आता खोटे आकडे पसरवणारी शाहरुख खानचीही आयटी सेल?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
अनेक जणांना एखाद्या गोष्टीबद्दल “राईचा पर्वत” करून सांगायची सवय असते. काम करायचं छोटंसं आणि जगासमोर प्रदर्शन असं करायचं की जणू एखादा पर्वतच उचलला आहे. एखादा माणूस स्वत: जरी आत्मस्तुती करत नसला तरी भाट लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीच्या एखाद्या लहानश्या कामाच्या सुद्धा फार मोठा गवगवा करतात.
आता तर सोशल मिडीयाच्या उदयापासून अनेक सेलेब्रिटीजचे पंखे आपल्या आवडत्या सेलेब्रिटीविषयीच्या गोष्टी वाढवून चढवून व्हायरल करत असतात.
याची प्रचीती नुकत्याच केरळमध्ये आलेल्या पुरानंतर अनेकांनी केलेली मदत आणि त्याचे फुगवून सांगितलेले आकडे पाहिल्यावर येते.
सध्या केरळमध्ये निसर्गाचा प्रकोप झाला आहे. जूनपासून पडत असलेल्या पावसामुळे तिथे महाप्रलयासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो लोकांनी ह्यात प्राण गमावले आहे, तर लाखो लोक बेघर झालेत. केरळमध्ये कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.
अश्यावेळी संपूर्ण देशच आपल्या केरळातील बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे.
केरळमध्ये पूर आला आणि तेथे मदतीचे आवाहन करण्यात आले. अनेकांनी शांतपणे मदत पाठवली तर अनेकांनी “मी कित्ती दानशूर” म्हणत मदतीचे आकडे जाहीर केले.
आपल्याकडे एक म्हण आहे कि ह्या हाताने दान केलं तर त्या हातालाही कळू नये. पण ऍडव्हर्टायझिंग का जमाना है भाई! स्वत:ची इमेज सुधारण्याची संधी कोण सोडेल?
ह्या सेलेब्रिटीजच्या फॅन्स लोकांनी तर सोशल मिडीयावर ‘माझा सेलेब्रिटी किती दानशूर” अशी चढाओढच लावली आहे. ह्या चढाओढीत लोक अनेक चुकीचे आकडे सांगत आहेत. परवाच न्यूज वाचली की बॉलीवूडच्या किंग खानने म्हणे केरळमधील पूरग्रस्तांसाठी ५ कोटींची आर्थिक मदत जाहीर केली.
सलमान निझामी नावाच्या पत्रकाराने ही बातमी दिली. ही न्यूज ऐकल्यापासून शाहरुख खानचे फॅन्स भारावून गेलेत.
तुम्हालाही अगदी गहिवरून यायच्या हे कळायला हवं, ही बातमी खोटी आहे!
म्हणजे किंग खानने केरळवासियांसाठी मदत पाठवली आहे. पण ती मदत ५ कोटींची नसून २१ लाखांची आहे आता ह्याबद्दल त्याचे तुम्हाला हवे तर कौतुक करा किंवा इतकं काय त्यात, ते त्याचे कर्तव्यच आहे असे म्हणून सोडून द्या!
Shahrukh Khan didn’t tweet,
Shahrukh Khan didn’t brag,
Shahrukh Khan didn’t go to media.Shahrukh Khan donated 5 crore for Kerala flood victims- silently. Something @Paytm head shud learn- Charity is not Business, it’s a sign of humanity!
We love you @iamsrk bhai!
— Salman Nizami (@SalmanNizami_) August 19, 2018
ह्या सलमान निझामी साहेबांनी आपल्या ऑफिशियल ट्वीटर अकाऊंटवर शाहरुख खानने केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदत केल्याबद्दल त्याचे कौतुक केले.
इतकेच नव्हे तर त्याने ह्या बातमीचा युट्यूब चॅनेलवरचा व्हिडीओ सुद्धा अपलोड केला.,
“शाहरुख खानने कुठले ट्विट केले नाही की शाहरुख खानने कसल्याही बढाया मारल्या नाही. शाहरुख खान प्रसारमाध्यमांकडे गेला नाही . शाहरुख खानने शांतपणे केरळातील पूरग्रस्तांसाठी ५ कोटींची देणगी कोणताही गाजावाजा न करता दिली.”
paytm च्या मुख्य अधिकाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की समाजसेवा किंवा मदतकार्य हा व्यवसाय नाही. ते माणुसकीचे लक्षण आहे. SRK भाई वी लव्ह यु!” असे ह्या व्हिडीओचे कॅप्शन होते.
नेटकऱ्यांना जेव्हा कळले की ही बातमी सपशेल खोटी आहे तेव्हा अनेकांनी ह्या पत्रकार साहेबांवर हल्लाबोल केला व शाहरुखने ५ कोटींची नाही तर २१ लाखांची देणगी दिली ह्याचे पुरावे दिले. ह्यानंतर ह्याच पत्रकार साहेबांनी परत ट्वीट करून शाहरुख खानने २१ लाखांचीच देणगी दिल्याचे कन्फर्म केले.
Shahrukh Khan’s office just confirmed me that his NGO has also donated 21 lakhs, many of his fans are sending the relief material to Kerala through trucks. Big salute!
— Salman Nizami (@SalmanNizami_) August 19, 2018
“शाहरुख खान ह्यांच्या ऑफिसने कन्फर्म केले आहे कि त्यांच्या NGO ने २१ लाखांची मदत केली आहे. तसेच शाहरुख ह्यांचे अनेक चाहते केरळला अनेक आवश्यक वस्तू मदत म्हणून ट्रकमधून पाठवत आहेत. बिग सॅल्यूट!” असे ते ट्वीट होते.
शाहरुख खान ह्यांच्या मीर फाउंडेशन ह्या वेलफेअर संस्थेकडून ही २१ लाखांची मदत केरळमध्ये पाठवण्यात आली आहे.
.@iamsrk Meer Foundation has donated Rs 21 lakh to a relief group working amongst flood victimshttps://t.co/wQ4swRrk1w
— Firstpost (@firstpost) August 19, 2018
परंतु त्यांनी ५ कोटींची देणगी दिल्याचे कुठेही अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाही तरीही ह्या पत्रकार साहेबांनी शाहरुख खानच्या २१ लाखांत स्वत:च्या मनाची भर घालून मदतीचा आकडा ५ कोटी इतका फुगवला.
ही खोटी बातमी व्हायरल करून निझामी साहेबांनी जगासमोर स्वत:चे तर हसे करून घेतलेच पण त्यांच्या ह्या कृतीमुळे नेटकऱ्यांनी शाहरुख खानला व त्याच्या चाहत्यांना सुद्धा ट्रोल करण्याची संधी सोडली नाही.
अशीच बातमी सनी लिओनीबद्दल सुद्धा व्हायरल झाली. सनी लिओनीने केरळच्या पूरग्रस्तांसाठी ५ कोटी देणगी दिल्याची बातमी, फोटो नेटवर व्हायरल झाले. अनेक लोकांनी ही बातमी खरी समजून ह्यावर ट्वीट देखील केले कि ,
”सनी लिओनीने केरळला ५ कोटींची मदत पाठवली. सनी, तुझ्या ह्या कार्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. रिस्पेक्ट!” तर एकाने ट्वीट केले की, ”सनी लिओनीने केरळच्या मदत कार्यात ५ कोटींची देणगी दिली. अशा वेळी कुठे गेले आपले बॉलीवूडचे सेलेब्रिटी?
–
श्री श्री रविशंकर , राम देव, अंबानी आणि अनेक बिझनेसमन अश्या संकटाच्या काळात कुठे गेले? सनी लिओनीच्या देणगीशी इतर राज्यांनी केलेल्या मदतीची तुलना करा.”
हे सगळे नेटवर व्हायरल झाले असताना सनीचे मात्र ह्यावर मौन आहे. तिने ह्यावर कुठलेही भाष्य केले नाही. एका वृत्तवाहिनीने सनीला संपर्क करून ह्यासंदर्भात विचारले असता तिच्या टीमने उत्तर दिले की ह्या व्हायरल झालेल्या बातमीविषयी सनीला काहीही बोलायचे नाही.
तिने ह्या मदतकार्यात किती देणगी दिली हे ही ती जाहीर करू इच्छित नाही. म्हणजेच सनीने ५ कोटी दिल्याची बातमी खरी म्हणता येणार नाही.
एखाद्या संकटाच्या काळी दिलेली मदत अशी मोजत नसतात. प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे जो तो मदत देत असतो. शाहरुखसारख्या अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनीही अशी मदत केली. ही गोष्ट स्वागतार्ह आहे
पण सोशल मिडीयावर अतिउत्साही मंडळी कसलीही शहानिशा न करता काहीही व्हायरल करत असतात. म्हणूनच शहाण्या माणसाने त्याच्यावर विश्वास ठेवू नये. ना शाहरुख खानने ना सनी लिओनीने केरळसाठी ५ कोटी देणगी दिली. दोघांनीही देणग्या दिल्या पण त्याची त्यांना प्रसिद्धी नको होती.
त्यांच्या अतिउत्साही चाहत्यांनी खोट्या बातम्या सगळीकडे पसरवल्याने त्यांना उगाचच ट्रोल केले गेले आणि ज्यांनी ह्या बातम्या शहानिशा न करता फॉरवर्ड केल्या त्यांनाही ट्रोलिंगचा चांगलाच अनुभव आला.
म्हणूनच कुठल्याही गोष्टीची पक्की खात्री असल्याशिबाय बोलू नये हेच खरं!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.