटा चष्मा चालू दिसतं.

२४ तासांपैकी जवळपास १८ तास तारक मेहताचा पगडा सब टीव्ही वर असतो.

पण, तारक मेहताच्या येण्याच्या काही वर्षांआधी जेव्हा सब टीव्ही नवीन सुरु झालं होतं तेव्हा ऑफिस ऑफिस हा भारतातला नंबर एक कॉमेडी शो होता.

कुठल्यातरी एका ऑफिसच्या पायऱ्यांवर चपला घासून घासून त्रस्त झालेला मुसद्दीलाल म्हणजेच पंकज कपूर आणि ऑफिसमधले कर्मचारी म्हणजे उषाजी, शुक्लाजी, पटेल आणि पांडे (सॉरी, पांडेजी) ह्या सगळ्यांनी आपल्याला भरपूर हसवलं.

 

 

लाच घेण्याच्या साध्या विषयावर बनलेली ही सीरिअल म्हणजे केवळ चार भिंतीमध्ये घडलेली कथा आहे. मोठं बजेट नसताना मोठे कलाकार नसताना केवळ कथा आणि पटकथेवर कोणीतही सीरिअल प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू शकते ह्याचं ऑफिस ऑफिस हे समर्पक उदाहरण आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version