Site icon InMarathi

वेश्यागमन की बलात्कार : विकृतांच्या मेंदूत ही चॉईस असते का?

rape inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगात सगळीकडेच स्त्रियांवर, लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस भयावहपणे वाढत चालले आहे.

विकृत लोकांचा स्वतःच्या भावनांवर ताबा नसणे किंवा कमजोर व्यक्तींवर किंवा व्हल्नरेबल व्यक्तींवर वर्चस्व प्रस्थापित करणे, नशेच्या अंमलाखाली, एखाद्या अपमानाचा बदला म्हणून किंवा इतर अनेक कारणांमुळे बलात्कार होतात.

ह्यात क्षणिक भावनेच्या किंवा वासनेच्या आहारी गेल्यामुळे होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण मोठे आहे.

ह्यावर अनेक लोक युक्तिवाद करतात की, वेश्याव्यवसाय कायदेशीर केला तर वासनेच्या आहारी गेलेल्यांना त्यांची वासना शमवण्यासाठी एक मार्ग उपलब्ध होईल व इतर सर्व स्त्रियांचे ह्या विकृत वासनांधांपासून संरक्षण होईल.

 

 

ह्यावर असाही एक मतप्रवाह आहे की लैंगिक अत्याचार होण्याचे फक्त हे एवढे एकच कारण असते तर ज्या ज्या देशांत वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे त्या देशांत बलात्कार झालेच नसते. पण असे होत नाही.

वेश्याव्यवसाय कायदेशीर असणाऱ्या देशांमध्येही लैंगिक अत्याचाराचे प्रमाण मोठे आहे. म्हणजेच फक्त “वासनेवर ताबा नसणे” हे बलात्काराचे एकच कारण नाही. ह्या गुन्हा घडण्यामागे अनेक कारणे असतात.

ऑक्सफर्ड युनिव्हार्सिटीचा एक रिसर्च असे सांगतो की, ऱ्होड आयलंडमध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीर केल्यापासून सहा वर्षात तिथे सेक्स मार्केट विस्तारले असले तरीही ह्या काळात बलात्काराचे प्रमाण तसेच महिलांमध्ये लैंगिक आजाराचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले आहे.

वेश्याव्यवसायाला विरोध हा मुख्यत: सामाजिक व नैतिक कारणांसाठी केला जातो.

हा व्यवसाय कायदेशीर केला तर लैंगिक आजार पसरणे व बळजबरीने ह्या व्यवसायात ढकलणे ह्या गोष्टी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

कुठलीही स्त्री आनंदाने ह्या दलदलीत उतरायला स्वत:हून कधीच तयार होत नाही. एकतर परिस्थितीवश स्त्रियांना ह्या व्यवसायात यावे लागते किंवा अनेकांना ह्या व्यवसायात फसवून किंवा बळजबरीने आणले जाते.

ह्या स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे असे मत आहे की, वेश्याव्यवसाय जगातून नाहीसा झाला पाहिजे.

कुठल्याही स्त्रीवर असे आयुष्य जगण्याची वेळ येऊ नये. वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना अटक किंवा शिक्षा केली जाऊ नये.

परंतु हा व्यवसाय चालवणारे, कुंटणखाने चालवणारे, दलाल, स्त्रियांची खरेदी विक्री करणारे तस्कर आणि हा व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार करणारे ह्यांना मात्र कडक शिक्षा व्हायला हवी.

मागच्या वर्षी अॅम्नेस्टी इंटरनॅशनलसारखी मोठी संस्था आणि लॅन्सेट बोर्ड ह्यांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांवर गुन्हा दाखल होऊ नये ह्याच बाजूने मत दिले आहे. ह्या संस्थेकडून एक पेपर सादर करण्यात आला होता.

ह्या पेपरमध्ये असे म्हटले होते की, वेश्यांवर गुन्हा दाखल न केल्याने म्हणजेच वेश्याव्यवसाय कायदेशीर केल्याने सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यात मदत होईल तसेच स्त्रियांवर होणारे अत्याचार सुद्धा कमी होतील.

जुलाई २०१४ मध्ये “सेक्स वर्क” ह्या विषयावर लॅन्सेटने एक अहवाल प्रसारित केला होता. त्यात वेश्याव्यवसाय कायदेशीर व्हावा ह्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला होता. त्यात असे म्हटले होते की, वेश्याव्यवसायात असणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले नाही तर त्याचा सामाजिक स्वास्थ्यावर चांगलाच परिणाम होईल.

त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये असेही म्हटले होते की, वेश्याव्यवसाय कायदेशीर झाल्यास एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण एक तृतीयांशाने कमी होईल. हे प्रेस रिलीज अनेक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले होते.

 

 

ह्यात असे मुद्दे मांडण्यात आले होते की, हा व्यवसाय कायदेशीर झाल्याने ह्या व्यवसायासंदर्भात पोलिसांकडून जी हिंसा व भ्रष्टाचार केला जातो तो संपेल, पंटर्स कडून हिंसा होणार नाही, निरोधांचा वापर १०० टक्के होईल आणि लोक त्यांच्या समस्यांसाठी कुठलीही भीती न बाळगता आरोग्य चिकित्सालयात जातील.

परंतु हे तेव्हाच होईल जेव्हा ह्या व्यवसायात असलेले सर्वच लोक नियमाप्रमाणे चालतील. जे की सामान्यपणे होत नाही.

ह्या व्यवसायाला कायद्याची मान्यता मिळाली तर ह्या व्यवसायाचा विस्तार झपाट्याने होईल. आणि अधिकाधिक स्त्रियांना ह्या व्यवसायात ढकलले जाईल.

फ्री मार्केट इकॉनॉमीच्या सिद्धांतानुसार मार्केट जर सॅच्युरेट झाले तर वस्तूंच्या किमती घटतात. हाच नियम ह्या व्यवसायाला लावला तर हा व्यवसाय कायदेशीर केल्यावर परिणामांची व शिक्षेची भीती न राहिल्याने अधिकाधिक स्त्रिया ह्यात ओढल्या जातील.

कायदेशीरच असल्याने जे लोक पूर्वी ह्या पर्यायाचा विचार करत नव्हते ते पुरुष सुद्धा कायद्यात बसते म्हणून ह्या स्त्रियांकडे जातील.

ह्यात आणखी एक मुद्दा असा आहे की, ज्या स्त्रिया हा व्यवसाय करतात त्या त्यांच्या ग्राहकांना निरोध वापरणे सक्तीचे करू शकत नाहीत. इतर काही स्त्रिया जास्त पैश्यांसाठी निरोध न वापरण्याचे पुरुषांकडून जास्त पैसे घेऊ शकतात कारण अनेक पुरुषांना निरोध वापरणे आवडत नाही.

अशा वेळी ज्या स्त्रिया त्यांच्याकडे आलेल्या पुरुषांना निरोध वापरणे सक्तीचे करतील त्यांना कस्टमर गमावण्याचा धोका पत्करायचा नसेल तर त्याही निरोधाशिवाय व्यवसाय करतील.

 

 

ह्याने असुरक्षित शारीरिक संबंध वाढून अनेक आजार पसरतील. शिवाय ह्या स्त्रियांना नको असलेल्या गर्भधारणेचा धोका पत्करावा लागेल.

ह्यातून मग एकतर मूल जन्माला घालून त्याची परवड किंवा असुरक्षित गर्भपात हे धोके सुद्धा उद्भवतातच आणि नैतिकदृष्ट्या बघायचे झाल्यास ह्यात ह्या स्त्रियांचा सुरक्षित शारीरिक संबंधांचा हक्क डावलला जातो.

वेश्याव्यवसाय कायदेशीर व्हावा ह्या मताचे असलेले लेखक रोनाल्ड विटझर त्यांच्या लिगलायझिंग प्रॉस्टिट्यूशन ह्या पुस्तकात लिहितात की, इनडोअर कायदेशीर वेश्याव्यवसायात कमी अत्याचार होतील.

स्त्रियांवरच्या हिंसेचे प्रमाण कमी होईल, ह्या स्त्रियांना वर्किंग कंडीशन्स चांगल्या मिळतील आणि बेकायदेशीर काम केल्याचे मनावर ओझे राहणार नाही.

परंतु असे नसते. जर्मनी, नेव्हाडा, हॉलंड,ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड ह्या देशांत वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे तरीही ह्या देशातील हा व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा हिंसा, अत्याचार सहन करावे लागतात.

२००४ साली डच नेत्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी व अनेक नागरिकांनी हे उघडपणे मान्य केले हॉलंडमध्ये वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देणे ही घोडचूक झालेली आहे.

आणि ह्या निर्णयामुळे जे चांगले परिणाम व्हायला हवे होते ते तर झालेच नाहीत उलट ह्या स्त्रियांच्या समस्यांमध्ये भर पडली. कायद्याची भीती न राहिल्याने लोक ह्या स्त्रियांशी वाटेल तसा दुर्व्यवहार करू लागले. तसेच ह्या स्त्रियांना आधीपेक्षा कमी मोबदला मिळू लागला.

हे ही वाचा – बलात्काराचा विळखा – वाटतो तितकाछोटा नाही! डोळे उघडणारे आकडे!

 

ह्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्याने स्त्रियांवरच्या अत्याचारात भर पडते.

स्त्रियांची, मुलींची तस्करी होण्याचे प्रमाण वाढते. बेकायदेशीर कुंटणखाने उभे राहतात. तसेच स्त्रियांवरील होणाऱ्या हिंसेचे व अत्याचाराचे प्रमाण कमी झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत. एचआयव्हीचे प्रमाण घटल्याचेही पुरावे नाही.

 

 

ह्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळाल्यास त्याने फक्त कुंटणखाने चालवणारे, दलाल तसेच ह्या स्त्रियांकडे जाऊन पैश्यांच्या बदल्यात एकतर्फी सुख भोगणारे पुरुष ह्यांनाच काय तो फायदा होईल.

ह्या व्यवसायात पिचलेल्या स्त्रियांचे मात्र नुकसानच होईल. त्यांना “कायदेशीर” बलात्कार सहन करावे लागतील.

राहिला प्रश्न सामाजिक स्वास्थ्याचा व स्त्रियांच्या सुरक्षिततेचा तर वर म्हटल्याप्रमाणे स्त्रियांवर अत्याचार हे फक्त भावनेवर ताबा न राहिल्याने होत नाहीत तर त्यामागे अनेक कारणे आहेत. म्हणूनच हा व्यवसाय कायदेशीर केल्याने स्त्रियांवरचे अत्याचार थांबतील असे कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे.

बलात्कार थांबण्यासाठी मुळात समाजात सर्व पुरुषांना व स्त्रियांना देखील स्त्रियांचा आदर करायला शिकवणे, त्यांचा एक माणूस म्हणून स्वीकार होणे आवश्यक आहे.

तसेच ह्या गुन्ह्यासाठी त्वरित न्याय व कडक शिक्षेची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. कायदेशीर वेश्याव्यवसाय हे ह्या समस्येवरचे उत्तर नाही.

कारण अत्याचार करणारे कुंटणखान्यात जाऊन तिथल्या स्त्रीवरही अत्याचारच करतील. एक स्त्री वाचण्यासाठी दुसऱ्या “अधिक व्हल्नरेबल” स्त्रीवर अत्याचार होऊ देणे हे ह्या समस्येवरचे उत्तर निश्चितच नाही.

 

हे ही वाचा – असिफावरील “शिस्तबद्ध” बलात्काराचा घटनाक्रम अंगावर काटा आणि डोक्यात चीड आणतो

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version