' अमेरिका एका थोर “अटल” राजकारण्याच्या मृत्यवर हळहळतीये, ज्याची भारतीयांना अजिबात ओळख नाही – InMarathi

अमेरिका एका थोर “अटल” राजकारण्याच्या मृत्यवर हळहळतीये, ज्याची भारतीयांना अजिबात ओळख नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतीय राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणात चाललेल्या रामरगाड्यात अमेरिकेतून आलेल्या एका अत्यंत महत्वाच्या बातमीची आपल्याकडे कुणी फारशी दखलच घेतली नाही. I admit, मलाही काडीचीही कल्पना नव्हती. काल परवा माझा एक मित्र अमेरिकेत फिरताना त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिसलं की, अमेरिकेत झेंडे अर्ध्यावर उतरवले आहेत…

कारण विचारल्यावर कळालं की,

२५ ऑगस्टला सिनेटर जॉन मॅक्केन यांचे निधन झाले. खरंतर कालच यावर लिहिणार होतो, पण महागुरुंच्या कौतुकात या पोस्टच कितपत गांभीर्य राहील याची शाश्वती नसल्याने आज लिहीत आहे.

तर, कोण होते कोण हे जॉन मॅक्केन? फोटोवरून बऱ्याच लोकांच्या लक्षात आलंच असेल की, हा इसम २००८ मध्ये ओबामा विरुद्ध राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढला आणि हरला…आणि ओबामा पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती झाले…पण बाकी काय?

 

John Sidney McCa
businessinsider.in

तर, जॉन मॅक्केन हे एका आर्मी पार्श्वभूमी असलेल्या घरात जन्माला आले. “जॉन सिडनी मॅक्केन-तृतीय” हे त्यांचं पूर्ण नाव. आजोबा आणि बाबा दोघेही सैन्यात उच्चपदस्थ. साहजिकच जॉनही सैन्यात (नौदलात पायलट म्हणून) रुजू झाला. सुरुवातीला हरफनमौला असलेला जॉन, काही विलक्षण घटनांमुळे अमेरिकेच्या अर्वाचीन इतिहासात कायमचा लक्षात राहील.

त्यातला एक प्रसंग म्हणजे व्हिएतनाम युद्धात बॉम्बिंग सुरु असताना काही बिघाड होऊन जॉनचं विमान एका छोट्याश्या व्हिएतनामीज खेड्यात कोसळलं… स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून येथेच्छ टॉर्चर केलं… मनगटाला बांधून लोम्बत ठेवलं… रोजच्या रोज मारहाण केली… (पुढे शेवटपर्यंत त्यांना हात उचलून स्वतःच्या केसातून फिरवत आला नाही.) पुढे जॉनचे बाबा पॅसिफिक युद्धआघाडीचे प्रमुख झाल्यावर व्हिएतनाम ने जॉन ला सोडून देण्याची तयारी दर्शवली…

पण जॉन ने नकार दिला… कारण ज्या क्रमाने युद्धकैदी पकडले जातात, त्या क्रमाने त्यांची सुटका व्हावी असा शिरस्ता होता… जॉनच्या शब्दात सांगायचं तर त्यांना preferential ट्रीटमेंट मिळणं म्हणजे “it was just not right…!”. पुढे युद्ध समाप्ती नंतर जॉन अमेरिकेत परत आले तेव्हा त्यांचे एका हिरोच्या आवेशात स्वागत करण्यात आले.

कुबड्यांच्या आधार घेत एक पुरस्कार स्वीकारायला आलेल्या जॉन मॅक्केनचे छायाचित्र पहिल्या पानावर छापले गेले. पुढील पोस्टिंग त्यांना काँग्रेस (अमेरिकन संसद)मध्ये नाविक दलाचा प्रतिनिधी म्हणून मिळाले आणि त्यांच्या आयुष्यातला दुसरा अध्याय सुरु झाला.

 

John Sidney McCain III-inmarathi
successstory.com

युद्धकाळात लोकांकडून मिळालेला मानसन्मान, गोड समंजस स्वभाव, तत्वाधिष्टित जीवन आणि सर्व थरातल्या सर्व लोकांशी जुळवून घेण्याची क्षमता या अंगभूत गुणांच्या जोरावर १९८८-८९ साली जॉन मॅक्केन ऍरिझोना राज्यातून काँग्रेसवर पहिल्यांदा निवडून गेले आणि मग पुढे तब्बल ८ वेळा निवडून जाण्याचा विक्रम केला. २००८ सालची एक घटना माणूस म्हणून जॉन मॅक्केन किती मोठे होते याची साक्ष देऊन जाते.

ओबामा विरुद्ध जॉन मॅक्केन झपाटल्या सारखे प्रचार करत होते. ते आणि त्यांची बस “straight talk”, देशाला पिंजून काढत होती… एका प्रचारसभेत एका परंपरागत रिपब्लिकन मतदार महिलेने मॅक्केन साहेबांना विचारलं, “माझा ओबामा वर विश्वास नाही… ओबामा अरब आहे… देशाचं वाटोळं करेल… इ. इ.” त्यावर त्या बाईचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आत वैतागून मॅक्केन साहेबांनी तिच्या हातून माईक काढून घेतला आणि ते म्हणाले-

” No mam…that is not true…Obama is a good decent family man and American citizen….फक्त काही मूलभूत तात्विक मुद्द्यांवर आमच्यात मतभेद आहेत आहे म्हणून हे मतदान होत आहे…!”

संपूर्ण प्रचारात ओबामा किंवा मॅक्केनपैकी एकानेही एकमेकांबद्दल एकही अपशब्द उच्चारला नाही. उलट देशासाठी मॅक्केन नी केलेल्या त्यागा बद्दल ओबामांनी आणि ओबामांच्या आशावाद आणि उत्स्फूर्ततेबद्दल मॅक्केन नी एकमेकांचे सतत कौतुकच केले. ओबामा निवडून आल्यावर तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवूनही “देशात आज एक क्रांतिकारी बदल झाला आहे…” या आशयाचे मॅक्केन यांचे भाषण आजही जनतेच्या लक्षात आहे.

 

John Sidney McCain III-inmarathi03
classlifestyle.com

तिसऱ्यांदा ही राष्ट्रपतीपदाची निवडणूक अयशस्वीपणे लढवल्यावर मॅक्केन पुन्हा संसदेत सक्रिय झाले आणि आपल्या मानवतावादी आणि मनस्वी भाषणे आणि धोरणांनी संसदेत पार्टी पॉलिटीक्सच्या खूप वर गेले. इमिग्रेशन रिफॉर्म्स असो, बॉर्डर सिक्युरिटी असो की, अगदी हल्ली स्वतःच्या पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी “ओबामा केअर” च्या पक्षात मतदान करून संसदेत स्वतःची वेगळीच छाप पडली.

आपल्याच पक्षाचा राष्ट्रपती असूनही डोनाल्ड ट्रम्पच्या कित्येक धोरणांवर सडकून आणि येथेच्छ टीका केली. पण मध्यंतरी अचानक त्यांना ब्रेन ट्युमर झाल्याची बातमी आली आणि अवघी अमेरिका हळहळली.

ओबामांसकट सगळ्यांनी आपापल्या सदिच्छा व्यक्त केल्या, पण त्या ही व्याधीच्या छाताडावर उभे राहून, कपाळावर सर्जरी झाल्याची भली मोठी जखम मिरवत मॅक्केननी संसदेत उतरून आवेशात भाषण केले. आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. ट्रम्प राष्ट्रपती झाल्यावरही संसदेच्या armed force कमिटीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी जगभरात दौरे केले आणि अमेरिकेची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला.

काही दिवसांपूर्वी अटलजी गेल्यावर ज्या भावना आपल्याइथे जनमानसात होत्या, तश्याच भावना जॉन मॅक्केन गेल्यावर अमेरिकेत उमटल्या आहेत. “आज देश एका खऱ्या देशभक्ताला आणि एका सज्जन, निर्मल मनाच्या माणसाला मुकला…” असेच दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे आणि मतदारांचे म्हणणे आहे.

आजच्या एकमेकांच्या जीवावर उठलेल्या राजकारणात एक आदर्श राजकारणी कसा असावा याचे उदाहरण घालून देणाऱ्या जॉन मॅक्केन साहेबांना मनापासून श्रद्धांजली… ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो…

-लेखक : निखील सरदेशमुख

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?