Site icon InMarathi

भारताने साध्य केलेल्या ह्या अभिमानास्पद गोष्टी कितीतरी विकसित देशांनासुद्धा जमलेल्या नाहीत

ISRO-Satellite-Launched-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

साधारणपणे आपल्याकडील लोकांचा समज असतो कि परदेशात सुबत्ता आहे. युरोप, अमेरिका ,जपान हे देश आपल्या देशापेक्षा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप पुढे आहेत असे आपल्याला वाटते आणि काही अंशी हे खरे देखील आहे. युरोप अमेरिका म्हणजे जणू स्वर्गच आहे असे अनेकांना वाटते. तिथले ते सर्वच चांगले असा अनेकांचा ग्रह असतो.

परंतु आपला देश सुद्धा आता काही मागे राहिलेला नाही. आपल्याही देशात हुशार आणि मेहनती लोकांची अजिबात कमतरता नाही.

हुशारी व टॅलेंटच्या बाबतीत आपणही परिपूर्ण आहोत आणि म्हणूनच आपल्या देशाने अश्या काही गोष्टी केल्या आहेत ज्याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा कारण ह्या गोष्टी कितीतरी विकसित देशांना सुद्धा जमलेल्या नाहीत.

आज आपण भारतातील उत्तम गोष्टी ज्या जगात दुर्मिळ आहेत अश्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

भारताकडे जगातली सर्वात अत्याधुनिक रिमोट सेन्सिंग प्रणाली आहे. भारताचा रिमोट सेन्सिंग उपग्रह अमेरिकेच्या उपग्रहापेक्षाही जास्त अचूकतेने काम करतो. अमेरिकेच्या उपग्रहाकडून माहिती मिळण्यात बऱ्याचदा उशीर होतो. पण हेच काम भारतीय उपग्रह अचूकतेने करतो.

 

geospatialworld.net

तसेच कमी खर्चात अवकाशात उपग्रह सोडण्याची प्रणाली सुद्धा भारताकडे आहे. आपले इस्रो हे यशस्वीपणे अवकाशात उपग्रह सोडण्यात एक्स्पर्ट आहे. फार कमी देशांकडे ही विकसित प्रणाली आहे. तसेच भारतात मायक्रो व नॅनो उपग्रह विकसित करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.

भारतीय आयटी इंडस्ट्री ही जगातील दुसरी आयटी इंडस्ट्री आहे. जगात आयटी इंडस्ट्रीत पहिला नंबर चीनचा लागतो व दुसरा नंबर भारताचा लागतो. लवकरच आपण चीनला मागे टाकून पहिला क्रमांक मिळवायच्या तयारीत आहोत.

बहुभाषिक असण्यात आपला देश आघाडीवर आहे. आपल्या देशातील जवळजवळ प्रत्येक माणसाला कमीत कमी दोन तरी भाषा अवगत असतात. एक आपली मातृभाषा जी आपण घरातच शिकतो, दुसरी हिंदी जी घराबाहेर पडल्यावर कंपल्सरी येतेच आणि शाळेत सक्तीचा विषय असल्यामुळे इंग्रजीही आपण शिकतो!

 

amaindia.org

ह्याशिवाय अनेक लोक संस्कृत घेतात अनेक लोक फ्रेंच , जर्मन , स्पॅनिश ,जपानी अश्या परदेशी भाषा शिकतात. पाश्चिमात्य देशांत लोकांना इतक्या भाषा येत नाहीत जितक्या भारतीयांना येतात.

भारतीय कापडाची क्वालिटी जगात उत्तम समजली जाते. हातमागावरचे कापड, भारतातील विविध शहरातील रेशीम, खादी, कॉटन , जरदोजी कापड ,विविध ठिकाणच्या पारंपारिक वेशभूषा,त्यातील हजारो प्रकारचे डिझाईन हे भारतातील श्रीमंत व समृद्ध संस्कृतीचा वारसा सांगतात. म्हणूनच भारतीय कपड्यांची स्टाईल ही युनिक आणि खास म्हणून प्रसिद्ध आहे.

तसेच प्राचीन कलेचा वारसा सांगणारे आपले पारंपारिक शास्त्रीय नृत्याचे प्रकार सुद्धा जगप्रसिद्ध आहेत. भारतीय जेवण व भारतीय मसाले हे तर प्राचीन काळापासून जगात सर्वत्र प्रसिद्ध आहेत.

आपल्याला अभिमान वाटावा अशी आणखी एक गोष्ट म्हणजे भारतातील दिल्ली एयरपोर्ट हे सर्व्हिस देण्यात जगातील पहिल्या क्रमांकाचे एयरपोर्ट आहे. भारतातील एयरपोर्टस वर पिण्याचे पाणी मोफत मिळते जे युरोपमधील एयरपोर्टस वर सहसा मिळत नाही.

तसेच भारतात एयरपोर्टसवर मोबाईल किंवा लॅपटॉपच्या चार्जिंगची सुविधा सहज वापरता येते. भारतीय एयरपोर्टसवर जितक्या चांगल्या सुविधा मिळतात तितक्या युरोपमधील एयरपोर्टसवर मिळत नाहीत.

 

qz.com

आपल्या भारतात आपल्याला जितका स्वस्त मोबाईल डेटा मिळतो तितका स्वस्त इतर देशात मिळत नाही. आपल्याकडे जितक्या पैश्यात आपण महिनाभर मोबाईल डेटा वापरतो तेवढ्या डेटासाठी विकसित देशांमध्ये दहापट जास्त पैसे मोजावे लागतात.

भारताचे पब्लिक डेब्ट हे जीडीपीच्या ५० टक्के आहे. तेच युरोपचे ९० टक्के तर अमेरिकेचे ७८ टक्के व जपानचे २२० टक्के आहे. डेब्ट क्रायसिस हा विकसित देशांना मोठ्या चिंतेचा विषय आहे. तसेच आपल्याकडे लोकांचा पैसे वाचवण्याकडे जास्त कल आहे.

भारतीय माणूस हा केव्हाही कर्ज काढण्यापेक्षा खर्च कमी करण्यावर भर देतो. आणि असलेले पैसे सेव्ह करून ठेवतो. एका रिपोर्टच्या मते भारतीय लोक आपल्या मिळकतीच्या २८ टक्के रक्कम सेव्हिंगमध्ये टाकतात तर विकसित देशात हेच प्रमाण १५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

भारतात वैद्यकीय सेवा विकसित देशांपेक्षा स्वस्त आणि जास्त चांगली आहे. म्हणूनच अनेक परदेशी लोक भारतात उपचारासाठी येतात कारण तिकडे वैद्यकीय अत्यंत महागड्या आहेत. भारतात तुमच्या आजारावर कमी पैश्यात सुद्धा उपचार होऊ शकतात. अनेक विकसनशील देशात तुमच्याकडे पैसा कमी असेल तर तुम्हाला वैद्यकीय सेवा मिळत नाहीत.

भारतीय डॉक्टर कमी पैश्यात उत्तम उपचार करतात. तसेच ते सर्जरीमध्ये सुद्धा निष्णात असतात. तसेच परदेशात तुम्हाला साधे तापाचे औषध घ्यायचे असले तरी तुमच्याकडे इन्शुरन्स असणे गरजेचे असते. आपल्याकडे मात्र इतके कडक नियम नाहीत आणि तुलनेने औषधोपचार स्वस्त आहेत.

भारतात आपल्याला असंख्य टीव्ही चॅनेल्स अत्यंत कमी दरात बघता येतात. शिवाय अगदी ग्रामीण भागात सुद्धा केबलमुळे जवळजवळ सगळे चॅनेल दिसतात. तसेच अमेझॉन, हॉटस्टार, नेटफ्लिक्स सुद्धा आपल्याला कमी दरात उपलब्ध आहेत. हेच केबल विकसित देशात अनेकांना परवडू शकत नाही.

आपल्या देशात अगदी लहानश्या झोपडीत राहणाऱ्या माणसाकडे सुद्धा हल्ली टीव्ही व केबल असतं! गरीब माणसाला परवडेल असे केबलचे दर आपल्या देशात आहेत. पण अनेक देशात हे दर सामान्य माणसाला न परवडणारे आहेत.

 

fuccha.in

भारताची सिनेमासृष्टी जगातली दुसऱ्या क्रमांकाची मुव्ही इंडस्ट्री आहे. अमेरिकेच्या हॉलीवूड नंतर जगात भारताच्या बॉलीवूडचाच नंबर लागतो. भारतीय सिनेमे जगात सगळीकडे आवडीने विविध भाषांत डब करून पाहिले जातात. भारतातही आता सिनेमाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे भारतीय चित्रपटांत सुद्धा अनेक अत्याधुनिक गोष्टी बघायला मिळतात.

अनेकांना विश्वास बसणार नाही परंतु भारतातील करप्रणाली ही करदात्यांच्या फायद्याची आहे. युरोपियन देशात लोकांच्या मिळकतीचा ४० टक्के भाग हा सरकार कराच्या स्वरुपात कापून घेते.

आपल्याकडे स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक तसेच कमी मिळकत असणाऱ्यांना करात सवलत दिली जाते.परंतु विकसित देशात मात्र करप्रणाली अत्यंत कडक आहे.

भारतात उच्चशिक्षण घेण्यासाठी तुलनेने कमी पैसा लागतो. विकसित देशांमध्ये मात्र उच्चशिक्षणाचा खर्च खूप जास्त आहे.म्हणूनच भारतात उच्चशिक्षण घेण्याचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. अर्थात आपल्याकडे आपले आईवडील आपल्या शिक्षणाचा नोकरी लागेपर्यंत संपूर्ण खर्च करतात. परंतु परदेशात असे नाही.

परदेशात शिक्षणाचा खर्चही भरपूर आहे आणि तिकडे मुलांना स्वत:च स्वत:च्या उच्चशिक्षणासाठी आर्थिक सोय करावी लागते.अनेकांना इच्छा असून देखील पुरेसा पैसा नसल्याने उच्चशिक्षण घेता येत नाही.

 

Violence, Child. (Photo By BSIP/UIG via Getty Images)

भारतात शस्त्र बाळगण्यासाठी कडक नियम आहेत. सर्रास सर्वांना बंदूक वापरायला काय बघायलाही मिळत नाही. आपल्याकडची लहान मुले दिवाळीत टिकल्या फोडायला आणि रंग उडवायला बंदुकीच्या पिचकाऱ्या वापरून बंदुकीची हौस पुरी करतात.

अमेरिकेत मात्र अजाण लहान मुलांच्या हातात सुद्धा बंदूक सहज येऊ शकते.

लहान मुलांनी शाळेत गोळीबार करून लहान मोठ्यांचा जीव घेतल्याच्या अनेक घटना अमेरिकेत घडतात. भारतात शस्त्र बाळगण्याचे नियम कडक आहेत ही फार चांगली गोष्ट आहे.

म्हणूनच आपल्या देशाला कमी समजण्याचे कारण नाही. अर्थात आपल्या देशाला अनेक गोष्टीत सुधारणेसाठी प्रचंड वाव आहे परंतु हळू हळू चित्र बदलते आहे. आपण सर्वांनी प्रयत्न केले तर आपला देश सर्वच बाबतीत अग्रेसर होईल.

नावं ठेवण्यापेक्षा सकारात्मक विचार व प्रयत्न केले तर आपणही एक दिवस जगातील महासत्ता बनू हे नक्की!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version