अख्खा इस्लाम धर्म विरुद्ध एकटी मुस्लिम महिला: एक थरारक युद्ध पेटलंय! : भाग २
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
अयान हिरसी अली या डच अमेरिकन सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या इस्लामविरोधी भूमिकेमुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्या मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांना जागतिक स्तरावर वाचा फोडतात. मुलींचे जबरदस्तीने करून देण्यात येणारे लग्न,ऑनर किलिंग तसेच बालविवाह व फिमेल जेनायटल म्युटीलेशन ह्याविरोधात आवाज उठवून त्या जनजागृती करत आहेत.
त्यांनी महिलांच्या अधिकारांसाठी एक AHA Foundation ही संस्था स्थापन केली आहे. त्यांनी थिओ व्हॅन गॉग ह्यांच्यासह “सबमिशन” हा मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार दाखवणारा एक चित्रपट तयार केला. ह्यामुळे वादंग उठले व अयान ह्यांना ठार मारण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या. त्यात थिओ व्हॅन गॉग ह्यांची हत्या झाली.
त्यांच्या हेरेटिक ह्या पुस्तकात त्यांनी इस्लाम धर्मात कट्टरपंथीयांना हरवून सुधारणा करण्याविषयी लिहिले आहे. त्या सुधारणावादी मुस्लिमांना पाठींबा देतात.
आपल्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करताना अयान ह्यांच्या मार्गात इस्लामी कट्टरवाद आडवा आला. कारण जे आयुष्य अयान ह्यांना हवे होते त्याच्या अगदी विरुद्ध प्रथा इस्लाममध्ये आहेत. म्हणूनच हे कट्टरपंथीय अयान ह्यांना ठार मारू इच्छितात.
प्रेषित मोहम्मदांची शिकवण व कुराण हेच अंतिम सत्य आहे. त्यांच्यावरच संपूर्ण श्रद्धा ठेवून त्यांना शरण जाणे हेच लहानपणापासून अयान ह्यांना शिकवले गेले.
त्यांनीही त्यावरच श्रद्धा ठेवली. अल्लाहची आपल्यावर कृपा व्हावी ह्यासाठी त्यांनीही धर्मात सांगितले ते सर्व पाळले.
म्हणूनच जेव्हा त्यांचा परिवार केनियाला स्थायिक झाला तेव्हा इस्लामच्या नियमाप्रमाणे व केनियातील लोकांप्रमाणे अयान ह्या सुद्धा डोक्याला हिजाब बांधत असत.
अयान म्हणतात की,
“हे सर्व करण्यात मला थ्रील वाटू लागले. ती एक सुखद भावना होती. मला अगदी सशक्त असल्यागत वाटू लागले होते. ह्या सर्व कव्हरखाली कोणाला संशयही येणार नाही अशी स्त्रीत्वाच्या श्रेष्ठत्वाची भावना होती जी धर्माभिमानी लोकांच्या मते घातक होती. मी एक अस्सल मुस्लीम आहे असा संदेश ह्यातून जात होता.”
ह्यानंतर अयान एका प्रार्थना करणारा गृपला सामील झाल्या. ह्या ठिकाणी अल कायदाला प्रोत्साहन व प्रेरणा देणारे सय्यद कुतुब व हसन अल बना ह्यांचे विचार सांगितले जात असत. ह्या विचारांचा अयान ह्यांच्यावर प्रभाव पडू लागला.अयातुल्ला खोमेनी ह्यांनी सलमान रश्दी ह्यांच्या पुस्तकांत असलेल्या इस्लामविरोधी मजकुरामुळे त्यांना ठार मारायला हवे असे घोषित केले होते.
तेव्हा अयान ह्यांना सुद्धा सलमान रश्दींना ठार मारायला हवे असे वाटत असे. म्हणूनच त्या काळात अयान स्वत: रश्दींना ठार मारायला तयार होत्या किंवा जे रश्दी ह्यांना ठार मारतील त्यांना मदत करायलाही तयार होत्या असे त्या सांगतात.
अयान ह्यांच्या मते इस्लाममध्ये जिहाद हे सहावे कर्तव्य मानले गेले आहे. म्हणूनच जेव्हा इस्लामच्या नावाखाली हिंसा होते तेव्हा अनेक मुसलमान लोक त्याविरुद्ध बोलू शकत नाहीत. तसेच इस्लाममध्ये सांगितल्याप्रमाणे जे जिहाद करतात ते अत्यंत शूर असतात व त्यांना त्यांचा मान दिला पाहिजे.
त्या काळात ह्या कट्टरपंथीयांचा अयान ह्यांच्यावर प्रभाव पडला होता. अशातच त्यांचे वडील जे इतकी वर्ष त्यांच्या बरोबर नव्हते ते अचानक परत आले व त्यांनी घोषणा केली कि त्यांनी अयानसाठी एक योग्य मुलगा बघितला आहे. अयान ह्यांना तो मुलगा अजिबात आवडला नव्हता तरीही त्यांच्याकडे काही इलाज नव्हता.
तो मुलगा कट्टर विचारांचा होता. आणि त्याला अयानशीच लग्न करायचे होते.
अयान ह्यांना माहिती होते की, त्यांच्याकडून सर्वांना फक्त समर्पणाची अपेक्षा आहे. मुस्लीम मुली आपले निर्णय स्वतः घेत नाहीत व आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगत नाहीत. हीच अयान ह्यांच्याकडून सर्वांना अपेक्षित होते.
परंतु अयान लग्नासाठी तयार नव्हत्या. त्या नेदरलँड्सच्या विमानात बसून आश्रयासाठी नेदरलँड्सला आल्या. त्या तिथे पोहोचल्या तेव्हा त्यांच्या मनात ह्या जागेबद्दल प्रचंड धास्ती होती. त्यांना वाटले होते कि ह्या देशात भ्रष्ट किंवा वाईट माणसे भेटतील परंतु इतका शांत आणि सुंदर देश पाहून त्या चकित झाल्या. त्यांना हा देश म्हणजे स्वर्गच वाटला.
–
- “मुस्लिम तरुणींनी बँक कर्मचाऱ्यांशी लग्न करणे धर्मविरोधी”- नवा फतवा!
- “धर्मग्रंथ की माणसं?” एका हिंदूत्ववाद्याचा मनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना कळकळीचा प्रश्न
–
“आम्ही कट्टरतावादी लोक ह्या देशातील लोकांना नास्तिक किंवा धर्मनिंदक समजत असू. परंतु मी बघितले कि ह्या देशातील लोक चांगले समृद्ध जीवन जगत आहेत. येथे समलैंगिकांनाही स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला भाषणस्वातंत्र्य आहे. मग मी आश्रयाच्या शोधात असलेल्या लोकांच्या सेंटरला गेले आणि तिथे मी बघितले कि इथे जी माणसे आहेत ती जवळजवळ सगळीच मुस्लीमबहुल देशातून आली आहेत. ही माणसे ह्याच “नास्तीकांकडे” आश्रय व मदत मागत आहेत.
मग मी विचार केला की, जर आपण स्वत:ला इतके श्रेष्ठ समजतो तर मग ह्या “नास्तिक” लोकांकडे मदतीची भीक का मागतो?” असे अयान सांगतात.
त्या पुढे सांगतात की,
मी हिजाब शिवाय रस्त्यावर बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या मनात भीती होती कि हिजाब न घातल्याने माझ्यावर ही नास्तिक माणसे अत्याचार करतील किंवा मला त्रास देतील. परंतु मी रस्त्यावर हिजाब न घालता गेले तरीही कोणीही माझ्याकडे दुसऱ्यांदा वळून सुद्धा बघितले नाही.
त्यानंतर मी अनेक प्रयोग करून बघितले. मी मद्य पिऊन बघितले , बॉयफ्रेंड शोधला आणि वाचनालयात जाऊन ज्ञान मिळवले. कधी कधी असे वाटायचे कि जे जे पुस्तक मी वाचले त्यातील प्रत्येक पान माझ्या विचारांना आव्हान देत होते. ह्याच ज्ञानामुळे युरोपियन लोकांनी जुनाट गोष्टी, प्रथा सोडून स्वतःची प्रगती केली.
प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे व सारखी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपापले निर्णय घेण्याचा व स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगण्याचा अधिकार आहे हे युरोपमध्ये रुजलेले विचार मला कळले. हे विचार त्यांनी लहानपणापासून ज्या धर्माचे पालन केले त्या धर्माच्या अगदीच विरुद्ध विचार होते.
त्यानंतर त्यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. सप्टेंबर २००१ साली मॅनहॅटन येथे जिहादी हल्ला झाला. हा हल्ला करणारा मुख्य जिहादी मोहम्मद हा अयान ह्यांच्याच वयाचा होता. त्यांना असे वाटले कि त्या ह्या हल्लेखोराला ओळखतात. वेळीच त्यांनी केनिया सोडले नसते तर आज कदाचित त्या सुद्धा अश्या जिहादी हल्ल्यांत सामील झाल्या असत्या. हा हल्ला झाला तेव्हा काही कट्टरवाद्यांनी ह्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या लोकांच्या मृत्यूचा आनंद नेदरलँड्समधील रस्त्यावर साजरा केला.
अयान ह्यांनी बघितले कि घरगुती हिंसाचारच्या बळी असलेल्या महिलांमध्ये मुस्लीम महिलांचे प्रमाण जास्त आहे.ह्या स्त्रिया पुरुषांच्या दहशतीपासून लांब जाण्यासाठी domestic violence shelters च्या आश्रयाला येतात.
डच शहरांमध्येही जबरदस्तीने लग्न करून देण्याचे व ऑनर किलिंगचे प्रमाण भरपूर आहे. त्यांना मुस्लीम महिलांना हे जाणवून द्यायचे होते कि त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे व त्या अत्यंत भयानक आयुष्य जगत आहेत. त्यांना मुस्लीम महिलांना ह्याविरुद्ध प्रतिकार करण्यास उद्युक्त करायचे होते.
त्यांनी लोकांमध्ये ऑनर किलिंगविषयी जागृती निर्माण केली. ह्यासाठी त्यांनी इंग्लिश फेमिनिस्ट मेरी वॉलस्टोनक्राफ्ट ह्यांची मदत घेतली. ह्यामुळे त्यांना सेंटर राईट लिबरल पार्टीने मेम्बर ऑफ पार्लमेंट होण्यासाठी निवडणूक लढण्याची विनंती केली. अयान ह्यांना भरपूर मते मिळाली व त्या निवडुन आल्या.
त्यामुळेच त्यांची थिओ व्हॅन गॉग ह्यांच्याशी ओळख झाली. परंतु थिओ व्हॅन गॉग ह्यांच्या हत्येनंतर अयान ह्यांना सुरक्षा देण्यात आली व त्यांना क्वचितच घराबाहेर पडण्यास मिळत असे.ह्या सर्व घटनांमुळे एका नव्या क्रांतिकारी अयान हिरसी अली ह्यांचा जन्म झाला.
क्रांतिकारी अयान ह्यांना वाटतं की,
धर्मात सुधारणा होऊ शकत नाही. धर्मात बदल घडू शकत नाहीत. त्यांच्या मते जे करोडो मुसलमान लोक शांततापूर्ण व नियमांना धरून आयुष्य जगत आहेत ते खरा इस्लाम फॉलो करत नाहीत. किंवा ते ह्या धर्मातली शिकवण टाळून विवेकबुद्धीचा वापर करणे आणि इस्लामच्या मागण्यांची पूर्तता करणे ह्या द्वंद्वात आयुष्य जगत आहेत.
त्या पुढे सांगतात की, प्रेषित मोहम्मदांना मुसलमान फार मानतात आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करतात.परंतु त्यांच्या आयुष्यात त्यांनी अशी काही कामे केली की, जी अयोग्य किंवा ते गुन्हे आहेत.त्या म्हणतात की, the war on terror is a war on Islam, आणि इस्लाम हे नवे फॅसिजम आहे.
परंतु “सुधारणावादी अयान” ह्यांची मते ह्याउलट आहेत. त्या म्हणतात कि इस्लाममध्ये सुधारणा होणे शक्य आहे व त्याची सध्या जगाला व मुस्लीम जनतेलाही आत्यंतिक गरज आहे.इस्लाममध्येही असे काही तुरळक लोक आहेत जे धर्माचे पालन करून चांगल्या सुधारणा घडवून आणू इच्छितात. इर्शाद मांजी व तौफिक हमीद हे त्यापैकीच दोघे आहेत. ते धर्मात राहून, त्याचे पालन करून, त्यात सुधारणा आणून, मुसलमान जनतेचे व पर्यायाने जगाचे भले करण्याची इच्छा बाळगतात.
त्यांच्या वडिलांनी सुद्धा सौदी अरेबियात वास्तव्य असताना त्यांना सांगितले की, हे लोक जे Wahabbism चा पुरस्कार करत आहेत तो खरा इस्लाम नव्हे. हे लोक खऱ्या इस्लाम धर्माला भ्रष्ट करत आहेत. इतर धर्मियांचे इस्लाम मध्ये धर्मांतर हे जबरदस्तीने व हिंसेने होता कामा नये तर त्यांच्यापुढे चांगली उदाहरणे ठेवून त्यांना इस्लाम धर्माचा अवलंब करण्यास उद्युक्त करायला हवे.
अयान म्हणतात की, त्यांचे वडील हे ह्याप्रकारे धर्म व त्यांची सदसद्विवेकबुद्धी ह्यांची सांगड घालत होते.
सध्या अयान ह्या मेम्बर ऑफ पार्लमेंट नाहीत. त्यांची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. त्या स्वतःच्या सुरक्षेसाठी येणारा खर्च स्वत:च करत आहेत. आयुष्यात इतके कठीण प्रसंग येऊनही ,ठार मारण्याच्या धमक्यांना तोंड द्यावे लागत असूनही त्या त्यांचे कार्य नेटाने करत आहेत. व्यवस्थेशी ,कट्टरपंथीयांविरुद्ध लढा देत आहेत.
जीवावरचे संकट असूनही त्या म्हणतात की ,
मी न घाबरण्याचा व ठामपणे ह्याविरुद्ध उभी राहण्याचा प्रयत्न करतेय. कधीतरी मलाही भीती वाटते. परंतु मी नशीबवान आहे. माझ्या आयुष्यात असे अनेक क्षण आले की, तेव्हा मी चुकीचा निर्णय घेतला असता तर माझे आयुष्य आणखी कठीण असले असते. केनियात राहिले असते किंवा वडिलांनी ज्याच्याशी लग्न ठरवले होते ते केले असते तर मी माझ्या आई सारखेच अत्यंत दीनवाणे व दु:खी कष्टी आयुष्य जगले असते.
मोगादिशु येथे जन्मलेल्या किती मुली आज जिवंत आहेत? किंवा त्यापैकी किती जणींना त्यांचा स्वतःचा आवाज आहे? परंतु मी जिवंत आहे. माझ्याप्रमाणेच इतर मुस्लीम स्त्रियांची कैफियत जगाला कळावी ह्यासाठी लढते आहे!
–
- हसताय ना? हसायलाच पाहिजे ! – इस्लामी धर्मगुरुंचे मनोरंजक फतवे : भाग १
- अख्खा इस्लाम धर्म विरुद्ध एकटी मुस्लिम महिला: एक थरारक युद्ध पेटलंय!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.