Site icon InMarathi

इस्लामी आक्रमणापासून स्व-संरक्षणास भारतात आलेला “हा” समुदाय इथेच स्थायिक झाला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत अनेक जातीधर्मांचा देश आहे. या देशात हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन हे प्रमुख समाज असले तरी आणखी एका समाजाने भारत देशाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान दिले आहे… तो म्हणजे पारशी समाज!

हे पारशी लोक बाहेरून येऊन दुधात साखर मिसळावी तसे भारतात मिसळले. गेल्या कित्येक वर्षांपासून इथल्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक घडामोडींचा हिस्सा बनले.

 


पण मुळात आपला स्वतःचा प्रदेश सोडून त्यांना भारतात येऊन राहण्याची गरज का भासली असेल याचा मागोवा घेतल्यानंतर मिळालेली माहिती अतिशय मनोरंजक आहे.

पर्शिया (सध्याचे नाव इराण) या देशातील हे मूळ रहिवासी. ‘झोराष्ट्रीयन’ पंथाला मानणारे आणि ‘झेंद अव्हेस्ता’ या धर्मग्रंथावर श्रद्धा असणारे हे पूजक. यांचा धर्मग्रंथ आपल्या ऋग्वेदानंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्राचीन ग्रंथ समजला जातो.

 

 

गुण्यागोविंदाने कालक्रमण करत असताना आठव्या शतकात अरब आक्रमकांची वाकडी नजर पर्शिया देशावर पडली. इसवी सन ६३३ मध्ये अरब या देशात येण्यास सुरुवात झाली. हळू हळू अरबांनी पर्शियामध्ये चांगलेच बस्तान बसवले आणि स्वतःच्या लौकिकाला स्मरून देशाची सूत्रे हाती घेण्यास सुरुवात केली.

या प्रकाराला अर्थातच पारशी लोकांनी कडवा प्रतिकार केला. अरब आणि पारशी यांच्यात छोट्या छोट्या लढाया, चकमकी घडू लागल्या.

मारवाह येथे झालेल्या लढाईत अरब कमांडरची हत्या करण्यात त्यांना यशही मिळाले परंतु त्याचा फायदा मात्र घेता आला नाही. एका मोठ्या लढाईत ज्याला ‘उल्लेसचे युद्ध’ म्हणतात त्यात अरबांचा सेनापती ‘खलिफा ओमर’ याने पारशी लोकांचा पूर्ण पाडाव केला.

 

 

असे म्हटले जाते की या शेवटच्या युद्धात पस्तीस हजार पारशी ठार मारले गेले आणि ऐंशी हजार पारशी बंदी बनवले गेले. या मुस्लिम आक्रमणासमोर पारशी लोकांची ताकद कमी पडल्याने त्यांना हार मानल्याशिवाय पर्याय नव्हता.

पण मुळातच हे चिवट वृत्तीचे लोक असल्याने आपला धर्म आणि संस्कृती वाचवण्यासाठी मुस्लिमांसमोर शरण न जाता स्थलांतर करण्याचे यांनी ठरवले.

कारण, आक्रमकांचा विजय झाल्यावर गैर मुस्लिमांवर लादतात तो जिझिया कर पारशी लोकांवरसुद्धा लादला गेला होता. त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण सुरू झाले होते.

 

 

नवीन जन्मलेल्या मुलांना इस्लाम धर्माची दीक्षा देणे, त्यांना मदरश्यात शिक्षण घेण्याची जबरदस्ती करणे वगैरे प्रकार होत होते. आपल्याच देशात आपल्यावरच अत्याचार होत आहेत ही गोष्ट त्यांना सहन करणे कठीण होते.

एक तर निमूट अत्याचार सहन करणे अथवा प्रतिकार करणे हे दोन पर्याय उपलब्ध असताना. त्यांनी स्थलांतर करण्याचा तिसरा पर्याय निवडला.

चहुबाजूला मुस्लिम देश असल्याने त्यांना स्थलांतर करण्यासाठी हिंदुबहुल भारत देश त्यामानाने सुरक्षित नाही वाटला तरच नवल!

लहान लहान गटात विखुरलेले पारशी लोक एकत्र आले आणि समुद्रमार्गे बोटीवरून त्यांचा प्रवास भारताच्या दिशेने सुरू झाला. आठव्या आणि नवव्या दशकात पारश्यांच्या बोटी भारताच्या गुजरात भागातील किनाऱ्यावर येऊन धडकू लागल्या.

‘किस्सा-ए-संजान’ मधील नोंदीनुसार जवळपास अठरा हजार पारशी भारतात आले होते. त्यातले काही दिव आणि काही संजान येथे उतरले.

 

 

त्यावेळी गुजरात मध्ये हिंदू राजा ‘जादव राणा’ हा राज्य करत होता. हा राजा स्वभावाने उदार आणि प्रेमळ होता. स्थलांतरितांनी राणा कडे आश्रय मागितला. अरब आक्रमकांच्या जुलमाच्या कहाण्या शरणार्थींकडून ऐकल्यानंतर त्या हिंदू राजाचे हृदय कळवळले. राजाने त्यांची विनंती स्वीकार केली.

मात्र त्यांचा भिन्न पेहराव, वेशभूषा आणि भाषा बघता जादव राणाने शरणार्थींना चार अटी घातल्या. त्या पाळल्या तर तो आश्रय देण्यास तयार होता.

१) त्यांनी गुजराती भाषा शिकून घ्यायला हवी आणि तिचा वापर करायला हवा.

२) इथले स्थानिक कपडे वापरायला हवे. विशेषतः स्त्रियांनी साडी हा पेहराव स्वीकारायला हवा.

३) लग्नकार्य इत्यादी गोष्टी संध्याकाळीच पार पडल्या पाहिजेत.

४) कुठलेही शस्त्र बाळगण्यास व वापरण्यास बंदी असेल.

हे ही वाचा – इंग्रजांच्या एका आदेशामुळे पारश्यांनी मुंबईत दंगल पेटवली होती!

 

या अटी मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण भारताखेरीज इतर ठिकाणी आश्रय मिळणे फार कठीण होते. पारशींनी या चार अटी त्वरित मान्य केल्या. आणि अश्या तर्हेने ते भारतात स्थायिक झाले.

पारशी लोककथेमध्ये या घटनेची एक गमतीशीर कहाणी सांगितली जाते. असे म्हणतात की ज्यावेळी पारशी लोकांचे शिष्टमंडळ राजा राणाकडे आश्रय मागायला आले तेव्हा राजाने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. एक ग्लास दुधाने भरून शिष्टमंडळाच्या नेत्याकडे दिला गेला.

त्यामध्ये लपलेला संदेश त्याने बरोबर ओळखून त्या दुधात साखर टाकून हलवली.

 

 

यामधून त्यांना असा अर्थ अभिप्रेत होता की, या सुंदर भारत देशात आम्ही साखरेप्रमाणे मिसळून आमच्या बुद्धीने आणि कष्टाने या भूमीच्या भरभराटीसाठी प्रयत्न करू.

या योग्य उत्तरामुळे राजा अतिशय खुश झाला आणि भारताची कवाडे पारश्यांसाठी खुली झाली.

 

 

त्यांनी घडवलेला पुढचा इतिहास तर आपणा सर्वांना ठाऊक आहेच!

दादाभाई नौरोजी, फिरोझशाह मेहता, होमी भाभा, जमशेदजी टाटा आणि त्यांचा परिवार, गोदरेज परिवार, वाडिया परिवार यांनी व यासारख्या अनेक पारशी समाजाच्या व्यक्तींनी भारताच्या आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक प्रगतीमध्ये अमूल्य योगदान दिले आहे हे कुणी नाकारू शकत नाही.

हे ही वाचा – पारशी लोकांच्या सामूहिक श्रीमंतीचं एक महत्वपूर्ण कारण – अफू !

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version