Site icon InMarathi

आणि ह्या एका अवलिया शिक्षकामुळे देशाला सचिन तेंडुलकर मिळाला

teacher-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एक किशोरवयीन मुलगा शाळेच्या ज्युनिअर टीम कडून क्रिकेट खेळायचा. एके दिवशी त्याच्या शाळेच्या सिनिअर टीमची वानखेडे स्टेडियमवर मॅच होती. हा मुलगा ती मॅच बघायला तिथे पोचला.

वास्तविक त्याच्या कोचने त्याला सांगितलं होतं की, शाळा सुटल्यानंतर तू प्रॅक्टिस मॅच खेळायला जा. पण त्याने ते ऐकलं नाही.

त्याला वाटलं की नेट प्रॅक्टिस केली म्हणजे भरपूर सराव झाला. त्याचे कोच वानखेडे वर उपस्थित होतेच. मॅच संपल्यानंतर हा मुलगा कोच सरांकडे गेला आणि त्यांना नमस्कार करू लागला. सरांनी विचारलं,

“आजच्या प्रॅक्टिस मॅच मध्ये तू किती रन काढलेस?”

“सर, मी नेटप्रॅक्टिस भरपूर केलीय. इथे सिनिअर टीम ला चिअर अप करायला आलो होतो.”

त्यावर सर खूपच भडकले! सर्वांच्या समोर मुलाच्या गालावर एक थप्पड मारून त्याची खरडपट्टी काढत म्हणाले,

“तू दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवणे बंद कर. स्वतः असे काही करून दाखव जेणेकरून लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील!”

तो मुलगा म्हणजे सचिन तेंडुलकर! आणि ते कोच म्हणजे रमाकांत आचरेकर!

 

India.com

स्वतः सचिनने हा किस्सा सांगितला आहे. तो म्हणतो की सरांनी माझ्यासाठी तो फार मोठा धडा दिला. त्या दिवसापासून मी एकही प्रॅक्टिस मॅच चुकवली नाही.

शिक्षक फक्त ज्ञान देतात असे नाही तर तर ते विद्यार्थ्याचा या जगात वावरण्यासाठी सर्वांगीण पद्धतीने विकास करतात. ज्यांना असे गुरू लाभले ते नेत्रदीपक कामगिरी करून दाखवल्याशिवाय राहत नाहीत.

द्रोणाचार्य आणि अर्जुनाप्रमाणे आचरेकर आणि सचिन तेंडुलकर ही अशीच गुरुशिष्यांची जोडी. आज सचिनने आयुष्यात जे काही मिळवलंय त्याच्या मागे रमाकांत आचरेकर सरांचे योगदान आहे हे तो विसरला नाही.

आचरेकर सर कोच म्हणून कार्यरत होण्यापूर्वी स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू होते. मुंबई आणि इतर ठिकाणच्या प्रतिभेला हेरून त्याला पैलू पाडायचे काम ते मोठ्या आवडीने करीत.

अशातच त्यांना सचिन तेंडुलकर नावाचा हिरा सापडला. सचिन लहानपणापासूनच क्रिकेट वेडा. लहान असताना तो रबरी बॉलने खेळायचा. मात्र तो अकरा वर्षांचा झाल्यावर क्रिकेटची आवड बघून त्याच्या भावाने, अजितने त्याला आचरेकर सरांकडे सोपवला.

हा अजितचा निर्णय सचिनच्या आणि पूर्ण क्रिकेट विश्वाच्या भविष्याला कलाटणी देणारा ठरला असे म्हटल्यास चुकीचे नाही.

 

Rediff.com

त्यावेळी आचरेकर सर शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत अधिकृत क्रिकेट कोच होते. सचिनची शाळा वेगळी होती पण आचरेकर सर त्याचा खेळ पाहून प्रभावित झाले आणि त्याचे ऍडमिशन शारदाश्रम मध्ये करायला लावले. त्यामागे जास्तीत जास्त काळ सोबत राहून क्रिकेटचा सराव करता यावा हे कारण होते.

दोघे कित्येक तास शिवाजी पार्क मैदानावर एकत्र घालवत असत. आचरेकर सर सचिनला वेगवेगळ्या मैदानावर, वेगवेगळ्या संघासोबत खेळायला लावत.

त्यातून कुठल्याही परिस्थिती मध्ये, कोणत्याही पिचवर आणि कश्याही बॉलिंगवर खेळायची त्याची क्षमता विकसित होत गेली.

सचिन सांगतो की, कित्येक तासांच्या अथक सरावानंतर जेव्हा मी अतिशय थकायचो तेव्हा सर मला ग्राउंडवर पळायला सांगायचे. यामुळे पुढील आयुष्यात खेळताना कधी थकवा जाणवलाच नाही!

 

 

आचरेकर सरांकडे आणखी एक टेक्निक होती. ज्यावेळी सचिन बॅटिंग करून करून कंटाळायचा त्यावेळी सर मधल्या स्टंपवर एक रुपयाचे नाणे ठेवायचे आणि टीमला चॅलेंज द्यायचे. जो बॉलर हे नाणे पाडून दाखवेल त्याला तो एक रुपया बक्षीस.

आणि समजा कुणीच पाडू शकलं नाही तर तो एक रुपया सचिनचा!

मग मात्र सचिनला स्फुरण चढायचं… बॉलर त्या एक रुपयासाठी खेळायचे मात्र सचिन इर्षेला पेटून न हारण्यासाठी खेळायचा. अर्थातच ते नाणे बऱ्याचदा सचिनच्याच खिशात जायचे ही गोष्ट निराळी!

त्यावेळी जमवलेली ती नाणी सचिनने अजूनही जपून ठेवली आहेत. नंतर मिळालेल्या कुठल्याही पुरस्कारापेक्षा ती नाणी त्याला जास्त महत्वाची वाटतात.

मी त्या नाण्यामुळे कठीण परिस्थितीत जास्त मेहनत करायला आणि स्पर्धात्मक खेळायला शिकलो असे सचिन कृतज्ञतापूर्वक नमूद करतो.

आता या वयात क्रिकेटमधून सचिनने बरेच काही मिळवले आहे. पण तरुही त्याचे डोळे त्या लहानपणीच्या सचिनला शोधत असतात जो सचिन आचरेकरांचा आशीर्वाद मिळवला की मोठा खजिना मिळाला या आनंदात असायचा.

 

youtube.com

 

आचरेकर सर एकदा म्हणाले होते, शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या रुपात स्वतःचे यश पाहतो. माझ्यासाठी माझे यश म्हणजे सचिन तेंडुलकर आहे.

खरोखर आपण असे म्हणू शकतो की रमाकांत आचरेकर हे आधुनिक द्रोणाचार्य आणि सचिन हा आधुनिक अर्जुन आहे.

थोडंसं आणखी जाणून घेऊया या द्रोणाचार्याबद्दल :

रमाकांत आचरेकर यांचा जन्म मालवण येथे १९३२ साली झाला. त्यांनी १९४३ पासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अनेक नामांकित क्लब कडून खेळून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यानंतर त्यांनी आपले ध्येय क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट शिकवण्याकडे केंद्रित केले.

शिवाजी पार्क येथे ‘कामत मेमोरियल क्रिकेट क्लब’ची स्थापना करून कोचिंग देणे सुरू केले.

सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे ही त्यांच्या काही शिष्यांची नावे.

यावरून कल्पना येऊ शकते की ते कुठल्या दर्जाचे शिक्षक आहेत. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य क्रिकेट साठी आणि क्रिकेट शिकवण्यासाठी, टिकवण्यासाठी वेचले आहे. जगाच्या तुलनेत भारतीय क्रिकेट कुठेच मागे राहू नये यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पाहून नतमस्तक व्हायला होतं. सध्या त्यांचा कोचिंग क्लब त्यांची मुलगी आणि जावई चालवतात.

 

CricketCountry.com

 

क्रिकेटमधील या त्यांच्या योगदानासाठी त्यांना १९९० मध्ये ‘द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त झाला. एवढंच नव्हे तर २०१० मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ देखील राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला गेला.

क्रिकेटमधील योगदानासाठी कृतज्ञ राहून संपूर्ण क्रिकेट विश्वातर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्काराने देखील ते सन्मानित झाले आहेत.

 क्रिकेट जगताचे महागुरू आचरेकर सरांचे आभार मानावे तितके कमीच आहेत! आपल्याला सलाम सर!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version