Site icon InMarathi

संकटात असलेल्या लहानग्यांच्या आयुष्यात आशेची ज्योत जागवणारी “व्हाईट फ्लेम”: इग्लॅनटाईन जेब

jeb-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लहान मुलांचे भावविश्व मोठ्यांपेक्षा फार वेगळे असते. त्यांच्या स्वप्नाळू , निरागस निष्पाप जगात सर्वांविषयी आपुलकी असते. आपण मोठी माणसे मात्र हे त्यांचे छान छोटेसे भावविश्व समजून घेण्यात कमी पडतो.

“तो किंवा ती लहान आहे, त्यांना काय कळतं” असा विचार करून आपण लहान मुलांचे बोलणे फार गांभीर्याने घेत नाही. किंवा त्यांचे बोलणे नीट ऐकूनच घेत नाही. परंतु लहान मुलांचे भावविश्व एखाद्या लहानश्या गोष्टीने सुद्धा ढवळून निघू शकते.

त्यांच्या विश्वात सुद्धा त्यांना काही प्रश्न असू शकतात, समस्या असू शकतात. ज्या आपण गांभीर्याने न घेतल्याने पुढे मुलांच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

बिचाऱ्या लहान मुलांना आपले प्रश्न मोठ्यांपुढे मांडताही येत नाहीत आणि त्यांच्या समस्येचे निराकरण सुद्धा मोठ्यांनी मनावर घेतल्याशिवाय होऊ शकत नाही.

लहान मुलांचे विश्व छोटे असले तरी अत्यंत महत्वाचे आहे.परंतु हे फार कोणाच्या लक्षात येत नाही. सगळ्यात व्हलनरेबल असतात ती लहान मुले व त्यांच्या हक्कांची सहज पायमल्ली होऊ शकते. असे असताना देखील त्यांचे हक्क दुर्लक्षित राहतात.

 

save_the_children-ukblog.com

आता परिस्थती जरा बदलत असली तरी पूर्वी मात्र लहान मुलांनाही हक्क असतात हे कोणाच्या गावीही नव्हते. परंतु इग्लॅनटाईन जेब ह्यांनी लहान मुलांचे भावविश्व समजून घेऊन त्यांच्या अधिकारांसंदर्भात आंतरराष्ट्रीय मंचावर प्रश्न उपस्थित केले.असे करणाऱ्या त्या जगातील पहिल्या व्यक्ती होत्या.

 इग्लॅनटाईन जेब ह्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संकटात सापडलेल्या लहान मुलांच्या आयुष्यात आशेची ज्योत निर्माण करण्यात व्यतीत केले. म्हणूनच त्यांना “द व्हाईट फ्लेम” म्हणजेच “श्वेतज्योत” असे म्हणतात.

इग्लॅनटाईन जेब ह्यांचा जन्म २५ ऑगस्ट १८७६ रोजी इंग्लंडमधील शोर्पशायर येथे झाला.

इग्लॅनटाईन ह्यांचे संपूर्ण कुटुंबच समाजसेवेला वाहून घेणारे होते. त्यांची आई इग्लॅनटाईन ल्युइसा जेब ह्यांनी ग्रामीण भागातील लहान मुलांसाठी होम आर्ट्स अँड इंडस्ट्री असोसिएशनची स्थापना केली होती. त्यांना त्या हस्तकलेचे प्रशिक्षण देत असत.

तर इग्लॅनटाईन ह्यांची बहिण ल्युईसा ह्यांनी पहिल्या महायुद्धात वुमेन्स लँड आर्मीची स्थापना करण्यात हातभार लावला होता. त्यांची दुसरी बहिण डॉरोथी फ्रान्सेस जेब ह्यांनी महायुद्धानंतर जर्मन लोकांची जी प्रतिमा मलीन झाली होती त्याविरोधात जनजागृतीचे काम केले.

इग्लॅनटाईन ह्यांनी ऑक्सफोर्डच्या लेडी मार्गारेट हॉल येथे इतिहासाचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी शिक्षक होण्यासाठी प्रशिक्षण घेतले व सेंट पीटर्स ज्युनियर स्कूल येथे एक वर्षासाठी शिक्षिका म्हणून काम केले.

 

claremulley.com

लवकरच त्यांना असे वाटले की “शिकवणे” हा आपला खरा मार्ग नव्हे. ह्या कामादरम्यान त्यांच्या असे लक्षात आले कि लहान मुलांना गरिबीमुळे अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते.

त्यानंतर त्या त्यांच्या आजारी आईला भेटायला केम्ब्रिजला गेल्या. तेथे त्यांनी चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीसाठी काम केले. ह्या सोसायटीचे लक्ष्य विज्ञानाच दृष्टीकोन बाळगून समाजसेवा करणे हे होते.

ह्या संस्थेबरोबर काम करताना त्यांनी शहरातील परिस्थितीचा अभ्यास केला आणि ह्या अभ्यासावर आधारित त्यांनी १९०६ साली Cambridge, a Study in Social Questions हे पुस्तक लिहिले. त्यानंतर त्यांनी केम्ब्रिज इंडिपेंडंट प्रेस ह्या साप्ताहिकासाठी लिहिणे सुरु केले.

१९०७ साली त्यांची केंब्रिज बरो कौन्सिलच्या शिक्षण समितीवर नेमणूक करण्यात आली.

त्यानंतर १९१३ साली त्या मॅसेडोनिआला रिलीफ फंडाच्या कामासाठी गेल्या. तिथे त्यांनी अल्बानियन निर्वासित लोकांवर होत असलेले अत्याचार बघितले. ह्या अत्याचारांसाठी सर्बिया हा युद्धखोर देश जबाबदार होता. हे अत्याचार बघून त्यांचे मन हेलावून गेले.

निर्वासित लोकांची नृशंस हत्या, त्यांची उपासमार, त्यांचे कष्टप्रद आयुष्य बघून त्यांनी ह्या लोकांसाठी काहीतरी करण्याचे ठरवले. परंतु त्यांच्यासाठी पुरेसा निधी जमवताना इग्लॅनटाईन ह्यांना अडचणी येत होत्या कारण इंग्लंडमध्ये ह्या निर्वासितांविषयी फार कोणाला काही वाटत नव्हते.

इग्लॅनटाईन ह्यांना मात्र युद्धाची किती आणि काय किंमत सामान्य माणसांना चुकवावी लागते ह्याबद्दल निर्वासितांचे दु:ख बघून कळले होते.

 

the-holocaust-explained.com

पहिले महायुद्ध संपल्यानंतर ऑस्ट्रिया, हंगेरी आणि जर्मनी ह्या देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली होती. तेव्हा इग्लॅनटाईन व त्यांची बहिण डॉरोथी ह्यांच्या लक्षात आले कि ह्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडल्याने तिथे सर्वांनाच उपासमार सहन करावी लागत आहे व ह्याचा सर्वात जास्त त्रास लहान मुलांना भोगावा लागत आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणातून मित्र राष्ट्रांनी ह्या देशांची आर्थिक कोंडी केली म्हणूनच ह्या देशांत अन्नधान्याची फार मोठी टंचाई निर्माण झाली.

जेव्हा इंग्लंडमधील सर्व माणसे युद्धात विजय मिळाल्याचा आनंद साजरा करत होती तेव्हा इग्लॅनटाईन ह्या मुलांची कशी मदत करता येईल हा विचार करत होत्या.

असाच विचार करणारे काही लोक व इग्लॅनटाईन ह्यांनी एकत्र येऊन “फाईट द फॅमिन” हा गट स्थापन केला. ह्या राष्ट्रांची आर्थिक कोंडी थांबवावी म्हणून हा गट प्रयत्न करीत होता. ह्या गटाने दुष्काळपीडितांची मदत करण्याचे कार्य सुरु केले.

जर्मनी व ऑस्ट्रियातील लहान मुलांचे आयुष्य दुष्काळाच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी निधी गोळा करणे आवश्यक होते. त्यासाठी १५ एप्रिल १९१९ रोजी “ सेव्ह द चिल्ड्रेन” ही संस्था स्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.ही संस्था स्थापन करताना इग्लॅनटाईन ह्यांना संघर्ष करावा लागला.

त्या १९१९ मध्ये ऑस्ट्रियातील उपासमार झालेल्या बालकांचे फोटो असणारी पत्रके लंडनच्या चौकात वाटत असताना त्यांना अटक करण्यात आली. कारण ह्या पत्रकांना सरकारची मंजुरी नव्हती.

 

third-sector.com

ब्रिटीश सरकारला असे वाटले कि ह्या महिलेला अटक झाल्यावर जो आर्थिक कोंडीविरुद्ध ह्या गटाचा दबाव आहे तो कमी होईल. परंतु असे झाले नाही. इग्लॅनटाईन ह्यांच्याविरुद्ध जेव्हा कोर्टात खटला उभा राहिला तेव्हा त्यांनी स्वत:च्या बचावासाठी वकिलाची मदत न घेता स्वत:च आपली बाजू कोर्टापुढे मांडली.

ह्या प्रश्नाची नैतिक बाजू त्यांनी कोर्टापुढे मांडली तरीही न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. शिक्षा म्हणून त्यांना ५ पौंड इतका आर्थिक दंड ठोठावला. परंतु गंमत म्हणजे ह्या आर्थिक दंडाची रक्कम सरकारी वकील सर आर्चिबाल्ड बोल्डविन ह्यांनी स्वत: इग्लॅनटाईन ह्यांना देऊ केली. ही “सेव्ह द चिल्ड्रेन” ह्या संस्थेला मिळालेली पहिली देणगी होती.

आपल्याला शिक्षा झाली तरीही कोर्टापुढे आपल्याला प्रश्नाचे स्वरूप मांडता आले ह्याचे इग्लॅनटाईन ह्यांना समाधान होते.इग्लॅनटाईन ह्यांच्या खटल्याची सगळीकडे चर्चा झाली. वर्तमानपत्राने ह्या खटल्याची दखल घेतली.

परंतु नुसत्या बातमीने लहान मुलांची उपासमार थांबणार नव्हती. इग्लॅनटाईन ह्यांनी ह्या प्रसिद्धीचा फायदा निधी जमवण्यासाठी करायचे ठरवले. त्यांनी एक सभेचे आयोजन केले. ही सभा रॉयल अल्बर्ट हॉल येथे आयोजित करण्यात आली होती.

ह्या सभेला किती उपस्थिती राहील ह्याबद्दल इग्लॅनटाईन ह्यांच्या मनात धाकधूक होती. सभेसाठी ह्या सभागृहात अलोट गर्दी लोटली.परंतु त्यातील अनेक लोक इग्लॅनटाईन ह्यांना विरोध करण्यासाठी आले होते.

भाषण सुरु करण्याआधी इग्लॅनटाईन ह्यांच्या मनात एक धास्ती होती परंतु एकदा भाषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला व त्यांनी ठामपणे भाषण पूर्ण केले. भाषणाची सांगता करताना त्या म्हणाल्या कि ,

”उपाशी बालकांना वाचवण्याचे कोणतेही प्रयत्न न करता त्यांना भुकेने मरताना बघणे हे एक माणूस म्हणून आपल्याला अशक्य आहे.”

त्यांचे भाषण संपताच लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ह्यानंतर अनेकांनी देणग्या दिल्या व काहीच दिवसात दहा हजार पौंड इतका निधी जमा झाला. हा निधी व्हिएन्ना येथे पाठवण्यात आला.ह्यानंतर इग्लॅनटाईन व त्यांची बहिण डॉरोथी ह्यांनी लहान मुलांच्या हक्कांसाठी आंतरराष्ट्रीय चळवळ सुरु केली.

ब्रिटीश संस्था “डेव्ह द चिल्ड्रेन” व स्वीडिश संस्था “रद्दा बारनेन” ह्यांनी एकत्र येऊन “आंतरराष्ट्रीय सेव्ह द चिल्ड्रेन युनियन” ही संस्था जिनेव्हा येथे स्थापन केली.ह्या संस्थेच्या लंडनमधील कामाची जबाबदारी इग्लॅनटाईन ह्यांच्यावर सोपवण्यात आली.

मध्य युरोपातील लहान मुलांसाठी कार्य केल्यानंतर “सेव्ह द चिल्ड्रेन”च्या कार्यकर्त्यांनी ग्रीस व आसपासच्या देशांत जिथे सततच्या युद्धामुळे लहान मुलांचे आयुष्य होरपळलेले होते त्या मुलांसाठी मदतकार्य सुरु केले.

येथील कार्य संपत नाही तोच महायुद्ध व आंतरराष्ट्रीय राजकारण ह्यामुळे रशियात अन्नटंचाई निर्माण झाली व ह्या संस्थेचे लोक रशियातील मुलांना मदत करण्यासाठी रशियात गेले. हे कार्य करताना त्यांनी बालकांचे प्रश्न जगापुढे आणायचे ठरवले.

त्यांनी बालहक्कांचा जाहीरनामा तयार करून तो राष्ट्रसंघाकडे दिला. ह्यात बालकांचे हक्क व त्याविषयी आंतरराष्ट्रीय समूहाची कर्तव्ये दिलेली होती. १९२४ साली हा “जिनेव्हा जाहीरनामा” राष्ट्रसंघाने स्वीकारला.

 

eglantyne-jebb-blog.com

ह्या जाहीरनाम्यात पाच कलमे होती. ती म्हणजे

१. बालकांची नैसर्गिक वाढ होण्यासाठी त्यांना सर्व साधने पुरवण्यात यावीत.

२. उपाशी बालकांना अन्न, आजारी बालकांना उपचार व गरज आहे अश्या प्रत्येक बालकाला प्रगतीसाठी मदत मिळायला हवी.

३. अनाथ व बेघर बालकांना आधार व आसरा मिळायला हवा व बालकाने अपराध केल्यास नंतर त्याचे पुनर्वसन केले जावे.

४. आपत्कालीन स्थितीमध्ये बालकांना अग्रक्रम देऊन त्यांच्या सुरक्षेची काळजी सर्वप्रथम घेण्यात यावी.

५. सर्व प्रकारच्या शोषणापासून बालकांना संरक्षण मिळावे.

इग्लॅनटाईन ह्यांच्या मनात संपूर्ण जगातील बालकांबद्द्ल कणव होती. उपासमार किंवा काही संकट आल्यास प्रौढ व्यक्ती त्यातून नंतर सावरते व पूर्वपदावर येते परंतु ह्या सगळ्याचा बालकांवर मात्र वाईट परिणाम होतो. म्हणूनच बालकांना अग्रक्रम देणे अतिशय आवश्यक आहे.

म्हणूनच त्यांनी सर्व बालकांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संकटात सापडलेल्या बालकांचे आयुष्य सुकर करण्यात व्यतीत केले.त्यांच्याच प्रयत्नाने १९२५ साली पहिली बालकल्याण कॉंग्रेस आयोजित करण्यात आली.

१७ डिसेम्बर १९२८ रोजी बालकांसाठी आशेची ज्योत असणाऱ्या ह्या मातृहृदयी श्वेतज्योतीचे दीर्घ आजाराने निधन झाले. ‘सेव द चिल्ड्रन’ आणि ‘बालहक्क चळवळ’ ह्याचे आता मोठ्या चळवळीत रुपांतर झाले आहे. त्यांचे कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

बालकांसाठी संकटाच्या अंधारात मदतीचा प्रकाश आणणाऱ्या इग्लॅनटाईन जेब ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version