आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
हिंदू सण, प्रथा, परंपरा म्हणजे काहीतरी भयंकर “वाईटच” असं मानणारे अनेक “विचारवंत” आपल्याकडे आहेत. होळी म्हणजे स्त्रियांना जाळणारा “पुरुषसत्ताक सण” अश्या प्रकारच्या “श्रद्धा” अनेकांनी घट्ट रुजवून घेतल्या आहेत. सुदैवाने, बहुतांश भारतीय (हिंदू – अहिंदू…सर्वच!) समाज बऱ्यापैकी समजूतदार असल्याने अश्या विद्वेषी प्रचारास कुणी भीक घालत नाही.
आणि त्यामुळे आपला एकोपा कधीच तुटत ही नाही.
परंतु ह्या अश्या विकृत विद्वेषी प्रचारकी लिखाणाचा प्रकार काही थांबत नाहीये!
ह्याच धर्तीवर, अक्षय बिक्कड ह्या तरुण विचारवंत कार्यकर्त्याने, फेसबुकवर एक उपहासात्मक पोस्ट लिहिली आहे.
“रक्षाबंधन” हा गोड सण जर अश्याच विद्वेषी लिखाणाद्वारे बदनाम करायचा असेल तर कसा करता येईल – ह्यावर उत्कृष्ट कल्पनाविस्तार अक्षय बिक्कड ने केला आहे. तो इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत.
===
रक्षाबंधन का करू नये..?
कोणे एके काळी (म्हणजे साधारण पाच हजार वर्षांपूर्वी) बहुजनीस्थान (म्हणजे आजचा हिंदुस्थान) मध्ये ‘मर्कटासूर’ नावाचा एक सर्वगुण संपन्न राजा (लोकशाही पद्धतीने निवडून दिलेला आणि संविधानानुसार चालणारा) गुण्या गोविंदाने राज्य करत होता.
प्रजा सुखी होती. कारण त्या राजाने कधीही ‘नोटबंदी-जीएसटी’ सारखे आचरट निर्णय घेतले नव्हते. ‘बुद्धिजीवी’ वर्ग सुखात लोळत होता म्हणून ‘असहिष्णुता, पुरस्कार वापसी’ वगैरेची फॅशन पण नव्हती. शेतमालाला हमीभाव होता, दर चार आठ वर्षातून एकदा ‘कर्जमाफी’ दिली जायची.
एवढंच नाही तर त्याने काश्मीर पाकिस्तान ला देऊन टाकलं होतं म्हणून पाकिस्तान सोबत सौहार्दाचे संबंध होते आणि अरुणाचल चीन ला देऊन टाकल्यामुळे चीन सोबत चांगले संबंध होते.
गरज नसल्यामुळे सैन्याला सुट्टी देऊन टाकली होती.
देशभर होणाऱ्या सगळ्या गुन्ह्यांचा निकाल टीव्ही डिबेट मधेच ‘प्रत्येक विषयातले जाणकार’ बोलावून चर्चेतून (?) लावला जायचा म्हणून न्यायालय,पोलिसयंत्रणा यांची गरज नव्हती.
थोडक्यात काय तर राज्यात सगळं आलबेल होतं.
अशा या गुणी राजाला त्याच्या इतकीच गुणी, सुंदर,सुशील, पाककलेत निपुण अशी एक कन्या होती. तीच नाव ‘राखी’.
राखी उच्च विद्या विभूषित होती. त्याचबरोबर आंदोलन कलेत देखील पारंगत होती. शाळेत असतानापासून ती आंदोलनात भाग घ्यायची, त्यांचं नेतृत्व करायची.
कॉलेज मध्ये असताना तिने अन्याय अत्याचाराचं प्रतीक असलेली मनुस्मृती उभी आडवी जाळली होती. तेव्हा ती सर्वप्रथम ‘प्रकाश’ झोतात आली होती.
अशी हि विद्रोही कन्यका मनुवाद्यांचा ‘डोक्यात’ न बसती तर नवल. मर्कटासुराच्या राज्यात मनुवाद्यांचं फारसं काही चालत नसे. ते त्यांच्या विघातक कारवाया लपून छपून पार पाडत. नालासोपारा, मालेगाव वगैरे भागात त्यांचा थोडाफार प्रादुर्भाव होता. त्याठिकाणीच त्यांची प्रशिक्षणाची गुप्त केंद्रे होती.
तर या सनातनी डोक्यांनी मर्कटासुराच्या कन्येला म्हणजेच राखीला संपवत नाही तोवर ‘शेंडीला गाठ बांधणार नाही’ अशी ‘भीष्म’ प्रतिज्ञा केली.
जनमानसात मिसळून रहाण्याची आवड असल्यामुळे राखीच्या सोबत अंगरक्षकांचा फौजफाटा नसायचा.
याच गोष्टीचा फायदा घेऊन समाज कंटकांनी राखीचे अपहरण करून तिला बंदिस्त केले. आणि पुढे तिचे हाल हाल करून मारले.
आपल्या अगदी आवडत्या कन्येचे अपहरण झाल्याने आणि त्यावर काहीच करू शकत नसल्याने मर्कटासुराने आत्महत्या केली. याच राजकीय अस्थैर्याचा फायदा घेऊन मनुवाद्यांनी सत्ता हस्तगत केली.
परंतु राखीवर झालेला अत्याचार जनता विसरली नव्हती. म्हणून तिच्या स्मरणार्थ ते राखी बंधन हा दिवस साजरा करू लागले.
पुढे मनुवाद्यांनी याचे रेफरन्सेस बदलून टाकले आणि आपली दिशाभूल केली.
मित्रांनो, या बामणांच्या नादी लागून हा दिवस आनंदात साजरा करून तुम्ही आपल्यासाठी बलिदान देणाऱ्या राखीच्या हौतात्म्याचा अवमान करत आहात.
मित्रांनो जागे व्हा.
(‘भारतीय सणांचे वास्तव आणि विपर्यास – काळ्या पिवळ्या इतिहासाची साक्षेपी मांडणी’ या पुस्तकातून उधार)
: अक्षय बिक्कड
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.