हसताय ना? हसायलाच पाहिजे! सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग : भाग २
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
मागील भागाची लिंक : हसताय ना? हसायलाच पाहिजे ! सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग – भाग १
===
सनातन संस्था हे नाव आता तुम्हा सर्वांना परिचयाचे झाले असणार, सनातन संस्थेवर सध्या दहशतवादी हल्ला घडवणून आणण्याची तयारी करण्याचा आरोप आहे. अर्थातच त्यांनी हे कृत्य केलं की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.
पण तत्पूर्वी आपण मागे बघितलं होतं की सनातन संस्था ही कशाप्रकारे हिंदू मध्ये “जनजागृती”– साठी हिंदूंसाठी निरनिराळे फतवे काढत असते.
ते फतवे किती निम्न शास्त्रीय व बुद्धिभेद निर्माण करणारे असतात हे आपण बघितले. सनातन संस्था तेवढ्यावर थांबत नाही. तर सनातन संस्थेने हिंदूंनी कसं आचरण ठेवावं, कोणती क्रिया कशी करावी, कश्याप्रकारे काही गोष्टी करणं टाळावं याचं “शास्त्रीय” मूल्यमापन देखील दिलं आहे.

हे इतकं शास्त्रीय आहे की, नासाचा शास्त्रज्ञांना देखील लाजवेल.
चला तर आपण जाणून घेऊयात सनातन संस्थेचं अजब तर्क विज्ञान, ज्यातून होणार हिंदूंचा उद्धार !
१) तुम्ही कपडे कसे धुतात?
कपडे धुणे ही एक कला आहे, असं जर कोणी म्हटलं तर नवल वाटत नाही. ती खरंच एक कला आहे, आजकल तर वॉशिंग मशीनचा जमाना आहे, पण प्राचीन काळापासून कपडे धुण्याला शास्त्र खूप महत्वाचं मानत आलं आहे, असं सनातनचे मत आहे.
एका विशिष्ट दिशेला बघत कपडे धुतल्यास त्या कपड्यांचा मळ निघून जातो. त्यातून सुवास पण येतो सोबत त्या कपड्यांची आध्यात्मिक पातळी वाढते आणि माणूस सकारात्मक होतो, त्याचं प्रत्येक काम फत्ते होतं.
त्याला कसलेच टेन्शन राहत नाही. त्यामुळे प्रत्येकाने कपडे धुतलेच पाहिजे. त्यात वाकून कपडे धुतले तर अलभ्य लाभ भेटत असतो.

मळके कपडे घातल्याने रज तम गुण वाढतात, जर तुम्ही हॉस्टेल ला राहत असाल आणि दहा बारा दिवस अंघोळ करत नसाल तर मग तुमचा राक्षस झाला असणार अथवा चार पाच ब्रम्ह राक्षस तुमच्या शरीरात मुक्कामाला असणार , असं सनातनच्या धार्मिक लॉजिकच सरळ सरळ संदर्भासहित स्पष्टीकरण देता येईल.
२) तुम्ही भात कसा बनवता?
सावधान! जर तुम्हाला भात आवडत असेल आणि तुम्ही तो बनवण्यासाठी कुकरचा वापर करत असाल तर ते त्वरित थांबवा, भात बनवतांना तुम्ही सनातन शास्त्राचा अवलंब करत नाही आहात, तुम्ही तो कुकरचा भात खाऊन स्वत:ला पापाचा भागीदार बनवत आहात.
त्यातल्या त्यात तो नैवेद्य म्हणून देवाला दाखवला तर मग विषय संपला, देव तुम्हाला नरकात टाकतो का नाही ते बघा !
पण फिकर नॉट, आपल्या सनातन संस्थेने जनसेवेसाठी अजून एक व्यवस्था लावली आहे. जर तुम्हाला भात खायचा असेल तर तुम्ही तो कुकर ऐवजी भांड्यात तयार करा, अगदी सनातनच्या साईट वर दिल्याप्रमाणे पाणी, तांदूळ वापरा.
मग बघा तुमचा भात कसा लसलशीत होतो ते, अगदी अमृततुल्य लेव्हलचा भात, मग बघा तुमची आध्यात्मिक पातळी कशी वाढते. सोबतच सिलेंडर संपायचा स्पीड पण वाढेल फक्त पाकिटातील पैसे कमी होतील.

चालतंय की ! अध्यात्मिक पातळी साठी इतकं केलेलं.
३) हात पाय धुंण, गुळण्या करणं!
तुम्ही बाहेरून आल्यावर हात पाय धुतात का? जर हो तर तुम्ही वैद्यकीय शास्त्रानुसार अगदी योग्य करतात, तुम्ही झोपेतून उठल्यावर गुळण्या करतात? तर ते देखील योग्यच करतात. पण तुम्ही ते सर्व करतांना धार्मिक पुस्तकात ते कसं करावं याबद्दल जे मत पूर्वजांनी सनातन च्या साईटवर व्यक्त केलं आहे ते जाणतात का?
नाही तर तुम्ही धोक्यात आहात, सनातन संस्थेच्या मते यानुसार तुमच्यात रज तम गुण वाढीस लागून तुमच्यात काम क्रोधाची वाढ होऊन तुमचा आध्यात्मिक पातळीची पार वाट लागली आहे.

हे सर्व रोखण्यासाठी नेहमी प्रमाणे सनातन संस्था धावून आली आहे, तर यापुढे कधीच उत्तर, दक्षिणेकडे तोंड करून हातपाय धुवायचे नाहीत आणि गुळण्या पण करायच्या नाही.
फक्त पूर्व दिशेकडे करून करायच्या, सूर्याचे किरणं पडून तुमची अध्यात्मिक पातळी वाढण्यास मदत होईल बहुतेक, तुम्ही अमृता सारखे शुद्ध व्हाल, तुम्हाला आजार होणार नाही. आयुष्यभर निरोगी राहाल, हो हे सर्व करतांना भगवान विष्णुचं नाव घेत राहिलं तर वैकुंठ वासी व्हाल.
४) ब्रश वापरु नका!
तसे तर युरोपियन लोकांनी आपल्या संस्कृतीवर भयंकर आक्रमण केलं त्यामुळे प्रचंड नुकसान आपलं झालं, ते तर परतले पण त्यांनि कोलगेट आणि तिच्यासोबत टूथब्रश ह्या गोष्टी आपला धर्म भ्रष्ट करायला ठेवल्या आहेत.
जर तुम्ही ब्रशने दात घासत असाल तर तुम्ही मूर्ख आहात, त्यात तुम्ही शास्त्रीय परंपरांचा अवमान करत आहात, ब्रशने दात घासल्याने तुम्ही स्वतःच्या शरीराला अध्यात्मिक गतीच्या वाटेवर जाण्यापासून रोखत आहात, यातून तुम्ही स्वतःच आणि समाजाचं नुकसान करत आहात!

त्यामुळे यापुढे तुम्ही फक्त बोटाने दात घासायला हवेत कारण तुमच्या बोटाने दात घासल्याने मुख दुर्गंधी मुक्त होऊन तुम्ही एकदम स्वच्छ अनुभव येईल तसेच तुमच्या बोटातील ऊर्जा तुमच्या मुखातून शरीर भर प्रसारित होईल. त्यामुळे तुम्ही हे करायलाच हवे.
अजून एक महत्वपूर्ण सूचना श्राद्ध आणि अमावस्येला दात घासू नये असं म्हणतात तुमच्या बोटात त्या दिवशी पितरांचा वास असतो !
५) तुमच्या पाल्याची अध्यात्मिक पातळी तुम्हाला माहिती आहे का?
तुम्ही तुमच्या पाल्याचा जन्म झाल्यावर जश्या त्याचा वेगवेगळ्या टेस्ट करता, वेगवेगळ्या लसी देतात, तशी तुम्ही तुमच्या पाल्याची आध्यात्मिक पातळी तपासता का हो? नेमकं तुमच्या घरी जन्माला आलेलं मूल हे नरकातुन आलं आहे की स्वर्गातून आलं आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?
नसेल तर मग त्वरित जाऊन ते कुंडली द्वारे तपासून बघा, जर कमी अध्यात्मिक पातळी असेल तर कदाचित ते बाळ तुम्हाला प्रचंड त्रास देईल, तुम्ही त्याच्याकडून जी सुखाची अपेक्षा करत आहात ते सुख तो बाळ तुम्हाला देऊ शकणार नाही!
–
- दाभोलकर हत्येचे आरोपी ते ATS च्या नजरेतील संभाव्य दहशतवादी : सनातन संस्थेचा लेखाजोखा
- भारतातून “जात” जात का नाहीये? वाचा ८ तर्कनिष्ठ कारणं
–
आता तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बाळाची आध्यात्मिक पातळी कशी वाढेल यासाठी सनातन संस्थेशी संपर्क करा, त्यासाठी आवश्यक होमहवन करा. ही तुमच्या पाल्याचा भविष्याची गरज आहे.

वरील लिखाण अत्यंत उपरोधिक पद्धतीने लिहण्याचं कारण एकच होतं की, जनमाणसाने विवेकाला धरून अश्या संघटनांच्या ह्या विकृत प्रचाराला बळी पडू नये. हिंदु धर्माचा पाया हा बुद्धिप्रामाण्यवाद आहे.
परंतु सनातन संस्था मात्र त्या विपरीत काहीतरी विकृत असं समाजात रुजवत आहे. प्राचीन काळापासून भारतात अनेक विद्वान लोक वास्तव्य करून गेले आहेत.
त्यांनी वेद वेदांत उपनिषद यासारख्या शास्त्रांची निर्मिती केली. परंतु त्यात कुठेच ह्या अश्या प्रथा परंपरांचा उल्लेख नाही.
ह्या सर्व मध्ययुगीन मानसिकतेच्या विकृत प्रथा आहेत. ज्या आजच्या २१ व्या शतकातील बुद्धिप्रामाण्यवादी समाजाला स्वीकारहार्य नाही. तुम्ही ठरवा तुम्हाला विकृतीची साथ द्यायची आहे की संस्कृतीला विज्ञानाची सांगड घालून एक सुसंस्कृत समाज घडवायचा आहे?
कारण हे जे मांडत आहे ते विज्ञान नाही पण विज्ञानाचे कवच ओढून पसरवलेली कुठलीतरी पोथीनिष्ठ विकृती आहे. ह्या अपप्रचाराला बळी पडू नका इतकिच कामना!
–
- कपटी मनुवाद्यांचा, रक्षाबंधन, सण का साजरा करू नये : एक तथाकथित पुरोगामी चिंतन
- “भारत एक “राष्ट्र” नाही” असं म्हणणाऱ्यांनी एकदा विचार करून पहावा
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.