“खरकटे मौल्यवान आहे” हे शिकवणारा वेगळ्या वाटेवरचा इंजिनियर
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखक: दत्ता जोशी
===
काही माणसं चक्रम असतात. अशीच माणसं काहीतरी आगळं, समाजोपयोगी, आश्वासक असं घडवू शकतात. परवा अशाच एका माणसाशी परिचय झाला. गप्पा झाल्या. चक्रमपणाची खात्री पटली आणि मग त्यांच्याबद्दल लिहावेसेच वाटले. दीपक कान्हेरे हे त्यांचे नाव आणि अत्यल्प किमतीत आणि दीर्घकाळ टिकणार्या बायोगॅस संयंत्रांची उभारणी हे त्यांचे वैशिष्ट्य…! ते इंजिनिअर आहेत… पण वेगळ्या वाटेवरचे…!
परवा संध्याकाळी बीड बायपासच्या परिसरात कामानिमित्त गेलो असताना औरंगाबादच्या ‘एमआयटी’चे संस्थापक आणि अखंड ऊर्जेचे प्रेरणास्त्रोत असलेल्या डॉ. यज्ञवीर कवडे सरांना भेटण्याची इच्छा झाली.
माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यावरील पुस्तकात मी २०१२ मध्ये त्यांच्याविषयी लिहिले होते. त्या वेळी त्यांच्यातील वेगळेपण लक्षात येत गेले.
मग अथूनमधून भेटायला सुरुवात केली. परवा फोन केला, तर म्हणाले ‘या. पन्नालालजीही आलेले आहेत. भेट होईल.’ ‘एमआयटी’च्याच परिसरात असलेल्या त्यांच्या घरी पोहोचलो तर ज्येष्ठ समाजसेवी पन्नालालजी सुराणा तेथे होते. त्यांच्याशीही अल्पसंवाद झाला. ते गेल्यानंतर कवडे सरांशी गप्पा मारताना त्यांनी ‘एमआयटी’च्या होस्टेलमध्ये सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल सांगितले.
होस्टेल मेसमधील ‘फुड वेस्ट’वर चालणार्या बायोगॅस संयंत्राची उभारणी तेथे सुरू आहे. अर्थात ती पूर्णत्वाला गेली आहे. कार्यरत झालीय. दीपक कान्हेरे नावाचे गृहस्थ ते काम करताहेत. त्यांच्या सोबतीला चार इंजिनिअर आहेत, जे स्वतः प्रत्यक्ष अंगमेहनतीचे काम करताहेत…
हे सारे ऐकल्यानंतर थांबणे शक्यच नव्हते. हे सगळे प्रत्यक्ष पाहण्यासारखे होते आणि कवडे सरांनीही प्रत्यक्ष भेट घालून देण्याची उत्सुकता दाखविली. आम्ही काही मिनिटांतच त्या साईटवर पोहोचलो आणि मग तासभर तिथेच रमलो.
मुळात कवडे सर म्हणजे नवनव्या तांत्रिक प्रयोगांत रमणारे, प्रत्येक गोष्टीतील शास्त्र शोधणारे आणि नव्या पिढीपर्यंत तांत्रिक शिक्षण पोहोचविण्यासाठी सतत आग्रही असलेले व्यक्तिमत्त्व. शिक्षणाच्या क्षेत्रात संपूर्ण आयुष्य काढल्यानंतर त्या मेहनतीला आलेले फळ म्हणजे ‘एमआयटी’. ‘शिक्षण महर्षी’ म्हटले तर आजकाल वेगळा वास येतो. पण ते खर्या अर्थाने शिक्षणमहर्षी.
१९६० च्या दशकात रोटेगावच्या संस्थेत त्यांनी बायोगॅसचा पहिला प्रयोग मोठ्या जिद्दीने उभा केला होता. कदाचित औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात उभारलेला तो त्या प्रकारचा पहिलाच प्रयोग असावा. तांत्रिक कारणांमुळे तो तीन-चार वर्षांत बंद पडला.
पण विषय मनात ताजा होता. परवा काही महिन्यांपूर्वी दीपक कान्हेरे यांच्या भेटीनंतर त्या विचाराने पुन्हा उचल खाल्ली आणि ‘एमआयटी’ परिसरात बायोगॅसचा प्रकल्प अवतरला.
या प्रकल्पाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. आधी तांत्रिक विषय समजावून घेऊ. या संयंत्राची क्षमता ३६ हजार लिटरची आहे. त्यात दररोज १५० ते १८० किलो ‘फुड वेस्ट’वर प्रक्रिया होऊ शकते आणि त्याद्वारे दररोज १८ घनमीटर गॅस तयार होतो. ढोबळ विचार करायचा तर आपला घरगुती सिलिंडर सुमारे १५ किलोंचा असतो.
या द्वारे दररोज निम्मा सिलिंडर गॅस उपलब्ध होतो. होस्टेलच्या मेसमध्ये कमर्शियल सिलिंडर वापरला जातो. तो २० किलोंचा असतो. कॉलेज वर्षभरात साधारण २०० दिवस चालते. रोजचा ७ किलो गॅस उपलब्ध होतो असे मानले तर वर्षभरात साधारण १४०० किलो गॅस निर्माण होतो.
अर्थात, वर्षभरात कमर्शियल सिलिंडरच्या आकारातील ७० सिलिंडर निर्माण होतात. या सिलिंडरचा दर साधारण १३५० रुपये आहे. असे साधारण ९५ हजार रुपये वाचवण्यात संस्थेला यश आले. हा एक पैलू झाला.
‘कॉस्ट इफेक्टिव्हिटी’ हा या प्रकल्पाचा दुसरा पैलू. तो कसा? हे संयंत्र फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने उभारले गेले आहे. ६ एमएम लोखंडी सळ्या, कबुतरजाळी, वाळू आणि सिमेंट वापरून डोमसह पूर्ण काम झाले. ३६ हजार लिटर क्षमतेचा डोमही याच तंत्राने साकारला. शून्य लिकेजसह…! विटांचा वापर कुठेही झाला नाही.
केवळ तुलना म्हणून सांगायचे झाले तर औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सरकारी यंत्रणेद्वारे) काही दिवसांपूर्वी ४ घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्लँट उभारण्यात आला. त्याला २ लाख २० हजार रुपये खर्च आला. इथे त्यापेक्षा साडेचारपट मोठा म्हणजे १८ घनमीटरचा प्लँट उभा राहिला तो केवळ ३ लाख ७० हजारात. म्हणजे साधारण दीड पट मूल्यात…!
पण हे वैशिष्ट्य इथेच संपत नाही. आणखी तीन गोष्टी इथे घडतात.
दोन दिवसांत संयंत्रातील घटक कुजल्यानंतर त्यातून काळसर द्रवरूप स्लरी बाहेर येऊ लागते. ते उत्तम सेंद्रीय खत असते. ते बागेत, शेतात वापरले जाऊ शकते. त्यामुळे अन्य खतांच्या वापराच्या खर्चात बचत होते. ही स्लरी सगळ्याच संयंत्रातून येते. तो प्रकल्पाचा अंगभूत भाग असतो. मात्र ‘एमआयटी’मधले पुढचे वैशिष्ट्य हे आहे की इथे वायू विलगीकरणाची यंत्रणा बसवण्यात आली आहे.
हे नेमके काय असते?
शास्त्रीय भाषेत त्याला ‘स्क्रबिंग’ म्हणतात. बायोगॅस संयंत्रातून 2 वायू बाहेर पडतात. मिथेन (होय, तोच. नरेंद्र मोदी फेम!) आणि कार्बनडायऑक्साईड.
मिथेन ज्वलनशील आहे आणि कार्बनडायऑक्साईड आगीला शांत करणारा. त्यामुळे बायोगॅसमधून बाहेर पडणारा वायू गॅस शेगडीद्वारे जाळण्याआधी त्यातील कार्बनडायऑक्साईड बाजूला केला तर गॅसचे औष्णिक मूल्य वाढते.
(सोबतच्या छायाचित्रात पिवळ्या-निळ्या रंगाचे पाईप दिसतात, ते त्याच प्रक्रियेतले आहेत…)
याशिवाय तिसरी गोष्ट इथे वेगळेपणाने केलेली आहे. तयार होणारा मिथेन ‘कॉम्प्रेस’ करून सिलिंडरमध्ये भरण्यासाठीची यंत्रणाही इथे उभारण्यात आलेली आहे. त्यामुळे तयार झालेला वायू दीर्घकाळ, कुठेही घेऊ जाऊन वापरता येऊ शकतो. तो अकारण वाया जात नाही.
मग प्रश्न पडतो, हा प्रकल्प होस्टेलची इंधनाची गरज १०० टक्के वाचवतो का?
उत्तर आहे – १०० टक्के नव्हे तर ३० टक्के गरज पूर्ण करतो. पण उष्टे-खरकटे उघड्यावर फेकण्याची गरज मात्र १०० टक्के वाचवतो. इथल्या अन्नाचा एक कणही उघड्यावर टाकावा लागत नाही. औरंगाबादेतील कचर्याचा विषय लक्षात घेता हा गुण अतिशय मोलाचा…
श्री. कान्हेेरे सांगतात, “दत्ता जोशी, इथली ३० टक्के गरज भागवणे हीच सायुज्जता आहे.‘त्याज्यात सायुज्यं साध्यते’… सोप्या भाषेत सांगायचे तर टाकाऊतून टिकावू निर्माण झाले पाहिजे. आम्ही वाया जाणारे खरकटे कुठे टाकायचे याचे शाश्वत उत्तर शोधले, विकसित केले आणि समाजासमोर खुले केले.” म्हणूनच त्यांच्या उद्योगाचे नाव ‘सायुज्य ऊर्जा’ असे आहे.
‘एमआयटी’ने हा उपक्रम करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली. या प्रकल्पाला आणि विद्यार्थ्यांना परस्परांशी जोडले. कॉलेजचे उपप्राचार्य श्री. किशोर कुलकर्णी यांच्या माध्यमातून विद्यार्थी या कामाशी जोडले गेले.
प्रत्यक्ष काम करून त्यांनी हे तंत्र अवगत केले. उद्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपापल्या गावी जातील तर तेथे स्थानिक प्रश्नावर आवश्यक असलेले उत्तर त्यांच्याजवळ तयार असेल.
आयुष्यात कुठेही हा विषय समोर आला तर किफायतशीर, परिणामकारक आणि प्रभावी मॉडेल त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले असेल.
तुम्हा कुणालाही हा प्रकल्प पाहायचा असेल तर, समजून घ्यायचा असेल तर तो शक्य आहे.
कुलकर्णी सरांशी 9568453678 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधून पूर्वपरवानगीने भेट देता येईल, शास्त्र समजून घेता येईल. या आठवडाभरात गेलात तर कदाचिक श्री. कान्हेरे नावाच्या अवलियाशी आणि थेट सिमेंट वाळूत हात घालून काम करणार्या त्यांच्या इंजिनियर सहकार्यांशीही भेट होऊ शकते…!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.